किंमत -त्याच्या निर्णयाची भाग 2

गोष्ट तिची अन् त्याची

हे सारं दरवाजातून पाहणाऱ्या मधुलच्या सासुबाई तिच्या पाठोपाठ बाहेर आल्या.
"मी काय म्हणते, कशाला हवी ती नोकरी? आता बाळाचा विचार करा. तशीही तीन वर्ष होऊन गेली लग्नाला."

"ते कसं? आम्हाला नवऱ्याच्या पुढं जायचं आहे. त्याच्यापेक्षा भरपूर पैसा कमवायचा आहे. साऱ्या सहकाऱ्यांतून वाहवा यांनाच मिळायला हवी ना! एक दिवस मॅनेजरची पोस्टही मिळेल यांना.
मग सगळे सहकारी हाताखाली काम करतील नि या त्यांच्याकडून काम करवून घेतील." निषाद अजूनही रागातच होता.

"बस् निषाद. काय बोलतोस, तुझं तुला तरी कळतंय का? इतका राग कशासाठी? बायको
आपल्यापेक्षा पुढे जाते म्हणून? तिला मान, आदर मिळेल, जास्त पगार मिळेल आणि लोक तुला नावं ठेवतील याची भीती वाटते की काय?"

"उद्या लोकं म्हणतील निषाद बायकोच्या हाताखाली काम करतो म्हणून. मला ते मुळीच चालणार नाही."

"मग हे ऑफिसमध्ये जाऊन सांगायचं. इथं माझा रागराग करून काय उपयोग?" मधुलच्या डोळ्यातून एकसारखं पाणी वाहत होतं.

"काय सांगू, मी माझ्या बायकोच्या हाताखाली काम करणार नाही असं? अगं, तिथं सगळे वेड्यात काढतील मला. त्यापेक्षा प्रमोशनसाठी तुझी वर्णी लागण्याआधी नोकरी सोडून दे. मग प्रश्नच मिटला." निषाद जरा खालच्या आवाजात म्हणाला.

"मी नोकरी सोडणार नाही आणि आता प्रमोशनही नाकारणार नाही. माझ्या मेहनतीचं फळ मला मिळत असेल तर ते मी का नाकारू? हा माझा ठाम निर्णय आहे आणि मला प्रमोशन मिळत असेल तर याचा अर्थ असा नाही की तू कुठेतरी कमी पडतो आहेस. ते एक ना एक दिवस तुलाही मिळेल. शांत डोक्याने विचार करून बघ." इतकं बोलून मधुल आपल्या खोलीत गेली.

'ही पोरगी एक दिवस वरचढ ठरणार हे मी निषादला सांगत होते. पण तिच्या हा प्रेमात पार वेडा झाला होता. आता तिचा राग करून काय उपयोग? पण काहीही असो. पोर मोठी हुशार आहे.' सासुबाई मनात म्हणाल्या.

आपल्या मुलाचा अहम् दुखावला गेला आहे हे आईला कळत होतं. पण सुनेने आपल्या मुलाला मागे टाकावं याचा राग त्यांना आला होता. सुनेला मुलापेक्षा जास्त पगार आहे असं कुठल्या तोंडाननं लोकांना सांगायचं? लोक आपल्यावर हसतील, माघारी बोलतील अशी चित्रा ताईंना भीती वाटू लागली.

क्रमशः

🎭 Series Post

View all