कोण होती ती भाग २

Mystery
कोण आहे ती भाग २

राजेश व हर्षल दोघेही त्वरित हॉस्पिटलमध्ये पोहोचले. हितेशने त्यांना त्या मुलीने दिलेली चिठ्ठी दाखवली. राजेशने हॉस्पिटल मॅनेजमेंट सोबत बोलून हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज चेक केलं, पण कोणत्याच कॅमेऱ्यात त्या मुलीचा चेहरा दिसत नव्हता.

राजेश हॉस्पिटलच्या लॉबीत येरझाऱ्या मारत होता. हितेश व हर्षल डोक्याला हात लावून बाकड्यावर बसलेले होते.

“दादा, आपण त्या मुलीला शोधण्यासाठी पोलिसांची मदत घेतली तर…” हर्षल म्हणाला.

“नाही, नको. पोलिसांची मदत घेतली, तर यात मिडिया सहभागी होईल. पप्पांची व परिणामी आपल्या सगळ्यांचीच यातून बदनामी होईल.” राजेशने सांगितले.

“दादा, तू हे काय बोलतोय? पप्पांची आणि आपली बदनामी का होईल? या अश्या प्रकारे चिठ्ठी देऊन रक्त देणाऱ्या मुलीला आपल्याला शोधायचे आहे. चिठ्ठीचा पुरावा आपल्याकडे आहे. यात सरळसरळ ती मुलगी दोषी आहे हे आढळून येतंय. आपल्या बदनामीचा विषय यात येतोच कुठून?” हितेश राजेश जवळ येऊन म्हणाला.

“हितेश, हर्षल आपण त्या तिकडच्या स्पेशल रूममध्ये जाऊन बोलूयात. इथे आपलं बोलणं कोणी ऐकलं तर वेगळाच प्रॉब्लेम आपल्यापुढे उभा राहील.” राजेश त्या दोघांना घेऊन एका रूममध्ये गेला. त्याने रूमचा दरवाजा आतून लावून घेतला.

“दादा, असं काय आहे की जे आपण बाहेर बोलू शकलो नाही?” हर्षलला प्रश्न पडला होता.

“तुमच्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील, फक्त माझं थोडं शांतपणे ऐकून घ्या. हर्षल, हितेश मला हे सगळं तुम्हाला सांगायचं होतंच, फक्त मी योग्य वेळेची वाट बघत होतो. आज ती वेळ आली आहे, असं मला वाटतंय.

तुम्हाला पप्पांची एकच बाजू माहित आहे, त्यामुळे तुम्ही दोघेही हे ठामपणे सांगू शकत आहेत की, पप्पांनी आजवर कोणाचंही वाईट केलं नाही, त्यांच्या सारखा देवमाणूस शोधूनही सापडणार नाही. आपल्या घरातील एकमेव मी असा आहे की, पप्पांच्या दोन्ही बाजू मला माहित आहे.

तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की, मलाच ते सगळं कस माहिती झालं. साधारण एका वर्षापूर्वी मी पप्पांसोबत नागपूरला गेलो होतो, तिथे मला सगळं कळलं.

काल हर्षलने मला सहज विचारलं की, आपल्या तिघांपैकी एकाचाही रक्तगट पप्पांशी मॅच का होत नाही? त्यावेळी मी त्या प्रश्नाचं उत्तर मला माहित असूनही देणे टाळले.

नारायण वाघ हे आपले जन्मदाते नाहीयेत, ते आपले सावत्र पप्पा आहेत.” राजेशला मध्येच थांबवत हितेश जोरात म्हणाला,

“दादा, तू काहीही बोलू नकोस. बोलताना विचार करून बोल.”

हितेशला राजेशच्या बोलण्याचा राग आला होता, तर हर्षलच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होते.

राजेश पुढे म्हणाला,
“हितेश, तुला माझं बोलणं पटत नसेल तर डी एन ए टेस्ट करून घे, तेव्हाच तुझी खात्री पटेल. आता माझं बोलणं पूर्ण होईपर्यंत मध्ये बोलू नकोस. सत्य कितीही कटू असलं तरी ते सत्यच असतं.

आपण जो बिजनेस सांभाळतो आहे तो आपल्या आजोबांचा म्हणजेच आईच्या वडिलांचा होता. पप्पा
आजोबांकडे नोकरी करायचे. आपले जन्मदाते वडील, त्यांचं नाव मला माहित नाहीये. त्यांचं आणि आपल्या आईचं कधीच पटलं नाही. आई सतत तिच्या माहेरीच असायची, त्यामुळे आपल्या कोणालाही आपले जन्मदाते वडील किंवा त्यांचं घर आठवत नाहीये. तेच अधूनमधून इकडे येऊन रहायचे. आईला तिच्या सासरी राहणं कधीच आवडलं नाही. आपल्या जन्मदात्या वडिलांना ते घर सुटत नव्हतं आणि त्यांना आईही हवी होती, म्हणून ते काही दिवस इकडे, काही दिवस तिकडे असे रहायचे.

त्यात आपल्या आईची आणि पप्पांची भेट झाली. आईला पप्पा आवडू लागले, मग काय आईने आपल्या जन्मदात्या वडिलांना घटस्फोट दिला आणि पप्पांशी लग्न केलं. पप्पांनी आईसोबत लग्न केवळ पैशांसाठी केलं होतं.

पप्पांचं आधीच एक लग्न झालं होतं, हे त्यांनी आईपासून लपवून ठेवलं होतं. शिवाय त्यांना एक मुलगा आणि मुलगी पण होते. एके दिवशी पप्पांची पहिली बायको आणि दोन मुलं गावावरून इकडे आले, तेव्हा आईला खरं काय ते कळलं, पण पप्पांनी त्यांच्या पहिल्या बायकोला आणि मुलांना झिडकारून टाकलं. त्यांना पप्पांनी स्विकारलं नाही. त्यावेळी अजून बरच काही घडलं होतं, पण ते मला माहित नाही.

पप्पांच्या बाबतीतील अजून एक सत्य म्हणजे त्यांना बाई आणि बाटलीचा छंद होता, त्यांनी त्यांचं हे रूप आईपासून आणि जगापासून लपवून ठेवलं होतं. आईला जेव्हा हे सत्य समजलं तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला होता. पप्पा आज सुधारतील, उद्या सुधारतील या आशेतच ती शेवटच्या श्वासापर्यंत होती.

आज पप्पांना जो त्रास होत आहे, ते त्यांच्याच कर्माचं फळ आहे. मला शंका आहे की, जी मुलगी पप्पांना रक्त द्यायला आली होती, ती त्यांचीच मुलगी असेल. पण ती मुलगी भेटल्याशिवाय आपल्याला खर काय ते कळणार नाही.”

“दादा, तू जे म्हणतो ते खरं असेल, पण आपण त्या मुलीला शोधायचं कसं आणि कुठे? ती खरंच पप्पांची मुलगी असेल का? आणि ती पप्पांना अजून काय त्रास देणार असेल?” हर्षलला प्रश्न पडले होते.

यावर थोडा विचार करून राजेश म्हणाला,
“पप्पांच्या ज्या नागपूरच्या मित्राकडून मला ही माहिती मिळाली त्या मित्राकडे चौकशी करून बघतो. कदाचित त्यांना काही आयडिया असेल.”

राजेश मोबाईल घेऊन त्याच्या पप्पांच्या मित्राचा नंबर शोधत होता, तोच दरवाजावर कोणीतरी टकटक आवाज झाला. हितेशने दरवाजा उघडला, तर एक वॉर्डबॉय उभा होता,
“साहेब, तुमच्यासाठी एक मुलगी येऊन ही चिठ्ठी देऊन गेली.”

हितेशने त्याच्या हातातील चिठ्ठी घेतल्यावर तो वॉर्डबॉय निघून गेला. राजेश व हर्षल त्याच्या जवळ येऊन तिघे मिळून चिठ्ठी वाचू लागले,
“तुम्ही मला शोधण्याचा प्रयत्न करताय ना? चला तर मग मीच तुमची मदत करते. आधारवड महिलाश्रमात जा, तिथे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतील.”

“आधारवड महिलाश्रम! त्या आश्रमाला तर पप्पा दरवर्षी भरगोस देणगी देत असतात.” हर्षलने आपली प्रतिक्रिया दिली.

“हितेश, तू आमच्यासोबत आश्रमात येणार आहेस का?” राजेशने हितेशकडे बघून विचारले.

“नाही. मी पप्पांसोबत इथेच थांबतो. तुम्ही दोघे जाऊन या.” हितेश खाली मान घालून म्हणाला.

राजेशने हॉस्पिटल मधून निघण्यापूर्वी पुन्हा एकदा सीसीटीव्ही फुटेज चेक केलं, तर वॉर्डबॉयला चिठ्ठी देणाऱ्या मुलीनेही तोंडाला स्कार्फ बांधलेला होता, पण तिच्या अंगकाठी व उंचीवरून ही आणि पहिली मुलगी वेगवेगळ्या आहेत, हे दिसून आले. आता ही मुलगी कोण? हाही प्रश्न राजेश समोर उभा राहिला.

आधारवड आश्रमात गेल्यावर दोन्ही मुली भेटतील का? बघूया पुढील भागात….
©®Dr Supriya Dighe