किंमत -त्याच्या निर्णयाची भाग 1

गोष्ट तिची अन् त्याची
"उद्यापासून तू नोकरी करणार नाहीस." निषाद तणतण करत होता.

"का?" मधुलला मात्र तो असं का म्हणतोय हे कळत नव्हतं.

"एकदा सांगितलं ना? नाही म्हणजे नाही."

"झालंय तरी काय?" आता मधुलचा आवाजही चढला.

"खरंतर नवरा -बायकोने एकाच ऑफिसमध्ये काम करू नये." तिच्या सासुबाई, चित्रा ताई मध्येच म्हणाल्या.
त्यांच्याकडे दुर्लक्ष करत मधुल निषाद पाठोपाठ आपल्या खोलीत आली.
"इतकं चिडायला काय झालं निषाद?"

"सगळं माहिती असून काहीही माहित नसल्याचा आव तुला बरोबर आणता येतो. ऑफिसमध्ये तुझ्या प्रमोशनची चर्चा गेले अनेक दिवस सुरू आहे. ती तुझ्या कानावर आली नाही?"

"नाही तर!" मधुल आश्चर्याने म्हणाली.

"वा! असं कसं होऊ शकतं? माझा यावर विश्वास बसत नाही. एकतर मी तुला सीनियर आहे. मीही झपाटून, मन लावून काम करतो. मेहनत करतो आणि प्रमोशन मात्र तुला? तेही ज्युनियर असून!"

"अरे, मला यातलं काहीही माहिती नाही आणि मला नको आहे ते प्रमोशन. कारण पगार जरी वाढला तरी कामाचा पसाराही तितकाच वाढेल." मधुल कपड्यांच्या घड्या घालत म्हणाली.
"मग त्यात एवढा चिडण्यासारखं आहे तरी काय? बायकोला प्रमोशन मिळणार म्हणून नवरा नाराज होतो का? अन् नुसती मेहनत, कष्ट करण्याऐवजी माणसांनं स्मार्ट वर्क करावं." मधुल सहज म्हणाली आणि निषादचा पारा आणखीनच चढला.

"म्हणजे तुला म्हणायचंय काय? मी नुसती गाढवी मेहनत करतो, माझी बुद्धी कामात वापरत नाही? अगं, तू ज्युनियर आहेस माझी. मला काय अक्कल शिकवतेस?" निषाद.

"निषाद, काहीही बोलू नकोस. मी तुझ्याकडून खूप काही शिकले आहे. प्रमोशनची चर्चा आणि प्रमोशन मिळणं यात टोकाचं अंतर असतं. मला आत्ता मिळालंय का प्रमोशन? नाही ना? मग कशाला एवढी चिडचिड? आणि प्रमोशन मिळाल तर तू खुश व्हायला हवंस."

"जा..मी का खुश होऊ? तिकडे ऑफिसमध्ये माझे सहकारी माझ्यावर हसतात. ते म्हणतात, तुझी बायको तुझ्यापेक्षाही स्मार्ट वर्कर आहे."

"याचा राग आलाय तर तुला. ते असं म्हणत असतील तर सांग त्यांना, होय माझी बायको आहे स्मार्ट वर्कर.
मी तुझ्या बुद्धीने काम करत नाही निषाद. माझी स्वतःची काही मत आहेत, तत्व आहेत. त्यानुसार मी काम करते. हे बघूनच तू माझ्याशी लग्न केलंस ना?" बोलता बोलता मधुलच्या डोळ्यात पाणी आलं.

"ती चूक झाली माझी. मला काय माहित, माझी बायको एक दिवस माझ्याही पुढे निघून जाईल! माझ्यापेक्षा जास्त पैसे कमवेल आणि जास्त रिस्पेक्टही.." निषाद रागाने बाहेर बैठकीच्या खोलीत येऊन बसला.

"तरी मी सांगत होते, या पोरीशी लग्न करू नकोस म्हणून. पण नाही..तुझ्या हट्टापुढे मी तरी काय बोलणार? आता भोगा कर्माची फळं." मधुलच्या सासुबाईंनी आगीत तेल ओतलं.

"बायको आपल्या पुढे जाते हे बघवत नाही काय? अरे, कसला नवरा आहेस तू? पाठिंबा द्यायचा सोडून तिला नोकरी सोडायला लावतोस? ती तुझी प्रतिस्पर्धी नाहीय तर लाईफ पार्टनर आहे रे." बाबा आतल्या खोलीतून ओरडले. तसा त्यांचा खोकला वाढला.

"बाबा, तुम्ही त्रास करून घेऊ नका. झोपा बघू." मधुल पळत त्यांच्या खोलीत आली.

"तू त्याचं काही एक ऐकू नकोस. नोकरी सोडू नको अजिबात. नवऱ्याच्या बोलण्याकडे सरळ दुर्लक्ष कर आणि प्रमोशन मिळालं तर त्याचा स्वीकार कर." बाबा म्हणाले.

क्रमशः



🎭 Series Post

View all