किंमत -त्याच्या निर्णयाची भाग 3 अंतिम

गोष्ट तिची अन् त्याची
बरेच दिवस विचार करून निषादने स्वतः नोकरी सोडायचा निर्णय घेतला. हा निर्णय टोकाचा आहे हे त्यालाही कळत होतं. पण पुढे जाऊन आपल्या सहकाऱ्यांना काय उत्तर द्यायचं याचा विचार करून त्याचं डोकं सुन्न झालं होतं.
इतकं शिकून, मेहेनत करून बायको आपल्या पुढे जाते ही कल्पना त्याला सहन होणारी नव्हती.
पुरुषप्रधान संस्कृतीची विचारसरणी तशी असल्याने बायकोने दोन पावलं नवऱ्याच्या पाठीमागे राहावं अशी अपेक्षा असणाऱ्या निषादला मधुलचा राग आला होता.

या नोकरीत जम बसला असला तरी यापेक्षा अधिक चांगली नोकरी मिळेल या विश्वासाने, विचार करून कोणाला काही न सांगता त्याने स्वतः चा राजीनामा ऑफिसमध्ये देऊ केला.

आता ऑफिसमध्ये याची दबक्या आवाज चर्चा सुरू झाली. ही गोष्ट मधुलच्या कानावर आली नसली तर नवलच होतं. मधुलने निषादशी बोलायचं खूप प्रयत्न केला. त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याने तिच्याशी बोलणं टाकलं होतं.

बॉसने निषादला बोलावून घेऊन राजीनाम्याचं कारण विचारलं, हा निर्णय पक्का आहे का हेही विचारलं. निषाद मात्र आपल्या निर्णयावर ठाम होता. त्याचे जवळचे सहकारीही त्याच्या या तडका फडकी घेतलेल्या निर्णयावर नाराज होते.

काही दिवसांनी त्याचा राजीनामा मंजूर झाला. जाता जाता बॉस एवढंच म्हणाले, "तू राजीनामा द्यायला नको होतास. कारण ऑफिसचा एक चांगला एम्प्लॉयी होतास तू. या राजीनामाच्या मागं काही वैयक्तिक कारणही असू शकतं म्हणून तो स्वीकारला. वैयक्तिक कारण की मधुलशी स्पर्धा? अर्थात सगळ्या पुरुषांची मानसिकता अशी नसते निषाद." सर हसत म्हणाले.
"आणि मधुल बरोबर तुझाही प्रमोशनसाठी विचार सुरू होता. पण तू असं करायला नको होतंस."

हे ऐकून निषादला आपल्या निर्णयाचा पश्चात्ताप झाला. पुढे अशी चांगली नोकरी मिळेल की नाही याची त्याला शंका वाटू लागली. स्वतःच्या आततायी विचारांची त्याला लाज वाटायला लागली. आपण हे काय करून बसलो? हा प्रश्न त्याला छळायला लागला.

खिन्न मनाने त्याने आपला पराभव स्वीकारला. बायकोबद्दल आपल्या मनात इतकी असुरक्षिततेची भावना का निर्माण झाली? याचं उत्तर त्याला मिळत नव्हतं. आयुष्यात प्रथमच स्वतःकडूनच तो हरला होता. मात्र घडून गेलेल्या गोष्टीवर पश्चाताप करण्या व्यतिरिक्त त्याच्या हातात काही उरलं नव्हतं. त्याच्या या निर्णयाची मोठी किंमत त्याला चुकवावी लागणार होती. हे मात्र खरं होतं.

समाप्त
सायली कुलकर्णी - जोशी.

🎭 Series Post

View all