चॅम्पियन ट्रॉफी २०२५
लघुकथा ( संघ कामिनी)
शीर्षक : किडनीचे गुपित
पुण्यातील ’सर परशुराम महाविद्यालयात’ प्रोफेसर देशपांडे मराठी शिकवत असत. त्यांची शिकवण्याची पद्धत खूप छान होती, प्रत्येक गोष्ट ते सर्वांना समजावून आणि मनापासून शिकवत असत. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला संयमाने उत्तर देणे, त्यांचे मनोबल वाढवणे हेच त्यांचे आयुष्याचे ध्येय आहे असे मानून आपले पूर्ण आयुष्य त्यांनी त्या महाविद्यालयातील मुलांना शिकवण्यातच घालवले होते.
त्यांच्या वर्गात अक्षय नावाचा हुशार विद्यार्थी होता. तो गरीब घरचा असला तरी त्याला स्वाभिमान होता. त्याचे वडील बीड येथे हंगामी शेतकरी होते आणि इतर वेळी आई आणि तेसुद्धा दवाखान्यात काम करायचे. अक्षयला अभ्यासाची प्रचंड आवड होती. त्याला शिकायचे होते, आयुष्यात काहीतरी मोठे व्हायचे होते; पण परिस्थिती त्याला वारंवार मागे खेचत असे. दहावी झाल्यावर तो पुढे शिकण्यासाठी पुण्यात आला आणि देशपांडे सरांच्याच महाविद्यालयात दाखल झाला.
देशपांडे सरांनी काही दिवसांतच त्याच्या डोळ्यांतली जिद्द ओळखली. त्यांनी त्याला शिष्यवृत्ती मिळवून दिली, पुस्तके घेण्यासाठी काही श्रीमंत लोकांची ओळख करून दिली. गरीब अक्षयचे स्वप्न जपण्यासाठी सरांनी आपला कितीतरी वेळ आणि शक्ती खर्च केली होती.
हळूहळू अक्षय वर्गात उठून दिसू लागला. निबंध स्पर्धा असो किंवा वक्तृत्व स्पर्धा, त्याचे नाव नेहमी पुढे येऊ लागले. सरांनाही त्याचा अभिमान वाटू लागला आणि इथेच अक्षयला थोडी गर्वाची बाधा होऊ लागली.
एका महाविद्यालयीन निबंध स्पर्धेत अक्षयला प्रथम क्रमांक मिळाला नाही म्हणून तो खूप चिडला. ज्या विद्यार्थ्याला प्रथम क्रमांक मिळाला होता त्याने तो चुकीच्या मार्गाने मिळवला आहे आणि त्याला त्याचे फळ मिळायला हवे असे समजून, त्याला त्याने बेदम चोपले. तो बिचारा इस्पितळात जाऊन पडला होता. काही विद्यार्थ्यांनी ही गोष्ट देशपांडे सरांपर्यंत पोहोचवली.
महाविद्यालयातील इतर प्राध्यापक देशपांडे सरांना बोलू लागले.
“देशपांडे, हे सगळे तुमच्या लाडामुळे झाले आहे बरे! तो आता सर्वांना स्वतःपेक्षा कमी लेखतो आणि आपल्या पुढे जो जाईल त्याला पाण्यात पाहू लागला आहे.”
देशपांडे सरांना हे बोलणे रुचले नाही. त्यांनी रागाच्या भरात सगळ्या वर्गासमोरच अक्षयला फटकारले.
“अक्षय! तुला वाटते की तू खूप मोठा झालास का? तू काय आणि या महाविद्यालयातील बाकीचे काय, अजून सगळे जण अंड्यात आहेत. तुम्हाला अजून खूप स्पर्धा करायच्या आहेत आणि त्या फक्त माझ्या ओळखीवर पुढे होऊ शकणार नाहीत. मेहनत सोडून शॉर्टकट शोधणे, इतरांना आपल्या पुढे गेला म्हणून मारणे हे खऱ्या विद्यार्थ्याचे लक्षण नाही. तू कदाचित या गोष्टीत तरबेज झाला आहेस, आता मला तुझ्यासारखा विद्यार्थी नको!”
त्या क्षणी अक्षयचा आत्मसन्मान तुटून पडला. त्याने अपेक्षा केली होती की सर नक्की त्याला पाठीशी घालतील; पण उलट त्यांच्याच तोंडून अपमान ऐकावा लागला.
त्याने देखील मनाशी ठरवले,
‘आता मी देखील सरांशी बोलणार नाही.’
‘आता मी देखील सरांशी बोलणार नाही.’
गुरू-शिष्याच्या नात्यात मिठाचा खडा पडला होता.
काळ पुढे सरकत गेला. सर त्यांच्या कामात आणि अक्षय देखील अभ्यासात गुंतून पुढे चांगला मोठा इंजिनीअर बनला. त्यांचे एकमेकांशी बोलणे थांबले; पण मनाच्या गाभाऱ्यात कुठेतरी दोघांमध्ये एक नाळ कायम होती.
एके दिवशी अचानक बातमी आली, देशपांडे सरांना गंभीर आजार झालाय. त्यांची किडनी निकामी झाली होती. त्यांना त्वरित ट्रान्सप्लांट करायची गरज होती; पण दाता मिळत नव्हता. ही बातमी ऐकून सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनात खळबळ माजली.
अक्षयला ही बातमी कळली तेव्हा त्याचे मन द्विधा अवस्थेत पडले.
‘ज्यांनी माझा सगळ्यांसमोर अपमान केला, त्यांची मी का फिकीर करायची? मी त्यांच्यासाठी का त्रास सहन करू?’
पण नंतर त्याच्या लक्षात आले, ‘हेच ते सर होते, ज्यांनी मला पुस्तकांसाठी मदत केली होती. मला शिष्यवृत्ती मिळवून दिली होती. मी आज जे आहे ते त्यांच्यामुळेच आहे. त्यांचा राग हा त्यांच्या प्रेमाचाच एक भाग नव्हता का? त्यामुळेच कदाचित मी इतका पुढे येऊ शकलो.’
या विचारांनी त्याचे मन ढवळून निघाले.
शेवटी त्याने ठरवले,
‘सरांसाठी मी कसाही असेन; पण मी माझे कर्तव्य विसरणार नाही.’
‘सरांसाठी मी कसाही असेन; पण मी माझे कर्तव्य विसरणार नाही.’
अक्षय डॉक्टरांकडे गेला, त्याने स्वतःची पूर्ण तपासणी करून घेतली. नशिबाने त्याची किडनी सरांसाठी पूर्णपणे योग्य ठरली. त्याने गुपचूप सर्व प्रक्रिया पूर्ण केली आणि डॉक्टरांना सांगितले,
“माझे नाव सरांपर्यंत पोहोचू देऊ नका. त्यांना ते कधीच कळू नये की त्यांना किडनी कोणी दिली आहे ते.”
शस्त्रक्रियेचा दिवस आला. सरांची प्रकृती नाजूक होती; पण डॉक्टरांना आत्मविश्वास होता. तासनतास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर शेवटी डॉक्टर बाहेर आले आणि सगळ्यांना सांगितले,
“ऑपरेशन यशस्वी झाले आहे. सर आता हळूहळू बरे होतील.”
सगळीकडे दिलासा पसरला; पण सरांना जेव्हा शुद्ध आली तेव्हा त्यांनी डॉक्टरांना विचारले,
“मला किडनी कोणी दिली? मला त्या देवमाणसाला भेटायचे आहे. त्याला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत.”
डॉक्टरांनी हसून उत्तर दिले,
“त्या व्यक्तीने एकच अट घातली, त्याचे नाव गुप्त ठेवायचे. त्याला तुमचे आभार नको आहेत, फक्त तुम्ही बरे व्हावे हीच त्याची इच्छा आहे.”
सरांच्या डोळ्यांत पाणी आले.
‘असा कोण असेल ज्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला आयुष्य दिले आणि तरीही स्वतःचे नाव लपवले? माझे नशीब खरेच सुदैवी आहे.’
काही आठवड्यांनी सर पुन्हा महाविद्यालयात रुजू झाले. ते थोडे अशक्त तर होते; पण वर्गात उभे राहण्याची ताकद त्यांना मिळाली होती. त्यांनी शिकवायला सुरुवात केली तसा विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
त्या दिवशी अक्षय देखील महाविद्यालयात आला होता. सरांनी त्याच्या नजरेला नजर भिडवली, तो देखील त्या शस्त्रक्रियेमुळे थोडासा अशक्त वाटत होता. सरांना बोलायचे होते; पण त्यांना शब्द सुचले नाहीत.
सरांचा वर्ग सुटल्यावर अक्षय हळूच पुढे आला आणि थोडासा घाबरत चाचरत म्हणाला,
“सर, तुम्ही आता बरे आहात ना? हेच आम्हा सगळ्यांसाठी पुरेसे आहे.”
सरांनी क्षणभर त्याच्याकडे पाहिले. त्यांना जाणवले अक्षयच्या मनात काही तरी गुपित आहे; पण ते काय, हे ते ओळखू शकले नाहीत.
काळ पुढे सरकत गेला. सर आपल्या आयुष्याच्या उर्वरित काळात शिकवत राहिले, शेकडो विद्यार्थ्यांना घडवत राहिले; पण त्यांना कधीच कळले नाही की त्यांच्या एका आवडत्या शिष्याने, ज्याच्याशी त्यांचे भांडण झाले होते, एकमेकांशी बोलत देखील नव्हते, त्यानेच गुपचूप त्यांना जगण्याची पुन्हा एकदा संधी दिली होती.
समाप्त
©भालचंद्र नरेंद्र देव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा