कोडे सुटेना (भाग एक)

Mystery Of An Accident

कोडे सुटेना? (भाग एक)

©® स्वाती बाळूरकर देशपांडे,सखी

" हॅलो रोहन बक्षी बोलताय का ?" जरबदार आवाज तिकडून.

ऑफिसात अननोन नंबर ने आलेला फोन रोहनने उचलला होता.

"हो बोला . . बोलतोय. आपण कोण?"

"मी इन्स्पेक्टर साळुंखे!"

" इन्स्पेक्टr? बोला, काय झालं ?" तो घाबरला होता.

"निलांबरी नावाच्या कुणा महिलेला ओळखता का ?"

"हो. . हो म्हणजे माझी पत्नी आहे , नीलांबरी. . . ती ? काय झालं सांगाल का?"

"रोहन साहेब , तुम्हाला हाय वे पोलीस स्टेशनला यावं लागेल."

" पोलीस स्टेशन ?आता? काय झालं ?"

"हो आता या , नाही तर मग एक काम करा लगेच घटना स्थळी या."

"पण इन्स्पेक्टर, काय झालं ते तर सांगा?" आता मात्र रोहन रडकुंडीला आला. कधीच पोलीस आणि कोर्ट या भानगडी माहित नसलेला रोहन.

" तुम्ही एक काम करा ,घटनास्थळी या .बंगलोर हायवे वरती .मी लोकेशन टाकतोय . तर तिथे एक्सीडेंट झालाय."

" बापरे मग त्यात नीलांबरी चं नाव का आलं ?"

"मिस्टर बक्षी तुम्ही इकडे येणार की फोनवरच चौकशी करणार? एक अपघात झालाय इथे , आणि घटनास्थळी असलेल्या महिलेकडे नीलंबरी रोहन या नावाची ओळखपत्र आहेत."

" काय एक्सीडेंट? मी आलोच. म्हणजे नीलंबरी सुखरूप आहे ना ?"

"तुम्ही या तरी सगळं कळेल."

हळुवार बोलणारा रोहन, जरबदार आवाज ऐकून त्याची बोबडी वळली होती.

आता मनामध्ये शंका कुशंकांनी थैमान घातले होते.

ऑफिसमध्ये बॉस ला माहिती देऊन तो पटकन आपली गाडी घेऊन निघाला .

घटनास्थळी पोहोचला. आताच आर्ध्या तासापूर्वी ॲक्सिडेंट झालेला होता.
इन्स्पेक्टर साळुंखे समोर च त्यांच्या गाडी जवळ उभे होते.


"या मिस्टर रोहन, हे पहा त्या कारचा एक्सीडेंट झालेला आहे समोरून ट्रक ने धडक दिलीय बहुतेक , तर महिलेचा चेहरा ओळखू येत नाहीय ."

हे ऐकताच त्याचे हात पाय कापायला लागले .

"शरीराला थोडी दुखापत झालीय पण चेहराच . . "

"ती कशी आहे सर?"

"आता. . .खंबीर व्हा मि . रोहन सॉरी पण "

त्यांनी टोपी काखेत घेतली आणि मान झूकवली . समोर बोट दाखवले.

रोडच्या एका बाजूला , पांढरी चादर पांघरलेली होती. हवालदारानी सांगितलं की "अपघात ग्रस्त महिलेला तिथे झोपवलेलं आहे आणि तुम्हाला ओळख पटवायला बोलावलं आहे. "


हवालदार माने सोबत रोहन पुढे निघाला,

देवाकडे प्रार्थना करत होता की ती स्त्री नीलू नसावी.

"साहेब , सोबतचा पुरुष आहे त्याचा चेहरा व्यवस्थित आहे पण त्याच्या डोक्याला जबर मार लागलाय ,आम्ही ॲम्बुलन्स बोलावली आहे, त्याला दवाखान्यात पोहोचण्याची व्यवस्था करतो आहोत." माने नी हे सांगताच त्याला अजूनच धक्का बसला .

रोहन तिथे पोहोचला पण हात पाय लटपट कापत होते.

त्या महिलेच्या चेहऱ्यावरून जेव्हा चादर काढली तेव्हा चेहरा ओळखण्याजोग राहिला नव्हता. सगळ्या काचा घुसल्या होत्या आणि रक्त बंबाळ होता. . तो जोरात ओरडला.

पण ती स्त्री तिच्या अंगकाठी वरून अगदी निलांबरी सारखीच होती.
घटनास्थळी सापडलेली पर्स निलूचे होती, तिची आवडीची हॅन्ड बॅग तिथे होती, त्यात सगळी ओरिजनल कागदपत्रे अगदी चेकबुक, बँकेचे पासबुक सुद्धा तिथे होतं. तिचा फोनही तिथे होता पण तो बंद होता.

"पटली का ओळख मिस्टर रोहन ?" साळुंके जवळ आले.

"पण इन्स्पेक्टर हा ड्रेस नीलूचा नाही." तो स्वतः ल नकरत होता.

"अहो, ड्रेसचं काय घेऊन बसलात ? तुम्हाला माहीत नसणारा एखाद्या ड्रेस पण नसेल का बायकोकडे ? घेतला असेल नवीन आणि एक सांगतो पुरुषांची स्मरणशक्ती खूप कमकुवत असते, बायकांची दांडगी असते. बायका सगळ्या साड्या पण कोणी दिली, कधी दिली, किती वर्षांपूर्वीची, किती रुपयाला घेतली होती हे त्यांच्या लक्षात राह तं ना. . . आपल्या राहतं का?"
हवालदार मानेचं हे बोलणं ऐकून साळुंखेच्या चेहऱ्यावरती हसू आलं पण त्यांनी प्रसंगाचे गांभीर्य पाहून नियंत्रण ठेवलं.

" माने प्रसंग काय आहे आणि काय वायफळ बडबड लागलीय ? बर यां साहेबांसोबत थांबा आणि ओळख पटवा , सही घ्या. तोपर्यंत मी ह्या माणसाला हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करतो. ॲम्बुलन्स येईलच आता."

"हा माणूस पण त्याच गाडीत होता?" रोहन ने आश्चर्याने विचारलं.

" बर हा सोबतचा इसम कोण ?" मानेनी विचारलं,

एकतर रोहनच्या डोक्यात हा प्रकाश पडेना की सकाळी घरी व्यवस्थित किचनमध्ये व्यस्त असलेली नीलू, दुपारी तीन वाजता येथे बंगलोर हायवे वरती कशी आली ? आणि कशाला आली ? हा सोबतचा काळा सावळा दांडगा पण तरुण अनोळखी माणूस ? हा कोण ?

हवालदार मानेणी विचारलं , पण उत्तर नव्हतं.

"साहेब मला माहित नाही." तो वैतागला.

" अहो साहेब नीट पहा, तुमचा मित्र, त्यांचा मित्र ,तुमचे नातेवाईक, त्यांचे नातेवाईक, दोघांपैकी ऑफिसातला कलिग , कोणी नातेवाईक, शेजारी ? कुनीतरी असेलच ना. नाहीतर मॅडम त्याच्यासोबत कशा असतील?"

" काय मूर्खपणा आहे? माझ्या आणि तिच्या सर्व नातेवाईकांना मी ओळखतो . तिचे सगळे भाऊ ,मावस चुलत, मामे, आत्ते सगळे अगदी मानलेले सुद्धा मला माहित आहेत. शाळे आणि कॉलेजचे मित्रानाही मी ओळखतो ,त्यांच्या गट-टुगेदरला गेलेलो आहे मी , शेजारी तर कुणीच नाही. नाही सर, मी ह्या माणसाला ओळखत नाही. तो ड्रायव्हर वगैरे ?"

आता साळुंखे जवळ आल्याने म्हणाले " रोहन सर, आम्हालाही असंच वाटलं पण सर ही टॅक्सी नाही , वैयक्तिक कार आहे आणि गाडीतले कागदपत्र आणि या माणसाचा मेळ लागत नाहीय . कळेल. आरटीओ ला कॉल गेलाय. महत्त्वाचं म्हणजे एक्सीडेंट झाला त्यावेळी मॅडम ड्रायव्हिंग सीट वरती होत्या, त्यामुळे एक्सीडेंट कसा झाला कळायला मार्ग नाही ."

रोहन खरंच संभ्रमित झाला होता.

नीलू ला कितीदा म्हणाला होता की' तू ड्रायव्हिंग शिक, घरात गाडी आहे पण ती नाही म्हणायची. शिकायची कशाला तू आहेस ना!' ती विषय टाळायची.

" सर जर ड्रायव्हिंग सीट वर ही महिला असेल तर ती माझी बायको असू शकत नाही. . . कारण तिला कार चालवता येत नाही. लायसन्स पण नाहीय तिच्याकडे ."

"ओके. मग ह्या इकडे कुठे गाडी शिकण्यासाठी आल्या होत्या का ?" माने हळूच म्हणाले.

"पण हा काय जीव घेणा प्रकार आहे? म्हणतोय ना की ती नीलू नाही वाटत . . . मला कल्पना न देता ती कुणा अनोळखी माणसाबरोबर कार कशी शिकेल?" रोहन तिच्या आठवणीने रडायलाच लागला.

"हे पहा सर मी तुमची अवस्था समजू शकतो , पण आम्हाला कोपरेट करा म्हणजे तपासला दिशा मिळेल. बघा ना एकदा ,ओळख पटली का?" असे विचारल्यावर तो पुन्हा एकदा प्रयत्नपूर्वक बॉडीच्या जवळ गेला , चेहऱ्याकडे तर बघवलं जात नव्हतं . गळ्याकडे लक्ष गेलं गळ्यात मंगळसूत्र तर निलूचच होतं . बुद्धी एक सांगत होती आणि मन एक म्हणत होतं .

उपलब्ध असलेल्या पुराव्यां नुसार ती निलूच असायला पाहिजे होती पण त्याचं मन मानायला तयार नव्हतं.

तो त्या प्रेताच्या बाजूला बसला आणि तिचा उजवा हात हातात घेतला. पण हात खूप वेगळा वाटला.

लग्न होऊन सहा वर्षे झाली होती, इतक्या वर्षात पती-पत्नीला त्यांच्या शरीराचे भाग तर ओळखीचे होतातच ना . . . तसेच तो म्हणाला. . ." सर हात तर नीलुचा वाटत नाही."


इन्स्पेक्टर साळुंखे म्हणाले , "मिस्टर रोहन, जिवंत हात आणि मृत हात याच्या स्पर्शात खूप फरक असतो, त्या स्पर्शवरून तुमची ओळख पटणार आहे का?"

" तसं नाही इन्स्पेक्टर, हिला अंगठ्यांची खूप आवड होती, उजव्या हातात तिच्या दोन तीन अंगठ्या असायच्या आणि आता एकही नाही."

" किती अंगठया असायच्या?"

तो पुन्हा विचारात पडला.

" दोन-तीन म्हणजे ? ती सतत बदलत असायची. . . . पण आमच्या लग्नाची एक अंगठी होती ती मात्र तिच्या हातात नेहमी असायचीच, तीही दिसत नाही."
त्यांनी दुसऱ्या हाता वरची चादर काढली, त्या बोटात तीन अंगठ्या होत्या.

पाय देखील तिच्यासारखे नाहीत असं वाटायला लागलं .

पण ?


क्रमशः

©® स्वाती बाळूरकर देशपांडे,सखी
दिनांक २८.०६.२४

🎭 Series Post

View all