Login

किंमत समजली..

किंमत समजली
दीप्ती ssssss दीप्ती ssssss
आधी इकडे ये sss
माझ्या इथल्या फाईल कुठे गायब झाल्या?

बेडरुममधून आकाशने वस्तूंची आदळआपट करायला सुरुवात केली तशी दीप्ती गॅस बंद करून बेडरूमध्ये धावली.

बेडरूममध्ये टेबलवरच्या सर्व वस्तू अस्ताव्यस्त पसरल्या होत्या आणि आकाश काहीतरी शोधत होता.
दीप्तीला आलेलं पाहून ओरडून म्हणाला , काय गरज पडली तुला माझ्या वस्तू दुसरीकडे ठेवायची? सकाळच्या गडबडीत मी काय हेच शोधत बसायचं का ?
दीप्तीने पुढे होत कपाटातून फोल्डर काढला त्यात व्यवस्थित रचलेल्या त्याच्या फाइल्स काढल्या आणि शांतपणे त्याच्या पुढे धरल्या.
तसं आकाशने त्यातली निळी फाईल जोरात खेचून घेतली आणि बॅगेत ठेवून अंघोळीला निघून गेला.

दीप्ती पुन्हा गॅस सुरू करून उरलेला स्वयंपाक करायला लागली तसा १५-२० मिनिटांनी आकाश पुन्हा तिच्या नावाने ओरडत बाहेर आला.

" तुझं डोकं ठिकाणावर आहे का गं? की मुद्दाम मला त्रास द्यायचा विचार केलाय ?

अहो आता काय झालं तुम्हाला चिडायला? शांत व्हा आधी आणि सांगा मला..दीप्ती पुन्हा समजुतीने म्हणाली.

तुला काल रात्रीचं मी सांगितलं होत माझा ब्ल्यू फॉर्मल शर्ट इस्त्री करून ठेव आणि तू मूर्ख ss सफेद शर्टवर इस्त्री मारून बसलीस.

आताच्या आता मला ब्ल्यू शर्ट इस्त्री करून दे. निघ लवकर...

दीप्ती त्याचा हात धरून खोलीत घेऊन गेली. बघा इथे सफेद शर्टच्या खालीच ब्ल्यू शर्ट इस्त्री करून ठेवला आहे.
उत्तर देऊन दीप्ती पुन्हा निघून गेली.
आकाश निरुत्तर होऊन तयारी करून ऑफिसला निघून गेला.
पण या रागाच्या भरात त्याने टिफीन तसाच ठेवला.
तशी दीप्तीच्या चेहऱ्यावर काळजी पसरली.

डायनिंग टेबलवर बसून हा तमाशा पाहणारे सासू सासरे उठले.

सासरे दीप्तीला म्हणाले, अजून किती दिवस सहन करणार आहेस ? आत्ता याचा सोक्षमोक्ष लावायलाच हवा.

सासूबाई - दिप्ती तू बॅग भर आणि चांगली ८-१० दिवस माहेरी जा . आम्ही बोलावल्याशिवाय येऊ नकोस.
त्याला बरोबर अद्दल घडवली पाहिजे.
कळू दे त्याला की तुला बायको म्हणून आणलंय नोकर किंवा राग काढायची मशीन म्हणून नाही.

दीप्तीने सासूबाईंना मिठी मारली आणि माहेरी निघून गेली.

एखादी गोष्ट मनाप्रमाणे नसेल तर आकाश चिडचिड करायचा. दीप्तीच्या रूपात त्याला आता राग व्यक्त करायला हक्काची व्यक्ती मिळाली.
तेवढ्यापुरता ओरडून तो संध्याकाळी सगळं विसरून पुन्हा चांगला वागायचा.
म्हणून तितक्याच शांततेने आणि समजूतदारीने दिप्ती वागत होती.

सासू सासऱ्यांना दिप्तीचं फार कौतुक होतं. शिवाय तिचं प्रत्येक कामही टापटीप आणि पद्धतशीर होतं.
चुका आकाशच्याच असायच्या.

संध्याकाळी आकाश घरी आला तेव्हा हॉल आणि किचन मधला पसारा, त्याचा डायनिंग टेबल वरचा टिफीन, अस्ताव्यस्त बेडरूम सारं काही तसंच होतं. दिप्तीचा पत्ता नव्हता.
ती चिडून निघून गेल्याचं आईने त्याला सांगितलं.

यावर बेफिकीरपणे त्याने उत्तर दिलं...
गेली तशी येईल परत गरज असेल तर.

आई - ठीक आहे, मग आपल्या जेवणाचं, घरात पडलेल्या पसाऱ्याच पण काय करायचं ते तूच सांग आता.
माझ्याने आता नाही होणार हे सर्व.
तसंही तुला दिप्तीचं काम पटतं नव्हतं मग तूच कर आता सगळी कामं व्यवस्थित.

त्याआधी जेवणाचं बघा माझ्या गोळ्या आहेत ९ वाजताच्या. वडिलांनी सांगितलं.

आईंनी बसल्या जागी आकाशला डाळ भाताचा कुकर कसा लावायचा याच्या सूचना दिल्या.

जेवणं झाल्यावर आकाशने बडबड करत हॉल बेडरूम आणि किचनमधला पसारा आवरला. खरकटी भांडी साफ केली. एकीकडे कपड्यांची मशिन लावली. कामाची सवय नसल्यामुळे
सर्व करून झोपायला उशिर झाला आणि सकाळची कामं गडबडली. उशिरा ऑफिसमध्ये पोचल्यामुळे
बॉसने देखील त्याला सुनावलं.

सलग तीन दिवस हेच घडलं आणि त्याचं पूर्ण वेळापत्रक बिघडलं.

आता मात्र आकाशला आपली चूक आणि दिप्तीची किंमत समजली होती.

आई , प्लीज दीप्तीला बोलावं.
मला आता जाणवलं की ती आपल्या घरासाठी किती काय काय करते ते.
ती गेल्यापासून माझा एकही दिवस आणि एकही कामं व्यवस्थित पार पडली नाहीत.

बायको म्हणून यायला सांगू की घरातली नोकर म्हणून ?
कारण घरकाम तुझ्या अंगावर पडलं म्हणून आठवण झाली ना तुला ?
आई रागात ओरडल्या.

पण तिने तरी फुकटचं नोकर म्हणून का रहाव ? बायको म्हणून कधी तिला समजून घेतलंय का ? सतत आपलं तिला ओरडत राहायचं.

आमची हिंमत नाही तिला बोलवून परत तुझ्याकडून तिचा अपमान करून घ्यायची.
तुला जर खरंच पश्चात्ताप होत असेल तर तूच जा माफी माग आणि घेऊन ये तिला.
बाबा म्हणाले.

तसा आकाश उठला आणि दीप्तीला आणायला निघाला.

इकडे सासूबाईंनी दीप्तीला फोन करून प्लॅन सक्सेसफुल झाल्याचं सांगितलं.
0