खरी पूजा..
©अनुप्रिया
"अरेरे! काय हे? सणासुदीच्या दिवसांत चार दिवस दम निघाला नाही का? पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या तरी घ्यायच्या. आता झाला ना विचका?”
“हो, बाई… या दिवसांत स्त्रियांना देवाला हात लावू द्यायचं नसतं. विटाळ झाला. एकप्रकारे अपशकूनच झाला म्हणायचा.”
"हो खरंय, असं झालं की दूर राहिलं पाहिजे. नाहीतर अपशकुन होतो."
घरात जमलेल्या बायकांत कुजबुज सुरू झाली. ते ऐकून अनुजाचा चेहरा अजूनच फिका पडला. तिच्या चेहरा पडण्याचं कारणही तसंच होतं.
दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी सोसायटीत गणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू होती. सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम जाणवत होती. कुलकर्णी कुटुंबातल्या घरात जणू उत्सवाचा झगमगाट ओसंडून वाहत होता. सगळीकडे सजावट, फुलांचा सुवास, मोदकांचा गंध साऱ्या घरभर पसरला होता. बाप्पाच्या स्वागताची तयारी मोठ्या जोशात सुरू होती आणि त्या सगळ्यांत पायाला चाकं लावल्याप्रमाणे अनुजा साऱ्या घरभर भिंगरीसारखी फिरत होती. अनुजा सगळ्या गोष्टी स्वतः जातीने पाहत होती. गेल्या पंधरा दिवसापासून अनुजा घरातली साफसफाई करत होती. सर्व तांब्या पितळेची भांडीकुंडी घासूनपुसून स्वच्छ केली होती. घरातला बिछाना, अंथरुण पांघरूण सारं स्वच्छ धुवून काढलं होतं. संपूर्ण घराला रंगरंगोटी केली होती. बाप्पा येण्याच्या आदल्या दिवशी तिच्या नवऱ्याच्या, नणंदेच्या आणि सासऱ्यांच्या मदतीने रात्रभर जागून सजावटीची तयारीही केली होती.
आज सकाळी उठल्यापासून अनुजा बाप्पाच्या येण्याची तयारी करत होती. नैवेद्य करण्यापासून ते घरातली एकेक गोष्ट तिने नीट पाहिली होती. तिचे सासरे आणि नवरा शार्दूल बाप्पाला आणण्यासाठी बाहेर गेले. तिच्या सासूबाईंनी पूजेची सगळी तयारी केली आणि शेजाऱ्यापाजऱ्यांना आरतीसाठी घरी बोलवलं. सोसायटीतल्या सगळ्या बायका जमा झाल्या. बाप्पा आला की लगेच आरती आटोपून घ्यायची असं तिने ठरवलं होतं. थोड्याच वेळात तिचे सासरे आणि नवरा शार्दूल बाप्पाच्या मूर्तीला घेऊन घरी आले. तिच्या नणंदेने, हर्षदाने दारातच बाप्पाला औक्षण केलं आणि मोठ्या उत्साहाने गणेशाचं स्वागत करत आत घेतलं.
इतक्या दिवसांपासून बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या अनुजाचा चेहरा मात्र पडला होता आणि ती काहीही न बोलता एका कोपऱ्यात जाऊन बसली. तिला असं शांत बसलेलं पाहून हर्षदा धावतच तिच्याकडे आली.
“वहिनी, काय झालं गं? इतक्या दिवसांपासून तू एवढी सगळी तयारी केलीस, आणि आता का अशी मागे सरलीस?"
अनुजा थरथरत्या आवाजात हर्षदाच्या कानात कुजबुजली,
"अगं बघ ना हर्षू.. आज बाप्पा येण्याच्या दिवशीच मला अचानक पाळी आलीय. पाळीची तारीख पण जवळ आली नव्हती. काय माहिती कशी काय अचानक आली? आता मला देवाच्या जवळ बसणं, पूजा करणं हे काहीच करता येणार नाही. देवाला हे चालणार नाही. त्यामुळे तुम्ही करा आरती. मी बाजूला बसते."
हे बोलताना अनुजाच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले.
“मी एवढी मनापासून बाप्पांची सेवा केली; पण आज त्यांच्या आगमनाच्या दिवशीच मी परकी ठरले. माझ्या गणरायाच्या पायाला मी स्पर्शही करू शकत नाही. मी अपवित्र झालेय.”
ती स्वतःशीच खिन्नपणे पुटपुटली. इतका वेळ बायकांची सुरू असलेली कुजबुज तिच्या सासूबाईंच्या कानावर पडली. त्या अचानक उठून उभ्या राहिल्या. त्यांच्या आवाजात राग, वेदना आणि ठामपणा होता.
"थांबा जरा! कोण म्हणालं की ती अपवित्र आहे? हिच्या हाताने घडलेली सजावट, हिच्या घामाने ओले झालेले कपडे, हिच्या प्रेमाने बनवलेले मोदक हे सगळं बाप्पाला नकोय का?”
त्यांचं बोलणं ऐकून सगळेच थबकले. अनुजाच्या सासूबाई सर्वांवर जवळजवळ ओरडल्याच.
“निसर्गाने दिलेलं शरीराचं चक्र अपवित्र कसं असणार? जे आई होण्याचं वरदान देतं, ते अशुद्ध कसं म्हणायचं? अगं अनुजा, देवापासून तू कशी काय दूर राहशील? घरातल्या प्रत्येक गोष्टीत तुझं योगदान आहे. हा मंडप, हे मोदक, ही सजावट… हे सगळं तुझ्या श्रमांचं आहे. हेच तर खरी पूजा आहे.. खरंतर गणपती बाप्पा शुद्धतेचं नव्हे तर प्रेमाचं, श्रद्धेचं, आणि समानतेचं प्रतीक आहेत. जर अनुजाला बाप्पाच्या पूजेपासून दूर ठेवलं, तर ही पूजा अपुरीच राहील. अनुजा, ऊठ चल बाप्पाची आरती करून घे. ”
.
साऱ्या घरभर शांतता पसरली. काय बोलावं कोणालाच काही समजत नव्हतं. सर्वांनाच सासूबाईंच्या आधुनिक विचारांचं नवल वाटलं. अनुजाने पदराने डोळ्यांतले अश्रू पुसले. तरीही तिच्या मनात अजून थोडी शंका होतीच.
.
साऱ्या घरभर शांतता पसरली. काय बोलावं कोणालाच काही समजत नव्हतं. सर्वांनाच सासूबाईंच्या आधुनिक विचारांचं नवल वाटलं. अनुजाने पदराने डोळ्यांतले अश्रू पुसले. तरीही तिच्या मनात अजून थोडी शंका होतीच.
“पण आई, गावातले लोक काय म्हणतील? कुणाला पटेल का हे?"
सासूबाईंनी सभोवताली एक नजर टाकली. त्यांचा आवाज शांत होता; पण स्वरात ठामपणा स्पष्टपणा जाणवत होता.
"लोकं काहीही म्हणोत, बाप्पा आपल्याला काय सांगतात ते बघ. ते आपल्याला समानता, प्रेम आणि आदर शिकवतात. बाप्पा सांगतात, प्रेमात अशुद्धता नसते. आणि लोकांचं काय गं? ते तर बोलत राहतीलच. कोणाचं ऐकायचं ते आपणच ठरवायचं. अनुजा, आज तू आरती केली नाहीस, तर बाप्पांची पूजा अपूर्णच राहील."
तेवढ्यात लहान मुलं धावत आली.
"ताई, तूच आरती कर! बाप्पा तुझीच वाट पाहताहेत.”
सगळ्यांच्या आग्रहाने अनुजा पुढे आली. तिच्या हातात आरतीचं ताट ठेवण्यात आलं. थरथरत्या हातांनी तिने आरती सुरू केली.
आरतीच्या ज्योतीने घर उजळून निघालं.मोठमोठयाने गजर झाला,
"गणपती बाप्पा मोरया!"
त्या प्रकाशात अनुजाचे अश्रू आता आनंदात बदलले होते.सगळ्यांना जाणवलं, “खरी पूजा म्हणजे देवाला सोनं-चांदी अर्पण करणं नव्हे; खरी पूजा म्हणजे स्त्रीच्या अस्तित्वाचा, तिच्या श्रमांचा, तिच्या प्रेमाचा सन्मान करणं आहे.”
आता जणू बाप्पाच हसून म्हणत होते,
"तुम्ही माझा नव्हे, तिचा सन्मान केला. हाच माझा उत्सव आहे.. हीच माझी खरी पूजा.. ”
समाप्त
©अनुप्रिया
२७.०८.२०२५
©अनुप्रिया
२७.०८.२०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा