Login

खेळ कुणाला दैवाचा कळला 4 अंतिम

नारीवादी कथा


निशा आणि रोहन दोघेही हॉस्पिटलमध्ये गेले. सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांनी रिपोर्ट पाहिले आणि त्या दोघांना पाहिले. डॉक्टरांचा असा धीर गंभीर चेहरा पाहून निशाला खूप टेन्शन आले होते.

"डॉक्टर, काही प्रॉब्लेम आहे का?"

"हो. तुम्हाला हे मूल वाढवता येणार नाही. खरंतर तुम्ही आई होऊ शकणार नाही."

"पण का डॉक्टर? काय झालं? गेल्या महिन्यात तर तुम्ही कन्फर्म केले होते ना मग आता काय झाले?"

"तुमच्या गर्भाशयाला गाठ आहे. तुमच्या पोटामध्ये जर हे मूल तुम्ही वाढू दिले तर ती गाठ आपोआप वाढत जाईल आणि त्याचा तुमच्या जीवाला शिवाय या होणाऱ्या बाळाच्या जीवाला धोका आहे त्यामुळे तुमची गर्भाशयाची पिशवी काढून टाकल्यास योग्य होईल. कारण ते तुमच्या शरीरावर परिणाम करेल त्यामुळे तुम्ही अबॉर्शन करावे असे मला वाटते. डॉक्टरांच्या तोंडून हे वाक्य एकदाच निशाच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या डोळ्यावर अश्रू वाहू लागले. परमेश्वराने मातृत्वाचे दान तर देऊन टाकले होते पण ते इतकेच? ते पूर्णत्वाला सुद्धा घेऊन जाता येत नाही असा कसा हा अन्यायी परमेश्वर आहे असे तिला वाटू लागले. आणि बाहेर येऊन ती रोहनला मूल न पाडण्याविषयी विनवत होती.

शेवटी रोहनने तिला विश्वासात घेऊन समजावून सांगितल्यावर ती तयार झाली. जेव्हा ऑपरेशनसाठी तिला आयसीयूमध्ये घेऊन जात होते तेव्हा आतापर्यंतचा सगळा जीवनपट तिच्या डोळ्यासमोरून जात होता. बहिणीच्या डोहाळे जेवणाच्या वेळेला तिला बायका नाही नाही ते बोलत होत्या, शिवाय ओटी भरण्यासाठी तिला कोणताच मान मिळाला नव्हता, प्रत्येक कार्यक्रमात गेल्यानंतर तिला मूल नाही म्हणून कोणताच मान मिळत नव्हता हे सगळे तिच्या नजरेसमोरून जात होते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. पण रोहनने तिला समजावताना एक वाक्य बोलला होता की, "माझ्यासाठी फक्त तू महत्त्वाची आहेस. बाकी जगाशी मला काही देणे घेणे नाही." म्हणून ती फक्त आणि फक्त रोहनसाठी हे करायला तयार झाली होती.

ऑपरेशन झाल्यानंतर ती हॉस्पिटलमध्येच होती. तिच्या माहेरचे सासरचे सगळेजण तिला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते. तिची सर्वांनी समजूत घातली होती. प्रत्येक जण पाच पाच मिनिटं येऊन तिला भेटून जात होते. आता आज तिला डिस्चार्ज मिळणार होता. इथून पुढे खरे तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार होती. तिने नोकरी करून खूप नाव मिळवायचे आणि यश मिळवायचे असे ठरवले होते. आयुष्याच्या सरते शेवटी एखादे मूल दत्तक घ्यायचे असाही दोघांनी विचार केला होता. निशाला डिस्चार्ज मिळाला आणि ते दोघेही घरी जायला निघाले. इतक्यात डॉक्टरांची धावपळ चालू होती हे त्यांच्या नजरेस पडले. त्यांनी एका सिस्टरला थांबवून विचारले, "काय झाले आहे? इतका का गोंधळ सुरू आहे?"

"एक एक्सीडेंट केस आली आहे त्यामध्ये दोघे पती-पत्नी एक्सपायर झाले आहेत आणि त्यांचा एक वर्षाचा मुलगा खूप रडतो आहे. डॉक्टरांना काही समजेना. कोणाला कॉल करावा आणि कोणाशी कॉन्टॅक्ट करावे? पोलिसांना इन्फॉर्म केले आहे पण अजून काहीच कळाले नाही."

"मी एकदा बाळाला घेऊन पाहू का? मी घेतल्याने कदाचितते शांत झाले तर." निशाने हळूच विचारले. तेव्हा "ठीक आहे मी आणून देते." असे म्हणून ती सिस्टर निघून गेली आणि थोड्याच वेळात तिने त्या मुलाला निशाच्या हातात दिले. मुलाला पाहतात निशा हादरून गेली. घाय मोडून ती रडू लागली. कारण हा तिच्या सख्ख्या बहिणीचा मुलगा होता. त्यांनी लगेचच सर्वांना बोलावून घेतले. हॉस्पिटलमध्ये एकच कल्लोळ माजला होता. त्या दोघांचे पार्थिव त्यांच्या पाहुण्यांच्या हवाली केले होते. त्यांचे सर्व कार्य आटपोपर्यंत तो लहान मुलगा निशाकडेच होता. निशा त्याला जीवापाड जपत होती. त्याला प्रेम करत होती आणि निशाच्या सहवासात तो मुलगादेखील रमला होता. त्या तर मुलाला काहीच समजत नव्हते की, त्याचे आई बाबा देवाकडे केले आहेत याची सुद्धा त्याला जाणीव नव्हती पण मावशीच्या सहवासात चांगला रमला होता.

इकडे कार्य वगैरे सगळे आटोपून झाल्यावर छोट्या आर्यनला कोण सांभाळणार? यावर चर्चा सुरू होती कारण आर्यनचे बाबा हे एकुलते एक होते आणि त्याचे आईवडील गेल्या वर्षातच देवाघरी निघून गेले होते. त्याच्या पाठीमागे त्याला सांभाळणारे कोणीच नव्हते. मग रोहनने निर्णय घेतला की, छोट्या आर्यनची जबाबदारी आम्ही घेतो. त्याला आम्ही दत्तक घेतो आणि त्याचे पालन पोषण करतो. हे पाहून निशाला खूप आनंद झाला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. एकीकडे बहीण गेल्याचे दुःख आणि दुसरीकडे असे मातृत्व मिळाल्याचा आनंद. खरंच हा दैवाचा खेळ कोणाला कधी कळला आहे का?
समाप्त
0

🎭 Series Post

View all