कोण होती ती भाग ३(अंतिम)

Mystery
कोण होती ती भाग ३ (अंतिम)

हॉस्पिटलमधून निघाल्यावर राजेश व हर्षल दोघेही आपल्या घरी गेले, तिथे ते फ्रेश झाले आणि मग ते आधारवड आश्रमाच्या दिशेने निघाले.

“दादा, आपण हॉस्पिटलमधून निघाल्यापासून बघतोय की, तू काहीच बोलत नाहीयेस, कोणता तरी गहन विचार करत आहेस. नेमकं तुझ्या डोक्यात चालू तरी काय आहे?” हर्षलला प्रश्न पडला होता.

यावर राजेश म्हणाला, “हर्षल, पप्पांना रक्त देणारी मुलगी आणि हॉस्पिटलमध्ये चिठ्ठी देऊन गेलेली मुलगी या दोन मुली वेगवेगळ्या आहेत, त्यांच्या शरीरयष्टीवरून तो अंदाज आपल्या सगळ्यांनाच आला आहे. पप्पांना रक्त देणारी मुलगी ही त्यांची मुलगी आहे अस आपण समजून चाललो, तरी ती दुसरी मुलगी कोण हा प्रश्न पुढे आहेच शिवाय या दोन मुली एकत्र आहेत हेही कळतंय.

आपल्याला त्यांनी ज्या आश्रमात बोलावलं आहे त्या आश्रमाला आपले पप्पा देणगीही द्यायचे. नेमकं हा मॅटर काय आहे हेच मला कळत नाहीये. मला तर असं वाटतंय की, पप्पांनी आपल्यापासून अजून खूप काही लपवून ठेवल आहे जे की आपल्याला माहिती नाहीये.”

“दादा, आता या सगळ्याचा विचार करून काहीच उपयोग होणार नाही. आश्रमात गेल्यावरच खरं काय आणि खोटं काय हे आपल्यासमोर येईलच.” हर्षल.

पुढील काही वेळातच हर्षल आणि राजेश आधारवड आश्रमात पोहोचले. आश्रमात गेल्यावर ते थेट संचालकांच्या केबिनमध्ये गेले. राजेश व हर्षलला बघून संचालक म्हणाले,

“वाघ साहेब हॉस्पिटलमध्ये आहेत, म्हणून तुम्ही आज इकडे आलात का? वाघ साहेबांनी इतकी वर्षे आजचा दिवस कधीच चुकवला नाही.”

राजेश व हर्षलला त्यांचे बोलणे कळत नसल्याने राजेश पुढे म्हणाला,
“सर, तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? आज आश्रमात काय आहे?”

“अच्छा. तुम्हाला काहीच माहीत नाहीये तर… मला वाटलं, वाघ साहेबांनी तुम्हाला सगळं सांगितलं असेल. वाघ साहेबांच्या बंगल्यात एक मोलकरीण रहायची, तिची आज पुण्यतिथी आहे, त्यांच्या स्मरणार्थ आश्रमात दरवर्षी पुजा असते. पुजा संपतच येईल, मी तिकडे जातो, तुम्हीपण या.” हे बोलून संचालक तेथून निघून गेले.

राजेश व हर्षलने एकमेकांकडे बघितले. दोघांच्याही डोळ्यात आश्चर्य होते.

“साहेब जे बोलले त्याने धक्का बसला असेल ना, टेबलवर जे पाण्याचे दोन ग्लास ठेवलेत, ते तुमच्याचसाठी ठेवले आहेत.” राजेश व हर्षलने आवाजाच्या दिशेने वळून बघितले तर तिथे एक मुलगी उभी होती.

“तू कोण आहेस?” राजेशने विचारले.

“मी तीच मुलगी आहे, जिने तुमच्या पप्पांना रक्त देऊन जीवनदान दिले.” त्या मुलीने अतिशय शांतपणे उत्तर दिले.

“हे सगळं करण्यामागे तुझा हेतू काय आहे? आधी तू पप्पांना रक्त दिले, नंतर चिठ्ठी लिहून धमकी दिली. पुन्हा एक चिठ्ठी देऊन आम्हाला इथे आश्रमात बोलावले.” राजेश.

“मी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल. आधी बाहेर जी पुजा सुरू आहे ती संपूदेत. जास्त वेळ नाही, फक्त १५ मिनिटे वाट बघा.” एवढं बोलून ती मुलगी केबिन मधून बाहेर निघून गेली.

राजेश व हर्षलही पुजेच्या ठिकाणी जाऊन आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण करत होते. त्यांच्याशी जी मुलगी बोलली तिच्या हालचालींवर राजेश बारीक लक्ष ठेवून होता. पुढील काही वेळात पुजा संपन्न झाली. त्या मुलीने राजेश व हर्षलला खुणेने तिच्या मागे यायला सांगितले. ती मुलगी त्या दोघांना एका रूममध्ये घेऊन गेली.

रूममध्ये तीन खुर्च्या व एक टेबल ठेवलेला होता. बाकी रूममध्ये काहीच सामान नव्हते. राजेश व हर्षल रूममध्ये सर्वत्र आश्चर्याने बघत होते.

“ही काऊनसेलिंग रूम असल्याने इथे दुसऱ्या कोणत्याच वस्तू ठेवण्यात आलेल्या नाहीत. तुम्ही बसा.” खुर्च्यांकडे हात दाखवत ती म्हणाली.

टेबलच्या एका बाजूला एक खुर्ची व दुसऱ्या बाजूला दोन खुर्च्या होत्या. एका खुर्चीत ती मुलगी बसली आणि समोरील दोन खुर्च्यांमध्ये राजेश व हर्षल बसले.

त्या मुलीने बोलायला सुरुवात केली,
“ माझं नाव कोमल. आता बाहेर ज्या स्त्रीच्या पुण्यतिथी बद्दल पुजा सुरू होती. ती माझी आई. नारायण वाघ हे माझे जन्मदाते वडील आहेत. ही माझी ओळख.”

“कोमल, तू पप्पांना रक्त दिलं आणि वर धमकीवजा चिठ्ठी का लिहून आलीस?” राजेशने त्याच्या मनातील प्रश्न विचारला.

“मी त्यांना रक्त दिलं, कारण ते या आश्रमासाठी खूप काही करत आहेत. आज केवळ त्यांच्यामुळे ह्या आश्रमात बऱ्याच निराधार महिला व मुलींना आधार मिळाला आहे. तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील सत्य कळावं म्हणून मी ती चिठ्ठी लिहिली होती.

मी आईच्या पोटात असतानाच बाबा गावावरून इकडे आले, त्यांना नोकरी लागली. तुमच्या आईच्या आणि पैशांच्या प्रेमात बाबा पडले. बाबांच्या मनात एकदाही माझी आई, भाऊ आणि माझा विचार आला नाही. आईला बाबांच्या लग्नाबद्दल कळलं, तेव्हा ती आम्हाला दोघांना घेऊन तुमच्या घरी आली होती, तेव्हा बाबांनी आम्हाला नाकारलं. बाबांनी आम्हाला स्विकारलं नाही. त्यावेळी माझा भाऊ चार वर्षांचा आणि मी सहा महिन्यांची होते.

एवढ्या मोठ्या शहरात कुठे रहायचं? हा प्रश्न आईसमोर उभा होता. आई आम्हाला दोघांना घेऊन फुटपाथच्या कडेला हताश होऊन बसली होती. मध्यरात्री बाबा गाडी घेऊन आम्हाला घ्यायला आले होते. आईला वाटलं होतं की, बाबांना त्यांची चूक उमगली असेल.

बाबा आम्हा तिघांना घेऊन शहरापासून दूरवर असलेल्या एका बंगल्यात घेऊन गेले. बाबांनी मदत करण्याचे नाटक केले होते. बाबा खूप दारू प्यायलेले होते. बंगल्यात गेल्या गेल्या बाबा एखाद्या हैवानासारखे तुटून पडले होते. आई ओरडत होती, म्हणून माझा भाऊ बाबांच्या पायात घुटमळत होता. बाबांनी त्याला इतक्या जोरात लाथ मारली की तो जागेवर गेला. आई ओरडून ओरडून थकली, पण तिच्या मदतीला कोणीच आलं नाही.

बाबा नशेतच बेशुद्ध झाले. माझ्या रडण्याच्या आवाजाने तो बंगला घुमत होता. त्या घरात एक मोलकरीण रहायची. तिला माझी कीव आली आणि ती मला रात्रीच लांब तिच्या गावाला घेऊन गेली. मी तिलाच माझी आई समजायचे.

बारावीत असताना हुशार विद्यार्थी म्हणून शाळेत बाबांच्या हस्ते माझा सत्कार झाला. पुढील शिक्षण व्यवस्थित मिळावे म्हणून बाबा मला या आश्रमात घेऊन आले. इकडे येण्याआधी मला माझ्या यशोदा मातेने माझ्या आयुष्याचं सत्य मला सांगितलं होतं.

मला शिक्षणाची गरज असल्याने मी शांत बसले. हळूहळू बाबांची माहिती काढली. तुम्ही तिघे आणि हा समाज बाबांना जो मान देतात ते त्या योग्यतेचे नाहीत. हे किमान तुम्हाला समजावे यासाठी योग्य संधीची मी वाट बघत होते, ती संधी आली आणि मी त्या संधीचा फायदा घेतला.” बोलता बोलता कोमलच्या डोळ्यात पाणी आलं.

“कोमल, तुझ्या आईचा मृत्यू कसा झाला?” राजेशने विचारले.

“मला माहीत नाही आणि मला माहितीही करून घ्यायचं नाहीये.” कोमलने उत्तर दिले.

“तू आम्हाला हे सत्य सांगितलं, त्याचा तुला फायदा काय?” राजेशने पुढील प्रश्न विचारला.

“त्यांच्या सावत्र मुलांच्या मनात त्यांच्या बद्दल असलेला आदर संपुष्टात येणे, हीच त्यांच्यासाठी शिक्षा आहे. तुम्हाला तुमचे पप्पा देवमाणूस वाटायचे, त्यांची ती प्रतिमा पुसली जावी हीच माझी इच्छा होती.

माझं बोलून झालं आहे, मी निघते. तुम्ही मला पुन्हा कितीही शोधण्याचा प्रयत्न केला तरी मी तुम्हाला सापडणार नाही. अरे हो एक सांगायचं राहून गेलं, दुसऱ्यांदा जेव्हा ती मुलगी वॉर्डबॉयकडे चिठ्ठी द्यायला आली होती, ती मुलगी माझी एक मैत्रीण होती.” एवढं बोलून कोमल त्या रुममधून बाहेर पडली.

नारायण वाघ बरे होऊन घरी आल्यावर राजेशने त्यांना कोमल बद्दल सांगितलं. आपल्या मुलांना आपल्या आयुष्यातील दडवून ठेवलेले घाणेरडे सत्य कळल्याने ते त्यांच्यासमोर कधीच मान वर करून बोलू शकले नाही.

समाप्त
©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all