Login

खोली क्रमांक ३०७... भाग - ३

दिव्याखाली अंधार
खोली क्रमांक ३०७... भाग - ३


रिया पळत पळत रिक्षात बसली. गार्डचा तो विचित्र आवाज तिच्या कानात अजूनही घुमत होता,
“आता तू ऐकशील ठकठक… तुझ्यासाठीही जागा आहे.”

रात्रभर तिला झोपच आली नाही. तिने हॉस्टेल बदललं, रूम बदलली, पण मन मात्र शांत होत नव्हतं.
गार्ड नेमकं काय म्हणाला? नेहाच्या गायब होण्याशी त्याचा काही संबंध आहे का? आणि 307 मध्ये खरंच काय आहे?

दुसऱ्या दिवशी सकाळी ती कॉलेजमध्ये गेली. तिच्या मनात एकच विचार होता, सत्य शोधण्याचा.

तिने परत एकदा CCTV फुटेज मागितलं. गार्ड शंभर टाळ्या देत होता, पण या वेळी रियाने सिक्युरिटी ऑफिसरला थेट सांगितलं. फुटेज पुन्हा चालू केलं. त्या रात्रीचं.

रिया दिसत होती. पाठीमागून तो रेनकोटवाला माणूस दारापर्यंत येतो… पण या वेळी, ऑफिसरने दुसरा कॅमेरा बदलला आणि रिया थक्क झाली.

दुसऱ्या कॅमेऱ्यात, त्या माणसाने दार उघडण्याचा प्रयत्न केला होता! हातमोजे घातलेल्या हातांनी. पण दार बंद होतं, म्हणून तो परत वळून अंधारात अदृश्य झाला.

रिया कुजबुजली, “म्हणजे तो फक्त पाठलाग करत नव्हता… तो आतही यायचा प्रयत्न करत होता.”

ऑफिसरने विचारलं, “तुम्ही तक्रार करणार का?”
रिया क्षणभर थांबली. “आधी मला सत्य शोधू द्या.”

रिया हॉस्टेलमध्ये आली तेव्हा तिची रूममेट मिताली परत आलेली होती.मितालीने रियाच्या चेहऱ्याकडे पाहूनच विचारलं, “तू ठीक आहेस ना? खूप घाबरलेली दिसतेयस.” रिया काही क्षण गप्प झाली.

शेवटी तिने सगळं सांगितलं, 307, भिंतीमागचा मार्ग, आवाज, गार्ड, सगळं.

मिताली शांतपणे ऐकत राहिली. मग म्हणाली, “रिया… तुला माहितेय का? दोन वर्षांपूर्वी नेहा गायब झाली तेव्हा… तिच्याबरोबर राहणारी रूममेट मीच होते.”

रिया दचकली. “तू…?”
मितालीने मान डोलावली.

“नेहा सतत सांगायची की रात्री कुणीतरी भिंतीच्या पलीकडे चालतंय. ठकठक करतोय. पण मी ते मजेत घेतलं. आणि एके दिवशी ती अचानक गायब झाली.
पोलीस म्हणाले, पळून गेली असेल. पण मला माहित होतं… ती कुठेही नाही गेली.”

मिताली पुढे म्हणाली, “एक गोष्ट मी कधीच कोणाला सांगितली नाही. नेहा गायब होण्याच्या आधीच्या रात्री,
मी कोणीतरी भिंतीमागच्या मार्गातून बाहेर पडताना पाहिलं होतं.”

रिया जोरात कुजबुजली, “तो माणूस?”

मिताली म्हणाली, “हो. हुडी घातलेला… तोच.”

त्या रात्री दोघींनी ठरवलं, “आज आपण त्या भिंतीमागे जाऊच. जे काही असेल, सत्य बाहेर आणायचं.”

307 बंद होती. पण सगळ्या हॉस्टेलच्या मुली झोपल्यानंतर दोघींनी किल्ली बनवून घेतली होती.

रिया कुजबुजली, “तयार आहेस ना?”

मिताली, “हो. पण लक्षात ठेव, शक्य असेल तर फक्त पाहायचं…"
त्या दोघींनी दरवाजा उघडला.

307…अंधार…थंडावा…
दूरवरून काहीतरी खसखसल्याचा आवाज.
दोघी थरथरत भिंतीजवळ गेल्या. रियाने तो गुप्त भाग दाबला. भिंत हळूसच सरकली.

त्या मार्गात प्रवेश करताच काहीतरी बदलल्यासारखं जाणवलं, अस्वस्थ करणारी शांतता. हवा ओलसर.
जमिनीवर विचित्र खुणा. त्या छोट्या खोलीजवळ पोहचल्या जिथे रियाला वही सापडली होती. पण या वेळी… खोलीत काहीतरी वेगळं होतं.

तिथे लाल मार्करने भिंतीवर लिहिलेली एक नवी ओळ होती, “तुम्ही खूप उशीर केला.”
रिया आणि मितालीचा श्वास अडकला.मितालीच्या हातातून टॉर्च जवळपास पडणार होती.त्या मागे वळल्या, तेवढ्यात, ठक… ठक… ठक...भिंतीच्या दुसऱ्या बाजूने.
पण या वेळी खूप जवळून.

मिताली कुजबुजली, “कोणी आहे. रिया, आपण इथून बाहेर जायचं का?”
पण तितक्यात… समोरच्या अरुंद मार्गात कोणीतरी उभं राहिल्याची आकृती दिसली, पांढरे हातमोजे, काळी हूडी.

मिताली थरथरत म्हणाली, “तो… इथे आत कसा आला?”

त्या दोघी मागे हटल्या. तो माणूस शांतपणे पुढे येत होता.

रीया आणि मिताली पळू लागल्या. दोघी त्या अरुंद मार्गातून कश्याबश्या बाहेर आल्या.

307 मध्ये प्रवेश होताच रियाने दार जोरात लावून घेतलं.
कुणीतरी भिंतीला हात फिरवल्यासारखा आवाज आला.

मिताली ओरडली, “तो आत आहे! अजूनही तो आत आहे!”
त्या दोघी बाहेर धावून आल्या.
गार्ड खाली दिसला, अंधारात उभा.

रिया थरथरत म्हणाली, “तो… वर आहे! 307 मध्ये! आमचा पाठलाग करून आला!”

गार्ड हळूच वर पाहू लागला. मग म्हणाला, “कोण? तो?”

रिया, “अहो!! त्याचे हातमोजे… हुडी… तोच!”

गार्डच्या ओठांवर एक विचित्र, भीतीदायक, नसते हसू आलं.“मी तर इथेच होतो, रिया मॅडम…”

रिया आणि मिताली एकमेकींकडे पाहत राहिल्या.
मिताली हळूच म्हणाली, “रिया… 307 मधील माणूस... गार्ड असेल तर...." ते ऐकून रियाचा चेहरा पांढरा पडला. दोघींनी वर पाहिलं. 307 चं दार…हळूहळू स्वतःच उघडत होतं आणि समोर तो गार्डच उभा होता. त्याला बघून आता दोघींना कळलं होतं की आपण ज्याला घाबरत होतो तो हाच आहे. म्हणतात ना दिव्याखाली अंधार अशी गत झाली होती दोघींची.


क्रमशः
0

🎭 Series Post

View all