Login

खेळ मनाचा शकुन अपशकुनाचा (भाग १)

This is a love and social story

                         आज नवरात्रीची पहिली रात्र होता सगळीकडे रोषणाई आणि झगमगाट पाहायला मिळत होता. सगळीकडे उत्साह ओसंडून वाहत होता. रस्त्याने तरुण तरुणी नटूनथटून गरबा खेळायला जाताना दिसत होते. पुण्यातील पारिजात सोसायटी ही त्याला अपवाद नव्हती. सोसायटीमध्ये सालाबादप्रमाणे आज ही देवीची स्थापना झाली होती आणि  सात वाजल्यापासूनच गरबा खेळण्यासाठी अबाल-वृध्दांची मंडपाकडे रीघ लागली होती. विद्युत मात्र नको नको म्हणत असताना त्याचा पारिजात सोसायचीमध्ये राहणारा मित्र सुयश त्याला जबरदस्तीने मंडपात घेऊन आला होता.

   विद्युत चव्हाण एक तीस वर्षांचा एका I.T कंपनीत काम करणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर! उंचा-पुरा, उभट चेहरा, सावळा रंग, काळे डोळे, कुरळे केस आणि हसला की खळी पडणारी किलर स्माईल असे उमदे व्यक्तिमत्व!  अजून अविवाहित आणि आजच्या जमान्यात ही त्याला गर्लफ्रेंड नव्हती. त्याच्या व्यक्तिमत्वाला भुलून अनेक मुली त्याच्या मागे लागायच्या बाहेर आणि ऑफिसमध्ये ही पण हा पठ्ठ्या कोणालाच भीक घालत नव्हता. आई-वडील लग्नकर म्हणून मागे लागून थकले होते पण याने त्यांना ही दाद लागू दिली नव्हती.हे सगळं सुयश जाणून होता म्हणूनच तो आज बळेबळेच विद्युतला त्याच्या सोसायटीच्या गरबा कार्यक्रमात घेऊन आला होता. कारण सुयशला वाटत होत की विद्युतला इथे तरी एखादी मुलगी पसंत पडेल. पण  विद्युतला मात्र ना गरबा खेळण्यात इंटरेस्ट होता ना  मुली पाहण्यात.त्याने देवीचे दर्शन घेतले आणि तो साईडला जाऊन उभा राहिला. तो पर्यंत गरबा सुरू झाला आणि सुयशने त्याला म्हणाला.

सुयश,“ इथे मी तुला नुसते  पाहत उभे राहायला नाही बोलवले! चल लवकर गरबा खेळायला!” तो त्याला ओढून घेऊन जात म्हणाला.

विद्युत,“ काय रे सुयश तू ऐकशील तर शपथ!” तो  हसत म्हणाला आणि तो ही गरबा खेळण्यात सामील झाला.

                           तो आणि सुयश गरबा खेळणाऱ्या मुला-मुलींमध्ये सामील झाले. डीजे गाणी वाजवत होता आणि एक मोठा  गोल करून मुले-मुली एकमेकांनाच्या  समोरासमोर येऊन गाण्याच्या तालावर थिरकत होते.विद्युतचे मात्र कोणत्याच मुलीकडे लक्ष नव्हते पण त्याच्यासमोर गरबा खेळताना एक चेहरा आला आणि तो ओळखीचा चेहरा पाहून तो आणि ती मुलगी तिथेच थबकले. पण ती मुलगी लगेच  भानावर येऊन तिथून निघून गेली आणि विद्युत तिथेच पुतळ्या सारखा उभा होता. सुयशने ते पाहिले आणि त्याला हात धरून तिथून घेऊन गेला. विद्युत मात्र वेगळ्याच मन:स्थितीत गेला होता.त्याचा चेहरा ही पडला होता. सुयशला कळत होते की विद्युतचे काही तरी बिनसले आहे. म्हणून तो त्याला काहीच बोलला नाही. विद्युतने चारचाकी काढली आणि तो घरी निघाला तो विचार करत होता. ही तीच होती का? पण तिच्यात इतका बदल कसा झाला? तो विचाराच्या तंद्रीत घरी पोहचला. जेवण्याची त्याची इच्छाच मरून गेली होती. म्हणून तो रूममध्ये गेला आणि कपडे बदलून बेडवर आडवा झाला! पण आज  झोप काय तिच्या डोळ्यात उतरत नव्हती. तो त्याच्या ही नकळत त्याच्या भूतकाळात जाऊन पोहचला!

       त्याने पहिल्यांदा तिला पाहिले ते शाळेत आठवीत असताना! ती सहामाही नंतर त्याच्या शाळेत आली होती. गोरीगोमटी, गोबऱ्या गालाची, घाऱ्या डोळ्यांची, अप्र्या नाकाची, काळ्या केसांची  आणि थोडीशी स्थूल देहाची! तिला पाहून  विद्युत मात्र तेव्हाच घायाळ झाला होता.ती म्हणजे विदिशा सरनाईक! पहिल्या दिवशी मॅडमने तिची ओळख करून दिली. ती जरा घाबरूनच सगळ्या वर्गाला पाहत होती कारण नवीन शहर,नवीन  शाळा आणि नवीन लोक सगळंच नवीन! तिचे बाबा एका सरकारी बँकेत कामाला होते  आणि त्यांची बदली पुण्यात झाली होती. म्हणून ते पुण्यात सहकुटुंब राहायला आले होते. विदिशा थोड्याच दिवसात शाळेत रुळली आणि विद्युत आणि तिची मैत्री झाली.विद्युत हुशार विद्यार्थी होता. त्यामुळे विदिशाला त्याची बऱ्याचदा अभ्यासात  मदत होत असे. दिवस पाखरा सारखे उडून गेले आणि दोघे ही दहावीतुन अकरावीला गेले. 

      नवीन कॉलेज नवीन उत्साह! अत्ता पर्यंत विद्युतचा जीव तिच्यावर जडला होता आणि विदिशाचा ही त्याच्यावर! पण कोणीच प्रेमाची कबुली द्यायला धजावत नव्हते. पण अकरावीच्या सेमिस्टर नंतर विद्युतने विदिशाला प्रपोज केले आणि तीन महिन्यांनंतर विदिशाने त्याला होकार दिला. त्या दिवशी विद्युतला आकाश ठेंगने झाले होते. दोघांच्या ही प्रेमाला रंगत चढत होती. दोघे ही प्रेमाच्या आणाभाका घेत होते. तो पर्यंत ते बारावीत पोहोचले होते. बारावीच्या सेंड ऑफ  दिवशी विदिशाने बेबी पिंक कलरची साडी नेसली होती. ती कातिल दिसत होती विद्युतची नजर तिच्यावरून हटत नव्हती. चार वाजे पर्यंत कार्यक्रम झाला आणि विद्युत विदिशाला म्हणाला.

विद्युत,“  आपण लगेच  घरी न जाता बाहेर कुठे तरी गप्पा मारून घरी जाऊयात का? कारण आता आपली भेट केंव्हा होईल माहीत नाही विदू!”

     विदिशा ही तयार झाली आणि इथेच त्यांनी आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक केली. दोघे ही जवळच्या पार्कमध्ये त्यांच्या येणाऱ्या आयुष्याची गुलाबी स्वप्ने रंगवत बसले होते आणि त्यांना नेमकं विदिशाच्या वडिलांनी पाहिलं. आणि जे घडायचं होत तेच घडलं. घरी गेल्यावर विदिशाला तिच्या वडिलांनी  तिला जाब विचारला आणि विदिशानी विद्युत आणि तीच प्रेम आहे असं सांगितलं. त्या नंतर आठवड्या भरातच  विदिशाच्या वडिलांनी बिऱ्हाड गावाकडे हलवले. विदिशाला परीक्षेला ही बसू दिले नाही कारण विद्युत उच्च जातीचा आणि ते नीच जातीचे होते. विद्युतला मात्र यातलं काहीच माहीत नव्हतं कारण त्याच आणि विदिशाच परीक्षा केंद्र वेगळे होते आणि तिचे घर ही त्याच्या घरापासून लांब होते. तो परिक्षेमुळे अभ्यासात गढून गेला होता म्हणून त्याने विदिशाचा  जास्त विचार ही केला नाही पण शेवटचा पेपर झाल्यावर दोघांनी त्याच पार्कमध्ये भेटायचे ठेवले होते. पण त्या दिवशी विदिशा भेटायला आलीच नाही! विद्युतने तिच्या घरा जवळ चौकशी केल्यावर ती शहर सोडून गेले आहेत इतकच काय पण तिला परीक्षेला बसू दिले नाही हे त्याला कळले. 

     त्या नंतर विदिशा त्याला आज दिसली होती. पण वेगळ्याच अवतारात अगदी साधा फेंट कलरचा पंजाबी सूट, मोकळे कपाळ आणि मोकळा गळा!निशतेज चेहरा आणि अकाली आलेली प्रौढत्वाची झाक! तिला असं पाहून तो विचारात पडला की रंगाची आणि नाटण्याची इतकी आवड असणाऱ्या मुलीचा असा अवतार कसा झाला? तिच्या बद्दल जाणून घेण्याची एक अनामिक हुरहूर त्याला लागली आणि त्याने रोज गरबा खेळायला सुयशकडे जायचे आणि विदिशा बद्दल सगळे जाणून घ्यायचे असे मनोमन ठरवले. त्याला या सगळ्या विचारातच रात्री कधी तरी झोप लागली.

          दुसऱ्या दिवशी तो नेहमी प्रमाणे ऑफिसला गेला पण त्याचे लक्ष मात्र तिथे लागत नव्हते. आज विदिशा दिसेल का? दिसली तर आपल्याशी बोलेल का? आपल्याला ओळख दाखवेल का? आणि ती अशी का होती ना साज ना शृंगार? एक ना अनेक प्रश्नांचे काहूर त्याच्या मनात माजले होते. ऑफिस सुटले आणि तो आज ही सुयशकडे गेला. सुयशाला आज मात्र आश्चर्य वाटत होते की ज्या विद्युतला फोर्स करून अशा ठिकाणी आणावे लागत होते. तो आज मनाने कसा आला. या मागे काही तरी कारण असणार पण त्याने तूर्तास तरी त्याला काहीच विचारले नाही.  आज मात्र विदिशा त्याला गरबा खेळायला आलेली दिसली नाही. त्यामुळे तो थोडा निराश झाला. आता हिला कशी आणि कुठे शोधायची हा प्रश्न त्याला पडला पण त्याच्या एकदम लक्षात आले की नवरात्रीचे आयोजन तर  सोसायटी  करत असते आणि गरब्याचे ही आणि सोसायटी मधील लोक आणि त्यांच्या नातेवाईक, मित्रमंडळी   शिवाय कोणाला ही इथे प्रवेश नाही म्हणजेच या  सोसायटी मधील कोणाची तरी ती नातेवाईक तरी असली पाहिजे नाही तर मैत्रीण तरी!तिचा पत्ता काढण्यासाठी त्याने सुयशला गळ घालायचे ठरावे आणि तो सुयशला   बाजूला घेऊन गेला आणि बोलू लागला.

विद्युत,“सुशा तुझ्याकडे माझे काम आहे करशील का रे?” त्याने विचारले.

सुयश,“ बोल ना रे विद्या विचारायच काय त्यात माझ्या कडून झालं तर मी नक्कीच करीन!” तो म्हणाला.

विद्युत,“ तर ऐक काल एक मुलगी इथे गरबा खेळायला आली होती ती एक तर तुमच्या सोसायटी मधील कोणाची नातेवाईक असली पाहिजे नाही तर मग मैत्रीण तरी! तीच नाव विदिशा सरनाईक आहे तिच्या बद्दल सगळी माहिती मला हवी म्हणजे ती काय करते कुठे राहते वगैरे!” तो म्हणाला.

सुयश,“ फायनली माझ्या मित्राला मुलगी पसंत पडली तर! मी करेन सगळी चौकशी आणि सांगेन तुला उद्या संध्याकाळ पर्यंत!” तो हसून म्हणाला.

विद्युत,“ अरे सुशा ती माझं पहिलं प्रेम आहे जे इतकी वर्षे कुठेतरी हरवलं होत! तू जर तिची सगळी माहिती काढलीस तर खूप उपकार होतील माझ्या वर!” तो भावुक होऊन म्हणाला.

सुयश,“ बास का! अरे मित्र म्हणतोस आणि उपकाराची भाषा करतोस होय!” तो थोडा रागानेच म्हणाला.

विद्युत,“ सॉरी बाबा नाही करत उपकाराची भाषा पण उद्या संध्याकाळी मला डिटेल्स हव्यात सगळ्या!” तो म्हणाला आणि निघून गेला.

★★★★

         आज नऊ रात्रीतील तिसरी रात्र होती आणि विद्युत बरोबर गरब्याच्या वेळेवर सुयशच्या सोसायटी पोहचला. तो आज खूप खुश दिसत होता कारण आज त्याला सुयश विदिशाची सगळी माहिती सांगणार होता. सुयशने त्याला पाहिले आणि तो विद्युतला सरळ घरी घेऊन गेला. तो थोडा गंभीर दिसत होता. विद्युतने उत्सुकतेने विचाले.

विद्युत,“ केलीस ना रे चौकशी तिची सगळी!”

सुयश,“ हो केली रे विद्यु तिची चौकशी पण मला वाटत तू तिचा विषय सोडून द्यावास!” तो गंभीरपणे म्हणाला.

विद्युत,“ पण का अरे मी तिला पाहिलं आहे तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं मग तू अस का म्हणतो आहेच?” त्याने आश्चर्याने विचारले.

सुयश,“ गळ्यात मंगळसूत्र नसणारी प्रत्येक मुलगी बिन लग्नाची नसते विद्युत!” तो थोडा चिडून म्हणाला.

विद्युत,“ म्हणायचं काय आहे तुला स्पष्ट बोल जरा!” तो शांतपणे म्हणाला.

सुयश,“ अरे ती इथं तिच्या चुलत बहिणीकडे आली आहे शेजारच्याच विंग मध्ये राहते तिची बहीण! विद्युत ती विधवा आहे लग्न झालं आणि तीन महिन्यातच तिचा नवरा गेला.सासरच्या लोकांनी तिला अपशकुनी म्हणून हाकलून दिली. ती सध्या आई-वडिलांकडे असते नर्स आहे ती नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये! म्हणून म्हणतो मी की तिचा विचार………..” तो पुढे बोलणार तर विद्युतने त्याला मध्येच थांबवले आणि  बोलू लागला.

विद्युत,“  तिचा विचार सोडून देऊ कारण ती विधवा आहे म्हणून असंच ना? अरे माझं तिच्यावर प्रेम होतं आणि आहे तिचा नवरा असता तिचा संसार सुखाचा असता तर मी तिचा विचार ही केला नसता! पण ती विधवा आहे म्हणून माझे प्रेम तिच्यासाठी आटणार नाही उलट मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे!” तो ठामपणे म्हणाला.

सुयश,“ विद्युत तुला खूप चांगल्या मुली मिळतील रे उगीच कशाला तू विधवेचा विचार करत आहेस बरं तुझं अजून लग्न ही झालं नाही तू प्रथम वर आहेत!” तो समजावण्याच्या सुरात म्हणाला.

विद्युत,“ हो मिळतील ना मला चांगल्या मुली पण मला तीच हवी आहे! कदाचित नियती आणि परमेश्वराची हीच इच्छा असावी की माझे आणि तिचे ऋणानुबंध जुळावेत म्हणून मी  अजून बिन लग्नाचा राहिलो असेन!तू फक्त माझी  पहिल्यांदा तिच्या बहिणीशी  भेट  घालून दे! कारण मी सध्या या विषयावर विदिशाशी डायरेक्ट नाही बोलू शकत कारण ती माझ्या बोलण्याचा काय अर्थ काढेल सांगू शकत नाही! म्हणून तिच्या न कळत तू माझी आणि तिच्या बहिणीची भेट घडवून आन बाकी मी पाहून घेईल!” तो निश्चयाने बोलत होता.

सुयश,“ ठीक आहे मी तिच्या बहिणीला सगळी कल्पना देतो आणि तुला कुठं भेटायचे तो पत्ता whs up करतो!”तो म्हणाला.

        दोन दिवसाने सुयशने विदिशाची बहीण दिव्या आणि विद्युतची भेट एका कॅफेमध्ये घडवून आणली. सुयश विद्युतची दिव्याशी ओळख करून देत म्हणाला.

सुयश,“ हा विद्युत चव्हाण मी तुम्हाला विदिशा बद्दल बोललो होत ना हाच तो!”

       दिव्या विद्युतला निहाळत बोलू लागली.

दिव्या,“ तुम्हाला  सुयशने सांगितलेच असेल की विदिशा….” ती पुढे बोलणार तर विद्युत म्हणाला।.

विद्युत,“ हो मला पूर्ण कल्पना आहे!” तो मध्येच तिला थांबवत म्हणाला.

दिव्या,“ तुम्ही अनमॅरीड आहात तुम्हाला दुसरी चांगली मुलगी मिळू शकते मग विदिशाच का?” ती त्याच्याकडे संशयाने पाहत म्हणाली.

विद्युत,“ तुम्हाला संशय येणे साहजिक आहे विदिशाच का कारण ती माझे  पहिले प्रेम आहे आणि नियतीने आमचे पहिले प्रेम अपूर्ण राहू नये म्हणूनच कदाचित आमची पुन्हा भेट घडवून आणली!”

दिव्या,“ एक मिनिट म्हणजे तूच का तो? बारावीत असताना विदिशा आणि तुझं प्रेम होतं आणि ते कळल्यावर काकांनी बिऱ्हाड हलवल!” तिने आश्चर्याने विचारले.

विद्युत,“ हो मीच तो!पण त्या नंतर मी नवरात्रीच्या त्या रात्री गरबा खेळताना विदिशा पाहिल अस काय झालं की तिचा नवरा वारला आणि ती खूपच वेगळी भासत होती मला म्हणजे कायम हसत खेळत असणारी ती आता खूप शांत वाटली मला!” तो काळजीने म्हणाला.

दिव्या,“गेल्या काही वर्षात तिने इतकं काही भोगले आहे की आता ती खूप शांत झाली आहे.खरं तर ती फक्त श्वास घेते.जगणं तर ती कधीच विसरली आहे!” ती दुःखी होत म्हणाली.

विद्युत,“ असं काय घडले आहे तिच्या आयुष्यात की?मला सांगाल का प्लिज!” त्याने विचारले.

दिव्या,“ हो सांगते. विदी आणि काकूला काका गावाकडे घेऊन आले पण काका खूपच स्ट्रिक्ट  होते त्यांनी तिला पुढे शिकायला तर दिलच नाही पण अठरा वर्षे पूर्ण झाली की तीच लग्न करून दिलं.तिच्या मना विरुद्ध! ती खूप रडली होती तेंव्हा पण तिचे भोग इथेच संपले नव्हते. लग्न झालं नवरा घरदार चांगलं होत सगळं! ती ही मागच सगळं विसरून संसाराला लागली पण देवाला ते ही बघवले नाही आणि तीन महिन्यातच तिचा नवरा अपघातात गेला. नवरा मेल्याच खापर तिच्यावर फोडण्यात आलं. सासरच्या लोकांनी तिला अपशकुनी ठरवून घरा बाहेर काढले.काका तिला परत  घेऊन आले. पण मनातून ती पूर्ण कोलमडली होती.त्यानंतर डोप्रेशन मध्ये गेली ती!

      एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न ही केला.काका-काकुला आपल्या एकुलत्या एक मुलीची अशी अवस्था पाहवत नव्हती.काका आता तिच्या अवस्थेला स्वतःलाच जबाबदार समजत मात्र आता वेळ निघून गेली होती. मग तिच्यावर मानसोपचारतज्ञांकडून उपचार केले आणि दोन वर्षात ती सावरली तिचे मन रमावे म्हणून काकूने परत तिला कॉलेजला घातली आणि बारावी नंतर तिने नर्सिंग केले.आता ती रुग्ण सेवेत रमली आहे पण ती जगणं विसरली आहे.तिने दुसरं लग्न करावं असं काका-काकुला वाटते. मात्र तिचा असा समज झाला आहे की ती अपशकुनी आहे म्हणून ती प्रेम, लग्न या गोष्टीं पासून दूर पळते.तीच मन वळवण्यासाठी मी तिला इथे माझ्या जवळ घेऊन आले आहे आणि योगायोगाने तू भेटलास विद्युत खरच जर तू तिच्या आयुष्यात आलास तर ती पुन्हा नव्याने जगायला लागेल.  तत्पूर्वी तिच्या मनातील ती अपशकुनी असल्याचा  भ्रम दूर करावा लागेल आणि ते काम तूच करू शकतोस!” ती म्हणाली.

विद्युत,“ ठीक आहे. मी तिच्याशी बोलेण आणि तिला लग्नाची मागणी घालेन!तिला पटवून देईन की ती अपशकुनी नाही मुळात असं काही नसतच!” तो ठामपणे म्हणाला.

दिव्या,“ ठीक आहे मी तिला उद्या इथे घेऊन येऊ की गरबा खेळायला?” तिने विचारले.

विद्युत,“ मी उद्या संध्याकाळी सोसायटीमध्ये  येईन तिथल्याच गार्डनमध्ये तुम्ही तिला पाठवून त्या काही तरी निमित्त करून बाकी मी पाहीन!” तो म्हणाला.

          विद्युत विदिशाला ती अपशकुनी नाही हे पटवून देऊ शकेल?मागच दुःख विसरून विदिशा नव्याने विद्युत बरोबर जगायला शिकेल का?

क्रमशः

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत.कथा लेखिकेच्या नावा सहित शेअर करायला लेखिकेची हरकत नाही.

© स्वामिनी(अस्मिता) चौगुले.

★★★

     नमस्कार वाचक हो! पहिल्यांदा तर तुमची माफी मागते कारण लूप होल सिझन२ चे भाग मी सध्या पोस्ट करत नाही आहे.

     तुमची उत्सुकता मला समजते पण काही कथा या चिखलात रुतल्या सारख्या रुतून बसतात तसेच लूप होल सिझन २च्या बाबतीत माझे झाले आहे! मला आता त्या पुढे काय लिहावे तेच सुचत नाही. मी खूप विचार केला पण सध्या तरी मला त्या कथेतून ब्रेक घ्यावा लागत आहे.मला ही तुमचा हिरमोड करायला आवडत नाही पण थोडंस मला समजून घ्या ही विनंती! 

       म्हणूनच मी लूप होल सिझन २ ही मालिका तिथेच थांबवून ही तीन-चार भागांची नवीन  कथा मालिका  तुमच्या भेटीला घेऊन आले आहे आणि हो हंसफर्स सिझन दोन लवकरच तुमच्या भेटीला येईल हे मात्र नक्की!

      माझ्या कथांवर असेच भरभरून प्रेम करत राहा हीच विनंती!