Login

खऱ्याला खरं, खोट्याला खोटं- भाग 1

आईची चूक आहे असं धडधडीत दिसतानाही आईसमोर महान बनण्यासाठी बायकोला बोलणाऱ्या नवऱ्याला स्वातीने आयुष्यभराचा धडा शिकवला
"तुला काही अक्कल आहे की नाही? चहा उतू जाऊन पूर्ण ओटा चिकट झालाय आणि तू तसाच ठेवलास?"

ऑफिसमधून आल्यावर किचनमध्ये डबा ठेवायला गेलेला अरुण आपल्या बायकोवर चिडला होता. हॉलमध्ये सासूबाई सर्व ऐकत होत्या पण तोंडातून एक शब्दही निघाला नाही. स्वाती धावतच किचनमध्ये आली आणि म्हणाली,

"काय झालं?"

"हे काय आहे?" ओट्याकडे हात दाखवत अरुण म्हणाला,

ते बघताच स्वाती चिडली आणि म्हणाली,

"तुमच्या पाच मिनिटं आधी मी ऑफिसमधून आले होते आणि आल्या आल्या खोलीत गेले, मला काय माहित हे कोणी केलं?"

हा सगळा प्रकार सासूबाईंनीच करून ठेवला होता. त्यांना सवयच होती, ओट्यावर काही सांडलं, पसारा केला की तसाच ठेवायचा. स्वातीने मागून येऊन तो आवरत बसायचा.

सिद्ध झालेलं की सासूबाईंनीच चहा उतू जाऊन ओटा बरबरटून ठेवला होता ते. त्यांना सगळं माहीत होतं तरी अरुण स्वातीवर ओरडल्यावर एका शब्दाने खरं काय ते बोलल्या नाही याचा स्वातीला राग आला. तिने नवऱ्यावरच चिडचिड केली,

"काय झालं आता? बोला ना?"

अरुण आपल्या आईवर कसा चिडणार? तिला कसं बोलणार? धपकन तोंडावर आपटल्यावर किमान माफी तरी मागावी नाहीतर गप तरी बसावं ना, पण अरुणही सासूचाच मुलगा, तो म्हणाला,

"आईचं जाऊदे पण चहा उतू जाईपर्यंत तुला वासही आला नाही?"

"वास यायला मी घरी होते??"

परत एकदा अरुण तोंडावर आपटला, पण तरीही आईला काही न बोलता स्वतीलाच म्हणाला,

"आल्या आल्या आधी किचनमध्ये येऊन बघत जा, सरळ खोलीत घुसतेस.."

स्वातीला आता राग अनावर झाला, अरुणला माहीत होतं की तो चुकीचं वागतोय पण त्याला आईसमोर बायकोला नाचवणारा आधुनिक "श्रावणबाळ" म्हणून वागायचं होतं, मग वाटेल ते आरोप करून आईसमोर बायकोला हिणवण्यात त्याला पुरुषार्थ वाटे.

स्वाती काही बोलायच्या आत अरुण तिथून निघून गेला. जेवण झाल्यावर खोलीत गेल्यानंतर स्वातीने अरुणला चांगलंच फैलावर घेतलं, आईसमोर दादागिरी करणारा अरुण बायकोच्या हातात एकटा सापडल्यावर मात्र गरीब गाय बनून जाई,

"अगं मी आईला कसं बोलणार सर्वांसमोर?"

"म्हणजे बायकोला तिची चूक नसताना बोललेलं चालतं?"

"अगं समजुन घे थोडंस.."

"अजिबात नाही, यापुढे असं वागलात ना तर तिथल्या तिथे सोक्षमोक्ष लावेन..खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणायची हिंमत ठेवते म्हटलं मी..तुझ्यासारखं नाही बसत शेपूट घालून"

काही दिवसांनी जवळच्या नातेवाईकांचं लग्न ठरलं, लग्नाला स्वातीच्या माहेरचेही येणार होते. जाताना गाडीत त्यांनाही सोबत घेऊन जायचं असं ठरलं.