ख-या सुखाच्या शोधात
आजची सकाळ खास होती लेकीच्या हातचा गरमागरम चहा घेत मी सकाळ पेपर हातात घेतला आणि अचानक माझी नजर 'आधारवड ' या सदरावर पडली हे सदर माझ्यासाठी नवीन नव्हते.
ज्येष्ठ नागरिकांवर हे सदर होते, त्यात काही विशेष वाटत नव्हते, कारण आतापर्यंत त्याचा अर्थच समजला नव्हता. पण गेल्या काही महिन्यांत घडून गेलेल्या घटनांमुळे या म्हाता-या माणसांना
आधारवड का म्हणलयं ?
हे मी समजुन चुकले होते.
त्यामुळे आज हे सदर वाचताना मला काही गोष्टींचे ज्ञान मिळत होते आणि मी माझी केलेली चुक सुधारली याचे समाधानही होत होते.
3 महिन्यापुर्वीची गोष्ट घरात सासूसासर्याबरोबर मी रहाणार नाही असा निर्णय घेऊन मी नवीन संसार मांडला होता. आमच्या जून्या घरी आम्ही सर्व एकत्र रहात होतो. एक दिवस आमच्या शेजारी आशाचे नवीन जोडपे रहायला आले व ती माझी चांगली मैत्रीण झाली. पण त्यानंतर माझ्यात बदल होऊ लागला. घरी सासूबाई थोडेजरी काही बोलल्या तर त्याचा राग येत असे. माझी चूक असूनही ती कबूल करण्यात मला कमीपणा वाटत असे.
बाहेर जाताना त्यांना विचारावे लागे, काही निर्णय स्वतःच घ्यावे असे वाटे पण असे का ?
आधी असे नव्हते, पण माझ्यात हा बदल कशामुळे होत होता हे मलाच समजत नव्हते. जेव्हा मला आशा भेटायची तेव्हा तिच्या बोलण्यातून मला रोज नवीन काही तरी ऐकायला मिळायचे, ती सांगायची आज आम्ही पिक्चरला जाणार आहोत.
आज मी नवीन साडी घेतली. आज आम्ही फ्रिज घ्यायचा ठरवले आहे.
सगळे ती स्वतःच ठरवायची मला मात्र काही घ्यायचे म्हणले तरी मोठ्यांना सांगावे लागे.
एकदा आशा नळ चालू ठेऊन एकटीच शाॅपिंगला गेली होती. ती घरी येईपर्यंत सर्व घरात पाणी झाले होते पण घरी आल्यावर तिला आपल्या चुकीची जराही खंत वाटत नव्हती. उलट तिने एका बाईला पैसे देऊन घर स्वच्छ करून घेतले. मी तिच्या चुकीची जाणीव करून दिली तर ती मला म्हणाली ' त्यात एवढे वाईट वाटून घेण्यासारखे काय आहे ? तू मला मोठ्या माणसांसारखे उपदेश करू नको सारखे. मला नाही आवडत ' यावर मी काय बोलणार पण तेव्हापासून मलाही असे वाटू लागले. खरच राहिला असेल चुकून नळ उघडा तर त्यात एवढे काय ? ती स्वतंत्र आहे तिच्या घरात तिला रागवायला कोणी नाही तेच बरे आहे, नाहीतर आपल्या घरी ही म्हातारी माणसे सारख्या सुचना देत राहतात. जणु काही आपल्याला काही मतच नाही.
पुढे हळूहळू मी बदलू लागले आशाचे स्वतंत्र वागणे मला माझ्याही नकळत तिच्याकडे ओढू लागले. याबाबत मला माझ्या आईनेही समजावले पण मी दुर्लक्ष केले आणि शेवटी एक दिवस स्फोट झाला मी माझ्या नविन घरी वेगळी रहायला गेले.
मी माझा नवरा आणि माझी दोन मुले मोठी सोनू आणि छोटा चिंटू आमचे छोटे घर सुखी घर असे मनावर बिंबवीत मी खुप खुशीने नवीन घर सजवले. पहिला आठवडा खूप आनंदात गेला. मी माझ्याच विश्र्वात होते माझ्या मुलांना नवर्याला काय वाटते ? यात मला स्वारस्य नव्हते पण आता त्या गोष्टी हळूहळू समोर येत होत्या. सकाळी घरातले आवरताना माझी दमछाक होत होती व तो राग मुलांवर निघु लागला होता. चिंटूला आवडतो म्हणून मी शिरा केला तर तो म्हणाला तूला आजीसारखा शिराही करता येत नाही ऐकून राग आला. शेवटी दोन धपाटे घालून त्याला शिरा खाऊ घातला. रात्रीही तसेच सोनू चिंटूचे बाबा म्हणजे आजोबा रोज रात्री झोपताना गोष्ट सांगायचे, त्यादिवशी मुलांनी यांच्याकडे गोष्ट सांगा म्हणुन हट्ट धरला तर यांनी आई सांगेल म्हणुन सांगितले. आता मुले माझ्या मागे लागली गोष्ट सांग म्हणुन. पण मला तरी कुठे गोष्ट सांगता येत होती ? मी यांच्यावरच ओरडले, मुलांना झोपायला सांगायचे सोडून माझ्या मागे का लावले म्हणून ? झाले, यांच्या रागाचा पारा चढला मग काय यांची बडबड आणि मुलांची रडारड ऐकण्यातच पहाट कधी झाली ते कळले नाही. सकाळी मुलांना खुश करण्यासाठी हाॅटेलमधून जेवण मागवले. मुले खुप खुश झाली पण तेव्हापासून मला आणखी एक वाईट सवय जडली स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला, की रोज नवीननविन पदार्थ बाहेरून ऑर्डर करू लागले. त्याचाच परिणाम म्हणून चिंटू शाळेचा डबा खायचा बंद झाला. घरातून गुपचूप पैसे घेऊन मधल्या सुट्टीत शाळेच्या कॅटिनमध्ये वडापाव, मिसळ ,सामोसा असे पदार्थ खाऊ लागला.
हे सुध्दा दर आठ दिवसांनी अॅसिडीटीचा त्रास होतो म्हणून डॉक्टरकडे खेटे मारू लागले. डाॅक्टरने त्यांना बाहेरचे खायला सक्त मनाई केली. माझ्या वागण्याला मात्र ताळतंत्र राहिले नव्हते. एक दिवस ऑफिसमधून घरी आले तर घराला कुलूप दिसले. शेजारी चौकशी केल्यावर कळले की चिंटूला दवाखान्यात अॅडमिट केले आहे. पळतच दवाखाना गाठला माझे आई - बाबा , सासु - सासरे , हे आणि सोनू सर्वजण तिथे होते पण माझ्याशी कोणीही बोलले नाही. डाॅक्टरकडून समजले की चिंटूला फुड़पाॅईजनिंग झाले त्याचे अंग तापले होते, सगळे खुप काळजीत होते डाॅक्टरचे म्हणणे होते की बाहेरचे खाल्लाने त्याला हा त्रास झाला होता. त्यामुळे त्याच्या पोटाच्या आतडीला हि सुज आली आहे. एवढासा माझा चिंटू बेशुद्ध अवस्थेत पडला होता त्याची ती अवस्था पाहून माझे डोळे भरून आले. डोळ्यापुढे अंधार येऊ लागला आणि त्यातच दिसला, दोन दिवसापुर्वी पोट दुखते आहे म्हणून माझ्याजवळ येऊन रडत असलेला माझा चिंटू. तेव्हाच का नाही मी त्याला दवाखान्यात नेले हो आठवले मला आशा बरोबर फिरायला जायचे म्हणून मी ' बरे वाटेल थोड्यावेळाने ' असे सांगून त्याला तसेच सोडुन निघुन गेले. माझ्याच वागण्याची मला लाज वाटली रडू लागले मी. तेव्हढ्यात सोनू माझ्याजवळ आली. सोनू आता कुठे 7 वीत गेली होती पण किती समजूतदार होती मला म्हणाली ' आई आजी आजोबा घरी असते तर चिंटूला लगेचच दवाखान्यात आणले असते नाहीतर आजीने घरातच औषध बनवून त्याला दिले असते. आई तू पण आजीकडून ते औषध कसे बनवायचे ते शिकून घे ना ' किती निरागस ते शब्द. एक मोठी बहीण आपल्या भावाची किती काळजी घेत होती आणि मी?
आई माझ्याजवळ येऊन म्हणाल्या, तू काळजी करू नकोस घरी जा. आत्ताच ऑफिसमधून आली आहेस आराम कर व परत ये तोपर्यंत आम्ही आहोत इथे. यांना विचारायला गेले तर हे माझ्याशी एकही शब्द बोलायला तयार नव्हते. शेवटी तशीच एकटी घरी आले घरात येऊन फॅन लावून शांत पडावे असे वाटले पण घरात सर्वत्र अंधार, लाईट गेली होती पण ती ही फक्त आमच्याच घरातली. वीज ऑफिसमध्ये फोन लावला तर समजले की मागच्या महिन्याचे लाईट बिल भरले नसल्याने घरची वीज कापली आहे आणि दोन दिवस सरकारी सुट्टी असल्याने सोमवार शिवाय वीज परत येणार नाही ऐकून धक्काच बसला दोन दिवस लाईट शिवाय कसे होणार सगळे? कपाटातले बिल काढून पाहिले तर बिल भरण्याची मुदत उलटून 25 दिवस होत आले होते अजून चार दिवसांनी नवीन बिल आले असते, यांनी वेळेवर पैसे देऊनही मला वेळेत बिल भरायला जमले नव्हते या चुकीची मला लाज वाटू लागली आणि अचानक जून्या घरची आठवण झाली मुदतीच्या आत वीजबिल भरायचे म्हणुन बाबा ( सासरे ) नेहमी घाई करायचे तेव्हा मला राग येई आता कळते आहे ती चुक. बिचारे बाबा स्वतः जाऊन मुदतीत आणि त्या रांगेत उभे राहून बिल भरायचे पण नुसते पैसे द्यायचे कामही मला नीट जमत नव्हते. स्वयंपाकाचा कंटाळा आला तरी बाहेरून जेवण न मागवता सासुबाई घरी स्वतःच काहीतरी नवीन पदार्थ बनवायच्या. त्याच्या हातचे वेगवेगळे पदार्थ आम्ही सगळेच खूप आवडीने खायचो. सकाळी थोडेफार आवरून मी ऑफिसला गेले की माझ्या मुलांचे आवरण , त्यांची काळजी , घरची सफाई , बाजारहाट सर्व तर त्याच करायच्या. नुसती नावाला आई झाले होते मी, पण आईपण निभवायचं खरे काम तर त्याच करायच्या. खरं बोलली सोनू आजी असती तर आज माझा चिंटू दवाखान्यात असा पडला नसता. त्याचे आजोबा जवळ असते तर रात्री गोष्ट ऐकत तो शांत झोपला असता. आजी आजोबांचे संस्कार त्याच्यावरही झाले असते. घरातून गुपचूप पैसे नेण्याची घाणेरडी सवयही त्याला लागली नसती अशा अनेक गोष्टी समजू लागल्या आणि हे सर्व होण्यामागे कारणीभूत फक्त मी होते. माझ्या सुखासाठी मी माझ्या मुलांना, त्यांच्या आजीआजोबां पासून दूर केले होते. एका मुलाला आई पासून तोडले होते. नविन घरात पाऊल ठेवले तेव्हा मी सुखसागरात पोहत होते आणि यांच्या डोळ्यात अश्रू होते पण मला त्याची जाणीव ही नव्हती आणि एवढे करूनही मला काय मिळाले होते ? काहीच नाही.
चिंटूच्या काळजीने मला अस्वस्थ वाटत होते, तेव्हा कळाले यांना त्या घरापासून तोडताना त्या आईच्या मनाला काय वाटले असेल ?त्यांचे ह्रदय ही असेच तळमळत असेल जसे आता माझे माझ्या मुलासाठी तळमळते आहे. उठले आणि तडक दवाखान्यात आले. चिंटू शुध्दीवर आला होता त्याच्या शेजारच्या बेडवर हे आईच्या मांडीवर डोके ठेवून पडले होते दोघांच्या डोळ्यात अश्रु होते मुकपणे ते एकमेकांना आपल्या भावना सांगत होते, पण मला तिथे पहाताच पुन्हा एकदा यांच्या चेहऱ्यावर रागाची छटा उमटली आणि मला कळून चुकले की आज माझ्यामूळे माझ्या नवर्याच्या डोळ्यात अश्रु होते. त्याच्या मनाला मी जी वेदना दिली होती ती खोलवर ठसठसणारी होती. आपली चूक समजून घेऊन मी आईबाबाची आणि यांची माफी मागितली आईबाबांनी लगेचच मला माफ केले आणि यांनाही राग सोडायला सांगितला यांनी मला क्षमा केली. पण त्याचा अबोला काही सुटला नव्हता दोन दिवसांनी चिंटूला घेऊन आम्ही आमच्या जून्या घरी परत आलो. माझ्या मनात अपराधीपणाची भावना होती पण आईबाबांनी आपल्या प्रेमाने ती हि पुसून टाकली. सर्व घरचे वातावरण पहिल्यासारखे झाले होते. यांचा अबोला सुटू लागला होता. आज आईंनी मला आवडतो म्हणून खिचडी भात केला होता. रात्री झोपताना बाबांनी खूप छान गोष्ट सांगितली तेव्हाचा सोनू ,चिंटूच्या चेहर्यावरचा आनंद पाहून मला खूप छान वाटले. यांनाही त्यांच्या आईच्या ऊबेत परत आल्याने बरे वाटत होते ते ही जणू पुन्हा एकदा लहान झाले होते. माझी सोनू आता आजीकडून खूप काही नवनविन गोष्टी शिकत होती. तिने केलेला आजचा गरमागरम चहा पिताना त्या चहामध्ये आजीआजोबांच्या संस्कारांची आणि प्रेमाची चवही जाणवत होती. एवढे वर्ष संसार करत आले. रोज पहिला चहा मीच तर करत होते पण या चहाची सर कशालाच नव्हती.
ले --- सौ विद्या मेटे ( कारंजकर )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा