Login

कीर्तनाचे रंगी

नवरात्रीचे समाज प्रबोधन कीर्तन
जय देवी, जय महाकाली!


आज आपण नवरात्रीच्या पावन दिनी एकवटलेलो आहोत. या दिवशी आदिशक्तीची आराधना करणे हे आपल्या भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. देवीच्या अनेक रूपांपैकी महाकाली हा सर्वात भयंकर, तरीही सर्वात करुणामयी असा अवतार आहे.

मित्रांनो, महाकाली ही केवळ अंधाराचा नाश करणारी नव्हे, तर अज्ञान, अहंकार, लोभ, अन्याय आणि असत्य यांचा नाश करणारी आदिशक्ती आहे. तिच्या हातात तलवार आहे, खड्ग आहे, त्रिशूल आहे, पण तिच्या हृदयात माया आहे, करुणा आहे. म्हणूनच आपण तिचे केवळ भयाने नव्हे तर भक्तिभावाने देखील स्मरण करतो.

आजच्या समाजाला विचार करायला लावणारा प्रश्न असा आहे, कि आपल्या जीवनातली खरी "महाकाली" कोण आहे?

ती बाहेर कुठेतरी आहे का? नाही! ती आपल्या प्रत्येकाच्या अंत:करणात आहे. जेव्हा एखादा माणूस आपल्या घरातल्या मुलीला, बहिणीला, आईला सन्मान देतो, तेंव्हा तो महाकालीचीच आराधना करतो. जेव्हा कुणी गरीब, दुर्बल, शोषित यांचा अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो, तेंव्हा त्याच्यातील महाकाली जागृत होते.

पण आजचे वास्तव बघा, समाजात अजूनही अंधश्रद्धा, हुंडा, स्त्रीभ्रूणहत्या, दारू, व्यसनाधीनता या राक्षसांनी डोके वर काढले आहे. मित्रांनो, देवीच्या मूर्तीसमोर नारळ फोडण्यापेक्षा, या सामाजिक राक्षसांचा नाश करणे हेच खरे महाकालीचे पूजन आहे.

महाकालीने राक्षसांचा नाश केला, हे आपण पुराणात वाचतो. पण आपल्यालाही तिचे अनुकरण करून समाजातील या दृष्ट राक्षसांशी लढायचे आहे.

मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिले, तर ती महाकालीची सेवा असेल.
दारूबंदीला हातभार लावला, तर ती महाकालीची कृपा असेल.
कुणाच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आधार दिला, तर ती देखील महाकालीचीच कृती असणार आहे.

आज हे कीर्तन फक्त गाणे किंवा वेळ जाण्याचे साधन म्हणून पाहू नका, हे सर्वात मोठे समाजाला जागे करण्याचे साधन आहे. आपण देवीसमोर फुले , हार अर्पण करतो, पण खरे तीला काय अर्पण करण्याची गरज आहे माहित आहे का? तर आपल्या वाईट सवयींचा त्याग करणे. राग, मत्सर, लोभ, अहंकार, व्यसन हेच आपण महाकालीच्या चरणी अर्पण करू या.

देवीकडून केवळ भौतिक सुखाची प्रार्थना करून गप्प बसू नका. तिच्या कृपेने आपल्यात धैर्य, संयम, नि:स्वार्थ भाव, समाजासाठी जगण्याची उमेद निर्माण होऊ दे, हीच खरी प्रार्थना.

चला, या अष्टमीच्या पवित्र दिवशी एक वचन घेऊया. स्त्रीला सन्मान देऊ, अंधश्रद्धा तोडू, व्यसने सोडू, समाजात सत्य, प्रेम आणि न्याय यांचा दीप लावू.

महाकालीच्या जयघोषानेच आपण या कीर्तनाचा समारोप करू.

ओम ह्रीं श्रीम क्लीम आद्य कालिका परम ईश्वरी स्वाहा

जय देवी महाकाली!