Login

कोडे सुटेना (भाग तीन )

Mystry Of An Accident
कोडे सुटेना? (भाग एक)

©® स्वाती बाळूरकर देशपांडे,सखी


"हां. . . पण शक्यता म्हणजे ?"

" असल्या बऱ्याच गोष्टी होत असतात, पेपर मधे वाचत असाल की . आम्हाला काय वाटतं की ती महिला तुमची पत्नीच आहे पण तुमची ओळख पटत नाहीये, बरं मग तुमच्या बायकोचं कुठे बाहेर काही? म्हणजे तो सोबत चा माणूस. . . "

" इन्स्पेक्टर ,तुम्ही काहीही बोलणार का?"

"कूल ! अहो मी शक्यता वर्तवली . तुम्हाला ते सगळं ऐकून घेण्याची मानसिक तयारी करावी लागेल, मी सांगितलं होतं. तुमची बायको सापडेपर्यंत हे होणार , जर नाही सापडली तर मात्र ? . सध्या तर आम्ही इथे पंचनामा केला ,बॉडी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला पी. एम साठी पाठवून दिली आहे आणि डी एन ए सँपल पणं घ्यायला सांगितला आहे, ब्लड ग्रुप कळेलच. त्यासोबतच्या माणसाला दवाखान्यामध्ये दाखल केलेला आहे ."

"तो काय म्हणतोय?"

"काय म्हणणार ? त्याचा मेंदूला जबर दुखापत झाल्यामुळे सध्या तो बेशुद्ध आहे . तो पूर्ण शुद्धी वरती येईपर्यंत आम्ही त्याची जबानी घेऊ शकत नाही. जबानी किंवा काही ठोस पुरावा आम्हाला मिळेपर्यंत आम्ही काहीतरी अंदाज लावणारच ना !"

"अहो पण अंदाज लावायला सुद्धा बॅकग्राऊंड पाहता की नाही?" रोहन वैतागुन म्हणाला.

" कळत नाहीत की ,ती बाई तुमच्या बायकोची मैत्रीण होती की तो माणूस तुमच्या बायकोचा मित्र होता की ते दोघे चोर होते , बरं मग चोर होते तर तुमच्या बायकोला कुठे भेटले ? काय म्हणता?"

"खरं आहे, पण साहेब मला अजूनही वाटते की ती मृत महिला माझी पत्नी नीलू नाही ."

"बर मग एक काम करा, तुमची बायको हरवल्याची एक तक्रार द्या बघू. आपण दोन्ही केसला कसे जोडता येईल ते बघूया . मी तुम्हाला सोडतो , पण तुमचे सगळे डिटेल्स इथे द्या आणि आम्ही बोलावू तेव्हा उपस्थित रहा."

"निलूचा म्हणजे तिचा फोन मिळेल का?"

" नाही. फोन आमच्या ताब्यात आहे. त्याला मी चार्जिंग करून पाहिली पण फोन पूर्णतः फॉरमॅट केलेला आहे, ब्लँक ! म्हणजे अगदी नवीन घेतलेला फोन असतो ना तसा?"

"ओह माय गॉड. . . सर पण तिची गॅलरी फोटोने भरलेली असायची, कितीतरी ॲप तिच्या फोन मध्ये होते, आमचे सगळे बँकेचे व्यवहार तिच्या फोन मधून चालायचे . साहेब माझी फार परेशनी होऊन जाईल . काय करू आता ?"

"अहो रोहन सर , कागदपत्र त्यांचे सगळे आपल्याकडेच आहेत . डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड सगळं आहे पर्समध्ये. तुम्ही वाटलं तर एकदा पाहून खात्री करून घ्या ."

मग त्यांने ते सगळे बँकेचे सापडलेले कागदपत्र टेबलावरती हातात ग्लोव्हज घालून मांडून ठेवले हात न लावता पहा अशी सूचना दिली.

त्याला एकदा बँकेत भेटून यायला सांगितलं.

इतक्यात साळुंखेचां फोन वाजला. त्यांनी घेतला, रोहन कान देवून ऐकून घेत होता.

"हां बोला? अच्छा. . . बापरे. . मग कठीण होईल ना ते. अच्छा . . आणि गाडी? हो का? वाटलच मला. म्हणजे हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे! पाहतो."

"सर काय झालं? काही आमच्या केसबद्दल ?"

"हो, सांगतो. बसा!"

रोहन खूपच उत्सुकतेने इन्स्पेक्टर साळुंखे समोर बसलेला होता. काही महत्त्वाची बातमी कळेल अशी एक भोळी आशा त्याच्या मनात होती.
साळुंखे म्हणाले," आता एक फोन आला होता, त्यांनी गाडीचा नंबर वगैरे सांगितला आहे ,एकदा पहा या नंबरची ऍक्टिवा सापडलेली आहे."

"हा नंबर ,साहेब ही आमची गाडी आहे . म्हणजे नीलू चालवायची, हीच घेऊन तर ती घरातून निघाली आज दुपारी.

"बरं , मग तुम्ही आता निघा. तपास चालू आहे . त्या महिलेचे सँपल पणं आपण डी एन ए साठी दिलेले आहेत. काही गरज लागली तर आम्ही तुम्हाला बोलावू किंवा अपडेट करू. तुम्ही उपलब्ध रहायचं."

रोहनला वाटलं होतं की झालेली घटना थोडक्यात सुटेल आणि मग नीलू च्या आई-वडिलांना सांगावें .
त्याचे आई-वडिल ते थकलेले होते, गावी भावाकडे रहायचे. त्याची आई खूप भावनिक होती म्हणून कळवणे टाळले.

त्याने पोलिसांना रिक्वेस्ट केली होती की "बातमी शक्यतो टीव्ही वरती येवू देवू नका ना सर! उगीचच कुटुंबाची बदनामी होईल. नको नको ती चर्चा होते आजकाल. ."

'ते मला कळतं रोहन , पण नाही आज काल मीडियापासून काहीच लपून राहत नाही . हां त्यामुळे फक्त नाव सांगितले जाणार नाहीत याची दक्षता मी घेऊ शकतो. कारण अपघात आणि अशा घटना तर पेपर आणि टिव्ही वर येणारच."

संध्याकाळी ' बंगळूर हाय वे वर भीषण अपघात आणि एका महिलेचा जागीच मृत्यू!' अशा बातम्या येत होत्या आणि मग ब्लर करून फोटो दाखवले जात होते .
तपास चालू आहे इतकच त्या बातमीत देत होते,काहीच डिटेल्स सांगितले जात नव्हते.

पोलीस स्टेशन वरून निघाल्यानंतर रोहन ने त्याच्या ऑफिसमध्ये बॉसला घडलेल्या काही गोष्टी सांगितल्या आणि मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे या गोष्टीचा तपास लागेपर्यंत ऑफिसला येऊ शकत नाही , असे कळवून टाकलं.

त्याला मात्र त्या दिवशी सासुरवाडीत जावं लागलं .कारण लहानशी कूहू तिथे आईची वाट पाहत होती.
त्याने दुपारपासून प्रयत्न पूर्वक तिच्या आईवडिलांना या प्रकरणा पासून लांब ठेवले होते.
तो त्यांच्या घरी जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यांचे घर सील केले होते. त्यात सासूबाईंना फोन आला.

' काय झालं , नीलू अजून का नाही आली ? कुठे गेली आहे?"

" नाही मम्मी मीच येत आहे तिकडे , आल्यावर बोलतो."

आणि मग आल्यावर त्याने दुपारपासून घडलेल्या घटना सांगितल्या .
तिचे वडील थोडे हिम्मतवाले होते, "घाबरु नको, रोहन म्हणतात ना की दुसरी स्त्री आहे . . काही होणार नाही आपल्या नीलूला ! आपण कधी कुणाचे वाईट केलं नाही. ती कुठेही असेल , सुखरूप आहे . तुम्ही हिम्मत ठेवा आणि देवासमोर प्रार्थना करा."

पण तिची आई मात्र या तटस्थ वागण्याने हर्ट झाली.
ती खूप भावनिक झाली, "रोहन पण जर ती महिला म्हणजे जर नीलू असेल तर ? " असा विचार करून , बोलून ती रडायला लागली.

रोहन म्हणाला," मम्मी, अहो मी नीलू ला ओळखणार नाही का ? मी मुद्दाम तुम्हाला कळवले नाही कारण मला खात्री आहे. . . पण आपली नीलू कुठे आहे हे कळायला हवं ना!

"आता ती बाई म्हणजे ती अपघातात. . . मृत झालेली ? कुठे आहे?"

"मम्मी , पप्पा,हवं असेल तर मी तुम्हाला तिथे सरकारी दवाखान्यात घेऊन जातो . खात्री करा . . पण त्यांची ते प्रेत वगैरे दाखवण्याची प्रोसिजर फार बेकार असते .तुम्हाला त्रास होईल म्हणूनच मी दुपारी पोलीस इन्स्पेक्टरला ओळखीसाठी तुमचा संदर्भ दिला नाही . तिचा चेहरा भयानक खराब झालेला आहे."

रोहनच्या डोळ्यातून सारखे अश्रू येत होते. गळा रुंध झाला होता .सासरवाडीत त्याला मोठ्याने रडता ही येत नव्हतं आणि दुःख लपवता ही येत नव्हतं.

"बाबा आई कुठे गेली ? कधी येणार आहे ? घरी चल ना!" कुहु ने त्याच्या पायाला विळखा घातला तेव्हा त्याने तिला कडेवर घेतलं .

"कूहु बाळा आई ना तिच्या मैत्रिणीला भेटायला गेलेली आहे, उद्या येईल बाळा . . .आणि हो आई येईपर्यंत बाबा तुझ्या सोबतच आहे. . . !" तो उसने अवसान आणून म्हणाला.

"तू आहे ना पण बाबा. . आई पाहिजे!" ती रडकुंडीला आली.

" येईल ना बाळा उद्या! तू कशी गेलीस की नाही पिकनिकला , शाळेत पिकनिक ला. तशीच ती पण गेलीय ना !" त्याचा सूर बदललेला होता . कुठल्या क्षणी तो रडेल असं वाटलं .

नीलू च्या वडिलांनी कुहुंला जवळ घेतलं आणि म्हणाले, "चल आपण समोर बागेत फिरून येवू." ते गेले आणि रोहन ने आता टीव्ही ऑन केला.

टीव्ही वर ती बातमी पुन्हा पुन्हा दाखवण्यात येत होती बेंगलोर हायवेवर अपघात , अज्ञात महिलेचा मृत्यू , कंटाळून त्यांने बातम्या बंद करून टाकल्या.

रात्र भर कुणाचाही डोळ्याला डोळा लागला नाही.

रोहन ची तर खूप घुसमट . घरी जावं तर तिकडे सगळं फॉरेन्सिक चे लोक येवून गेले, बाजूच्यां काकू पाहतो म्हणाल्या.



क्रमशः

©® स्वाती बाळूरकर देशपांडे,सखी
दिनांक २८.०६ .२४