चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
खुशीचं स्वप्न
खुशी आज खूप आनंदी होती. सात वर्षांची खुशी आज पहिल्यांदा आपल्या आई बाबांसोबत मोठ्या गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला जात होती.
आज बाप्पांना भेटायचं तिचं एकमेव स्वप्न पूर्ण होणार होतं. तिच्या आनंदाला सीमा नव्हती. जाण्याआधी ती गणपती बघायला जात असल्याचं, तिने तिच्या सगळ्या मैत्रिणींना सांगितलं. त्यांच्यापैकी ती एकटीच होती जी आई बाबांसोबत इतक्या लांब गणपती बघायला जात होती.
ते सकाळी लवकर ट्रेनमध्ये चढले. लवकर उठली तरी खुशीला झोप लागत नव्हती. ती आनंदाने ट्रेनच्या बाहेरचे दृश्य बघत होती. तिला दम्याचा त्रास असल्यामुळे तिच्या घरच्यांनी तिला घेऊन कधी लांबचा प्रवास केला नव्हता, पण आज कित्येक दिवसांनी तो योग आला.
बघता बघता त्यांची ट्रेन त्यांना हव्या असलेल्या प्लॅटफॉर्मला लागली. ते दोघे खुशीला घेऊन ट्रेनमधून उतरले. स्टेशनच्या बाहेर निघून ते एका टॅक्सीमध्ये बसले. खुशीसाठी ते सगळं नवीनच होतं. ती शांत राहून फक्त स्मित करत, ते सगळं आनंदाने अनुभवत होती.
त्यांची टॅक्सी काही वेळाने त्यांना ठरवलेल्या ठिकाणी घेऊन पोहोचली. ते तिघे टॅक्सीतून बाहेर उतरले. मग तिथून पुढे त्या मंडळाच्या गेटपर्यंत चालत जाऊ लागले. खुशी बाबांचा हात धरून आजूबाजूला बघत चालू लागली.
चालता चालता ते तिघे त्या मोठ्या प्रवेश द्वारापाशी पोहोचले. ते बघून खुशी अगदी स्तब्ध होऊन त्याला बघू लागली. तिची मानवर होत नव्हती, इतका मोठा तो गेट होता . ती वर बघता बघता मागे पडणार इतका मोठा गेट होता तो. ती मागे पडणार तोच तिला मागे तिच्या बाबांनी पकडले आणि मग ते दोघे एकमेकांकडे बघून हसू लागले.
" बापरे! बाबा, किती मोठा गेट आहे हा, एकदम मस्त !" खुशी हसत तिच्या बाबांना म्हणाली.
" हो बाळा, कारण आत बाप्पा पण तेवढेच मोठे आहेत ना. त्यांना यायला जायला इतकी जागा हवी ना? चला आता आत जाऊन आपण बाप्पांना भेटूया छान." खुशीचे बाबा तिला म्हणाले.
ते ऐकून खुशी आनंदी होऊन त्यांच्या सोबत पुढे चालू लागली. चालत चालत ते तिघे भली मोठी रांग असलेल्या जागेत पोहोचले. ती रांग बघून खुशीचा मात्र भ्रमनिरस झाला.
" बाबा, बाप्पा कुठे आहेत ? किती गर्दी आहे इथे. बाप्पा भेटतील ना आपल्याला?" खुशी निराश होत तिच्या बाबांना विचारू लागली.
" हो बाळा, बाप्पांना माहीत आहे ना, आज त्यांची लाडकी खुशी त्यांना भेटायला येणार आहे, मग ते आत खुशीची आतुरतेने वाट बघत आहेत. त्यासाठी आपल्याला ह्या सगळ्यांच्या मागून हळू हळू पुढे जावं लागेल ना? म्हणजेच आपल्याला आत बाप्पांना भेटता येईल ना?" खुशीचे बाबा तिची समजूत काढू लागले.
बाबांच्या बोलण्याने खुशी थोडी आनंदी आणि आता बाप्पांना भेटायला आणखीन आतुर झाली. ते तिथे असलेल्या रांगेत उभे राहिले . कधी तिची आई तिला उचलून घेत होती, तर कधी तिचे बाबा. बाबांची ती अतिशय लाडकी असल्यामुळे त्यांच्यापासून काही ती जास्त लांब राहत नव्हती. त्यांचा देखील ती जीव होती.
त्यांची रांग हळू हळू पुढे सरकू लागली. त्यात त्या दोघांना अजिबात कंटाळा येत नव्हता, कारण खुशीचे वेगवेगळे प्रश्न सतत चालूच होते.
" बाबा, त्या रांगेतून चला ना... तिथे बघा किती कमी लोकं आहेत. आपण लवकर जाऊ ना बाप्पांजवळ." बाजूला असलेल्या व्हीआयपी रांगेला बघून खुशी तिच्या बाबांना बोलू लागली.
" बाळा, आपण तिथून नाही जाऊ शकत. ती रांग आपल्यासाठी नाही." तिच्या बाबांनी तिला सांगितलं.
" आपल्यासाठी नाही म्हणजे? मग कोणासाठी आहे?" खुशीचा दुसरा प्रश्न बाबांसमोर लगेच उभा राहिला.
" ती रांग मोठ्या माणसांसाठी आहे बाळा." तिच्या बाबांनी तिला सांगितलं.
" मग तुम्ही दोघे पण तर मोठे आहात ना, मग इथून का जाताय?" खुशीचा आणखीन एक प्रश्न.
" हो, कारण आमच्या सोबत आमचं लहान बाळ आहे ना, म्हणून आम्ही इथून जातोय." तिचे बाबा म्हणाले.
तिच्या आईला त्या दोघांच्या संवादात काहीच रस नव्हता. तिला खुशीची सवय चांगलीच माहीत होती, म्हणून आज बाहेर आल्यामुळे तिने खुशीला तिच्या बाबांकडे सोपवले होते.
खुशीचे प्रश्न काही संपता संपत नव्हते, पण तरी तिच्या बाबांना त्याचा कंटाळा येत नव्हता. ते हसतच तिच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत होते. त्यांची प्रश्न-उत्तरे चालू असतानाच त्यांची रांग बरीच पुढे सरकली होती. ते आता त्या भल्या मोठ्या सुंदर मूर्तीच्या एकदम समोर आले होते.
तिच्या बाबांनी तिला ती मूर्ती लांबून दाखवली. छोटीशी खुशी सर्व काही विसरून एकटक त्या मूर्तीकडे बघू लागली. जणू ती नजरेनेच बाप्पांना काही बोलत होती. त्यामुळे तिचे प्रश्न थांबले होते, म्हणून तिच्या बाबांनी थोडा सुटकेचा निःश्वास सोडला.
ते हळू हळू आणखीन पुढे सरकू लागले. खुशीला आता बाप्पांच्या एकदम जवळ जाण्याची आतुरता लागून राहिली. त्यांची रांग तशीच हळू हळू आणखीन पुढे सरकू लागली. बाप्पांच्या पाया जवळ जाऊ लागली. पुढे जाता जाता त्या तिघांचं ही लक्ष बाप्पांकडे होतं.
बघता बघता ते तिघे एकदम बाप्पांजवळ पोहोचले. खुशीला तिच्या पप्पांनी उचलून घेतले होते. आणि त्यांच्या मागून तिची आई चालत होती. बाप्पांच्या पाया जवळ पोहोचताच खुशीच्या बाबांनी तिचं डोकं बाप्पांच्या पायावर ठेवावं म्हणून तिला खाली वाकवलं.
तोच अचानक त्यांच्या उजव्या बाजूने त्यांना जोराचा धक्का जाणवला आणि ते खुशीला घेऊन सरळ त्यांच्या डाव्या बाजूला ढकलले गेले. क्षणात अगदी काय झालं, त्यांचं त्यांनाच समजले नाही. ते एका जागेवर स्थिर झाले. बिचाऱ्या खुशीला बाप्पांच्या पायाला साधा हात देखील लावायला मिळाला नव्हता.
त्यांच्या मागून तिच्या आईला देखील तसंच ढकलून बाजूला करण्यात आलं. झाला प्रकार बघून खुशीच्या बाबांना ढकलणाऱ्यांवर चीड आली. ते खुशीला तसंच उचलून घेऊन त्या लोकांसोबत भांडू लागले. ते सगळे मिळून त्यांना बाहेर ढकलू लागले.
हा सगळा प्रकार बघून खुशी घाबरून गेली. जोर जोरात रडू लागली, पण बिचाऱ्या त्या चिमुकल्या जिवाकडं कोणाचेच लक्ष नव्हते. रडून रडून बिचारीचा जीव सुकला. हळू हळू ती शांत झाली. तिचा जीव गुदमरू लागला. ती तिचे इवलेसे डोळे मिटू लागली. ती तिथेच बेशुद्ध झाली.
पुढच्याच क्षणात अचानक तिच्या समोर तिला मोठा प्रकाश जाणवला. तसा डोळ्यांसमोर हात ठेवत तिने हळू हळू तिचे डोळे उघडले. डोळे उघडून ती हळू हळू तिचा हात बाजूला करू लागली. हात पूर्णपणे बाजूला केल्यावर समोरचे दृश्य बघून ती चक्रावून गेली. खरे खुरे बाप्पा स्वतः उदास चेहऱ्याने तिच्या समोर उभे होते. तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.
ती तशीच उठून धावत बाप्पांजवळ गेली आणि त्यांच्या पायांवर पडून त्यांना नमस्कार केला. तेव्हा बाप्पांनी तिला उठून उभं राहायला सांगितलं.
" बाळ खुशी, तू ठीक आहेस ना? तुला लागलं नाही ना कुठे?" बाप्पा तिला विचारू लागले.
" नाही बाप्पा, अजिबात नाही." खुशी स्तब्ध होऊन हसतच त्यांना बोलू लागली. तिला तिचे भान राहिले नव्हते.
" मला माफ कर बाळा, तू इतक्या आवडीने प्रेमाने मला भेटायला इथे आलीस आणि ह्या विकृत बुद्धीच्या लोकांनी तुझ्या सोबत अशी वागणूक केली. मला ह्यांच्या वागण्याने आता माझीच मला लाज वाटायला लागली आहे. तुझ्या सारखे कित्येक भक्त मला भेटायला म्हणून इथे येतात आणि अपमानित होऊन जातात.
बेटा, तुमचा अपमान म्हणजेच माझा अपमान आणि तुम्हाला झालेला त्रास म्हणजेच माझा त्रास. तू नको यायला हवं होतंस इथे. खरं तर, मी इथे राहतच नाही. तूच सांग, मी अशा वातावरणात कसा राहीन? मी भुकेला आहे, पण ह्यांच्या पैशांचा नाही. सोन्या-चांदीचा नाही, तर तुझ्या सारख्या भक्ताने निरागस भक्तीचा, प्रेमाचा भुकेला आहे. म्हणून तुझ्यासोबत माझ्या सर्व भक्तांना एकच मागणं आहे की, नका येऊ अशा ठिकाणी जिथे तुम्हाला किंमत नाही. मला मनोभावे हाक मारा, मी तुमच्यातच वसलेलो आहे. तू आज मला भेटायचं स्वप्न सोबत घेऊन आली होतीस ना बाळ? घे मी भेटलो तुला. नेहमी आनंदी आणि सुखी रहा आणि मला भेटावसं वाटलच, तर मनापासून मला हाक दे मी नक्की येईन, पण अशा ठिकाणी पुन्हा येऊ नकोस.
इथे ह्या लोकांनी माझा बाजार मांडला आहे. आता जा लवकर, बघ तुझे आई बाबा तुझी काळजी करत आहेत." बाप्पा भावूक होऊन खुशीला म्हणाले.
खुशी काही बोलणार त्या आधी तिच्या डोळ्यांवर अंधारी पसरली. तिने पुन्हा हळू हळू डोळे उघडले. तिला समोर तिचे आई बाबा दिसू लागले. त्यांच्याकडे पाहून ती स्मित करू लागली. तिला सुखरूप बघून त्यांचा जीव भांड्यात पडला. खुशीने त्यांना लगेचच तिथून बाहेर निघायला सांगितले.
ते तिघे ही तिथून निघून बाहेर आले. त्यांनी खुशीला पाणी प्यायला दिले. तिच्या चेहऱ्यावरचे स्मित तसेच होते.
आज खरंच तिच्या आनंदाला सीमा नव्हती, कारण तिचे स्वप्न पूर्ण झाले होते.
समाप्त.
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा