Login

खरी श्रीमंती (भाग - १)

विनयाकडे असलेला जुना फ्रिज माधवीला हवा आहे. परंतु, त्यामागे एक ठोस कारण आहे. ते जाणून घेण्यासाठी वाचा -खरी श्रीमंती.
ईरा चॅम्पियनशिप  २०२५
जलद कथालेखन
संघ - वनिता
कथा लेखन- अपर्णा परदेशी

शीर्षक - खरी श्रीमंती (भाग - १)

सकाळी दहा-अकराच्या सुमारास बिल्डिंगमधल्या बायकांच्या गप्पा रंगल्या होत्या. पुरुष मंडळी केव्हाच कामावर निघून गेली होती. मुले सुद्धा शाळेत निघून गेलेली असल्याने ही वेळ खास करून बायकांसाठी राखीव होती. त्यावेळी कुणाच्या घरी काय सुरू आहे? हा विषय आवडीने चघळला जायचा.

"विनया, मग काय ठरवले तू?" भूमीने विचारले.

"मला काही सुचत नाहीये गं. इतकी वर्ष झाली तिने कधी काही मागितले नाही. शिवाय इकडची काडी तिकडे केली नाही. घरातली सर्व कामे अगदी प्रामाणिकपणे करते. त्यामुळे तिला नकार द्यायला जड जात आहे."

"विनू तू फार भोळी आहेस; म्हणून तुझ्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जातो. माणसाला नाही म्हणता यायला हवे आणि तुला तेच जमत नाही." भूमी म्हणाली.

"नाहीतर काय? विनूच्या साध्या सरळ स्वभावामुळेच तिने फ्रिज मागायची हिंमत केली. आपल्या कुणाजवळ मागायची तिची हिंमत तरी होईल का?" पूजा म्हणाली.

"हो ना, इतकी महागडी वस्तू घ्यायची तिची ऐपत तरी आहे का? काय तर म्हणे जुना फ्रिज मला देऊन टाका." रियाने तोंड वेडेवाकडे करत उत्तर दिले.

"त्यापेक्षा तू गुपचूप तुझा जुना फ्रिज एक्सचेंज ऑफरमध्ये देऊन नवीन डबल डोअरचा फ्रिज घेऊन टाक. तेवढीच नवीन फ्रिजची किंमत कमी होईल. ह्या कानाची खबर त्या कानाला होऊ देऊ नको. आम्ही सुद्धा याची वाच्यता कुठे करणार नाही. काय गं सखींनो?" सुविधा सगळ्यांना उद्देशून म्हणाली.

"हो ना, नंतर माधवीला सांगून दे, की जुना फ्रिज चांगल्या किमतीत गेल्यामुळे मी तो विकून टाकला. अशा रीतीने हा विषय कायमचा संपेल." रियाने सांगितले.

विनयाला सर्व मिळून सल्ला देत होत्या. ती सर्वांचे म्हणणे शांततेत ऐकून घेत होती, पण तरीही तिची अवस्था कात्रीत सापडलेल्या कागदासारखी झालेली होती.

त्या सर्वांची चर्चा सुरूच होती, की त्यांना माधवी समोरून येताना दिसली. ती दिसताच सर्व मूग गिळून गप्प बसल्या. त्या तिच्याबद्दलच बोलत असाव्या, हे तिला कळायला वेळ लागला नाही. त्या घोळक्यातून वाट काढत ती चुपचाप वरच्या मजल्यावर निघून गेली. या विषयाला घेऊन विनयाला तिचा सामना करावा लागणार होता. तिला काय उत्तर द्यावे ह्या विचारात विनया स्वतःच्या घराकडे निघाली.

माधवी विनयासहित त्या बिल्डिंगमधल्या अजून काही घरांमध्ये घरकाम करायची. विनया या दिवाळीत नवीन फ्रिज घेत असल्याचे कळताच माधवीने तिच्याकडे जुन्या फ्रिजची मागणी करून पाहिली. विनयाने त्यावेळी तो विषय टाळला, पण दरवेळी ती टाळू शकत नव्हती आणि माधवीला देखील नकार देऊ शकत नव्हती. अशा संभ्रमातच तिने बिल्डिंग मधल्या बायकांसमोर तो विषय काढला आणि तिला फ्रिज देऊ नये हा सल्ला देण्यात आला.

विनया घरी आल्यानंतरही दुविधा मनस्थितीतच होती. माधवी बाकीच्या घरांमध्ये कामे संपवून तिच्याकडे येण्याआधी तिला काहीतरी निर्णय घ्यावा लागणार होता.

'बरं.. फ्रिज ही काही स्वस्तातली वस्तू नव्हती. सहज कुणी मागितली आणि लगेच देऊन टाकली. त्यातल्या त्यात माधवीसारख्या लोकांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीला फ्रिज का हवा होता? हे देखील ती सांगत नव्हती. काय करावं बरं? माधवीला फ्रीज देऊ की नये?' विनयाला काहीच सुचत नव्हते.

बराच वेळ होऊनही विनया कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकली नव्हती. तितक्यात माधवी दारात येऊन उभी राहिली.

"काय ठरवलं बाईसाहेब तुम्ही?" माधवीने मोठ्या अदबीने विचारले.

"मी अजून तुझ्या साहेबांना विचारले नाही. काल रात्री त्यांना घरी यायला बराच उशीर झाला होता; त्यामुळे याबाबतीत आमचे बोलणेच झाले नाही." विनयाने वेळ मारून नेण्यासाठी त्यावेळी सुचलेले कारण सांगून दिले.

"बाईसाहेब, साधारणतः त्या फ्रिजची किंमत किती असेल?"
माधवीने सरळ किंमत विचारली.

"मला काही अंदाज नाही गं त्याचा. घरातले सर्व व्यवहार तुझे साहेब बघतात; त्यामुळे मला निश्चित काही सांगता येणार नाही."

"समजा, मी तुम्हाला दरमहा पाचशे रुपये दिले, तर साधारणतः किती महिन्यात फ्रीजचे सर्व पैसे फेडले जातील?" माधवीने उत्साहाच्या भरात विचारले.

"मी सांगितले ना माधवी तुला. जुना फ्रिज किती किमतीत विकला जाईल याचा मला खरच अंदाज नाही. सारखं सारखं मागे लागू नकोस. तुला कशाला हवाय गं फ्रीज? तुला गरज तरी काय?" विनयाचा संयम सुटला होता.

"रागवू नका बाईसाहेब, गरज आहे म्हणून तर विचारते आहे ना. दुकानातून नवीन फ्रीज घ्यायची माझी ऐपत नाही. दुसऱ्या कुणाकडून जुना फ्रिज घ्यायचा म्हटलं तर ते लोक मला फसवू शकतात, पण तुम्ही असे कधीच करणार नाही. तुमच्यावर माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे."
माधवीच्या उत्तराने विनया ओशाळली.

"हे बघ माधवी, एक वेळ मी तुला देऊन पण टाकेल तो फ्रिज, पण तू तो ठेवणार कुठे? इन मीन दोन माणसे राहतील एवढीशी तुझ्या घरात जागा आहे. तुम्ही दोघे नवरा-बायको नेहमी घराबाहेर असता. तुझा नवरा ट्रक ड्रायव्हर असल्याने तो सतत फिरस्तीवर असतो. कित्येक दिवस तर तो घरी सुद्धा येत नाही. तुझा संपूर्ण दिवस लोकांच्या घरी काम करण्यात निघून जातो. ज्या घरात तुम्ही दिवसभर राहतच नाही त्या घरात फ्रिज घेऊन करशील काय? उलट तुला त्याची अडचणच होईल." विनया तिला समजावण्याचा प्रयत्न करत होती.

"बाईसाहेब, खरे कारण मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण मला तुमच्याकडून फुकटात फ्रीज नकोय. वाटल्यास तुम्ही माझ्या पगारातून पैसे कापा." माधवी विनवणी करत म्हणाली.

"तुमच्या चाळीत कुणी घेतला आहे का? त्यांनी घेतला म्हणून तुला घ्यावासा वाटतोय का?" विनयाने तर्क लावून पाहिला.

"नाही बाईसाहेब, लोकांचा हेवा करावा इतकी ऐपत नाही माझी. असेही आमच्या चाळीत राहणाऱ्या लोकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते. ते कुठे फ्रीजच्या नादी लागतील." माधवी पडलेल्या स्वरात म्हणाली.

"बरं ठीक आहे. निराश होऊ नको. मी आज रात्री तुझ्या साहेबांशी बोलून बघते. बघूया ते काय म्हणतात." विनयाने माधवीला खुश करण्यासाठी सांगितले.

हे ऐकताच माधवीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. मोठ्या उत्साहाने ती तिच्या कामाला लागली. त्याच आनंदात ती अधून मधून कुठले तरी जुने गाणे गुणगुणत होती. आनंदाच्या भरात तिच्या कामाचाही जोर वाढला होता.

विनयाला मनातून वाईट वाटत होते.
'आपण तिला आशेला तर लावून दिले, पण आपण तिला खरंच फ्रिज देणार आहोत का? एक्सचेंज ऑफरमध्ये आपल्याला चांगला फ्रिज मिळत असेल तर मग माधवीला तो का द्यायचा? जुन्या फ्रिजच्या बदल्यात माधवीकडून पैसे घेणे आपल्याला तरी योग्य वाटेल का?' असे एक ना अनेक प्रश्न तिला भेडसावू लागले होते.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all