खजुर ड्रायफ्रूटची बर्फी
हल्ली मुलांच्या डब्यात काय द्यावं काही कळतं नाही. दोन दोन डबे द्यावे लागतात. एक मोठ्या सुट्टीचा डबा आणि एक छोट्या सुट्टीचा. मोठ्या सुट्टीत भाजी पोळी आणि छोट्या सुट्टीत मग फळे बिस्किटे असे काहीही द्यावे लागतात. मग म्हंटले छोट्या डब्यात पण काहीतरी पौष्टिक दिले गेले पाहिजे. जेणेकरून पोट पण भरेल आणि सकाळी सकाळी काहीतरी दमदार खाल्ल्या जाईल.
साहित्य: पावकिलो खजुर, खसखस, काजू, बदाम, पिस्ता, मनुके, अक्रोड हे सगळे आपल्या आवडीनुसार घ्यायचे किंवा मग प्रत्येकी शंभर ग्रॅम घ्यायचे.
कृती: १) खजुर मिक्सरमध्ये बारीक करून घेणे.
२) खजुर बारीक होत नसेल तर अगदी थोडेसे पाणी घालून पेस्ट करून घ्यायची. जास्त बारीक नाही झाली तरी चालेल.
३) ही खजुराची पेस्ट कढईमध्ये चमचा भर तूप घालून चांगली भाजून घ्यायची.
४) आता कढईमध्ये तूप घालून त्यात एक एक करून सगळे ड्राय फ्रूट भाजून घेणे.
५) हे भाजलेले सगळे ड्राय फ्रूट पुन्हा मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेणे. थोडे जाडसर राहिले तरी चालतील.
६) आता खजुराची पेस्ट आणि ड्राय फ्रूट दोन्हीही चांगले एकजीव करून घ्यायचे.
७) आता हे मिश्रण ताटात काढून त्याचा एक रोल करून घेणे.
८) रोल तुम्हाला आवडेल तसा करायचा, चौकोनी किंवा गोल आणि तो फ्रिजमध्ये किमान एक दोन तास सेट व्हायला ठेवून द्यायचा.
९) आता एका ताटात खसखस पसरवून घ्यायची आणि तो रोल त्यावर फिरवून घ्यायचा. जेणेकरून सगळीकडून त्याला खसखस एकसारखी लागल्या जाईल.
१०) सेट झालेल्या ह्या रोलचे पातळ काप करून घेणे.
ही खजुराची ड्राय फ्रूट बर्फी पौष्टिक तर असतेच पण खायला ही खूप मस्त लागते. साखर किंवा गूळ... काहीही गोड न घालता फक्त खजुरामुळे ती गोड होते. ही बर्फी डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवू शकता.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा