ईरा चॅम्पियनशिप २०२५
जलद कथालेखन
संघ - वनिता
कथा लेखन- अपर्णा परदेशी.
जलद कथालेखन
संघ - वनिता
कथा लेखन- अपर्णा परदेशी.
शीर्षक - खरी श्रीमंती (भाग - २)
दुसऱ्या दिवशी बिल्डिंगमध्ये पुन्हा त्याच चर्चेला उधाण आले; परंतु ह्यावेळी विषय थोडा वेगळा होता.
"माधवी दिवसेंदिवस बिघडत चालली आहे." भूमी म्हणाली.
"आपल्याला वाटायचं स्वाभिमानी आहे. माणसाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात तेच खरे." रियाने नेहमीप्रमाणे नाराजीचा सूर लावला.
"हो ना, आता तर हद्दच झाली बाई. आता आपण तिच्यासाठी जास्त जेवण बनवायचे का?" पूजा नाक मुरडत होती.
"म्हणूनच ती विनयाकडे फ्रीज मागत होती वाटतं." सुविधाने तर्क लावला.
विनया नुकतीच त्यांच्यात सामील झाली होती.
"कशावर चर्चा सुरू आहे?" स्वतःचे नाव ऐकून तिने उत्सुकतेने विचारले.
"त्या माधवीने कमालच केली बाई. तू तिला मुळीच फ्रीज देऊ नको. नाहीतर अजून काय काय मागेल सांगता येत नाही." भूमी वैतागत म्हणाली.
"म्हणजे? मला नाही समजले. नक्की काय झाले आहे?" विनयाने न समजून विचारले.
"काल तुझ्याकडे आल्यानंतर ती काही बोलली नाही का?" रियाने विनयाला विचारले.
"नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही? आमच्यात फ्रिजचा तेवढा विषय झाला." असे बोलून विनयाने त्यांच्यात झालेले संभाषण सर्वांना ऐकवले.
"अगं बाई, दरमहा तुला पैसे फेडायचे म्हणते आहे, तिला खरंच परवडणार आहे का तो फ्रीज. तिच्या त्या झोपडीत ठेवणार तरी कुठे?" भूमीने त्यावर प्रतिक्रिया दिली.
"त्यात आता नवीन नाटक सुरू झाले आहे तिचे. तू तिला फ्रिज दिला पण नाही अजून. त्या आधीच तिने सर्वांना सांगून ठेवले आहे, की उरलेले जेवण फेकू नका. ती तिच्या सोबत घेऊन जाणार आहे." रियाने विनयाला माहिती पुरवली.
"हे काय आता? मला वाटलं गरीब असूनही स्वाभिमानी आहे ती, पण नाही." हे ऐकून विनयाला माधवीचा राग आला.
"तेच तर म्हणतोय आम्ही. आपल्या घरी उरलेलं अन्न मागायची तिला काय गरज? आपल्यालाच देताना कसे वाटेल ते? बऱ्याच लोकांकडे कामाला आहे ती. तिच्या घरात खाणारी दोनच तोंडे आहेत. तिचा नवरा तर कित्येक दिवस घरी नसतो. मग एकटीला असे कितीसे लागत असणार? आपण देतो तो पगार कमी पडतोय का तिला?" भूमी तावातावाने बोलत होती.
"विनू, नीट विचार कर बाई. तिच्यावर दया करून तू फ्रिज देऊन टाकशील, पण नंतर सर्वांनाच त्याचा त्रास होईल असं दिसतंय. ती तुला दरमहा पैसे देते म्हणाली, पण तिने नाही दिले तर काय करशील? आपण मध्यमवर्गीय माणसे. काडी-काडी गोळा करून संसार करतो. सेल किंवा ऑफर मध्येच अशा मोठ्या वस्तू घेण्याची आपली हिंमत होते. आपण काही गर्भश्रीमंत नाहीत. गडगंज संपत्ती असलेल्या लोकांसारखं मनात आली ती वस्तू लगेच विकत घेऊन टाकली. एखादी महागडी वस्तू घेताना आपण शंभर वेळा विचार करतो; त्यामुळे तू पण सारासार विचार करून काय ते ठरव." सुविधा विनयाला भावनिक करत म्हणाली.
एव्हाना माधवी यायची वेळ झाली होती; त्यामुळे सर्वांनी हळूहळू तिथून काढता पाय घेतला.
विनया घरी आल्यानंतर अधिकच संभ्रमात पडली. एकतर माधवीला फ्रिज का हवा आहे? हे तिला कळत नव्हते. त्यातल्या त्यात त्या फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी ती आता इतरांकडे उरलेले जेवण पण मागायला लागली होती. विनया शांत डोक्याने सर्वच गोष्टींचा विचार करायला लागली. खरे तर वर्षभरापासून माधवी तिच्याकडे कामाला होती, पण एकदाही तिची तक्रार आली नव्हती. तिने कधीच इकडची काडी तिकडे केली नाही, की या भिंतीची त्या भिंतीला खबर लागू दिली नाही. रोज वेळच्या वेळी येऊन आपले काम करून ती निघून जायची. गेल्या वर्षभरात तिने कुणाकडेच अशी अवास्तव मागणी केली नव्हती आणि म्हणूनच की काय? तिच्या ह्या अजब मागण्यांनी विनयासहित सर्व अचंबित झाले होते.
इतर घरांची कामे आटपून माधवी नेहमीप्रमाणे ठरलेल्या वेळेनुसार विनयाकडे आली. आज स्वारी जरा जास्तच खुश होती. जुनी गाणी गुणगुणतच ती तिच्या कामाला लागली. विनयाला वाटले की आजही ती फ्रिजचा विषय काढेल, पण तसे काही झाले नाही. एक प्रकारे ते बरेच झाले. नाहीतर विनयाला परत वेळ मारून न्यावी लागली असती. सर्व काम आटपून झाल्यानंतर माधवी घरी जायला निघाली, पण जाण्याआधी तिने विनयाला विचारले.
"बाईसाहेब, रात्रीचे जेवण उरले असेल तर माझ्याकडे द्या. मी घेऊन जाईन. खरे तर तुमच्याकडे काहीच नसेल पण तरीही कानावर टाकलेले बरे."
"तुला माहितीये ना, माझ्याकडे रोज मोजकेच जेवण बनते. मला अन्न टाकायला आवडत नाही. आपल्या देशातले कित्येक लोक रात्री उपाशी झोपतात. कधी कधी तर अन्न पिकवणारा दातासुद्धा निसर्गाने केलेल्या अन्यायामुळे उपाशी राहून जातो. ओला दुष्काळ काय आणि सुका दुष्काळ काय? उपासमारीची परिस्थिती कुणावर कधीही येऊ शकते; म्हणून आज आपल्याला पोटभर मिळतंय तर आपण मातू नये ह्या मताची मी आहे; त्यामुळे मी कधीच अन्न वाया जाऊ देत नाही."
"हो बाईसाहेब, तुमचा हाच गुण मला फार आवडतो. मी बऱ्याच लोकांच्या घरी कामाला जाते. शिळे अन्न म्हणून बऱ्याच ठिकाणी जेवण फेकले जाते. खरे तर ते पाहून मला फार वाईट वाटायचे, पण त्याला पर्याय नव्हता. तुमच्या घरी कामाला लागल्यापासून मी बघते आहे. तुमच्या घरी अन्न कधीच वाया जात नाही. प्रत्येकाला लागेल तेवढेच तुम्ही ताटात वाढता. त्यानंतर मात्र ज्याला जितके लागेल तितके तो हाताने वाढून घेतो. एखाद्यावेळी चुकून माकून थोडीफार भाजी पोळी उरलीच तर तुम्ही ती देखील सर्वांमध्ये वाटून देता; त्यामुळे फेकण्याचा कधीच प्रश्न येत नाही." माधवी फार कौतुकाने बोलत होती.
विनयाला तिच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले. माधवीने तिच्या या सवयीचे किती बारकाईने निरीक्षण केले होते.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा