Login

खेळ- बारा ते तीन (भाग १)

काही वर्षांपूर्वी बंद पडलेल्या चित्रपटगृहात रात्रीच्या वेळी अखिल जातो, तेव्हा तिथे त्याच्यासोबत काय घडते हे जाणून घेण्यासाठी वाचा भयकथा - खेळ - बारा ते तीन.
ईरा चॅम्पियनशिप २०२५
संघ - वनिता

खेळ - बारा ते तीन (भाग - १)
लेखन - अपर्णा परदेशी.

ब्रुम...ब्रुम...ब्रुम...ब्रुम.

कानठळ्या बसेल इतका कर्णकर्कश आवाज करत रात्रीच्या वेळी दोन दुचाक्या सुनसान रस्त्यावर धूळधाण उडवत सुसाट पळत होत्या. त्या शहराबाहेरील तो विराण वस्तीतला रस्ता रात्री काय दिवसादेखील कुणाच्या फारसा वापरात नव्हता. त्या मुलांपैकी एकाच्या हातात मद्याची बाटली होती. थोड्याफार नशेत तिघेही आपल्याच मस्तीत वेगाने जात होते. रात्रीच्या वेळी गाड्यांवर माज करत फिरण्यात त्यांना थरार जाणवत होता.

त्या निर्जन रस्त्यावर कुणीही त्यांना हटकणारे नव्हते. धिंगाणा करत आपल्याच धुंदीत बेभान होऊन वाऱ्याशी स्पर्धा करत ते बरेच पुढे निघून गेले होते. त्यांच्यापैकी एकाच्या ते लक्षात आले.

"ए अखिल, चल आता मागे फिरू."  विघ्नेशने आपल्या दुचाकीचा वेग कमी करत अखिलला आवाज दिला.

"ए नाही रे, अजून थोडं पुढे जाऊया. वाऱ्याशी स्पर्धा करत सुसाट गाडी चालवायला भन्नाट मजा येते." अखिलने त्याला विरोध करत तशीच गाडी सुरू ठेवली.

"अखिल, बस झाले आता. असेही बारा वाजण्यात आले आहेत."  विघ्नेशच्या पाठीमागे बसलेला सिद्धेय म्हणाला.

"मग काय तुझी बायको घरी वाट बघतेय का?" अखिलने त्याची टर उडवली.

त्याचबरोबर विघ्नेशला जोरात हसू फुटले.

"तू खिदळणं बंद करतो का? अखिलला मागे फिरायला सांग." थोड्याशा घुश्यात सिद्धू विघ्नेशवर भडकला.

"अखिल, चल जाऊया खरंच. उगाच विषाची परीक्षा कशाला घ्यायची?" विघ्नेश गांभीर्याने म्हणाला.

"म्हणजे? कोणतं विष आणि कसली परीक्षा?" अखिल स्वतःच्या धुंदीत गाडी चालवत होता.

"तू आधी वेग कमी कर पाहू. मला ओरडावं लागतंय."

विघ्नेश पुढे जाणाऱ्या अखिलला म्हणाला. वैतागत अखिलने गाडी थांबवली. ते पाहून विघ्नेशने देखील गाडीला ब्रेक मारला.

"तू लहानपणीच शहरात शिकायला निघून गेल्यामुळे तुला ह्या जागेबद्दल कोणी काही सांगितले नसेल. आमचं ऐक. चल आता जाऊ परत." विघ्नेश म्हणाला.

"अरे, माहितीये मला. ही कामगारांची वस्ती आहे. फार पूर्वी इथे एक कंपनी होती. ती कंपनी बंद पडल्यानंतर लोकांचे हाल व्हायला लागले. म्हणून ही जागा सोडून ते लोक शहरात राहायला निघून गेले. आता त्या बंद पडलेल्या कंपनीचे आणि त्यांच्या मोडक्यातोडक्या घरांचे अवशेष तेवढे मागे उरले आहेत." एवढं बोलून अखिल जोरजोरात हसायला लागला.

"हो, पण तुला अर्धवट माहिती मिळाली आहे. कंपनी बंद पडण्याचे आणि ही वस्ती सोडून जाण्याचे कारण वेगळेच आहे." विघ्नेश गंभीर चेहऱ्याने म्हणाला.

"असे काय कारण आहे की त्यामुळे तुम्ही इतके घाबरत आहात." अखिलने कुतूहलापोटी विचारले.

"त्या कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराला चित्रपटांची भयंकर आवड होती. त्या आवडीचे रूपांतर व्यवसायात करण्यासाठी त्याने बराच खटाटोप करून प्रसंगी घरदार विकून स्वतःच्या मालकीचे चित्रपटगृह उभारले. परंतु, त्याचा उलट परिणाम झाला. कामगार कामावर जाण्याऐवजी चित्रपट पाहण्यासाठी जास्त गर्दी करू लागले. मोठ्या पडद्यावर दिसणारी प्रेमप्रकरणे आणि मारधाड त्यांना खरी वाटू लागली. त्या आकर्षणापोटी त्यांनी कंपनीकडे पाठ फिरवली. कामगार येत नसल्यामुळे कंपनीचे नुकसान होऊ लागले. त्यावर उपाय म्हणून कंपनीच्या मालकाने त्या कामगाराला चित्रपटगृह कायमचे बंद करण्याचा आदेश दिला. परंतु, त्यावरही त्याने नवीन शक्कल लढवली. रात्री बारा ते तीनच्या दरम्यान छुप्या पद्धतीने तो कामगारांना चित्रपटे दाखवू लागला. जागरणामुळे कामगार कामात दिरंगाई करू लागले. कामगारांच्या नाकर्तेपणामुळे कंपनीचे नुकसान होऊ लागले. पुढे त्याचा परिणाम म्हणून कंपनी रसातळाला लागली. झालेल्या नुकसानाचा वचपा काढण्यासाठी कंपनीच्या मालकाने त्या चित्रपटवेड्या कामगाराचा त्याच्याच चित्रपटगृहात बळी घेतला." एवढं बोलून विघ्नेशने आवंढा गिळला.

"यात चुक कुणाची?" सर्व कहानी ऐकून झाल्यानंतर अखिलने प्रश्न निर्माण केला.

"ते सोड. अजून पुढे बाकी आहे. त्या कामगाराचा अतृप्त आत्मा चित्रपटगृहात अडकून पडला आहे. अजूनही रात्री बारा ते तीनच्या दरम्यान तिथे चित्रपट सुरू असल्याचा आवाज येतो. काही लोकांनी आतमध्ये काय सुरू आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण ते लोक कायमचे आतच अडकून गेले." सिद्धूने पुढची माहिती दिली.

"ही अफवा पण असू शकते?" अखिलने शंका व्यक्त केली.

"हे बघ अखिल, पूर्वी जे लोक इथे राहायचे त्यांनीच सांगितले की जो कुणी त्या चित्रपटगृहात गेला तो तिथून कधीच बाहेर आला नाही. आता यातलं काय खरं आणि काय खोटं ते माहीत नाही. पण अशा काही घटना इथे घडल्या आहेत की त्यामुळे लोकांनी घाबरून ही वस्ती कायमची सोडून दिली. भीतीपोटी कंपनी मालक देखील आपल्या कुटुंबाला घेऊन विदेशात पळून गेला."  विघ्नेशने त्याला जितके माहीत होते तितके सांगितले.

"मला नाही पटत हे. ह्या असल्या फालतू गोष्टींवर कसा काय विश्वास ठेवू शकता तुम्ही?" अखिलने नापसंती दर्शवली.

"अरे, आग लागल्याशिवाय धूर निघत नाही बाबा. कुणीतरी काहीतरी अनुभवले असेलच ना?"  विघ्नेश समजावणीच्या सुरात म्हणाला.

"आपल्या आजोबा-पणजोबांच्या काळातल्या गोष्टीवर या आधुनिक जगात विश्वास ठेवणारे आपण मूर्खच नाही का?" अखिल चिडून म्हणाला.

"तुला हा मूर्खपणा वाटत असेल, पण आम्हाला धोका पत्करायचा नाही. तुला जायचे असेल तर तू पुढे जाऊ शकतो. आम्ही तुझ्यासोबत येणार नाही." सिद्धूने ठणकावून सांगितले.

"आणि समजा, मी त्या चित्रपटगृहात जाऊन दाखवले तर मला काय मिळेल? " अखिल तोऱ्यात म्हणाला.

"हे बघ अखिल, तुझ्यावर मद्याचा अंमल चढलेला दिसतोय. त्यामुळे आम्ही सांगितलेले तुला समजत नाहीये." सिद्धू शक्य तितक्या सौम्य आवाजात म्हणाला.

"आपण तिघांनी मिळून घेतली. तरीही तुमच्यापेक्षा मी जास्त नशेत आहे असं तुम्हाला वाटतंय का?"  अखिल चिडून म्हणाला.

"मला इतकंच म्हणायचं आहे की आमच्यापेक्षा कदाचित तू थोडी जास्त प्यायल्यामुळे सारासार विचार करू शकत नाहीये. स्वतःच्या जीवावर इतका उदार होऊ नकोस." सिद्धू अखिलला उद्देशून म्हणाला.

"तुमच्यासोबत अर्ध्या रात्री सुसाट वेगाने गाडी फिरवताना मी आधीच जीवावर उदार झालो होतो. तेव्हा तुम्हाला माझी काळजी वाटली नाही आणि त्या पुरातन काळातील भुताची भीती मला दाखवत आहात. कसले मित्र रे तुम्ही." अखिल नाटकी स्वरात म्हणाला.

अखिलने थेट त्यांच्या मैत्रीवरच बोट उचलले होते. सिद्धू आणि विघ्नेशचा चेहरा खाडकन उतरला.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all