Login

किनार

आयुष्याच्या सुख -दुःखाची किनार
"इस्स..कसली चाळ आहे ही! इथं कसं काय राहत होता तुम्ही? त्यापेक्षा आत्ताचा चार खोल्यांचा ब्लॉक बरा." आकाश पाठोपाठ मेघना चाळीत येत म्हणाली.

"मग काय झालं? आता जुनी झाली चाळ. पण इमारत घट्ट आहे हं. इथं राहण्याची मजाच काही और होती." आकाश एका मागोमाग एक जिने चढत होता.

"अजून किती पायऱ्या चढायच्या? आपल्या इथे लिफ्ट असल्याने पायऱ्या चढून जायची सवय नाहीय ना." मेघना आजूबाजूचे निरीक्षण करत, एक एक पायरी जपून येत म्हणाली. चाळीच्या मधोमध जिना होता. दोन्ही बाजूला पाच ते सहा अशी घरं होती. घरं कुठली! बंगल्यात राहणाऱ्या मेघनाला ती खुराड्यासारखी वाटायला लागली. त्यापुढे सामायिक व्हरांडा होता. तिथेही प्रत्येक बिऱ्हाडाचं काही ना काही सामान ठेवलेलं होतं. पण सारं नीटनेटकं लावून घेतलं होतं. तरीही तिला ते वातावरण रूचेना.

"हे बघ, आमचं..सॉरी आपलं घर. आकाश कुलूप उघडून आत आला. मागोमाग कसानुसा चेहरा करत मेघना आत आली. मात्र आत येताच तिचा मूड पार बदलला. बैठकीची खोली तशी लहान होती. पण स्वच्छ आणि नीटनेटकी होती. आत भरपूर उजेड होता. एका कोपऱ्यात छोट्याशा टेबलावर जुन्या मॉडेलचा टीव्ही अन् भिंतीवर दोन - तीन जुने फोटो टांगले होते.

"आकाश, हा तुझा फोटो आहे?" ती डोळे मोठे करून त्या फोटोकडे पाहत होती.

"तू कसं काय ओळखलंस?"

"अगदी आहेस तसाच आहेस." मेघना काहीशी लाजून म्हणाली.

"हम्म. हा टिव्ही अजून सुरू आहे बरं का. दोन - तीन थपडा मारल्या की दिवसभर चित्र नीट दिसत राहतं." आकाश हसत म्हणाला.
तशी मेघनाही हसली. तिने फिरून सगळं घर डोळ्यांखालून घातलं. स्वयंपाक घरात मोजकीच भांडी होती. ती नीट रचून ठेवली होती. तिथून बाहेर आल्यावर बैठकीच्या खोलीपुढे झोपायची खोली होती. चाळीच्या मानाने ती थोडी मोठी होती. ती खोलीही मेघनाला आवडली.
"कित्ती छान ठेवलं आहे सगळं!"

"हो. आईला साफ सफाईची फार आवड होती. म्हणजे अजूनही आहे. पण वयाच्या मानाने आता तिला फारसं काम होत नाही."

"अरे आकाश, केव्हा आलास?" इतक्यात बडवे काकू आत डोकावल्या. "आणि ही कोण?"

"काकू, हे काय आत्ताच येतो आहे आणि ही माझी होणारी बायको मेघना. आज सुट्टी होती. म्हंटल, हिला जुन्या आठवणी प्रत्यक्ष दाखवून येऊ म्हणून आलो. तसंही बरेच दिवस इथे येणं झालंच नाही." आकाश काकूंच्या पाया पडत म्हणाला. हे पाहून मेघनानेही त्याचं अनुकरण केलं.

"छान आहे रे तुझी बायको. अगदी तुला शोभून दिसते." काकू मेघनाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाल्या.

"बरं, आलात तसे जेवून जा. मी लगेच स्वयंपाक करते."

"नको काकू. परत येऊ केव्हातरी. उगीच तुम्हाला त्रास." आता त्यांच्या घरात कशाला जायचं? कधी एकदा इथून बाहेर पडतो असे झाले होते तिला म्हणून मेघना वरकरणी हसत म्हणाली.

"नको नाही अन् काही नाही. तुझा नवरा लहानपणी रोज आमच्याकडे जेवायला असायचा. एकवेळ तो तुझ्या सासूच्या हातची चव विसरेल. पण माझ्या हातची चव काही विसरायचा नाही. ते काही नाही. दोघे या लगेच." काकू निघून गेल्या. आकाश आणि मेघना नुसती कडी लावून बाहेर पडले.
"अरे, कुलूप लाव ना. कोणी पण आत शिरेल."

"इथं तसलं काही नसतं आणि शिरलंच तर चोरून न्यायला आहे तरी काय?"
दोघे खाली आले.

"इथे आमचा गणपती बसायचा. या चाळीत मी सगळ्यात लहान होतो. पण गणपतीच्या सजावटीला, पूजेच्या प्रसाद वाटपाला माझा झेंडा नेहमी पुढं असायचा. क्रिकेट खेळताना हरलो की जाम चिडायचो मी. मग बडवे काकू समजूत घालून मला जेवायला न्यायच्या. आई त्यांना म्हणायची अशाने शेफारेल तो. हरल्यावर कसं वाटतं हे कळू दे त्याला. पण काकू आईचं ऐकायच्या नाहीत."
आकाश लहानपणीच्या आठवणी बराच वेळ सांगत राहिला. चाळीतली अनेक बिऱ्हाडं दुसरीकडे राहायला गेली होती. जी राहत होती ती आकाशला पाहून प्रेमाने चौकशी करत होती.

"माझ्याकडे अशा फारशा आठवणी नाहीत. कारण माझे बाबा स्वभावाने खूप कडक होते. त्यामुळे मी आणि ताई घरातच काय ते खेळ खेळायचो. पण तुझ्या आठवणी ऐकून खूप गंमत वाटली. अशा मोकळ्या जगात खेळताना, वावरताना कित्ती भारी वाटत असेल ना? या आठवणी म्हणजे आपल्या आयुष्याची शिदोरी असते. हो ना?" मेघना चाळ न्याहाळत म्हणाली.

"आकाश, येताय ना?" काकूंची हाक आली अन् दोघे पुन्हा वर आले. जेवणाची तयारी झाली होती.
दोन पाट मांडून त्यावर पानं मांडली होती. बाजूला मंद सुवासाची उदबत्ती लावली होती. पानात
वरण भात, लिंबू, चटणी, कोशिंबीर, मटकीची उसळ, शेवयाची खीर अन् पोळी. असा साग्रसंगीत बेत होता. हे पाहून मेघनाला भूक लागल्याची जाणीव झाली.

"काकू, इतकं सगळं कशाला करत बसलात? उगीच तुम्हाला त्रास. "

"अगं, बाई आहे मदतीला. मला एकटीला सगळं करावं लागलं नाही काही आणि हे तुमचं केळवण आहे असं समजा. लग्न झाल्यावर तुम्हा चौघांना परत बोलणार आहे. चला, सावकाश जेवून घ्या. " काकू आग्रह करून दोघांना वाढत होत्या.

मेघनाला सगळा स्वयंपाक आवडला.
'घरी आईने असा स्वयंपाक केल्याचं मला अजिबात आठवत नाहीय. जे बनायचं ते बाबांच्या आवडीचं असायचं. त्यात ते सगळे विदेशी पदार्थ! तेच खाऊन सवय झालेली. मग असा पारंपारिक स्वयंपाक कसा आवडणार?' मेघनाने आपल्या विचारात जेवण संपवलं. 'आता सासुकडून असा स्वयंपाक शिकून घ्यायचा असं मनोमन तिने ठरवून टाकलं.

बडवे काकूंचं घरही छान होतं. त्यांनाही स्वच्छ तेची आवड असलेली दिसत होती.
"काकू, खाली अजूनही गणपती बसवता का?" आकाश हात धुवून येत म्हणाला.

"मग काय! पुढचा महिना सरत आला की तयारी सुरू होईल बघ. बाहेर गेलेली सगळी पोरं गणपतीला न चुकता येतात. दरवेळी तुझी आठवण निघते. आता या वर्षी तुम्ही दोघंही या म्हणजे झालं."
काकूंनी मेघनाला छानशी साडी दिली. "आवडते का बघ, नव्या फॅशनची आहे आणि तुझ्या सासुला सांग, मी आठवण काढली होती म्हणून."
त्यांनी आकाशलाही पाकीट दिलं.

"हे कशाला? पोटभर जेवलो की आम्ही." आकाश.

"लहानपणी शाळेत जाताना अविसोबत तुलाही दोन रुपये देत होते काका. विसरलास वाटतं?" काकू खोटं खोटं रागवत म्हणाल्या.
तसे सगळे हसायला लागले.

'आजवर असं प्रेम माझ्या वाट्याला का आलं नाही? आई सतत बाबांच्या धाकात असायची. नेहमी उदास, गप्प गप्प असायची ती. आजी -आजोबा दूर राहायचे आणि कधी शेजाऱ्यांच्या प्रश्नच आला नाही. कारण कोणी घरी आलेलं बाबांना आवडायचं नाही. त्यामुळे मित्र -मैत्रिणीही नाहीत.'

"कसला विचार करतेस? आकाश सोबत अधून -मधून हक्काने येत जा." काकूंचा निरोप घेऊन दोघे बाहेर पडले. न विसरता आकाशने आपल्या घराला कुलूप लावलं. तशी मेघना मनापासून हसली.

गाडी बरीच पुढे आली तरी मेघना शांत होती.
"आवडली चाळ?" आकाश तिच्या शांततेचा भंग करत म्हणाला. "तुला हे सगळं आवडलेलं नाही हे कळतंय मला. पण काळजी करू नको. आपलं लग्न झालं की आई - बाबा इथे राहायला येतील. मुलांचा संसार स्वतंत्र व्हावा, त्यात आपली लुडबुड नसावी असं आईचं मत आहे."

"का? मला तुझ्या आई -बाबांसोबत राहायचं आहे आकाश. सासू -सून, हे नातं कसं असतं हे अनुभवायचं आहे. आईंकडून खूप काही शिकायचं आहे. सासर -माहेर यातला फरक समजून घ्यायचा आहे. शेजाऱ्यांचा सहवास, प्रेम अनुभवायचं आहे. मला नको स्वतंत्र संसार आणि इथे यायला आता मलाही आवडेल. विकेंडला आपण सगळेच येत जाऊ.
माझं लहानपण शिस्तीत गेलं. असं मोकळं, निवांत आयुष्य जगायचं राहून गेलंय. ते या निमित्ताने जगायला मिळेल मला." मेघना.

"बघ, आत्ताच विचार कर. नंतर तुला पश्चाताप झाला नाही म्हणजे मिळवलं." आकाश उसनं हसत म्हणाला.

"नाही होणार. माझा स्वतःवर तेवढा विश्वास आहे."

मेघनाने गाडीच्या काचा उघडल्या आणि ती स्वस्थ बसली. काहीतरी आठवलं म्हणून मगाशी बडवे काकूंनी दिलेली साडी तिने उघडून पाहिली. गुलाबी रंग त्यावर नाजूक विणकाम केलं होतं. तसेच नाजूक काठ होते साडीला. तिला साडी खूप आवडली.

मेघनाला वाटलं, आता नव्या आयुष्याची सुरुवात अशीच व्हायला हवी. हे नाजूक विणकाम म्हणजे नात्यात विणलं जाणारं प्रेम आहे आणि हा काठ म्हणजे आधार अन् नात्याचा पाया. या काठामुळे साडीला शोभा येते. एकमेकांत गुंफलेले धागे जोडत एकमेकांना आधार द्यायचा अन् घ्यायचा सुद्धा. तशीच आपल्या आयुष्यालाही एक किनार असते, सुख -दुःखाची! यामुळे आपल्या आयुष्याला वळण मिळालेलं असतं.

तिच्याकडे पाहून आकाश थोडा रिलॅक्स झाला. त्याच्या मनातलं ओझं जणू कमी झालं होतं. गाडीतल्या रेडिओवर जुन्या काळातली गाणी लागली होती. मेघनाने त्याचा आवाज वाढवला. आता पुढच्या तासाभराचा प्रवास सुखकारक होणार होता. कारण दोघांनीही एकमेकांच्या मनावर असलेलं दडपण, ओझं ओळखून ते कमी करण्याचा प्रयत्न केला होता, अगदी नकळत!


समाप्त
©️®️सायली जोशी.