कोडे सुटेना (भाग दोन)

Mystry Of An Accident
कोडे सुटेना?(भाग दोन )

©® स्वाती बाळूरकर देशपांडे,सखी


त्याने सांगितलं की 'दागिने वगैरे माझ्या पत्नीचे आहेत पण ही माझी पत्नी नाही .'

"असं नाही, म्हणून तुम्ही जाऊ शकत नाही रोहन, कारण या स्त्रीच्या हातात तुमच्या पत्नीच्या अंगठ्या आणि मंगळसुत्र आहे शिवाय सर्व कागदपत्रे तिच्याकडेच आहेत . बरं पत्नीचा एखादा फोटो दाखवता का लेटेस्ट ?"

त्याने फोन मधला दोघांचा आणि तिचा आता संक्रांतीला काढलेला फोटो दाखवला.

फोटो पाहून मग बॉडी, तर इन्स्पेक्टरंना वाटलं की तो खोटं बोलतोय. कारण तिची अंगकाठी सारखीच होती.

तिचा फोनही चालू नव्हता, काय करणार?

"एकदा घरी जाऊन चेक करा , तुमची बायको घरी असेल तर सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल. नाहीतर तुमची यातून इतक्या लवकर सुटका होणार नाही. '

आता त्याला नीलू ची काळजी वाटायला लागली आणि पटकन कुहुचा चेहरा समोर आला. त्याची तीन वर्षांची मुलगी.
त्याने शेजारच्या पठारे काकूंना फोन लावला. त्यांनीही फोन उचलला नाही .

मग त्याने पोलिसाची परमिशन घेवून गाडी काढली,

"एक मिनिट मिस्टर रोहन , तुमच्या बायकोचां काही अपघात विमा वगैरे आहे का?"

"हो सर आहे, पण. . "

"किती लाखांचा?"

"दहा लाखांची पॉलिसी सर . पण का?"

"सहजच, माहित असावं म्हणून. तुम्ही जाऊन या घरी मग बघू.

आता मात्र तो खरचं खूप घाबरुन निघाला.

"माने, एक लेडीज कॉन्स्टेबल सोबत घ्या आणि पाठलाग करा. हे काहीतरी वेगळच मॅटर आहे, मला तर याच्यावर शंका येतेय .धडधडीत माझी बायको नाही म्हणतोय!".

" पण सर त्याला पॉलिसी क्लेम करायची असती तर हीच माझी बायको आहे असे म्हणाला असता ना. . !"


"माने , पॉइंट बरोबर आहे तुमचा पण तुम्ही डोकं नका लावू . मी पाहतो ."

रोहन घरी आला तर घराला कुलूप होतं, शेजारच्या काकूंना विचारलं तर त्या म्हणाल्या ," अरे अर्जंट काम आहे असं सांगून दोन अडीच तासापूर्वी ती घाईघाईत गेली ."

"काकू तिच्या हातात काही पर्स वगैरे होती का ?"

"नाही बहुतेक म्हणजे मी पाहिलं नाही, कुहुला आणायला सांगून किल्ली देऊन ती गेली . अरे पण काय झालं ?"

त्याला बोलताच येईना .काकूंनी आत बोलावलं, ग्लासभर पाणी दिले आणि मग विचारलं ,"रोहन काय झालं ,सांग ना रे?"
आणि तो एकदम रडायलाच लागला.

"पोलिसांचा फोन आला ऑफिसात . . "त्याने सगळं सविस्तर सांगितलं.

"रोहन कुठे झाला एक्सीडेंट ? आणि कधी?"

"बेंगलोर हायवे ला , आता तासाभरापूर्वी आणि काकू. . "

काकू तर पटकन सोफ्यावर बसल्या. "नाही रे बाळा असं काही सांगू नकोस."

"काकू अजून एक ,तिने कुठल्या रंगाचा ड्रेस घातला होता?"

" निळा होता रे. . .बहुतेक !"
बॉडी च्या अंगावरील ड्रेस पण निळाच! आता मात्र त्याचे डोकं बधीर झालं!

म्हणजे ती खरंच नीलू आहे?

रोहन जेव्हा पठारे काकूंना घडलेला प्रसंग सांगत होता त्यावेळी हवालदार माने एका लेडीज कॉन्स्टेबल ला सोबत घेवून त्यांच्या घराच्या बाहेर येऊन थांबले होते .

ते पाळती वरती होते, इकडे काय हालचाली होतात ते साहेबांना कळवायला सोपं.

रोहन आणि काकूचा मोठमोठ्याने बोललेला आवाज बाहेर येत होता.
थोड्या वेळात कूहुं ला आणण्याची वेळ झाली म्हणून त्यांने काकूंना विनंती केली की "तिला घेऊन या, पण तिच्या आजीकडेच सोडा ."

नीलांबरीचे आई-बाबा जवळच्या सोसायटीमध्ये राहत होते. पूर्ण प्रकार कळेपर्यंत त्यांना हे सगळं सांगणे योग्य नाही असं त्याला वाटलं .

तो काकूंना म्हणाला की " निलांबरीला आज कामाने बाहेर जावं लागलं, यायला उशीर होणार आहे आणि म्हणून कुहू ला इथे सोडतोय असं सांगा. प्लीज. काही कळू देवू नका."

त्यांनी होकार दिला.
मग रोहनने किल्ली घेतली आणि स्वतःच्या घराचं दार उघडलं .
घरात पाय ठेवताच त्याला कळालं की घरामध्ये काहीतरी गडबड आहे. प्लास्टिकच्या खुर्च्या वेड्यावाकड्या पडल्या होत्या. सोफ्यावर सगळी कुशन्स अस्ताव्यस्त होते.

मग तो हळूच किचनमध्ये डोकावला. . पण किचन तर अगदीच व्यवस्थित आवरलं होतं, बहुतेक कामवाली मावशी येण्याच्या अगोदरच नीलू घराबाहेर पडली होती. सिंक मधे भांडी तशीच होती.

मग त्याने धडधडत्या काळजा ने आपला मोर्चा बेडरूम कडे वळवला आणि बेडरूम मधील अवस्था पाहून त्याची तर पाचावर धारण बसली.

बेडरूम मधल्या पलंगावर प्रचंड पसारा पडलेला होता, निलूचे कपडे इकडे तिकडे विखुरलेले होते, अलमाऱ्या उघड्या पडलेल्या होत्या आणि लॉकरचं दर सताड उघडं होतं.
घरामध्ये जिथे जिथे म्हणून महत्त्वाची कागदपत्र ठेवलेली असतात, ते सगळे ड्रॉवर, लॉकर ओपन होते.

नीलू च्या कपाटातला खालच्या कप्पा, जिथे ती नेहमी असू दे रे माझ्या पर्सनल गोष्टी आहेत, असं म्हणायची तो कप्पा सुद्धा पूर्णपणे उचकलेला होता आणि रिकामा होता. म्हणजे मुद्दाम उचकटून टाकलाय असं वाटत होतं.

रोहन दोन्ही हात डोक्याला लावून पलंगावर बसला .त्याला बसण्यासाठी जागा शिल्लक नव्हती इतक्या तिच्या साड्या ब्लाउज आणि ड्रेसेस सगळीकडे पडलेले होते.

घरात चोरी झाली की काय ? ती नीलू च्या माघारी व्हायला हवी होती?
सध्या नीलू कुठे आहे ? ती तर चावी काकूंना देऊन गेली तर गेली कुठे ?
आणि ती गेल्यापासून घरी कोणीही आलेलं नाही. त्याचा वैताग असह्य झालेला.

त्या टेन्शनमध्ये तो हेच सगळं काकूंना सांगण्यासाठी बाहेर आला आणि त्याची नजर समोर मानेंवरती पडली . तो आश्चर्याने म्हणाला,

"अरे माने साहेब, तुम्ही इकडे?"

" हो सरांनी पाठवला आहे."

" अहो मी काय पळून जाणार आहे का कुठे ? विश्वास नाही का? माझी बायको बेपत्ता आहे आणि तुम्ही माझ्यावरती पाळत ठेवताहात?"

"रोहन साहेब मिस अंडरस्टँडिंग नाही करायची , तुमच्या मदतीसाठी पाठवला आहे साहेबांनी. . . घरी काय प्रकार झाला हे माहित नाही ना ? त्यामुळे लेडीज कॉन्स्टेबलला घेऊन आलो होतो ."

" बरं मग, आत मध्ये येता का ?"

आणि मग रोहन ने माने आणि त्या लेडीज कॉन्स्टेबल यांना आत मध्ये बोलावलं .

त्यांनी घरातल्या त्या सगळ्या पसाऱ्याची नोंद केली आणि फोटो काढले .

मानेनी तिथूनच इन्स्पेक्टर साळुंखे यांना कॉल लावला ,"
सर नीलांबरी मॅडम घरात नाहीयत आणि आत्ता साहेबांनी कुलूप उघडले तर बेडरूम मध्ये सगळ्या अलमारी आणि कपडे वगैरे अस्ताव्यस्त झालेत अगदी कुणीतरी चोरी केलीय जशी !"

"माने, मॅडम कुठे गेल्यात काही कळालं का?"

" नाही साहेब , शेजारी बाई सांगतात की दोन अडीच तासापूर्वी त्या काहीतरी अर्जंट काम आहे असं शेजारच्या बाईला सांगून निघाल्यात आणि ते अजून पर्यंत आलेले नाहीत बघा ."

"माने, मी काय म्हटलं होतं ? ही बाई त्या रोहनची बायकोच आहे. . . पण त्याला ते मान्यच करायचं नाही . . बरं मग घरात चोरी कोणी केली ? का ते पणं सगळं बनावट आहे?"

"सर ते सांगणं कठीण आहे, . म्हणजे ते रोहन साहेबच बायको साठी खूप परेशान आहेत. . ."

"ठीक आहे माने, तुम्ही त्यांना पणं तिथल्या वस्तूंना हात लावू नका असे सांगा आणि घराला सील करा आणि निघा."

माने म्हणाले -

" रोहन साहेब , इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला परत या म्हणतात. . "

" अहो मला माझ्या बायकोला शोधू द्या!"

" अहो साहेब , आम्ही कशासाठी आहोत, आम्ही शोधून काढू तुमच्या बायकोला. इथे घरात कुणाचे ठसे वगैरे पहायचे आहेत, तुम्ही सध्या सोबत चला आणि पोलीस स्टेशन वरती यायला सांगितले आहे."

माने नी योग्य ती कारवाई केली आणि ते परत निघाले.

" साहेब त्या सोबतच्या माणसाचं काय झालं?" रोहन ने माने ना विचारलं.

"त्या माणसाला दवाखान्यात पाठवले आहे, गेल्यावर अपडेट कळेलच आपल्याला ."

रोहनने पुन्हा स्वतःची गाडी काढली ,हायवे जवळच्या पोलीस स्टेशनला तो जाऊन पोहोचला.

साळुंखे अगदी निवांत बसले होते .

"हे पहा रोहन साहेब , स्ट्राँग रहा , तुमच्यासाठी ही वेगळी घटना आहे पण अशा कित्येक घटना आम्ही रोज पाहतो त्यामुळे. . . यात बऱ्याच गोष्टींची शक्यता आहे . ती आम्ही बोलून दाखवणार म्हणजे सत्य कळेपर्यंत आम्ही सगळ्या शक्यता तपासून पाहणार. कळतय का ?"

क्रमशः

©® स्वाती बाळूरकर देशपांडे,सखी
दिनांक २८.०६.२४

🎭 Series Post

View all