Login

कोमेजलेले नाते भाग-१

कोमेजलेले नाते पुन्हा बहरेल का?
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

शीर्षक: कोमेजलेले नाते भाग -१

" तुला काहीच कसं जमत नाही गं?" शामराव चिडून म्हणाले.

तिला सुद्धा राग आला होता, परंतु ती काहीच बोलली नव्हती. कारण ज्या व्यक्तीला बोलले गेले आहे, त्या व्यक्तीने स्वतःहून बोलायला हवे, असे अवनीला वाटत होते. आपले काम आवरून ती घराबाहेर नोकरीला जाण्यासाठी निघत होती. तिला सतत जे दिसत होते, त्यावर ती दुर्लक्ष करण्या पलीकडे काहीच करू शकत नव्हती.

रात्री जेवताना पुन्हा वाद झाला होता.

" तुझी सासू आता ही युजलेस झाली आहे. " शामराव आपली सून अवनीला म्हणाले.

अवनीचा नवरा काही महिन्यांसाठी बाहेरच्या देशात कामाला गेला होता, त्यामुळे सासू-सासऱ्यांची जबाबदारी ही तिच्यावर होती.

" बाबा, तुम्ही आता बोलायला चुकत आहात. आईंना तब्येतीच्या तक्रारी आहेत, आपणच थोडेफार समजून घ्यायला हवे ना?" अवनीने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.

" सगळ्या गोष्टी ती विसरत आहे. तिच्यापेक्षा माझं वय जास्त असूनही, मी सर्व गोष्टी नीट करत आहे. उद्या तिच्या
अशा वागण्यामुळे कोणाला काही दुखापत झाली किंवा स्वतःलाच काही करून घेतले तर हे कसं तुला कळत नाही?" शामराव चिढून म्हणाले.

हे सर्व ऐकून अवनीच्या सासुला आपला होणारा अपमान सहन झाला नाही आणि त्यांनी सरळ आतल्या खोलीत जाऊन दरवाजा बंद केला.

" बाबा, तुम्ही सारखे आईंना घालून पाडून बोलता, ह्याने त्या खूप दुखावल्या जातात. जसे तुम्ही कामात निवृत्ती घेतली आहे; तसेच त्यांना सुद्धा ह्या घरातील कामातून निवृत्ती घ्यायला हवी, म्हणूनच मी आपल्याला एखादा मदतनीस असावा असा विचार केला होता; परंतु तोही तुम्हाला पटलेला नाही. आता तुमच्यासारखे त्यांचेही शरीर थकत आहे. त्यांनी आपल्याला समजून घेतले तर आपणही आता त्यांना समजून घ्यायला हवे ना?"


" अगं ते कोणालाही घरी ठेवायचे म्हणजे, चोऱ्या किती होतात ह्या बातम्या ऐकल्या असशील ना तू आणि  घरच्या जेवणासारखं काही मिळतं का ? आता काय मी ते लोक जेवण बनवून देईपर्यंत त्याची वाट बघत बसायची का?"  सासऱ्यांनी त्यावर आपले मत मांडले.

त्यावर आता काय बोलावे, हे अवनीला समजत नव्हते.  तिने दरवाजाची एक्स्ट्रा चावी घेतली आणि त्याने दरवाजा खोलला आतमध्ये तिची सासू रडत होती.

"सर्व ठीक होईल आणि तुम्ही काही काळजी करू नका." ती त्यांना धीर देत म्हणत होती.

कधी मीठ राहिले जेवणात, मनासारखे जेवण नसले किंवा वेळेत काम नाही केले की शामराव रागवायचे. आयुष्यभर शामराव ह्यांच्या कडक स्वभावाला त्यांच्या बायकोने सहन केले होते. तसेच त्यांना हल्ली विसरायला व्हायचे. उशिरा त्यांना मुलगा झाला असला, तरी वय हे काही त्याचे काळानुसार बदल दाखवणे थांबवत नव्हते; असेच त्यांचे झाले होते.

अवनीच्या नवऱ्याने आधीच त्याचे वडील तापट स्वभावाचे आहेत ते सांगितले होते. त्याची आई जास्त उलट उत्तर न देणारी होती, त्यामुळे ती सहन करत आली होती. तिला कितीही वेळा सांगितलं तरीसुद्धा ती कोणाला उलट बोलत नव्हती आणि मनामध्ये सर्व साठवण्याची सवय आणि त्यामुळे तिला मन मोकळे करता आले नव्हते.

सतत घाबरून आणि अबोल राहणे ह्यामुळे रक्तदाब आणि मधुमेह या सारख्या व्याधी जडलेल्या होत्या.  त्यामुळे तिच्याकडे विशेष लक्ष देण्याबद्दल तिच्या नवऱ्याने सांगितले होते.

अवनीची माहेरची परिस्थिती बिकट होती. तिच्या वडिलांनी काढलेल्या कर्जाचे हप्ते ती नोकरी करून फेडत होती आणि याला तिच्या सासरच्या लोकांची सुद्धा परवानगी होती. कामामुळे अवनीच्या नवऱ्याला बाहेर जावे लागणार हे सुद्धा तिने समजून घेतले होते.

झोपताना आपल्या नवऱ्याची या विषयावर बोलायचं,असा तिने विचार केला होता, तिच्या नवऱ्याला तिने फोन लावला.

त्याच्याशी फोनवर बोलणे होऊ शकले नव्हते, त्यामुळे पुढच्या गोष्टीचा विचार करत कधीतरी रात्री ती झोपून गेली.

लग्नानंतर नवरा बायकोचे नाते फुलवण्यासाठी अवनीला वेळ मिळाला नव्हता. जसे माझे आई-वडील तसेच माझ्या नवऱ्याचे आईवडील माझे आहेत. तसा विचार करून तिने त्या दोघांसोबत राहण्यास स्वतःहूनच होकार दिला होता. कारण तिच्या नवऱ्याची नोकरी ही स्थिर नव्हती आणि तिची नोकरी सोडून तिच्या कर्जाच्या हफ्ते फेडणे कठीण गेले असते. म्हणून त्यांनी दोघांनी संमतीने हा निर्णय घेतला होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी दाराची घंटी वाजली.

दारावरील समोरची व्यक्ती बघून शामराव प्रश्नार्थक नजरेने बघायला लागले.

क्रमशः

कोण होती ती व्यक्ती?

© विद्या कुंभार.

कथेचा भाग कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा.
0

🎭 Series Post

View all