Login

खताविना शेती

खता विना शेती
खता विना शेती

भारत देश कृषिप्रधान देश आहे. पूर्वी शेती हा प्रमुख व्यवसाय होता. त्यामुळे कुटुंबातील लोकांना शेतीचा बराच अनुभव होता. कोणते पीक कधी घ्यायचे, खते कोणती व किती प्रमाणात द्यायची हे सर्व त्यांना माहिती होते. गाई गुरे पाळणे हा शेतीचा पूरक व्यवसाय असल्यामुळे सेंद्रिय खत भरपूर प्रमाणात जमा व्हायचे. ते शेतात टाकून पिके घेतली जायची. त्यामुळे जमिनीचा पोत टिकून राहायचा.

रासायनिक खतांमधून पिकांना आवश्यक असलेले अन्नद्रव्यांची गरज तात्काळ भागवली जाते. परंतु त्यामुळे हळूहळू जमिनीचा पोत बिघडतो. बी बियाणे, खते, कीटकनाशके यामध्ये शेतकरी गुरफटून जातो त्याचा परिणाम आज उत्पन्न वाढते. पण भविष्यात हळूहळू जमिन निकस होत जाते. कृत्रिम खत घातल्याशिवाय शेती करता येत नाही असा एक समज प्रचलित आहे. शिवाय जितके जास्त खत तितके जास्त उत्पादन जास्त ही भावना ही दृढ आहे. यामुळे नेमका उलटा परिणाम झाला आहे,म्हणजे असे की वारेमाप खते वापरल्यामुळे त्यातील पुष्कळचा भाग जमिनीवरच राहतो. त्याचा फायदा होण्याऐवजी जमीन खार होते व निरुपयोगी बनते.

उसाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी अशाच वाया जात आहे. त्यावर उपाय म्हणून सेंद्रिय खते वापरण्यास आजकाल सुरुवात झाली आहे.परंतु निसर्गही आपल्या परीने वेगवेगळे प्रयोग करीतच असतो. त्यातील एक म्हणजे घेवडा ( bean) जातीतल्या वनस्पतींच्या मुळांमध्ये रायझोनिअम या नावाचा एक जीवाणू राहतो. हा जिवाणू मुळांवर गाठी तयार करतो आणि हवेतल्या नायट्रोजन वायू शोषण घेऊन त्याचे अमोनिया वायूत रूपांतर करतो. वनस्पती हा अमोनिया चटकन शोषून घेते व प्रथिने तयार करण्यासाठी वापरते. रायझोनिअमला घेवडा संरक्षण देतो व अन्न पुरवतो. अशी ही दोघांची मैत्री आहे. या मैत्रीला सहजीवन किंवा सिम्बॉयसिस म्हणतात. रायझोनिअम जिवाणू जगातील सर्व खत कारखान्यांमध्ये जेवढा अमोनिया निर्माण करतो त्यापेक्षा जास्त अमोनिया निर्माण करतो. खरोखरच अद्भुत.

रायझोनियमचे एक वैशिष्ट्य असे, की हा जीवाणू फक्त घेवडा कुळातील वनस्पतीशीच सहजीवीत असतो. अलीकडे जनुक अभियांत्रिकीच्या साहाय्याने रायझोनिअम गहू, तांदूळ यासारख्या धान्योत्पादक वनस्पतींच्या मुळांमध्ये स्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यांना घेवड्याच्या मुळांवरील गाठींमध्ये एक घटक सापडला आहे. या घटकाला ते गाठ घटक किंवा नोड फॅक्टर म्हणतात. या घटकाचे विरल द्रवही फार मोठ्या प्रमाणात गाठी तयार करते. खरोखरच ऐकावं ते नवलच अद्भुत माहिती.

घेवड्याच्या मुळांवर जितक्या गाठी जास्त तितके अधिक रायझोनियम त्यात राहू शकतात आणि पर्यायाने अधिक अमोनिया तयार होतो. त्यामुळे नायट्रोजन युक्त खते घालण्याचे कारणच उरत नाही. फ्रेंच शास्त्रज्ञांनी घेवड्याच्या बियांवर गाठ घटकाचे लेप चढविले आहेत. अशा बिया अधिक गाठी तयार करतात व खताचा प्रश्न सुटतो.
सौ. रेखा देशमुख