Login

खा बाई खा .....

An old women story ...

सकाळपासूनच आजींची तब्येत नरम गरम होती. अनु, आजींची सून औषध घेऊन आजींच्या खोलीत आली...

"आई, आता बरं वाटतयं का तुम्हाला ? उलटी होऊन गेली ते एक बरं झालं. हे घ्या आलं लिंबाचा रस आणला आहे. हे थोडं थोडं आज दिवसभर घ्या म्हणजे तुमचा अपचनाचा त्रास कमी होईल."

"अनु, कित्ती प्रेमाने करतेस ग पोरी....तू इतकी माझी काळजी घेतेस आणि मी ...."

" आई, अहो असं का म्हणता.... खरं तर मी विचार करते, काल असं काय खाण्यात आलं तुमच्या, की तुम्हाला अपचन झालं असेल. मी काल बाहेर जाताना तुमचा पथ्याचा स्वयंपाक करूनच बाहेर गेले होते. कशानी तुम्हाला त्रास झाला असेल मग?"

"अनु, तुला खरं सांगू का?? काल तू दिवसभर बाहेर लग्नाला गेली होतीस, तेव्हा घरात माझ्यावर लक्ष ठेवायला तू नव्हतीस. मग काय माझा माझ्या तोंडावरचा ताबा सुटला. मी फार खादाडपणा केला....."

" म्हणजे ??  काय सांगताय तुम्ही?"

" तू बनवून गेलीस ते माझ पथ्याच दुपारचं जेवण, कमी तिखट तेलकट ते मी जेवले आणि थोड्यावेळ बाहेर सोफ्यावर बसून होते. तेव्हढ्यात तिथे अर्पिता आली आणि तिच्या हातात ते काय बर म्हणतात, ते फणता का काय ते पेय होतं."

" फँटा, म्हणायच आहे का? ते केशरी कोल्ड ड्रिंक्??"

" हां, तेच ते....तर अर्पिता ते घोट घोट चवी चवीनं पित होती, तिला पाहून मलाही राहवलं नाही.... मी म्हटलं दे ग मला पण तुझ ते फणता घोटभर"

"आज्जी, तू पिणार हे? अगं ते गोड गोड, सोडा घातलेलं सरबत असतं, तुला त्रास होईल उगाच नको तू पिऊ - असं पोर बोलली मला, पण तरी मे ते प्यायले. ते गार गार बरं वाटलं पिताना जीभेला पण नंतर पोटाला पण सोसायला हवं ना ....."

" असूद्या हो आई, कधीतरी घेतलं तर ठीक आहे"

" ते पिऊन झालं अन् मला नुसते ढेकर येत राहिले बघ.... अ्अअअ....बघ आत्ता पण नाव काढल त्या फणताच आणि मला ढेकर आला"

" हाहाहाहा, आई तुम्हीपण ना... बरं वाटेल तुम्हाला नका काळजी करू"

" अगं पण मी तेवढ्यावर थांबले नाही, दुपारी मी थोड्यावेळ वामकुक्षी घेतली. उठले तेव्हा चिन्मय मला म्हणाला, आज्जी आज मी चहा करून देतो तुला, आईने मला सांगितलं आहे आज मी नाहीये आजीला पाच वाजता चहा करून दे"

"पोरगं छान करतो ग चहा, माझ्या लेकाला देखील असा छान मसाला घालून चहा येत नसेल, पण तुझ पोरगं हुश्शार हां अनु.....
हां, तर मी चहात एक बिस्कीट घेतलं आणि टीव्ही पहात बसले"

"थोड्यावेळाने घरात छान सुवास दरवळू लागला.... म्हटलं काय शिजतंय रे पोरांनो? तर चिन्मय आणि अर्पिताने त्या मासाल्यातल्या झटपट शेवया केल्या होत्या. तुला सांगते, पोरांनी काय पटापट केलं सगळं, ओला वाटाणा घातला, कांदा, टोमॅटो, थोडं गाजर, वाह वाह! "

"अगं दिसतच इतकं छान होतं, माझ्या बाई तोंडाला पाणीच सुटल....त्यांना म्हटलं द्या रे मला पण दोन चमचे चाखायला"

"आई, तुम्ही मॅगी नूडल्स खाल्ले? अरे देवा.....पण आवडले का तुम्हाला?"

"बरं लागलं तसं, भाज्या माझ्या कवळीने चावल्या गेल्या अन् त्या शेवया नोडलस त्या गिळल्या गपकन...."

"आई, तुम्हीपण ना..... मी एक दिवस काय नव्हते तर तुम्ही कालचा दिवस खाबुगिरी करत साजरा केला. मी हे सगळ तुम्हाला देत नाही कारण त्याचा तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून."

" हो, ग पोरी.... तू माझ्या पथ्याची किती कटाक्षाने काळजी घेतेस आणि मी बघ काल एखाद्या लहान मुलासारखा नुसता खादाडपणा केला."

" म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असतं ना आई....."

" आणि एक सांगू? रागावशील पण तू... काल रात्री जेवताना मी मऊ खिचडी खाल्ली नाही!"

"काय, मग काय खाल्लं??"

"तुम्ही दोघे तर रात्री उशीरा लग्नाचं जेऊनच घरी येणार होतात. तसं तू आधीच बोलली होतीस. तेव्हा मुलांना हवं ते बाहेरून मागवून जेवा असं सागितलं होतस. पोरांनी पिझ्झा मागवला होता आणि मी पण त्यातला एक त्रिकोणी तुकडा खाल्ला!"

सासूबाईंचा कालचा खाण्याचा उपक्रम ऐकून अनुने डोक्याला हात लावला!!

" आता तू मला रागावशील ना? काय मी पण या वयात सोसत पण नाही आणि असं वागणं मला शोभत नाही. छे, चुकलंच माझ मेलीच!"

" आई आहो, असं का म्हणताय..."

"अनु, नको होतं खायला मी, मला बाई फार अपराध्यासारखं वाटतंय आता."

" असं नका म्हणू तुम्ही, होते इच्छा कधी तरी असं वेग वेगळं खाण्याची. पण तुम्हाला आता या वयात सोसणार नाही म्हणून मी देत नाही तुम्हाला. पण एखाद्या दिवशी तुम्ही खाल्लं, म्हणून अपराधी वाटून घेऊ नका. काल एकाच दिवशी एकदम असं अरबट चरबट पोटात गेलं, म्हणून तुम्हाला अपचन झालं, वाटेल बरं नका काळजी करू"

"आणि आई, ती अपराधीपणाची भावना आधी मनातून काढून टाका बरं. वेगळं काहीतरी खावस वाटणं हा काही अपराध नाही. मी असं करीन तुम्हाला जरा वेगळं खावस वाटलना, की मला सांगा, मी देईन तुम्हाला करून पण असं एकदम एकावर एक नको, त्याचा त्रास होईल....."

आलं लिंबाचा पाचक रस आजींना चमच्याने अनुने दिला....

"गुणाची ग सून माझी...." आजींनी अनुच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला .....

समाप्त

©तेजल मनिष ताम्हणे


 

0