Login

खेळ - बारा ते तीन (अंतिम भाग - 3)

काही वर्षांपूर्वी बंद पडलेल्या चित्रपटगृहात रात्रीच्या वेळी अखिल जातो, तेव्हा तिथे त्याच्यासोबत काय घडते हे जाणून घेण्यासाठी वाचा भयकथा - खेळ - बारा ते तीन.
ईरा चॅम्पियनशिप २०२५
संघ - वनिता

खेळ - बारा ते तीन (अंतिम भाग - ३)
लेखन - अपर्णा परदेशी

हा सावल्यांचा खेळ खरंच सुरू आहे की आपल्यावर मद्याचा अंमल चढल्यामुळे आपल्याला तसे भासत आहे हे त्याला कळेना. खुर्च्यांवर बसलेल्या सावल्या स्पष्ट पाहण्यासाठी तो आणखी पुढे गेला. चित्रविचित्र दिसणाऱ्या त्या मानवी आकृतीप्रमाणे भासणाऱ्या सावल्या पडद्यावर दिसणारे चित्रपटांचे दृश्य पाहून जल्लोष साजरा करण्यात मग्न होत्या. त्यातल्या काही त्याच्याकडे रागाने बघत होत्या, तर काही त्याला पाहून हसत होत्या.

इथे काहीतरी भयंकर अघटीत घडत असल्याचे त्याला जाणवत होते. अखिलच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. त्याच्या हातापायांना कंप सुटू लागला. भीतीने कपाळावर जमा झालेले घर्मबिंदू पुसत तो ते प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न करत होता.

त्याच्या बाजूला असलेल्या खुर्चीकडे त्याने पाहिले. त्यावर बसलेल्या एका पुरुषी आकृतीने त्याच्याकडे आपली धारधार नजर रोखली. त्या आकृतीच्या आग ओकणाऱ्या लालसर डोळ्यांमध्ये अखिलला मृत्यूचा आभास झाला. त्या डोळ्यातील भाव पाहून अखिल घाबरला. मागे सरकण्याच्या नादात धडपडून त्याचा तोल गेला. 

तो खाली पडणार तितक्यात कुणीतरी हात धरून त्याला सावरले व एका रिकाम्या खुर्चीकडे इशारा केला. आपल्या हाताला कसला गार स्पर्श झाला म्हणून अखिल निरखून बघू लागला. तर एक भयानक दिसणारी आकृती त्याच्याकडे दात विचकून हसत होती. जणू काही त्याला ती सांगत असावी की आता तुलाही आमच्यात बसावे लागेल.

अखिल दोन-चार पावले मागे सरकला व पूर्ण ताकदीनिशी मुख्य दाराकडे पळायला लागला. दारापर्यंत पोहोचणार तोच खाडकन तो दरवाजा लागला. अंगातली होती नव्हती ती सर्व ताकद वापरून तो दरवाजा उघडायचा प्रयत्न करू लागला. नंतर तो लाथा बुक्क्यांनी दरवाजा तोडायचा प्रयत्न करू लागला. परंतु, त्याचा काहीच उपयोग होत नव्हता.

अखिलने मागे वळून पाहिले. मगाशी पडद्यावर दिसणारा खेळ आता दिसत नव्हता. शिवाय सर्व खुर्च्या रिकाम्या होत्या. एक भयान शांतता आणि त्याच्या खेरीज तिथे काहीच नव्हते. त्याच्या सोबत नक्की काय होत आहे ते त्याला समजत नव्हते.

त्याचा बाहेर जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. हातबल आणि निराश झालेला अखिल बाहेर पडण्यासाठी दुसरा एखादा मार्ग सापडतो का म्हणून शोध घेऊ लागला. एकाएकी दिव्यांची उघडझाप होऊ लागली. चित्रपटगृहाच्या पडद्यावर एक हातपाय नसलेली रक्ताने माखलेली विचित्र आकृती दिसू लागली. अखिल तिला पाहून दाराकडे पळण्याच्या बेतात होता. मात्र त्याचे पाय तिथून हलेना. जणू काही ते दगडासारखे निश्चल आणि निष्प्राण झाले असावेत.

ती आकृती हळूहळू मोठी होऊ लागली. इतकी की भीतीने अखिलची छाती दडपून गेली. त्याचा आवाजही बाहेर येईना. त्याचे डोळे खोबनीत बाहेर पडतील की काय असे वाटायला लागले. स्वतःची सुटका करण्यासाठी तो धडपडू लागला. ती आकृती आक्राळ-विक्राळ रूप धारण करत त्याच्या दिशेने पुढे सरकायला लागली. तो भीतीने मूर्छित होण्याच्या मार्गावर होता. ती आकृती त्याला सामावून घेणार तेवढ्यात ती अदृश्य झाली.

पायांची हालचाल करण्यासाठी तो संपूर्ण शरीरावर जोर देऊ लागला. अंगातली उरलेली सूरलेली सर्व ताकद लावून तो पाय उचलायचा प्रयत्न करू लागला. एकाएकी त्याच्या पायांमध्ये त्याला जिवंतपणा जाणवू लागला. मोठ्या हिमतीने त्याने दाराकडे झेप घेतली.

पण....

कुणीतरी त्याला पुन्हा त्याच जागी ओढून आणले होते.

"तू इथे स्वतःच्या मर्जीने आला. परंतु स्वतःच्या मर्जीने बाहेर जाऊ शकत नाही." गडगडाटी हास्याच्या छायेत एक भारदस्त आवाज तिथे घुमू लागला.

"क...क...कोण आहे? मला कोणी दिसत कसं नाहीये." अखिलच्या तोंडून भीतीने थरथरणारे शब्द बाहेर पडले.

"जिवंत माणसे दिसतात. समजलं का? इथे यायची तुझी हिम्मत कशी झाली?" त्या आवाजात प्रचंड राग जाणवत होता.

"चूक झाली. माझंच चुकलं. मी पुन्हा असे करणार नाही. मला इथून बाहेर जाऊ द्या." अखिल हात जोडून विनवणी करत होता.

"आता इथून तुझी सुटका नाही. जे इथे आले ते पुन्हा कधीच बाहेर गेले नाही. ही जागा माझी आहे. माझ्या जागेवर येण्याचे धाडस केलेच कसे?" तो आवाज दरडावून विचारत होता.

"मला क्षमा करा. फार मोठी चूक झाली. पहिली आणि शेवटची चूक समजून माफ करा. पुन्हा असे कधीच होणार नाही." अखिल गयावया करत होता.

"नाही. मी पण अशीच याचना करत होतो. परंतु स्वतःच्या स्वार्थापायी कोणतीही दयामाया न दाखवता निर्घृणपणे मला मारून टाकण्यात आले. त्यामुळे इथे येणाऱ्या कुणालाच मी सोडणार नाही." त्या आवाजातून प्रचंड संताप व्यक्त होत होता.

अखिल जीवाच्या आकांताने त्या दाराला जोरजोरात धक्के मारू लागला. त्याला काय माहीत की तो निरर्थक प्रयत्न करत होता.

ती आकृती मात्र त्याच्याकडे पाहून गडगडाटी हास्य करत होती. कारण त्या चित्रपटगृहातील प्रेक्षकसंख्येत अजून एक भर पडणार होती.

त्या रात्रीच्या बारा ते तीनच्या खेळामध्ये ते चित्रपटगृह  बेंबीच्या देठापासून केला जाणारा आक्रोश आणि जीवघेण्या किंकाळ्यांनी भरून गेले होते.

विघ्नेश आणि सिद्धू रात्रभर अखिलची वाट बघत तिथेच थांबले होते. त्या काळ्याकुट्ट काळोखात चित्रपटगृहापर्यंत जायची त्यांच्यात मुळीच हिंमत नव्हती. म्हणून ते सकाळ होण्याची वाट बघत होते.

पहाटेच्या प्रहरी सूर्यनारायणाने दर्शन देताच ते दोघे देवाचे नामस्मरण करत चित्रपटगृहाच्या दिशेने अखिलच्या शोधासाठी निघाले. थोडे पुढे गेल्यानंतर काही अंतरावरूनच त्यांना चित्रपटगृहाबाहेर अखिलची गाडी दिसली. घाबरत घाबरत जोरजोरात देवाचे नामस्मरण करत ते गाडी जवळ गेले. तिथे गाडीच्या सीटवर त्यांना एक चिठ्ठी दिसली.

त्यावर लिहिले होते  - बारा ते तीनचा खेळ खल्लास!

समाप्त.
0

🎭 Series Post

View all