कोड्याचे उत्तर (Tenali Rama Story In Marathi)

Tenali Rama Story In Marathi
कोड्याचे उत्तर

रामा आणि गुंडप्पा धर्म शाळेतून बाहेर पडत होते.

“आता काय कलायच ठलवल आहे?” गुंडप्पाने विचारलं.

“जिथे जिथे त्या चोराने चोरी केली आहे तिथे जाऊन पाहणी करायची. कुठेतरी काहीतरी हाती लागेल.” रामा म्हणाला.

त्या दोघांच्या मागावर कोतवाल आणि गोपण्णा देखील होतेच.

रामा आणि गुंडप्पा गावातील एका माणसाच्या घरी आले होते. तो त्यांना सर्व दाखवत होता.

“हे बघा सगळं जे होतं ते तो चोरून घेऊन गेला. काहीच ठेवलं नाही. फक्त हे काहीतरी टाकून गेलाय.” तो माणूस रडत म्हणाला.

त्याने एक पितळी शिक्का असल्यासारखी एक मुद्रा दाखवली. रामा ते हातात घेऊन बघत होता.

“हे तर तसेच आहे ना जसे आधीच्या चोऱ्यांमध्ये त्या चोराने टाकले आहे.” कोतवाल आत येऊन त्याच्या हातून ते घेत म्हणाला.

“लामा” गुंडप्पा बोलत होता पण त्याला मध्येच तोडत कोतवाल बोलू लागला; “लामा? अरे पण याचं नाव रामा आहे ना?”

“तोतला आहे तो.” गोपण्णा म्हणाला.

“लामा ते बद.” गुंडप्पा एका भिंतीकडे हात दाखवून म्हणाला.

त्या भिंतीवर काव्य पंक्ती लिहिलेली होती.
“मी पाणी आहे, सगळं घेऊन वाहून जातो पण कोणाच्याही हातात येत नाही.”

रामाने ते वाचलं.

“काही समजलं रामा?” बंधूने विचारलं.

“हम्म. काहीतरी समजतंय बंधू.” रामा म्हणाला.
********************************
इथे आचार्य रामाला काहीतरी सुगावा लागेल म्हणून बेचैन झाला होता. त्याला कोणत्याही परिस्थितीत काहीच कळायला नको आणि त्यावर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे हे त्याला समजलं होतं.
********************************
दुसरीकडे रामा आणि बाकी सर्व दुसऱ्या घरात गेले होते. तिथेही चोराने तशीच निशाणी ठेवली होती.

“लामा ते बद.” गुंडप्पा म्हणाला.

त्याही घरातल्या भिंतीवर लिहिलेले होते;
“मी हवा आहे, सगळीकडे असतो पण कोणाच्याही हाती येत नाही.”

“आता तर काहीतरी सांग. काय समजलं तुला?” बंधू म्हणाली.

“शूs धैर्य बंधू धैर्य.” रामा म्हणाला.

संध्याकाळी रामा आणि बाकी सर्व छोट्या महाराणीच्या महालात गेले. छोटी महाराणी खूप रडत होती. एक दासी एका मोठ्या थाळीत रेशमी रुमाल घेऊन उभी होती आणि छोटी राणी एक एक रुमाल मागून डोळे, नाक पुसत होती.

“आता काय सांगू तो चोर आमची सोन्याची फणी घेऊन गेला. आमच्या आईने दिलेली होती ती.” राणी रडत रडत सांगत होती.

सगळेजण जाळीच्या पडद्याच्या अलीकडे उभे होते आणि राणी मोठ्या पलंगावर बसलेली होती.

“जेव्हापासून तो दुष्ट चोर आमची सोन्याची फणी घेऊन गेला आहे तेव्हापासून जणू आम्ही तयार होणंच विसरलोय.” राणी रडत बोलली.

पण ती इतकी छान तयार होऊन बसलेली बघून गुंडप्पा तोंड दाबून हसू लागला. रामाने हळूच त्याच्या पाठीवर मारून नाही म्हणून खूण केली आणि तो गप्प बसला.

“अजून एक गोष्ट आठवली. त्याने तिथे काहीतरी लिहून ठेवलं आहे.” राणी म्हणाली.

लगेचच एका दासीने त्या चोराने कुंकवाच्या थाळीत लिहून ठेवलेली थाळी सगळ्यांना दाखवायला बाहेर आणली. त्यावर लिहिलं होतं; “वाळू आहे; हातात येतो पण निसटून जातो.”

सगळे राणीच्या कक्षातून बाहेर पडले.

“किती शातिर आहे हा चोर. राजवाड्यात शिरला आणि चोरली फक्त महाराणीची सोन्याची फणी. अर्थ काय आहे याचा?” रामा म्हणाला.

“काय अल्थ?” गुंडप्पाने विचारलं.

“अरे हेच की मी कुठेही शिरू शकतो, मला कोणीही पकडू शकत नाही. गर्व आहे त्याला स्वतःवर. तो जेव्हा चोरी करतो त्याला स्वतः वर गर्व वाटतो.” रामा बोलत होता.

त्याच्या मागून कोतवाल आणि त्याचा सहाय्यक गोपण्णा तो कोणत्या अनुमनापर्यंत जातोय हे ऐकायला फिरत होते.

“हा चोर खूप गर्विष्ठ आहे. नाहीतर त्याला काय गरज आहे प्रत्येक चोरी नंतर अशी एक ओळ लिहून जाण्याची?” रामा म्हणाला.

“काय गलज आहे?” गुंडप्पाने विचारलं.

“सगळ्यांना आव्हान देतोय तो. हिम्मत असेल तर पकडून दाखवा.” रामा म्हणाला.

“हुं! असे हवेत इमले बांधून आणि इथे तिथे फिरून तुला असं वाटतंय का तू त्याला पकडू शकशील? शक्यच नाही. तो एक शातीर चोर आहे आणि बघ जर काही धागा मिळाला ना तरी अश्या ठिकाणी मिळेल ज्याचा कोणीही विचार केला नसेल.” कोतवाल म्हणाला.

त्याच्या बोलण्याने रामाला काहीतरी सुचलं. तो सगळ्यांना गो शाळेत घेऊन आला. तिथे पडलेल्या शेणाभोवती रामा उभा राहिला.

“अले कुते आहे तोल?” गुंडप्पाने विचारलं.

“हा आहे चोर.” रामा शेणाकडे बोट दाखवून म्हणाला.

“हे तेन आहे. तू आलम कल लामा.” गुंडप्पा म्हणाला.

“नाही! चोर इथेच आहे.” रामा म्हणाला.

“हे काय बोलतोयस?” कोतवाल म्हणाला.

“बरोबर बोलतोय कोतवाल जी! नीट ऐका.
गाईने खाल्ले गवत, गवताचे झाले शेण,
शेणात चोराचे घर आणि घरात ठेवले शेण.

आता हे शेणच आपल्याला त्या चोरापर्यंत घेऊन जाईल. यातच आहे त्या चोराचे रहस्य.” रामा म्हणाला.

कोतवाल आणि त्याचा सहकारी विचारत पडले. रामा हळूच हसला आणि ते दोघं तिथून निघून गेले. इथे कोतवालने आचार्यला बोलावून घेतले होते. आचार्य, त्याचे शिष्य, कोतवाल आणि त्याचा सहकारी सगळे त्या शेणाभोवती बसले होते. रामा जे काही सांगून गेला त्याचा विचार करून त्यातून काय अर्थ निघतोय हे सगळेजण बघत होते.

एक एक ओळ पुन्हा बोलून त्यातून काही अर्थ निघतोय का हे विचार करणं चालू असताना धनी बोलू लागला; “माझं ऐकाल तर या गाईला विचारू हे गोबर कोणी केलं आहे आणि तिला या ओळींचा अर्थ विचारू.”

“अरे मूर्ख! इथे किती गाई आहेत. गाय कसं सांगू शकेल हे शेण कोणाचं आहे?” आचार्य धनीच्या डोक्यात एक चापटी मारून म्हणाला.

“काय गुरुजी तुम्ही? जरी गाईचा पत्ता लागला तरी गाय कशी सांगणार आहे या ओळींचा अर्थ काय?” कोतवाल म्हणाला.

थोडा विचार करून आचार्य तिथून उठला. मागे पडलेली एक काठी घेऊन त्याने धनी मणीच्या हातात दिली. ते दोघे मिळून ते शेण चिवडू लागले.
***********************************
इथे रामा त्याच्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन एका मोठ्या महादेवाच्या देवळात घेऊन आला होता.

“माझं या देवळाच्या पुजाऱ्यांशी बोलणं झालं आहे. त्यांनी आपल्याला इथे राहण्याची परवानगी दिली आहे.” रामा म्हणाला.

त्याचं बोलणं ऐकून अम्माने काठी खाली टाकली आणि खुणा करू लागली आणि शारदा ती काय म्हणतेय हे सांगू लागली; “या म्हणतायत चल इथून दूर जाऊया. कोणाला काही कळायच्या आत निघू इथून.”

रामा तिला धरून बोलू लागला; “हे अम्मा नाही तिच्यातलं माझ्या विषयीचं प्रेम बोलतंय नाहीतर स्वतः दिलेली शिकवण ती स्वतः कशी विसरेल? खरा माणूस तोच असतो जो संकटांचा सामना करतो आणि संकटे देखील त्यांच्यावरच येतात ज्यांच्यात त्यांचा सामना करण्याची ताकद असते. अरे शारदा मी लक्ष्मी अम्माचा मुलगा आहे. मी संकटाचा सामना करणार. इथेच राहून. मी पळून जाणार नाही. हो ना अम्मा?” रामा म्हणाला.

त्याबरोबर अम्माने त्याची दृष्ट काढून बोटं कानशिलावर मोडली आणि त्याला जवळ घेऊन त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले.

“आता या तुमच्यावर गर्व करतायत.” शारदा म्हणाली.

“माहितेय. अम्माच्या या हातांच्या स्पर्शाची भाषा मी लहानपणापासून ओळखतो यात मला तुझी गरज नाही.” रामा म्हणाला.

यातच तो दिवस संपला आणि दुसऱ्या दिवशी रामा शिवलिंगाची पूजा करत होता.

“एक दिवस तर असाच संपला. आता फक्त दोन दिवस बाकी आहेत. काय करायचं याचा विचार केला आहे?” शारदाने काळजीने विचारलं.

“हो. केलाय विचार.” रामा म्हणाला.

“काय?” शारदाने विचारलं.

“हेच की, जर आपण कोणाच्या शोधात असू आणि तो आपल्याला भेटत नसेल तर असं काहीतरी करायचं ज्यामुळे तोच आपल्या शोधात येईल.” रामा म्हणाला.

“उचला. तो तिथे पाण्याचा तांब्या पडला आहे ना तो उचला आणि डोक्यावर ओता. काहीही बोलताय.” शारदा म्हणाली.

“ऐत! शालदा आदी त्यात ऐत! आदकल त्यात दोत तांगल तालतय.” गुंडप्पा म्हणाला.

शारदा त्याच्याकडे बघू लागली.

“तो लाज पुलोहित अनि कोतवालला तेनात अत गुंतवल आहे की आतापल्यंत सदल तेन तोलून ताकल असेल.” गुंडप्पा म्हणाला.

त्यावर रामा हसू लागला.

“शेण? ही काय भानगड आहे?” शारदा म्हणाली.

“ते सोड. मी काय विचार केलाय तो ऐक. जसे लोह लोह्याला कापते, हिरा हिऱ्याला, तसेच या चोराची चोरीच चोराला पकडेल. पण फक्त यावेळी ही चोरी तो चोर नाही तर मी करणार.” रामा म्हणाला.

“काय?” शारदा आणि गुंडप्पा एकदम म्हणाले.

“आता काय कुरापत शिजतेय तुझ्या डोक्यात?” बंधू म्हणाली.
****************************
इथे सगळं शेण चिवडून झालं तरी आचार्य आणि बाकी लोकांना काहीच कळत नव्हतं.

“यातून काही कळत नाहीये.” कोतवाल म्हणाला.

“आता या शेणाचे रहस्य तो रामाच सांगू शकेल. जा त्याच्यावर नजर ठेवा.” आचार्य कोतवालला म्हणाला.

ते दोघे तिथून गेल्यावर त्याने धनी मणीला स्वतःच्या उपरण्याने एक फटका मारला.

“चला! आता आम्ही खूप दमलो आहोत. आमच्या विश्रांतीची वेळ झाली आहे.” तो म्हणाला.

“हम्म! विश्रांती म्हणजे राज नर्तकी सौदामिनी.” धनी पुटपुटला.

ते तिघे आचार्यच्या घरी आले. खोलीत जाण्या आधी त्याने स्वतः च्या बायकोला बजावले;
“आमची आता तपश्चर्या करण्याची वेळ झाली आहे. कोणालाही इथे फिरकू द्यायचं नाही.”

“हो स्वामी! अगदी प्राण गेले तरीही तुमच्या ध्यानात कोणाला व्यत्यय आणू देणार नाही.” ती म्हणाली.

आचार्य आत गेला आणि त्याने खोलीचे दार लावून घेतले. आचार्यची पत्नी तिथून निघून गेली आणि धनी मणी बाहेर उभे राहिले. तो आत गाणं गुणगुणत होता ते त्यांना ऐकू येत होतं. दोघेही त्याची टिंगल करत होते. त्यानंतर सुगंधी अत्तर त्याने लावल्यावर त्याचाही सुवास बाहेर आला. धनी मणी तर त्याची चांगलीच टिंगल करू लागले. शेवटी अंधार पडल्यावर तो एक घोंगडी अंगावर घेऊन बाहेर पडला.
*********************************
इथे शारदाने कोणाच्या घरी चोरी करणार आहे हे विचारल्यावर रामाने राज नर्तकी सौदामिनीचे नाव सांगितले.

“तिच्या घरी का?” तिने घाबरून विचारले.

“कारण ती राजनर्तकी आहे शारदा. तिचा संबंध थेट राजवाड्याशी आहे. तिच्याकडे चोरी झाल्यावर ही बातमी लगेच राज दरबारात पोहोचेल. खऱ्या चोराला कधीच असं वाटणार नाही की त्याचं श्रेय कोणी दुसरं घेऊन जातंय. बघ तू यानंतर तो अशी काहीतरी चूक करेल की सहज पकडला जाईल. आता एवढ्या कमी वेळात हाच एक मार्ग आहे आपल्याकडे. हा धोका तर पत्करावा लागेल.” रामा म्हणाला.

त्याचं बोलणं ऐकून शारदाला थोडी असुरक्षित भावना वाटू लागली. ती गुंडप्पाला ती कशी दिसते असे विचारू लागली. रामा गालात हसला आणि त्याने तिला समजावले. रात्र झाल्यावर रामा आणि गुंडप्पा दोघे तयार झाले. त्यांनी पूर्ण वेश बदलला होता.

“थांबा! कोणाची दृष्ट नको लागायला.” शारदा म्हणाली आणि तिने रामाच्या काना मागे एक काजळाचे बोट लावले.

दोघे तिथून निघाले. सौदामिनीच्या घराबाहेर आल्यावर इथे तिथे बघत असताना रामा आणि आचार्यची एकमेकांना धडक लागली पण दोघेही पटकन तिथे असलेल्या एका मोठ्या गवताच्या राशी मागे लपले. आचार्यचा संपूर्ण चेहरा घोंगडीने झाकलेला असल्याने आणि रामाने वेश बदलला असल्याने कोणीच कोणाला ओळखले नाही. इतक्यात अचानक एक आवाज येऊ लागला.

“आम्ही ओळखतो हे कोण आहेत. आम्ही हे पण जाणतो तू कोण आहेस. तुला काय वाटलं आमच्या डोळ्यात धूळ फेकून वाचशील? हे राजाचे डोळे आहेत यांना धोका देणं इतकी साधी गोष्ट नाही.”

ते बोलणं ऐकून रामाने घाबरून हात जोडले आणि त्याच्या डोळ्यासमोर राजा कृष्णदेवराय येऊ लागले. त्याला कालचा प्रसंग आठवला आणि राजाचे रुप आठवले.

“आता शिक्षेसाठी तयार व्हा धोकेबाज! आम्ही आलोय.”

असा आवाज येताच आचार्य आणि रामा, गुंडप्पा लपलेले तिथून बाहेर आले. आचार्य देखील हात जोडून घाबरून उभा होता. तिघे समोर बघत होते. अंधारातून कोणीतरी त्यांच्या दिशेने येताना त्यांना दिसले.

क्रमशः…..

Credit:- Sony SAB Tenali Rama serial.

🎭 Series Post

View all