कोल्हापुरी म्हटल कि तर्रीदार झणझणीत असा तांबडा पांढरा रस्सा लगेच डोळ्यापुढे येतो . मस्त एक एक वाटी रस्सा फुरकन प्यायचा, पार नाकातून डोळ्यातून पाणी आले पाहिजे . असाच झणझणीत रस्सा , सुक मटण आणि पांढरा रस्सा बनवणार आहोत आपण त्याचीच रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करतेय .
सकाळी सकाळी पिशवी उचलली की निघायचं मटण आणायला बाजारात , नळी मागून घ्यायची त्याशिवाय मजा येत नाही खायला . घरी आले की मटण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं .
आधी मटण शिजवून घेऊया
साहित्य : अर्धा किलो मटण , एक कांदा बारीक चिरलेला , अर्धा चमचा हळद , एक चमचा आलं लसूण पेस्ट , चवीनुसार मीठ आणि पळीभर तेल . एक पातेलं गरम पाणी करून घेणे .
कृती : कुकरमध्ये तेलात कांदा गुलाबीसर परतवणे . नंतर त्यात आलं लसूण पेस्ट आणि हळद घालणे . आता त्यात आपण स्वच्छ धुवून ठेवलेले मटण घालून थोडावेळ झाकण ठेवून त्याला पाणी सुटेपर्यंत वाफ येवू देणे . आता त्यात चमचाभर मीठ घालून गरम पाणी ओतणे आणि कुकरचे झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या काढून मटण चांगले शिजवून घेणे .
आता आपण पांढरा रस्सा बनवूया , लहान मुलांना खूप आवडतो हा पांढरा रस्सा .
साहित्य : काजू सात ते आठ , खसखस दोन चमचे , तीळ दोन चमचे , जीरे एक चमचा , एका नारळाचे घट्ट दुध दोन वाट्या , दोन तमालपत्र , लवंग मीरे प्रत्येकी दोन , दालचिनी एक तुकडा , एक चक्रफूल , आलं लसूण पेस्ट एक चमचा , दोन हिरव्या मिरच्या , चवीनुसार मीठ आणि तेल .
कृती : काजू गरम पाण्यात तासभर भिजवणे . तीळ खसखस हलकेच भाजून घेणे . आता काजू खसखस आणि तीळ मिक्सरमध्ये थोड पाणी घालून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची . कढईत तेल घालून त्यात तमालपत्र लवंग मीरे दालचिनी जीरे चक्रफूल आणि हिरवी मिरचीचे दोन तुकडे आलं लसूण पेस्ट टाकून परवून घेणे . आता यात काजूची तयार पेस्ट घालून छान परतवून झाल्यावर त्यात नारळाचे दुध घालून घेणे मग मटणाचे शिजवलेले अर्धे पाणी म्हणजे दोन चार वाट्या घालून चांगले उकळून घेणे . चवीनुसार मीठ घालणे . आपला पांढरा रस्सा तयार आहे .
आता आपण मसाल्याचे वाटण करून तांबडा रस्सा कसा करायचा ते बघूया .
साहित्य : दोन मोठे कांदे , एक वाटी सुके खोबरे किंवा ओल्या नारळचा किस , तीळ चार चमचे , धने चार चमचे , जीरे दोन चमचे , आल दोन इंच , लसून दहा पंधरा पाकळ्या , दालचिनी दोन तुकडे , लवंग मीरे प्रत्येकी पाच ते सहा , कोथिंबिर एक वाटी , कोल्हापुरी लाल तिखट म्हणजे घरी बनवलेली मसाला मिरची म्हणजेच चटणी म्हणतात तिला ते सहा चमचे किंवा तुमची घरची मसाला मिरची किंवा कांदा लसूण मसाला तुम्हांला जितके तिखट आवडते त्याप्रमाणे घेणे पण मटण म्हटलं की कसं झणझणीतच भारी लागतं . हळद अर्धा चमचा , मीठ चवीनुसार , तेल चार ते पाच पळ्या .
कृती : कांदा आणि सुके खोबरे आख्खेच गॅसवर भाजून घेणे किंवा चिरून भाजून घेणे . तीळ जीरे धने पण कोरडे भाजून घेणे त्यातच लवंग मीरे दालचिनी पण भाजणे . आता मिक्सरमध्ये सगळ्यात पहिले तीळ जीरे धने दालचिनी लवंग मीरे हे कोरडेच बारीक करून घेणे . आता त्यात खोबरे बारीक करणे . नंतर कांदा आलं लसूण आणि कोथिंबीर बारीक करणे . पाणी घालून छान बारीक पेस्ट तयार करणे . हा आपला मसाला तयार आहे .
आता मोठ्या पातेल्यात किंवा कढईमध्ये चार ते पाच पळ्या तेल घेऊन त्यात सगळ्यात पहिले कोल्हापुरी लाल तिखट घालून घेणे म्हणजे रस्स्याला रंग छान येतो आणि तर्री हि छान येते . पण मिरची अजिबात जळू द्यायची नाही गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा . आता लगेचच वाटलेला मसाला घालून छान परतवून घेणे . हळद घालून अगदी तेल सुटेपर्यंत परतवणे . त्यात घोटभर पाणी घालून पुन्हा थोडावेळ परतवणे म्हणजे तर्री छान येते . आता त्यात राहिलेले मटण शिजवलेले पाणी म्हणजे मटण स्टॉक आणि थोडे गरम पाणी घालून घेणे . चवीनुसार मीठ घालून मंद आचेवर उकळून घेणे . तुम्हाला पाहिजे तेव्हढा रस्सा तयार करून घेणे , तसही हा रस्सा पातळच असतो . हा झाला आपला तांबडा रस्सा तय्यार .
आता आपण सुक्क मटण बनवूया
साहित्य : वरती रस्स्यासाठी वाटलेल्या मसाल्यातून दोन चार चमचे मसाला बाजूला काढून ठेवणे . एक कांदा बारीक चिरलेला , हळद अर्धा चमचा , लाल तिखट चार पाच चमचे , मीठ चवीनुसार , बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तेल .
कृती : कढईमध्ये तेलात कांदा परतवून घेणे नंतर त्यात वाटलेला मसाला घालून पुन्हा परतवणे . हळद लाल तिखट घालून परतवणे . आता यात शिजवलेले मटण आणि मीठ घालून नीट एकत्र करून घेणे . जास्त हलवून नाही घ्यायचे नाहीतर त्याचे तुकडे होतात अगदी हलक्या हाताने फिरवने . सगळे थोडावेळ परवून झाले कि त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकत्र करून घेणे .
आता एक मोठ्ठ ताट घेऊन त्यात एक सगळ्यात मोठ्ठ्या वाटीत तांबडा रस्सा फुल्ल भरून घ्यायचा आणि पांढरा रस्सा पण , बाजूला सुक मटण वाढायच भरपूर , मस्त ज्वारीच्या दोन गरमागरम भाकरी वाढायच्या . ते कांदा लिंबू घ्यायला विसरायचं नाही .
छान ताट सजवून झाले की फोटो बिटो काढायच्या भानगडीत न पडता सरळ खायला बसणे . नळी मस्त ताटात आपटून आपटून खायची , सगळ्यांनी बघितलेच पाहिजे आपल्याकडे .
किचन तुमचे आणि रेसिपी माझी .
असेच खात रहा आणि मला वाचत रहा .
रेसिपी आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका .
धन्यवाद .
सौं तृप्ती कोष्टी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा