खरंच असं घडलं! _ भाग १
(ही एक सत्यघटनेवर आधारित काल्पनिक कथा आहे)
"अनिल आज महेशच्या बाळाचं बारसं आहे. तू आणि अर्चना दोघे जा बारशाला. तुझ्या मामाला पण बरं वाटेल."
"आई सगळं खरं आहे पण मला कंपनीतून निघायला किती उशीर होतो. तूच सांग मी कधी जाऊ बारशाला. त्यापेक्षा तू अर्चनालाच ऑफिसमधून जाऊन यायला सांग."
"हे बघ अनिल माझी तब्येत बरी नाही त्यामुळे मला जाता येणं शक्य नाही आणि तुझ्या बाबांना पण आज एक महत्त्वाचं काम आहे संध्याकाळी. म्हणून मी तुला सांगते. संध्याकाळी उशीर झाला तर येताना अर्चना बरोबर तू असलास तर बरं होईल. मी निश्चिंत राहीन."
"बरं बाई आम्ही जाऊ. बरं बाळाला काय घ्यायचे ते सांग त्याप्रमाणे जातानाच आम्ही ते घेऊन जाऊ."
"ते सगळं मी आधीच आणून ठेवले आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त तुमची उपस्थिती तिथे लावायची आहे आणि जरा नीटनेटका जा. गबाळ्यासारखा जाऊ नकोस. मामीच्या माहेरच्या कोणी लग्नाच्या मुली असतील तर बघतील तुझ्याकडे."
"आई मी हा असा. माझ्याकडे कोण बघणार म्हणून तर अजून लग्न झालं नाही. हल्ली मुलींना त्या कशाही असल्या तरी नवरा हिरो लागतो."
अनिलने हो म्हटल्यामुळे मालतीताईना जरा हायसे वाटलं. माधव आणि मालती यांना अनिल आणि अर्चना ही दोन मुलं. ते मुंबईत सांताक्रुजला एका चाळीत राहत होते. अनिल त्यावेळचा मॅट्रिक झाला होता. तो महाकाली केव्हज रोड, अंधेरी येथे एका प्रायव्हेट कंपनीत नोकरीला असल्यामुळे त्याची नोकरी तशी यथातथाच होती. अर्चना एका सरकारी कार्यालयात नोकरी करत होती. अर्चना तयारी करता करता अनिलला म्हणाली,
"दादा मी हाफ डे घेऊनच मामाच्या घरी जाईन म्हणजे मामीला माझी थोडी मदत होईल. "
"अनिल तू पण जरा कंपनीतून लवकर निघून गेलास तर पाळणा वगैरे सजवायला तुझी मदत होईल. रवीकडे महेश एकटाच पडतो सगळं काम करायला."
"बरं मी साहेबांना विचारून बघतो. परमिशन मिळाली तर मी जाईन लवकर."
बारशाला जायचं म्हणून अनिल आणि अर्चना दोघेही व्यवस्थित तयार होऊन कामावर गेले. संध्याकाळी साहेबांना विचारून अनिल लवकरच मामाकडे गेला. मामा अंधेरीलाच चार खोल्यांच्या फ्लॅट मध्ये राहत होता. अनिल मामाकडे गेला तेव्हा एकटा महेश पाळणा सजवत होता. अनिलने त्याला लागलीच मदत करायला सुरुवात केली. त्याने आजूबाजूला नजर टाकली तेव्हा त्याच्या लक्षात आलं आई बोलल्याप्रमाणे तिथे तीनचार अनोळखी तरुणी होत्या. अनिल अधूनमधून त्या मुलींकडे बघत होता. त्या त्यांच्या गप्पातच गुंग होत्या. अनिल दिसायला खूपच सामान्य होता. एक तर त्याची उंची खूपच कमी होती शरीरयष्टी पण किरकोळ होती. एकूणच त्याच्याकडे कोणी पटकन बघेल असं काही नव्हतं. इतर लग्नाळू मुलांप्रमाणे अनिलला सुद्धा वाटायचं की त्याचं लग्न व्हावं. त्याच्यापेक्षा उंच मुली त्याला स्पष्ट नकार द्यायच्या आणि त्याच्यापेक्षा बुटक्या मुली त्याला पसंत पडायच्या नाहीत. आता तो चाळिशीला आला होता. त्यामुळे लग्न हे त्याच्यासाठी एक स्वप्नच ठरत होतं.
अनिलच्या मदतीने महेशने खूप कल्पकतेने पाळणा सजवला होता. कार्यक्रमात आणि पडेल ते काम केलं. आलेल्या पाहुण्यांना खाणं आणि चहापाणी देणं वगैरे. त्याला वाटत होतं यामुळे तरी लोकांचा आपल्याकडे लक्ष जाईल. त्याच्यामुळे बारसं व्यवस्थित पार पडलं. बारसे झाल्यावर अनिल अर्चनाला म्हणाला,
"तू जास्त उशीर व्हायच्या आधी घरी जा. मी इथे सगळं मागची आवरा आवर करायला मदत करतो आणि उशिरा घरी येतो."
"ठीक आहे."
मामीने अर्चनाला घरी न्यायला पेढे घुगऱ्या आणि इतर खाद्यपदार्थ दिले. ते घेऊन ती घरी गेली.
(अनिल उशिरा घरी गेला की मामाकडे राहिला, नक्की काय झालं ते पाहू पुढील भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा