Login

खरी श्रीमंती (भाग ३)

विनयाकडे असलेला जुना फ्रिज माधवीला हवा आहे. त्यामागे एक ठोस कारण आहे. ते जाणून घेण्यासाठी वाचा - खरी श्रीमंती.
ईरा चॅम्पियनशिप  २०२५
जलद कथालेखन
संघ - वनिता
कथा लेखन- अपर्णा परदेशी.

शीर्षक - खरी श्रीमंती (भाग - ३)

इतकी समजदार असणारी माधवी आता विनयाला थोडी गुढ वाटत होती. काहीतरी ठोस कारण असल्याशिवाय माधवी अशी वागणार नाही हे एव्हाना तिच्या लक्षात आले होते. विनयाने या प्रकरणाच्या मुळाशी जायचे ठरवले.

"चला, येते बाईसाहेब. फ्रीजचं काय तेवढं मला लवकर सांगा."

निघताना माधवीने विनयाला फ्रिज विषयी टोकलेच. ते ऐकून विनयाने नुसती नंदीबैलासारखी मान हलवली. तिच्या मनात मात्र वेगळीच खलबते सुरू होती.

माधवी जाताच विनयाने घाईघाईत आपली पर्स उचलली. माधवी पाठोपाठ ती देखील निघाली. माधवी बिल्डिंगखाली असलेल्या वॉचमनच्या खोली जवळ गेली. तिथे तिने काही पिशव्या ठेवल्या होत्या. त्या उचलून ती घराकडे निघाली. इतरांच्या घरचे उरलेले  अन्न जमा करून माधवी तिथे ठेवत असावी असा विनयाने अंदाज लावला. माधवी झपझप पावले टाकत निघाली होती. विनया तिला दिसू नये अशा पद्धतीने तिचा पाठलाग करत होती.

काही अंतर गेल्यावर माधवी एका गल्लीतून आत शिरली. विनयाने आधी तिला जाऊ दिले. त्यानंतर विनया तिच्या पाठीमागे गेली. गल्लीच्या दुसऱ्या टोकाला पुढे गेल्यानंतर एक जुनाट पद्धतीचे पडझड झालेले मंदिर होते. त्या मंदिराच्या पाठीमागे इटुकल्या पिटुकल्या दहा-बारा मुलांचा घोळका खेळत होता. फाटके कपडे, अनवाणी पाय, उन्हात रापलेली त्वचा आणि शरीराने अशक्त अशी ती मुले पकडापकडी खेळण्यात दंग होती. माधवी समोर दिसताच त्या मुलांनी गोंगाट करायला सुरुवात केली. आपला खेळ अर्धवट टाकून सर्वांनी तिच्याभोवती घोळका केला. तिच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे उधाण आले होते.

"थांबा बाळांनो, सर्वांना मिळेल. आज कमी मिळाले आहे; त्यामुळे सर्वांनी सारखे वाटून घ्या." माधवी मायेने त्यांच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली.

जेवण कमी आहे हे ऐकून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर कसलीही नाराजी पसरली नाही. उलट ती सर्व मुले पटापट गोलाकार जाऊन बसली. माधवीने आणलेले अन्न त्यांच्यापुढे ठेवले. त्यावर तुटून पडण्याऐवजी ती मुले आपापसात मिळून मिसळून खायला बसली होती. माधवी कौतुकाने त्यांच्याकडे बघत होती.

ते सर्व पाहून विनयाच्या डोळ्यांत घळाघळा पाणी वाहायला लागले. लोक म्हणतात देव मंदिरात असतो. आज मात्र तिने मंदिराच्या पाठीमागे माधवीच्या रूपात देव पाहिला होता. त्या भुकेल्या मुलांच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद पाहून तिला माधवीच्या मोठेपणाची जाणीव झाली होती. आपण सधन आहोत, आपल्या घरात सगळ्या सुखसोयी आहेत याचा अर्थ आपण श्रीमंत आहोत असे नाही. मनाने आणि कर्तुत्वाने देखील आपण तितकेच श्रीमंत व्हायला हवे असे तिला वाटून गेले. ती तिच्याच विचारात गुंतलेली असताना माधवी तिच्यासमोर कधी येऊन उभी राहिली ते तिलाही कळले नाही.

"बाईसाहेब! तुम्ही?" माधवीने आश्चर्यचकित होऊन विचारले 

"माधवी कोण आहेत ही मुले? मला सगळं काही सविस्तर सांगशील का?" विनयाने विचारले.

"हो, पण तुम्ही हे कुणाला सांगणार नाही ना! नाहीतर लोक मला कामावरून काढून टाकतील. मुले ही देवाघरची फुले असतात हो. मग ती आपली काय आणि दुसऱ्याची काय. देवाने माझ्या झोळीत अशी फुले टाकली नाही. कदाचित ह्याच कारणासाठी." डोळ्यातले पाणी अडवत माधवी म्हणाली.

"विश्वास ठेव माझ्यावर. मी हे कुणाला सांगणार नाही." हळव्या मनाने स्वतःला सावरत विनयाने आश्वासन दिले.

"बाईसाहेब, एके दिवशी या भागात मी काही कामानिमित्त आली होती. तेव्हा मी ह्या मुलांना मंदिराच्या पाठीमागे कुणीतरी फेकलेले अन्न उचलून खाताना पाहिले. ते दृश्य पाहून माझे काळीज पिळवटून गेले. मी ह्या मुलांची विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की त्यांचे आई-वडील पहाटेपासून रात्रीपर्यंत कुठल्यातरी बांधकाम स्थळी कामावर जातात. तिथे मुलांना सोबत नेता येत नाही; म्हणून ते देवाच्या भरवशावर सोडून जातात. जगण्यासाठी माणसाला किती तडजोडी कराव्या लागतात याचा विचार करून मला रात्रभर मला झोप लागली नाही."

"उरलेले अन्न मागायचे कारण समजले, पण तुला फ्रीज कशाला हवा होता?" विनयाने तिला पडलेला प्रश्न विचारला.

"बाईसाहेब, माझी पण परिस्थिती जेमतेमच आहे. रोज ह्या मुलांना जेवू घालावे तितकी माझी ऐपत नाही. तुम्ही नवीन फ्रीज घेताय हे ऐकल्यानंतर माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मी ज्या लोकांच्या घरी कामाला जाते त्यांच्या घरून उरलेले अन्न मागून घ्यायचे. एखादेवेळी जास्त मिळाले तर फ्रिजमध्ये साठवून ठेवायचे. जेणेकरून या मुलांना दुसऱ्या दिवशी देखील ते खाता येईल. म्हणूनच माझा सर्व खटाटोप सुरू होता."

"हे बघ माधवी, तू काहीच चुकीचं करत नाहीये. तू हे सर्व स्पष्ट सांगितलं असतं तर लोकांच्या मनात तुझ्याविषयी चुकीची धारणा झाली नसती. तुला किंवा इतरांना लाज वाटावी असे तू कोणतेच काम करत नाहीये. याउलट सर्वांना अभिमान वाटेल असेच हे कार्य आहे. राहिली फ्रिजची गोष्ट, तर उद्याच मी तुझ्या साहेबांशी बोलून घेते. शिवाय तुझ्या घरी फ्रिज पोहोचवण्याची सुद्धा व्यवस्था करता येईल का ते बघते. आणि हो अजून एक.. या मुलांसाठी जेवण कमी पडले तर हक्काने मला सांग. मी तुला नक्कीच मदत करेल."

विनयाच्या बोलण्याने माधवीच्या मनाला उभारी आली.

काही दिवसांनी माधवीच्या घरी दिमाखात फ्रिज पोहोचला होता. शिवाय बिल्डिंग मधल्या बायका स्वतःहून उरलेले अन्न तिच्याकडे सोपवत होत्या.

समाप्त.
0

🎭 Series Post

View all