Login

किंमत नात्यांची ( भाग- १ )

वेळ आल्यावर नात्यांची किंमत कळते ही सांगणारी कथा.
विषय:- रक्ताची नाती

शीर्षक:- किंमत नात्यांची

भाग:- १

"काय गं आई, अजून किती दिवस आपण तिचं बघायचं? सगळंच तर आपणचं पुरवतो की तिला. बास की आता, माझा ही संसार आहे म्हटलं." सचिन सोफ्यावर बसून पायात साॅक्स घालत आई सुमतीला थोडं रागातच म्हणाला.

सुमतीला खरं तर त्याचा खूप राग आलेला पण उगीच सकाळी सकाळी त्यांना कोणताही वाद नको होता म्हणून त्या राग आवरत म्हणाल्या, "हो, कळलं बरं. आता बोललास पण पुन्हा पुन्हा तेच बोलू नकोस. तिला सगळंच नाही पुरवतं आपण. थोडीफार मदत करतो इतकंच आणि हो, तेही तुझे बाबा देतात. तू तर कधीतरी देतोस तेही तोंड वाकडतिकडं करतं, जीवावर आल्यासारखं. तिची परिस्थिती सुधारेपर्यंत करू आम्ही मदत. तू नको करूस काही मदत. इथून पुढे आमचं आम्ही पाहून घेऊ. आज आपण देतोय. पण तिची परिस्थिती उद्या चांगली झाली की तीही करेलच की आपल्याला मदत. एक वेळ येईल अशी जेव्हा तिचं आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलं. माझे शब्द लक्षात ठेव तू सचिन. आता माझे बोल कटू वाटतील तुला, राग येत असेल माझ्या बोलण्याचा. पण वेळ आल्यावर हेच तुझं रक्ताचं नातं तुझ्या कामी येईल. जेव्हा तुला तुझ्या बोलण्याचा रोख लक्षात येईल तेव्हा मात्र तू पश्चात्ताप करशील. पण वेळ मात्र गेलेली असेल."

"हं..ती आणि मदत करेल, स्वप्न बघ तू फक्त. रक्ताचं नातं म्हणून तर गप्प आहे मी नाही तर.." तो थोडा कुत्सित हसत हातात घड्याळ घालत म्हणाला.

"नाही तर काय, हं? आता हसतोस पण एक वेळ अशी येईल की तू तिचा आयुष्यभर ॠणी होशील." सुमती त्याला मध्येच टोकत उपहासक हसत म्हणाल्या.

"नाही, आई ती वेळ कधीच येणार नाही. बस करा आता तिला मदत करणं. एवढचं सांगतोय यापुढे माझ्याकडून तिच्यासाठी कसलीच अपेक्षा करू नका." सचिन रागात एक कटाक्ष सुमतीकडे टाकत म्हणाला.

"ये बाबा, जाऊ दे ना, जा तू काॅलेजला. तुला आता काही नाही कळणार. तुला जायला उशीर होतोय ना जा मग तू. उगीच सकाळी सकाळी नाही वाद घालयचा मला. म्हटलं ना मी तुझ्याकडून अपेक्षा नाहीच आता काही. तुला म्हणणार पण नाही आता. जा तू." सुमती थोड्या चिडतच रागात म्हणाल्या.

"अगं,सुमे, जाऊ दे, त्याला का बोलतेस? काही फायदापण नाही त्याला बोलून. उगीच का रक्त आटवतेस? त्याला नाही पटणार तर ते. जा बाबा तू सचिन." सचिनचे बाबा श्रीधर सुमतीकडे पाहत म्हणाले. ते असे म्हणताच तो रागात पाय आपटत तिथून निघून गेला.

"अहो, पणऽऽ तो बघा कसा बोलतोय? सख्खी बहीण आहे ती त्याची आणि हा कसा वागतोय? ती घरी आली की ना कधी नीट बोलतो ना कधी नीट वागतो. सरळ घराच्या बाहेर तरी जातो नाही तर त्याच्या रूममध्ये जाऊन तर झोपतो. काय वाटतं असेल पाहुण्यांना. जरा म्हणून विचार नाही." सुमती तो  गेलेल्या दिशेला पाहत चेहरा उदास करत त्रागा करत श्रीधर यांना म्हणाली.

"जाऊ दे गं, आता आपण कितीही समजून सांगितले तरी त्याला कळणार नाही. वेळ आल्यावर कळेल त्याला. तू नको जास्त विचार करूस. उगीच त्रागा करून घेऊन तुझीच तब्बेत खराब होईल. आपण आहोत ना तिच्यासाठी." श्रीधर त्यांच्या खांद्यावर थोपटत म्हणाले.

"अहो, पण." ती बोलत होती तोच त्यांनी मी आहे असे डोळ्यांनी खुणावत त्यांना शांत राहायला सांगितले.

त्यांनी होकारार्थी कसे बसे मान डोलावली पण डोळे व मन भरून आले होते.

श्रीधर आणि सुमती यांना सचिन आणि सुजाता ही दोन मुलं. मध्यम वर्गीय कुटुंब. श्रीधर एक निवृत्त झालेले गृहस्थ तर सुमती गृहिणी. सुजाताचं लग्न झालेलं. तिचा नवरा नागेश, एका खाजगी संस्थेत शिक्षक म्हणून काम करत होता. अजूनही त्याचे परीक्षा देणे, चांगल्या पगाराची नोकरी शोधणं चालू होतं त्याचं. सुजाताची आर्थिक परिस्थिती थोडीशी नाजूक असल्याने श्रीधर त्यांना कधी कधी आर्थिक हातभार लावायचे जे की सचिनला कधी रूचतचं नसायचं. तो लगेच त्यांना बोलून दाखवायचा. श्रीधर आणि सुमती यांना ते सचिनचं वागणं, बोलणं आवडतं नसायचं पण उगीच वाद नको म्हणून ते कधी काही बोलत नसायचे. खूपच राग आला की एक दोन शब्द बोलायचे. शब्दाने वाद वाढतं जातील म्हणून ते शांत राहायचे.

काही दिवसांनी:-

आज मात्र सचिनला तो सगळा प्रसंग पुन्हा आठवला आणि नकळत त्याचे डोळे ओले झाले. झालेले क्षण डोळ्यांसमोर तरळून गेले.

क्रमशः

सुमतीचे म्हणणे खरे होईलं का? का सचिनचे डोळे ओले झाले? जाणून घेण्यासाठी वाचत राहा..नात्यांची किंमत