Login

खरंच असं घडलं! _ भाग ३

मृत जाहीर केलेला तरुण नाट्यमय रित्या जिवंत असतो

खरंच असं घडलं! _ भाग ३

रात्रीचे अकरा वाजून गेले होते. माधवने मालतीला विचारले,

"काय ग अकरा वाजून गेले. अनिल अजून घरी आला नाही.  तो रवीकडे राहणार आहे  काही बोलला का तुला?"

"नाही हो तो घरी येणार होता म्हणून त्याने अर्चनाला पुढे पाठवलं.  कदाचित जास्त उशीर झाला म्हणून रवी कडे राहायला असेल.  तसं पण त्याला अंधेरीलाच कामावर जायचं असतं."

इतक्यात दरवाजाची कडी वाजली.  माधवला वाटलं की अनिलच आला असेल म्हणून त्याने दार उघडलं.  दारात पोलिसांना पाहून तो घाबरला.  त्याने पोलिसाला आत येऊ दिले आणि घाबरतच विचारले,

"साहेब काय झालं. तुम्ही रात्रीच्या वेळी इथे कसे?"

"तुम्ही अनिल मोहितेचे वडील आहात ना!  अंधेरीला चालती ट्रेन पकडताना त्याचा अपघात झालाय.  तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल."

"पण साहेब अनिल बरा आहे ना. जास्त लागलं नाही ना!"

"हे बघा तुमच्या भावना मला कळतात.  परंतु तो सध्या काही हालचाल करत नाही. तुम्ही प्रत्यक्ष येऊन पहा."

हे ऐकल्यावर अनिलची आई मालती आणि अर्चना दोघीही हंबरडा फोडून रडू लागल्या.
माधववर पण खूप मोठा आघात झाला.  त्या दोघींना स्वतःला सावरायला सांगितलं आणि तो म्हणाला,

"तुम्ही इथेच थांबा.  मी जाऊन बघतो."

अनिलचे दोन मित्र मालती आणि अर्चनाला सोबत करायला थांबले.  माधव आणि अनिलचे वाडीतले दोन मित्र पोलिसांबरोबर अंधेरी स्टेशनला आले.  पांढरा कपडा घातलेला
अनिलचा अचेतन देह पाहून माधवला भोवळ आली.  कोणीतरी त्याला पाणी प्यायला दिलं.  पोलीस म्हणाले याला हॉस्पिटलमध्ये नेऊन पुढील प्रक्रिया करावी लागेल.  प्रथम त्याला तेथील जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.  तेथील डॉक्टरांनी त्याला पाहिले. त्याच्या डोक्यावरचा पांढरा कपडा दूर केला आणि ते तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांवर चिडले,

"ही व्यक्ती मृत झाली आहे की नाही हे कळल्याशिवाय तुम्ही त्याच्या डोक्यावरून पांढरा कपडा कसा घातला."

"डॉक्टर आम्ही सामान्य माणसं.  तो काहीच प्रतिसाद देत नव्हता, त्याची काहीच हालचाल पण नव्हती.  म्हणून आम्हाला वाटलं मेंदूला मार लागून तो मेला."

"हो बरोबर आहे.  त्याच्या मेंदूला मार लागलाच आहे आणि म्हणून तो कोमामध्ये गेलाय.  आता तो कोमामध्ये किती काळ राहील हे आत्ताच सांगता येणार नाही.  त्यामुळे तुम्ही त्याला रेल्वेच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा आणि त्यांच्या घरच्यांना तसं कळवा."

हे ऐकून माधवला कमीतकमी आपला मुलगा
जिवंत तरी आहे याचा आनंद झाला.  त्याने लगेच  त्याच्याबरोबर आलेल्या अनिलच्या एका मित्राला घरी जाऊन मालती आणि अर्चनाला कळवायला सांगितले आणि त्या दोघींना त्याने तेथून जवळ असलेल्या रेल्वेच्या हॉस्पिटलमध्ये बोलावलं."

अनिलला हॉस्पिटलमध्ये नेल्यावर तेथील डॉक्टर म्हणाले,

"याच्या मेंदूला मार लागला आहे आता हा कोमामधून कधी बाहेर येईल काही सांगू शकत नाही.  कदाचित तो दोन दिवसात पण कोमातून बाहेर येईल किंवा त्याला दोन महिने सुद्धा लागतील.  सर्व अनिश्चित आहे.  तोपर्यंत तो हॉस्पिटलमध्येच राहील."

हे ऐकून माधव देवाची प्रार्थना करू लागला.  मालती आणि अर्चना हॉस्पिटल मध्ये आल्यावर त्यांना हे कळल्यावर तो जिवंत आहे यातच त्यांना समाधान वाटलं.  रोज, अनिल आज कोमातून बाहेर येईल उद्या येईल या आशेवर ते तिघेही आळीपाळीने हॉस्पिटलमध्ये येऊन थांबत होते.  दोन महिने होत आले तरी अनिल काही कोमातून बाहेर येत नव्हता.  माधव आणि
मालतीच्या तोंडचं पाणी पळालं होतं.  नक्की काय होणार सर्व अधांतरी होतं.  एक दिवस माधव मालतीला म्हणाला,

"काय गं अनिल यातून लवकर बाहेर येईल ना! तुला ती केईएम हॉस्पिटलमधील नर्स अरुणा शानभाग आठवते का.  जवळजवळ एकेचाळीस वर्ष कोमामध्ये होती.  तसं काही आपल्या अनिलच्या बाबतीत होणार नाही ना!"

"अहो तुम्ही कृपा करून असं नकारात्मक काही बोलू नका.  मी खात्रीने सांगते अनिल एकदोन दिवसातच यातून बाहेर येईल."

काय आश्चर्य मालती बोलली त्याप्रमाणे पुढच्याच आठवड्यात अनिल कोमातून बाहेर आला.  फक्त त्याचा तोंडाकडचा भाग थोडा वाकडा झाला होता.  त्यामुळे त्याचे उच्चार स्पष्ट येत नव्हते.  बाकी तो पूर्ण नॉर्मल होता. डॉक्टर बोललेच होते की थोडंफार अपंगत्व येऊ शकतं. अनिलला काल तो बारशाहून परत येत होता तेच आठवत होतं.  मध्ये एव्हढा कालावधी गेला आहे ह्याची त्याला कल्पनाही नव्हती. त्याचे मित्र त्याला भेटायला आले तेव्हा त्याला म्हणाले,

"तुला अजून एक टोपण नाव दिलं आम्ही माहित आहे का!"

"कोणते?"

"कोमा फायटर.  कमाल आहे यार.  अंधेरी प्लॅटफॉर्म वर तुला पूर्ण सफेद कपड्याने झाकलेले पाहिलं आणि वाटलं तू आम्हाला कायमचं सोडून गेलास." माधव मालतीला म्हणाला,

"आपण एक सत्यनारायण पूजा घालूया.  पूर्ण वाडीला बोलवूया.  आपला मुलगा वरती हात टेकवून आला आहे."

अशा तऱ्हेने "अन्या बारक्या", "कुली" झाला आणि आता "कोमा फायटर" झाला.  देवाची लीला अगाध आहे हेच खरं.  आपण फक्त सिनेमात पाहतो की तिरडीवरचा माणूस उठून बसतो. पण इथे तर अनिलच्या आयुष्यात असं घडलं आहे आणि मुख्य म्हणजे अनिल स्वतः कोणाशीही थोडी ओळख झाली की त्याला आपल्या आयुष्यातील हया नाट्यमय घटनेबद्दल सांगतो.  अनिल खऱ्या आयुष्यात हिरोसारखा दिसत नाही पण ह्या घटनेमुळे त्याला आता हिरोसारखे महत्व आलं आहे.  आता तो "आनंद" सिनेमातील डायलॉग् मारतो,

"जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में है
जहाँपनाह, जिसे न आप बदल सकते है ना मैं "