Login

खंत.

A Short Story Of Big Regret.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

खंत

" हॅलो , हा अंशू बाळा बोल. हो मी येतोच आहे घरी. गाडीमध्ये आहे आता. बस आता आपल्या घरा जवळच पोहोचलो. अरे हो बेटा, तुझा खाऊ आणला आहे. मी आलो हा, मी लगेच फास्ट फास्ट..."
विक्रांत गाडी चालवताना त्याच्या मुलासोबत फोनवर बोलत नव्हता.

बोलता बोलता पुढे त्याच्या गाडीचे चाकं अचानक एका मोठ्या खड्ड्यात गेले. त्याने त्याची वेगात असलेली गाडी जोरात हबकली आणि त्याचा त्याच्या गाडीवरचा ताबा सुटला. त्याने मोठा अपघात टाळावा म्हणून गाडीचे स्टिअरिंग घाईने लगेच पूर्णपणे डाव्याबाजूला फिरवले. त्यामुळे त्याची गाडी वेगातच डाव्या बाजूला संपूर्ण रस्त्याच्या कडेला गेली. आधीच त्या रस्त्यावर खड्डे खूप होते, त्यात रस्त्याशेजारी असलेले दिवे देखील बंदच होते.

उशीर झाल्यामुळे आज तो पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी ह्या रस्त्याने येत होता. त्याची गाडी वेगाने रस्त्याच्या कडेला आली आणि अचानक धडाम... असा जोरदार आवाज आला आणि बाहेर असलेल्या त्या नीरव शांततेत तो आवाज घुमू लागला.

विक्रांत हॉस्पिटलच्या आवारात पोहोचल्यावर लगेच गाडीतून खाली उतरला. त्याने लगेच हॉस्पिटलच्या माणसांना बोलावून घेतले. त्याने गाडीचा मागचा दरवाजा उघडला आणि तिथून त्या माणसांच्या मदतीने त्याला बाहेर काढला आणि स्ट्रेचरवर झोपवून त्याला धावतच एमर्जेन्सी वॉर्डमध्ये घेऊन गेले. विक्रांतचे कपडे सगळे त्याच्या रक्ताने माखले होते.

विक्रांतच्या गाडीचा ताबा जाऊन त्याने गाडी रस्त्याच्याकडेने चालत असलेल्या त्या माणसाला ठोकली. अपघात होताच विक्रांत लगेच गाडीतून बाहेर उतरला आणि तो माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून त्याने क्षणाचाही विलंब न करता त्याला गाडीत ठेवले आणि सरळ हॉस्पिटलमध्ये घेऊन आला.

झाल्या प्रकरणाने विक्रांत पूर्णपणे घाबरला होता. त्याला त्याची स्वतःची चीड येऊ लागली. त्याच्या हातून खूप मोठं पाप झाल्याची जाणीव त्याला होऊ लागली. त्याच्या फोनवर बायकोचे सारखे फोन येत होते तरी ते उचलण्याचं भान देखील त्याला नव्हतं. तो वॉर्डच्या बाहेर डोक्याला हात लावून एका खुर्चीवर विचार करत बसून राहिला.

काही वेळाने वॉर्डचा दरवाजा उघडून डॉक्टर बाहेर येताना त्याला दिसले. त्यांना बाहेर आलेलं बघताच तो उठून त्यांच्या जवळ जाऊन काळजीने विचारू लागला, " डॉक्टर, तो माणूस आता कसा आहे  ?"


" काही सांगता येत नाही. डोक्याला खूप गंभीर जखम झाली आहे. आता त्यांना शुद्ध तर आली आहे, पण ते कधीपर्यंत शुद्धीत राहतील हे माहीत नाही. तुम्ही त्यांच्या घरच्यांना बोलावून घ्या."

डॉक्टरांचं ते बोलणं ऐकून विक्रांतच्या पायाखालची जमीनच सरकली. काय बोलावं त्याला समजेना झालं. त्याने डॉक्टरांकडून त्याला भेटायची परवानगी मागितली. डॉक्टरांनी त्याला होकार देताच तो हळू हळू दबक्या पावलांनी वॉर्डच्या दिशेला जाऊ लागला.

हळू हळू  तो वॉर्डच्या दरवाजा जवळ पोहोचला. दरवाजात उभा राहून तो डोळ्यांमध्ये पाणी आणून, आतमध्ये बेडवर पडलेल्या त्या माणसाला बघू लागला. मग डोळे पुसून तो चालतच त्या माणसाकडे गेला आणि त्याची विचारपूस करू लागला.

" धन्यवाद दादा, तुम्ही मला इथे हॉस्पिटलमध्ये आणले." विक्रांतला बघून तो माणूस म्हणाला.

त्याच्या त्या बोलण्यावर त्याला काय बोलावे हे त्याला समजेनासे झाले.

'त्याला त्या बेडवर पोहोचवणारा माणूसच मी आहे, हे त्याला कळल्यावर त्याची काय प्रतिक्रिया असेल. '
असे विचार त्याच्या डोक्यात फिरू लागले.

विक्रांतने मग कसा तरी विषय काढून त्याला त्याच्या घरच्यांना इथे बोलवण्याबाबत बोलू लागला.

" नको दादा, माझ्या मुलीचा आज वाढदिवस आहे. तिच्यासाठीच केक आणि खेळणी घेऊन मी तिच्या सोबत फोनवर बोलत चालत होतो इतक्यात हे घडलं. मध्येच फोन कट झाला म्हणून आता घरी, पण सगळे काळजीत असतील. माझा फोन आणि सगळं सामान तिथेच पडलं वाटत. डॉक्टर काय म्हणालेत कधीपर्यंत सोडणार आहेत मला?" तो माणूस विक्रांतला म्हणाला.

त्याचं ते सगळं बोलणं ऐकून विक्रांतला आपले अश्रू आवरले नाहीत तो तसाच तिथून फिरून बाहेर निघून गेला. बाहेर बसून तो ढसा ढसा रडू लागला.

त्याला हे नक्की  माहीत होतं की तो माणूस काही त्याच्या घरच्यांना बोलावणार नाही, म्हणून तो स्वतः तिथून निघून त्या अपघाताच्या ठिकाणी पोहोचला. तिथे बाजूला अंधारात त्याला त्या माणसाच्या हातातले सगळे सामान पडलेले दिसले. तो ते हातात घेऊन तिथेच खाली बसून रडू लागला.

तो रडत असतानाच त्याच्या बायकोचा परत फोन आला. ह्या वेळेस त्याने फोन उचलला.

त्याचा असा रडल्यासारखा आवाज ऐकून तिने त्याला काय झाल्याचं विचारलं. तेव्हा त्याने तिला सविस्तर संपूर्ण घटना सांगितली. तिने त्याला शांत राहायचं सांगून ती देखील त्या हॉस्पिटलला यायला निघाली.

मग काही वेळाने स्वतःला सावरून विक्रांतने तिथे आजूबाजूला थोडा शोध घेतला, तेव्हा त्याला तिथे त्या माणसाचा फोन मिळाला. त्याने तो लगेच ओपन केला, त्याला लॉक नव्हते.

नुकताच फोन केलेल्या नंबरवर त्याने फोन केला. त्याने फोन करून त्या माणसाच्या बायकोला तो हॉस्पिटलमध्ये असल्याचं सांगितलं आणि हॉस्पिटलचा पत्ता सांगून फोन ठेवून दिला. 

तिथे पडलेलं त्याचं सगळं सामान त्याने आपल्या गाडीत ठेवले आणि तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाला. हॉस्पिटल जास्त दूर नव्हते. काही वेळातच तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तिथे त्याची बायको त्या वॉर्ड समोर आधी पासून उभी राहून त्याची वाट बघत होती.

त्याला आलेलं बघताच ती त्याच्या जवळ चालत गेली आणि उदासीन होऊन त्याच्या नजरेत नजर घालून बघू लागली.

त्याला तिच्या त्या नजरेची भीती वाटू लागली. त्याचे काळीज आता जोरजोरात धडधडू लागले. त्याच्याकडे बघतच तिने फक्त एकदा नकारार्थी मान हलवली आणि त्याला काय समजायचं होतं, ते तो समजून गेला. तो तसाच उभ्या उभ्या खाली कोसळला. त्याची बायको त्याला सावरू लागली.

त्याला सावरत असतानाच हॉस्पिटलच्या मुख्य दरवाजातून एक बाई आणि दोन माणसे आत येताना त्यांना दिसले. ती बाई आधी पासूनच रडत होती. ती त्या माणसाची बायको आहे, हे त्या दोघांनाही समजले.

विक्रांतची त्यांच्या समोर जाण्याची हिंमत नव्हती. त्याची बायको हिंमत करून तिच्या समोर गेली. तिला सावरत आधी तिने खुर्चीवर बसवले आणि मग, हळू हळू तिला तिचा नवरा गेल्याचं सत्य सांगितलं. ते कळताच ती तिथेच मोठमोठ्याने रडू लागली. तिचा स्वतःवरचा
ताबाच सुटला. तिच्या सोबत आलेले तिचे दोन्ही भाऊ ते ही रडू लागले.

प्रशासनाच्या दुर्लक्षेमुळे आज दोन कुटुंब उध्वस्त झाले होते. एक त्या माणसाचे ज्याच्या घरात तो एकटा करता पुरुष होता, जो त्या माय लेकीला सोडून कायमचा निघून गेला होता. आणि दुसरा विक्रांतचा ज्याच्याकडून नकळत का होईना त्या माणसाचा खून झाला होता.

शेवटपर्यंत त्याला त्या लोकांना ते सांगायची हिंमत नाही झाली, पण त्याने त्याचा पश्चाताप म्हणून त्या माणसाच्या परिवाराची संपूर्ण जबाबदारी उचलली, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या रस्त्याच्या खड्ड्याबद्दल कोणाला ही तक्रार न करता ते भरून काढायचं काम त्याने आपल्या खांद्यावर घेतलं.

सोबतच रस्त्याशेजारी असलेल्या लाइट देखील त्याने स्वतःच ठीक करून घेतल्या. कारण त्याला चांगलंच माहीत होतं की, तक्रार करून काही उपयोग नाही. त्या लोकांसाठी माणसांच्या जिवापेक्षा पैसा मोठा झाला आहे. त्या कारणामुळे पुढे कोणाचाही जीव नको जायला हाच त्याचा नेहमी प्रयत्न राहिला. तीच खंत मनात ठेवून तो त्याचं आयुष्य जगू लागला.