Login

खरंच असं घडलं! _भाग २

मृत जाहीर केलेला तरुण नाट्यमय रित्या जिवंत असतो
खरंच असं घडलं! _भाग २

सगळी कामं संपल्यावर अनिल घरी जायला निघाला.  त्याला मामा आणि महेशने रहायचा आग्रह केला पण त्याने त्याचं ऐकलं नाही. उशीर झाला होता आणि तो अंधेरी प्लॅटफॉर्मवर आला तेव्हा एक ट्रेन सुटत होती. त्याने चालू ट्रेन पकडायचा प्रयत्न केला. कसं कोण जाणे त्याचा हात सटकला आणि तो प्लॅटफॉर्मवर पडला.  एरवी कधी कधी तो चालू ट्रेन पकडायचा, चालत्या ट्रेनमधून उतरायचा.  तशी त्याला सवय होती पण आज अचानक असं झालं. अनिल पडला आणि उठला नाही म्हणून आजूबाजूचे लोक जमा झाले.  तसं त्याला शरीरावर कुठे जखम झालेली दिसत नव्हती.  पण त्याची काही हालचाल नव्हती.  कोणी त्याच्या तोंडावर पाणी शिंपडलं कोणी त्याला पाणी पाजायचा प्रयत्न केला.  तरीही काही हालचाल नाही.  

इतक्यात रेल्वे पोलीस आले.  त्यांनी पाहिलं अनिल असाच पडलेला होता.  पोलिस आलेले पाहून बरेचसे लोक पांगले. त्यांना पोलिसांच्या लफड्यात पडायचं नव्हतं.  जे लोक आजूबाजूला होते ते कुजबुजत होते.

"बहुतेक मेला असं वाटतंय."

"काय को चालू ट्रेन पकडते है.  घर वालों के बारे में कुछ सोचते नही.  क्या हुआ मर गया ना खाली पिली"

"घरच्यांना किती यातना होतील, बिचारे"

पोलिसांनी स्ट्रेचर मागवलं आणि अनिलला प्लॅटफॉर्म नंबर एक वर नेलं.  प्रथमदर्शनी तरी अनिल चांगल्या घरातला वाटत होता.  त्याच्या गळ्यात सोन्याची चेन होती, बोटात अंगठी होती. त्याच्या हातात कोणतीही बॅग किंवा पिशवी नसल्यामुळे पोलिसानी त्याचे खिसे चाचपायला सुरुवात केली.  तिथे त्यांना एका खाजगी कंपनीचं ओळखपत्र मिळालं.  त्याच्यावर नाव होतं अनिल मोहिते.  त्याकाळी मोबाईल फोन कोणाकडे नसायचे आणि लँडलाईन पण ठराविक घरातच असायची.  आता ह्याची ओळख पटवायची तर या कंपनीतच जावं लागणार होतं.  कार्डवरचं प्लास्टिक गेल्यामुळे अनिलचा फोटो पण नीट दिसत नव्हता. पोलिसांना पण अनिल मेला आहे असंच वाटलं आणि त्यांनी त्याच्या पूर्ण शरीरावरून पांढरा कपडा घालून ठेवला.  जाणारी येणारी लोकं हळहळत होती.

पोलीस त्याच्या कंपनीचा पत्ता शोधत शोधत तिथे गेले.  त्याने तेच ओळखपत्र दाखवलं पण ओळखपत्र वरील फोटो नीटसा दिसत नव्हता. तिथे त्यांनी चौकशी केली तर अनिल मोहिते नावाचा कोणी कामगार तिथे नसल्याचे त्यांनी सांगितलं.  उपस्थित असलेल्या एका कामगाराने त्याचं वर्णन करायला सांगितलं.  पोलीस म्हणाले,

"अंगाने बारीक चणीचा कमी उंचीचा असा साधारण चाळीशीच्या आसपासचा तरुण आहे."

लगेच उपस्थित असलेल्यांपैकी दोघं एकदम म्हणाले,

"अरे म्हणजे आपला अन्या बारक्या आहे."

अनिल एकदम बारीक आणि उंचीने ठेंगणा असल्यामुळे तिथे त्याला "अन्या बारक्या" या टोपण नावाने सगळे ओळखत होते.  पोलिसांनी तेथील मॅनेजरला त्याचा पत्ता विचारला.  त्याचा तसा पत्ता कोणाला माहित नव्हता. त्यानंतर सर्वांची माहिती असलेले रजिस्टर मागवण्यात आलं आणि त्यातून अनिलचा पत्ता पोलिसांनी घेतला.  अनिल सांताक्रुजला रामबाग येथे राहत होता.  ज्याला साधारण सांताक्रुजची माहिती होती अशा एका कामगाराला पोलिसांनी बरोबर घेतलं आणि ते त्याचा पत्ता शोधत निघाले.  रामबाग मध्ये आल्यावर पुन्हा अनिल मोहिते कुठे राहतो असं विचारलं पण कोणालाच त्याच्याबद्दल काही माहिती नव्हतं.  पोलिसांना पाहून चार दोन लोक त्यांच्या जवळ आले.  त्यांना पण मोहिते कुठे राहतो काहीच माहित नव्हतं.  बरोबर आलेला कामगार म्हणाला,

"इथे पण कदाचित त्याचं काहीतरी टोपण नाव असेल.  त्याचं वर्णन सांगा. पोलिसांना ते पटलं.  त्यांनी त्याचं वर्णन केलं आणि तिथे जमलेल्या तरुण पोरांमधून एकजण ओरडला,

" अरे याने अपना "कुली". साब ने बताया वैसा
तो अपना कुलीच दिखता है."

त्याच्याबरोबर इतरांनी पण मान हलवली.

"हे कुली काय प्रकरण आहे. अनिल मोहितेलाच तुम्ही कुली म्हणता का!"

"हो साहेब. हा कुली म्हणजे अनिल आहे ना तो मिमिक्री एकदम मस्त करतो.  वेगवेगळ्या हिरोंचे आवाज काढावे तर त्यानेच.  काही वर्षांपूर्वी त्याने आमच्या वाडीतील गणेशोत्सवात कुली सिनेमामधील अमिताभ बच्चनचे डायलॉग खूप मस्त सादर केले.  पहिला नंबर पटकावला त्याने.  पब्लिक पण जाम खुश झालं त्याच्यावर.  तेव्हापासून सगळे त्याला "कुली" म्हणूनच ओळखतात."

"बरं चला आता कोणीतरी त्याचं घर दाखवा."

"पण साहेब आमच्या कुलीला काय झालं. तो बरा आहे ना."

"त्याच्या घरीच सगळं कळेल तुम्हाला."

दोघं तिघं अनिलचे घर दाखवायला पोलिसांबरोबर निघाले.

(अनिलच्या घरी काय परिस्थिती निर्माण झाली असेल. पाहूया पुढील भागात)