Login

खेळ - बारा ते तीन (भाग - २)

काही वर्षांपूर्वी बंद पडलेल्या चित्रपटगृहात रात्रीच्या वेळी अखिल जातो, तेव्हा तिथे त्याच्यासोबत काय घडते हे जाणून घेण्यासाठी वाचा भयकथा - खेळ - बारा ते तीन.
ईरा चॅम्पियनशिप २०२५
संघ - वनिता

खेळ - बारा ते तीन (भाग - २)
लेखन - अपर्णा परदेशी

संवादाचे स्वरूप वादविवादाकडे झुकत चालले होते.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विघ्नेशने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

"अरे बाबांनो, कुठला विषय कुठे नेताय. माघारी फिरण्यातच शहाणपण आहे. चला निघू आता." 

"नाही. मी नशेत नाही. हे मी सिद्ध करून दाखवणार. मी एकटा त्या चित्रपटगृहात जाऊन दाखवणार आणि जसा गेलो तसा परत येऊन पण दाखवणार. " अखिल हातातली बाटली रागात फेकून बोलला.

"अखिल उगाच वाकड्यात शिरू नको. तुला नसेल आमच्यावर विश्वास ठेवायचा तर नको ठेवू. पण स्वतःचा जीव धोक्यात घालून तिथे जाण्याच्या गोष्टी करू नको." सिद्धू आवाजाची पट्टी वाढवत म्हणाला.

"घाबरला ना. मला माहित होते की तुम्ही उगाच मला भाकडकथा सांगत आहात. मी मागे मुळीच हटणार नाही. तुम्हाला दोघांना जायचे असेल तर जा. मी मात्र तुम्ही सांगितलेल्या गोष्टीची शहानिशा करून झाल्याशिवाय परत येणार नाही."

त्या तापलेल्या वातावरणातच अखिलने गाडीला किक मारली. विघ्नेश आणि सिद्धू घाबरून घाम पुसत पुढे जाणाऱ्या अखिलकडे गोंधळून बघत होते. तो येईपर्यंत इथेच त्याची वाट बघायची की घरी परत जायचे हे देखील त्यांना कळेना.

अखिलने गाडीचा वेग वाढवला. काही वेळातच तो त्या बंद पडलेल्या चित्रपटगृहाच्या लोखंडी फाटकाजवळ येऊन पोहोचला. बाहेरूनच तो त्या चित्रपटगृहाचे निरीक्षण करू लागला.

भग्न अवस्थेत जीर्ण झालेले ते चित्रपटगृह आपल्या अंतिम घटका मोजत होते. भूकंपाचा सौम्य झटका आला तरी जमीनदोस्त होईल इतकी त्याची वाईट अवस्था झाली होती. तरीही वर्षानुवर्षे कालवश न होता ते कसे काय उभे होते कुणास ठाऊक?

अखिलने फाटक उघडायचा प्रयत्न केला. फाटकाची खालची बाजू जमिनीतल्या मातीत रुतून बसल्यामुळे ते फाटक सहजासहजी उघडत नव्हते. अखिलने फाटक मागेपुढे हलवून खालची माती मोकळी करायचा प्रयत्न केला. अजून थोडा जोर लावताच ते फाटक उघडले गेले आणि आकाशात गिधाडे गिरट्या घालायला लागली. त्यांच्या फडफडणाऱ्या आवाजाने अखिल थोडा विचलित झाला. पण तरीही मनात आलेला तात्पुरता विचार त्याने त्वरित झटकून टाकला.

कुण्या एकेकाळी नावाजलेले हे चित्रपटगृह  सद्यस्थितीत भुताच्या अधिपत्याखाली असल्याची अफवा पसरलेली पाहून त्याला थोडे वाईट वाटले. लोकांच्या याच समजुतीला फाटा देण्यासाठी त्याने हिमतीने एक पाऊल उचलले होते.

मनाचा हिय्या करत तो त्या भव्य चित्रपटगृहाच्या मुख्य दारापाशी येऊन पोहोचला. चित्रपटगृहाचे मुख्य दार त्यावेळच्या जाड आणि मजबूत लाकडाने बनलेले होते. दारावर जाडजूड साखळदंडाने बांधलेले अत्यंत जुन्या धाटणीचे लोखंडी कुलूप होते. कित्येक वर्षांपासून बंद असल्यामुळे ते फार गंजून गेले होते. शिवाय त्या लाकडी दाराला देखील वाळवीने आतून बाहेरून पोखरून टाकले होते.

अखिल तो मजबूत बांधलेला साखळदंड आणि कुलूप काढण्याचा खटाटोप करू लागला. पण जोर लावूनही ते निघत नव्हते. तितक्यात आकाशात एक वीज चमकली. त्यासरशी साखळदंडासहित कुलूप निखळून  खाली पडले. गंजल्यामुळे ते कमकुवत झाले असावे आणि म्हणूनच ते आपोआप गळून पडले. हातांना लागलेली धूळ झटकत अखिल त्याच्या पायाशी पडलेल्या कुलपाकडे बघून विचार करत होता.

कुलूप उघडले गेले होते. आत काय आहे याची उत्सुकता ताणली गेली होती. अखिलने आपल्या दोन्ही हातांनी ते दार ढकलले. कर्रर्रर्र आवाज करत ते भव्य दार उघडले गेले. जणू काही ते बंद पडलेले चित्रपटगृह दोन्ही हात पसरवून त्याचे स्वागत करत असावे. कुठेतरी लपून बसणाऱ्या कबुतरांचा फडफडणारा आवाज गरजू लागला. अशा पडझड झालेल्या रिकाम्या वास्तुत पक्षी आवर्जून घरटी बांधतात, नाही का? अखिल स्वतःशीच हसला.

त्याने दारातून आत पाऊल टाकताच एक थंडगार वाऱ्याची झुळूक त्याला स्पर्शून गेली. तिथल्या वातावरणात किंचित बदल होऊ लागला. अखिलला तो जाणवत होता. परंतु नक्की काय आहे ते समजत नव्हते. गेल्या कित्येक वर्षांपासून मानवी वावर नसल्याने सुस्त पडलेले ते चित्रपटगृह आपली मरगळ झटकून उभे राहिल्यासारखे वाटत होते.

चित्रपटगृहाच्या कौलारू छताला ठिकठिकाणी भोके पडली होती. त्यातून काही चंद्रकिरणे आतमध्ये कवडशाच्या रूपात शिरली होती. तो उजेड पुरेसा नसल्याने अखिलने खिशातून मोबाईल काढून टॉर्च सुरू केली. त्या उजेडात तो आजूबाजूचे निरीक्षण करू लागला.

बाहेरून जुनाट पद्धतीचे वाटत असले तरी आतमध्ये ते चित्रपटगृह त्या वेळच्या मानाने बरेच मोठे दिसत होते. खूप वर्षांपासून बंद असल्यामुळे तिथे कुबट वास येत होता. जागोजागी कोळ्यांनी विणलेले जाळे आणि धुळीचे साम्राज्य पसरले होते. समोर लांबच्या लांब अशा लाल रंगाच्या मोडक्यातोडक्या लाकडी खुर्च्या पद्धतशीरपणे आडव्या उभ्या रांगेत मांडलेल्या होत्या. तिथून पुढे काही अंतरावर पुरेशा उंचीवर भव्य दिव्य असा पांढऱ्या रंगाचा कळकटलेला पडदा स्वतःचे अस्तित्व सांभाळत कसाबसा उभा होता.

त्याकाळी कित्येक कृष्णधवल आणि रंगीत चित्रपटे इथे टाळ्यांच्या गजरात पाहिले गेले असतील ना...असा विचार अखिलच्या मनात उगाचच चमकून गेला.

समोर भिंतीवर लावलेल्या घड्याळात बाराचा टोल पडला. घड्याळातील तिन्ही काटे बारावर येऊन थांबले.

आणि काय आश्चर्य...

कसलातरी घरघर आवाज ऐकू येऊ लागला. अखिलच्या मागे असलेल्या भिंतीतून एक मोठा प्रकाश निर्माण झाला. तो प्रकाश समोरच्या पडद्यावर पडताच तिथे काही अक्षरे उमटली. अखिल पडद्यावर लिहिलेले वाचू लागला.

"बारा ते तीनचा खेळ."

काही क्षणातच ते शब्द अदृश्य झाले. तो आवाजही बंद झाला.

अखिल बावरून इकडे तिकडे बघू लागला. कदाचित आपण खरेच जास्त मद्य प्यायल्यामुळे आपल्याला असे विचित्र भास होत असावे. तो स्वतःलाच समजावत होता.

पुन्हा घरघर सुरू झाली आणि त्या पडद्यावर चलचित्रे सुरू झाली. जुन्या काळातील अभिनेते-अभिनेत्री एकाच वेळी त्या मोठ्या पडद्यावर विविध अभिनय करताना दिसत होते. खुर्च्यांवर अनेक सावल्या टाळ्या वाजवत, शिट्ट्या मारत, किंचाळत चित्रपटाला दाद देत होत्या. नक्की काय सुरू आहे हे अखिलला समजत नव्हते. अचानक चित्रपट सुरू काय होतो आणि अदृश्य प्रेक्षक चित्रपट बघायला उपस्थित काय होतात हे त्याच्या कल्पनेच्या पलीकडे होते. तिथे इतका सगळा गोंधळ सुरू असताना अखिल कुणाच्या खिजगणतीत देखील नव्हता.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all