Login

कथा : खरा गुन्हेगार ! पार्ट 1

.
जलद कथा स्पर्धा फेब्रुवारी 2026


रात्रीचा प्रहर होता. गार वारा सुटला होता. छावणीतल्या एका तंबूत जवळपास चौदा वर्षाचा मिसुरडेही न फुटलेला कोवळा किशोरवयीन मुलगा खुर्चीवर बसला होता. तो थरथरत होता. घाबरत होता. मग पन्नास वर्षाचा एक प्रौढ अफगाणी व्यक्ती त्या तंबूत शिरला. मद्याच्या नशेत असलेला तो व्यक्ती त्या कोवळ्या मुलाला पाहून हसला. जसे लांडगा आपल्या शिकाऱ्यास पाहून क्रूरपणे हसतो तसे. त्याने त्या मुलाचा हात पकडला आणि त्याला जवळ खेचले. एखाद्या कळीला कुरतडून काढावे तसेच तो त्या मुलाचा उपभोग घेऊ लागला. तो लहान मुलगा किंचाळत होता. पण कुठे न कुठं त्यालाही ठाऊक होते की त्याच्या मदतीला कुणी नाही येणार. कारण आता तो एक गुलाम होता. उस्मानने त्याला विकत घेतले होते. त्या मुलाच्या आईवडिलांना रोख रक्कम देऊन. पण त्या रात्री जणू ईश्वराने त्या लहान मुलाची आर्त हाक ऐकली. एक अमेरिकन जवान तंबूत शिरला. घडत असलेला प्रकार पाहून त्या अमेरिकन जवानाच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. मनात आक्रोश निर्माण झाला. त्याने उस्मानला बेदम मारहाण केली आणि सोहेलची सुटका केली. तो अमेरिकन जवान " जोसेफ " होता.

***

" नाव काय आहे तुझं ? आईवडील कुठे आहेत तुझे ?"
जोसेफ म्हणाला.

" सोहेल. माझे आईवडील कंदाहारला राहतात. त्यांनी मला उस्मानला विकले. " सोहेल म्हणाला.

" का ?" जोसेफ म्हणाला.

" घरी खायला अन्न नव्हते म्हणून. गरिबी माणसाला काहीही करायला लावते. त्या पैश्यांनी काही दिवस घर चालेल आणि मलाही दोन वेळचे जेवण मिळेल म्हणून वडिलांनी विकले." सोहेल म्हणाला.

" बरं. घाबरू नको. आता तुला कुणी स्पर्शही करणार नाही. " जोसेफ म्हणाला.

सोहेल हसला.

" राग येणार नसेल तर एक बोलू का ?" सोहेल म्हणाला.

" बोल ना. " जोसेफ म्हणाला.

" तुम्ही अमेरिकेतले लोक विचित्र असतात. आधी आग लावतात मग विझवण्याचे नाटक करतात. आणि स्वतः किती शांतिप्रिय , मानवतावादी आहोत असे मिरवतात. पण आमच्या रुक्ष अफगाणिस्तानला " साम्राज्याची दफनभूमी " म्हणतात हे लक्षात ठेवा. " सोहेल म्हणाला.

" म्हणजे?" जोसेफ म्हणाला.

" सोव्हिएत युनियनने आपली सेना या भूमीत उतरवली तर त्यांचे पतन झाले. तसच महासत्ता असलेल्याचा गर्व झालेल्या अमेरिकेलाही रातोरात अफगाणिस्तान सोडून पळावे लागेल. खूप सुंदर होता आमचा देश. इथल्या बायका घराबाहेर पडायच्या. शिकायच्या. नोकरी करायच्या. जीवन जगायच्या. बुरखा बंधनकारक नव्हता. तुम्ही फोटो बघितले काबूलच्या स्त्रियांचे तर विश्वास ठेवणार नाही की या अफगाणी स्त्रिया आहेत म्हणून. अफगाणिस्तान जगातला एकमेव असा देश असेल जिथे आजी नातीपेक्षा जास्त शिकलेल्या आहेत."
सोहेल म्हणाला.

क्रमश..
0

🎭 Series Post

View all