Login

किंमत नात्यांची ( भाग ३ अंतिम)

वेळ आल्यावर नात्यांची किंमत कळते हे सांगणारी कथा
विषय:- रक्ताची नाती

शीर्षक:- किंमत नात्यांची

भाग- ३ (अंतिम )

'छी! कसे वागलो आपण, आपल्या सख्ख्या  बहिणीशी किती चुकीचे वागलो, ना कधी प्रेमाने दोन शब्द बोललो ना कधी आस्थेने विचारपूस केली. नेहमी राग, चिडचिड करायचो. आईबाबा मदत करत होते तर तेही बघवत नव्हतं मला. भाऊ म्हणून मी कमी पडलो पण ती मात्र बहिणीचं कर्तव्य मोठ्या मनाने पार पाडलं. तिने नातं मनापासून निभावलं. मी खरंच आता आयुष्यभर तिचा ॠणी झालो, आईचे म्हणणे पटलं मला आता. ती खरेच बोलली की एक वेळ अशी येईल की मी सुजाचा आयुष्यभर ऋणी असेन. आज मला हे जीवदान तिच्यामुळे मिळाले. तिच्यामुळे मला हे नवे आयुष्य मिळाले. तिचा किती दुःस्वास केला. किती नाही नाही ते बोललो. आता आली की तिची आधी माफी मागेन, अगदी पाय धरेन तिचे.'असे तो आपल्याच मनाशी संवाद साधत विचारात गढून गेलेला.

तेवढ्यात त्याच्या खांद्यावर एक हात जाणवला, तसे  त्याने मागे वळून पाहिले तर सुजाता त्याच्या समोर होती. ती त्याला भेटायला आलेली. तिला पाहून त्याला खूपच भरून आलं तो तिच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागला. तिला कळेना काय झालं ते, घाबरून गेली ती. ती मायेने व काळजीने पाठीवरून हात फिरवत म्हणाली,"ये वेड्या, दाद्या काय झालं रे? काही त्रास होतोय का तुला ? काही होत असेल तर सांग, डाॅक्टरांशी बोलू आपण."


तस तो आणखी रडू लागला. तशी ती घाबरली त्याला खांद्याला पकडत आपल्यापासून वेगळं करत त्याचा चेहरा ओंजळीत पकडून म्हणाली, "ये दादू, रडणं थांबवं बरं आधी. सांग ना काय झालं? मला भीती वाटतेय रे, काय होतयं तुला? हु."आता तीही मुसमुसू लागली.

तिच्या मुसमुसण्याने त्याने त्याचे डोळे उलट्या हाताने  पुसले व नंतर तिचे डोळे पुसत कापऱ्या आवजात नाक वर ओढत म्हणाला, "ये वेडाबाई, काही नाही झालं मला. मी एकदम ठीक आहे. तू आधी शांत हो बरं. हे बघ नाही रडत मी."

ती नाक ओढत हुंदका देत म्हणाली,"हुंऽऽ मग रडत का होतास तू?"

"तू मला माफ करशील ना,गं. किती वाईट साईट बोलायचो तुला. कधी प्रेमाने बोललो नाही की विचारलो नाही. तू मात्र कधीही तक्रार केली नाहीस. उलट माझ्या कठीण प्रसंगात मला मानसिक आधाराबरोबर, आर्थिक मदतही केलीस. मी तुझा आयुष्यभर ऋणी असेन गं." तो हात जोडून ते कपाळाला लावत मान खाली घालत म्हणाला.

"अरे,दादू हे काय करतोस तू? वेडा आहेस का तू! हंऽऽ अरे, मोठा आहेस तू माझ्यापेक्षा. असे हे हात जोडू नकोस रे, ते सतत डोक्यावर व पाठीवर असू दे. आणि काय हं..ऋणी काय म्हणतोस रे, आपले रक्ताचे नातं आहे. बहिणभाऊ आहोत ना आपण. मग एकमेकांना समजून ,सांभाळून घ्यायचं असतं ना." ती त्याचे हात हात घेत म्हणाली.

"हो, गं. मी वयाने फक्त मोठा आहे. मनाचा मोठेपणा तर तुझ्याकडे व भाऊजीकडे आहे. एवढे वाईट वागून पण तुम्ही दोघांनी आमच्यासाठी, सर्वांत जास्त माझ्यासाठीही किती काय केलंत. खरचं खूप उपकार.." तो म्हणत होताच की त्याच बोलणं मधेच तोडत ती म्हणाली," दादू, उपकाराची भाषा नको करूस रे. म्हटलं ना भाऊ बहिण आहोत आपण मग रक्ताच्या नात्यात उपकार कसले रे."

"अगं पण.." तो बोलत होता तर नागेश हसत म्हणाला,"सालेसाहब, आमची कोणतीच तक्रार नाही. आता दोघेही बहिण भाऊ शांत व्हा. झालं ते सर्व. तुम्ही बरे झालात. यातच सर्व आलं."

"हो, दादू, हे बरोबर बोलतात. बघ आता त्यांच्या मनातही तुझ्याबद्दल कसलीच तक्रार नाही." ती नागेशकडे पाहत हसत पुन्हा सचिनचे हात हातात घेत म्हणाली,"तेव्हा ते जाऊ दे. हा, तुला माझ्यासाठी काही करायचंच असेल तर फक्त आयुष्याभर माझ्या सोबत राहा. माझ्या सुखदुःखांत साथ दे. मीही सोबत असेन तुझ्या कायमच, साथ देईन तुझी. बोल एवढी इच्छा पूर्ण करशील, ना!"

"हो ,बहिणाबाई ,दिलं वचन. कधीही तुझी साथ सोडणार नाही. पण तुझे पैसे.." सचिन थोडं अडखळत जीभ हलकी चावत तिच्याकडे तिरक बघत म्हणाला.

"दाद्या,काय तू पैशाने माझी किंमत करणार का?हुं " ती कमरेवर हात ठेवून लटक्या रागात म्हणते.

"ओके,बाबा..साॅरी..हे बघ कान पकडतो. आता नाही बोलणार त्याबद्दल. पण तू रूसू नकोस,हं.." सचिन थोडसं नाटकी हसत कानाला हात लावत म्हणाला. 

"ठीक आहे,दादू ."ती हसत जवळ जात त्याच्या कानावरील हात खाली घेत त्याला बिलगली. तो ही मायेने मिठीत घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवतो.

तो बहिणभाऊचा मिलाप पाहून आणि मायेचे संभाषण ऐकून श्रीधर आणि सुमती यांचेही डोळे आनंदाने पाणावले. नातं पुन्हा नव्याने बहरलं. नात्यांची किंमत वेळ आल्यावरच कळतं हेच खरं. नाही का..?

कुटुंब म्हणजे सगळी नाती आली. सुखदुःख आणि संकट काळातच नात्याची खरी किंमत कळते. जसा सचिनला त्याचा प्रत्यय आला तसाच प्रत्येकाला येतो. सुखात आनंदाच्या सरीत न्हाऊन निघायला आणि संकटात ते पेलायला बळ कुटुंबामुळेच मिळते. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती महत्वाची असते. भलेही मतभेद असो, वादविवाद होवो, संकटाकाळी तेच धावून येतात. त्यासाठी विश्वास, प्रेम, आपुलकी, माया, जिव्हाळा नात्यात आणि कुटुंबात असायला हवा.