Login

कोकणातील गूढकथा- ४

ही कथा काल्पनिक असून अंधश्रद्धा पसरविण्याचा लेखिकेचा हेतू नाही

गावात तात्यासाहेब खोतांच प्रस्थ खूप मोठं होत. पिढीजात श्रीमंत घराणं. कशाचीच कमी नाही..सात पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती होती शिवाय भरपूर शेती-वाडी. वाड्याच्या बाजूला त्यांचं जून राम मंदिर होत. रामाच्या कृपेने सगळं छान होत. त्यांना दोन मुले होती. प्रीती आणि योगेश . प्रीती दिसायला खूप देखणी होती. बी. कॉम. झाली होती गेल्याच वर्षी. तिला पुढे शिकायचं होत खरंतर पण वडिलांचा विरोध होता. आता लग्नाचा वय आहे..त्यांचा मुलीचं लग्न उरकून घ्यायचा विचार होता. उगाच इकडे तिकडे भरकटली म्हणजे...?

त्यांनी रीतसर स्थळ बघायला सुरवात केली होती. पण इनामदारांचा जावई म्हणजे कसा हवा......
दिसायला राजबिंडा, श्रीमंत, खानदानी, शिकलेला, घरात नोकर-चाकर, दारात गाड्या आणि इतकं सगळं असाल तरी निर्व्यसनी आणि सुस्वभावी हवा. हे सगळं जुळून यायला वेळ लागणारच होता.

खोतांनी नुकताच हा राहता जुना वाडा नूतनीकरण करायचं काम सुरू केलं होत. त्याच्या कामासाठी घरात सतत कर्नाटकी कामगार वावरत होते. त्यात एक बसप्पा नावाचा तरुण मुलगा होता. पिळदार शरीर, दिसायलाही भारदस्त, रुबाबदार मुलगा होता. सुटबुटात तयार केलं असत तर अगदी खानदानी वाटावा असाच. पण जेमतेम शिकलेला आणि अनाथ होता. अशी कामे करून गुजराण करणारा. प्रीती आणि त्यांची सतत नजरा-नजर व्हायला लागली. दोन तरुण मन नकळतच एकत्र आली.
पण प्रीतीला माहीत होत हे घरात मान्य नाही होणार. त्यामुळे ती बसप्पाला पळून जाऊन लग्न करू असे सुचवते. घराच्या श्रीमंतीमुळे बाहेरच जग तिला माहीतच नव्हतं. पळून जाऊ आणि सुखी राहू असाच तिला वाटत असत. इकडे बसप्पाला मात्र लग्न करून सगळ्या संपत्तीचा मालक होऊ असेच वाटत असते. बसप्पा कमी शिकलेला असला तरी हुशार असतो तो प्रीतीला म्हणतो; 
" आपण जाऊ पळून... लग्न करून काही दिवसांनी परत येऊ आणि मग तुझे आई बाबा आपल्याला घरात घेतीलच."

" हो रे बसप्पा..चांगली कल्पना आहे..हे माझ्या डोक्यात आलेच नाही.."

हे त्यांचे बोलणे खोतांच्या घरात खूप वर्षे काम करणारे नाना ऐकतात. नाना नोकर म्हणून काम करत असले तरी तात्या लहान असल्यापासून ते या घरात होते. प्रीतीला तर त्यांनी अंगा-खांद्यावर खेळवलं होत. त्यामुळे ऐकलेला प्रकार तात्याना न सांगणं म्हणजे पाप ठरलं असत. मुलगी अशी पळून गेली तर खोतांच नाव धुळीस मिळेल. त्यामुळे हे तात्यांच्या कानावर घालायला नाना तात्याच्या खोलीत जातात.

" तात्या जरा आत येव ?"

" अरे नाना तुमी कधी पासून असा आत येव विचारूक लागलात..घर तुमचाच आसा.."

" नाय रे आपण आपली पायरी ओळखून रवलेला बरा असता..ता जावने..तुझो लक्ष असा चेडवार तुझ्या ?"

" काय झाला नाना.."

नानांनी ऐकलेला प्रसंग कथन केला. तात्यांच्या पाया खालची जमीन सरकली. 

" नाना काय सांगतास ह्या..?"

" जा ऐकलंय ताच सांगताय..ह्या घराचा वाईट झालेला मी कधीच ह्या डोळ्यांनी बघुक नाय शकत रे..पुढे काय ता इचार करून कर..मी येतय"

नाना आपल्या कामाला निघून गेले.

तात्यांना माहीत होतं नाना कधी खोटं बोलणार नाहीत. पण प्रीती अस करेल..? तात्या आता प्रीतीवर लक्ष ठेऊन होते. घराण्याची प्रतिष्ठा तात्या अशी धुळीस मिळवू देणारे नव्हते. तात्यानी प्रीतीला समजायचं ठरवलं.
" प्रीती, तुझं जे काही चालल आहे आहेत ते मला कळायचं नाही असं काही..काय करतेस तु हे..कधी विचार केलास का मागून आपल्या आई वडिलांना काय वाटेल..इथे गावात आपली काय इज्जत राहील..आणि तो बसप्पा ?? मौजमजा सोड पण नीट सांभाळू तरी शकतो का तुला ? तुला पुढे शिकायचं ना शिक मी आता नाही अडवत तुला पण असा अविचार करू नकोस मुली"

" बाबा तुम्ही काय बोलताय हे..? शी... माझ्या मनातही असे विचार नाहीत..अस काहीही नाहीय.."

प्रीती तात्यांना धुडकावून लावते. ती काही मान्य करत नाही त्यामूळे तात्याना गप्प बसावं लागत. तरी तात्यांनी योगेशला सर्व कल्पना देऊन लक्ष ठेवायला सांगितलेलं असत.
योगेश खूप सणकी डोक्याचा असतो. हे ऐकूनच आधी तो चिडलेला असतो. आपण प्रीतीचा जबरदस्तीने लग्न करू असा उपाय तो तात्यांना सुचवतो.पण नाना त्याला संयमाने घ्यायला सांगतात.पण योगेश असा गप्प बसणारा नव्हता.
तिसऱ्याच दिवशी गावातल्या नदीत बसप्पाच प्रेत सापडत. बसप्पा नदीवर अंघोळ करताना नदीत बुडून मेला अस गावभर कळत. तसही त्याचं जवळच कुणी नसतंच. केस संशयास्पद असली तरी तसा कुठला पुरावा मिळत नाही आणि खोतांच्या विरोधात कोण जाईल..? प्रकरणावर पडदा पडतो.

त्यानंतर प्रीतीला सारख्या फिट्स येऊ लागतात. तिला नदीत बुडणारा बसप्पा स्वप्नात येऊ लागतो. ती फार विचित्र वागू लागते.

एकेदिवशी सकाळी प्रीती उठलेली नसते म्हणून तिची आई सीमाताई तिला उठवायला तिच्या खोलीत जातात. पण प्रीती खोलीत नसते. सगळं वाडा, आजूबाजूची घर पालथी घेतली घालतात. पण प्रीतीचा शोध काही केल्या लागत नाही. सगळे काळजीत असतात..तितक्यात प्रीती नदीवरून येताना दिसते..भिजलेले कपडे..सोडलेलं केस..असा अवतार बघून सगळे घाबरतात..

" कुठे गेलेलीस...?" सीमाताई विचारतात

" मी कुठे गेले होते..मी तर इथेच झोपले होते...सकाळी उठले तेव्हा नदीवर होते..."

आता असे प्रकार सतत घडतात .म्हणून आता सतत प्रीतीसोबत कुणीतरी राहत असे..रात्रीपण तिला एकटीला झोपू देत नसत. प्रीतीची आई तिच्यासोबत रात्री झोपत असे. तरीही प्रीती कधी उठून रात्री वाड्याबाहेर जात असे हे कुणाला ही कळत नये.
शेवटी वाड्याला कुलूप लावून झोपू लागले..पण लावलेली कुलूप तशीच असायची आणि प्रीती नदीवर...
सकाळी उठल्यावर तिलाही आठवत नसे की ती कशी उठली नदीवर गेली....!
याचा शोध घ्यायचा म्हणून योगेश एकदिवस जागा राहतो. मध्यरात्री प्रीती खोलीच्या बाहेर येते. घरचा मुख्य दार आपोआप उघडत. प्रीती धुंदीतच निघून जाते. दार परत बंद होते...! योगेश चांगलाच घाबरतो..
लगेच त्याच्या लक्षात येत आपण मुख्य दरवाजाकडे CC TV लावले आहेत. खूप लोकांची ये जा असते घरात म्हणून.तो फुटेज बघतो. त्यात काहीवेळा पूर्वी एक आकृती आत आलेली दिसते ती प्रीतीच्या खोलीत जाते.
मग प्रीती आणि ती आकृती दोन मिनीटांनी परत बाहेर निघून जातात.

योगेश खूप घाबरतो. तो स्वतःशीच बोलत असतो.

 " बसप्पाचा आत्माच वाड्यात येतो. आणि  प्रीतीला नदीवर नेतो. भयंकर आहे हे सगळे."
तो एकटाच त्या रात्री गाडी काढतो आणि नदीवर जातो. त्याला नदीवर कुणीच दिसत नाही म्हणून तो टॉर्च घेऊन खाली उतरतो.....
आणि दुसऱ्या दिवशी योगेशचे प्रेत नदीत सापडते.....
त्यानंतर ना कधी प्रीती नदीवर जात ना बसप्पाचा आत्मा वाड्यावर येतं......!

0