Login

कोण लिहितंय ? भाग - २ (अंतिम भाग)

एक रहस्यमयी नोटबुक रोज अवनीला अनोखे संदेश लिहून दाखवतं, ज्यातून आर्याच्या मृत्यूचं गूढ उघडतं. शेवटी अवनी सत्य बाहेर काढते आणि आर्याला न्याय मिळवून तिच्या आत्म्याला मुक्त करते.
कोण लिहितंय ? भाग - २ (अंतिम भाग)


दाराबाहेरची सावली हलत होती. कुलूप हलण्याचा मंद आवाज अवनीच्या शरीरात थरकाप निर्माण करत होता.

नोटबुकवर लिहिलेलं शेवटचं वाक्य,
“अवनी… पळ! आत्ता!” तिच्या कानात घुमत होतं.

अवनीने डोळे पुसले आणि खोलीभोवती नजर फिरवली.
एकच रस्ता होता, खिडकी. तिने हळूच खिडकी उघडली.
बाहेर जिन्याच्या पाईपची रेल होती.
ती धरून खाली उतरता येऊ शकलं असतं, पण पाच मजले खाली होती.

भीती आणि जगायची इच्छा, दोन्ही तिच्यात संघर्ष करत होते. दार पुन्हा हललं. कोणी तरी दबक्या पावलांनी ते उघडण्याचा प्रयत्न करत होतं.

अवनीने नोटबुक छातीशी धरली आणि खिडकीतून बाहेर सरकली. तिचे पाय थरथरत होते, पण तिने पाईपला पकडलं. पाठीमागून दाराचं कुलूप टक करून उघडलं.
अवनी खाली उतरू लागली.

पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचेपर्यंत तिचे हात दुखायला लागले होते, पण ती थांबली नाही. ती थेट रजिस्टर ठेवलेल्या भूतलाच्या कॅबिनकडे धावत आली.

कॅबिनमध्ये फक्त एकच लाईट चालू होता. तिने जोराने दार बंद केले.
श्वास लागलेला…डोळ्यात अश्रू…नोटबुक हातात.

तीने नोटबुक उघडली. नवं वाक्य लिहिलं जात होतं,
“अवनी, आता तू सुरक्षित नाहीस. सत्य ऐक.”
अवनी कोसळत म्हणाली, “आर्या… मला सगळं सांग.”
पानावर हळूहळू अक्षरं दिसू लागली,
“माझा मृत्यू अपघात नव्हता. मी काहीतरी मोठं उघड करणार होते… आणि कुणीतरी मला थांबवलं.”
“कोण?” अवनीचा आवाज कमकुवत झाला.
नवीन ओळ उमटली, “हॉस्टेलचा वॉर्डन, श्री. लोखंडे.”

अवनी हादरली. वॉर्डन लोखंडे?
तो तर मुलींवर कडक शिस्त लावणारा, सर्वांना “बाबासारखा” वाटणारा…

पण आर्याने उघड केलं, तो रात्री मुलींच्या खोल्यांमध्ये चोरुन फोन चेक करायचा, फोटो शोधायचा, आणि काही मुलींवर दबाव ठेवायचा. आर्याने त्याला पकडलं होतं.
ती त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा करत होती.

त्या रात्री… लोखंडेने तिला थांबवलं.
काय झालं ते कुणी पाहिलं नाही.
आर्याचा मृत्यू “आत्महत्या” म्हणून दाखवला गेला.

अवनी थरथरली. तिच्या लक्षात आलं,
काल रात्री पावलांचा आवाजही लोखंडेचाच होता.

आता तो तिलाही मारणार होता. जसं त्याने आर्याला थांबवलं होतं… तसंच.

धावतधावत अवनी सरळ CCTV रूमकडे गेली.
तिने गेट उघडून स्क्रीनसुद्धा ऑन केली.

रात्री ३ वाजताची फुटेज रिवाइंड केली, तिला स्पष्ट दिसलं:
लोखंडे अवनीच्या फ्लोअरवर फिरतोय, तिच्या दाराजवळ जाऊन ऐकतोय, आणि भंगार चावीने कुलूप उघडतोय.

अवनीचा श्वास थांबला. त्याची सावली… त्याचं वागणं… सगळं फुटेजमध्ये होतं.
तेवढ्यात नोटबुक उघडं राहून एक वाक्य लिहिलं,
“हेच पुरावे घेऊन पोलिसांकडे जा. मला न्याय दे.”
अवनीने मोबाइलमध्ये फुटेज रेकॉर्ड केलं.
नोटबुक हातात घेतलं.
पण ती दाराकडे वळणार, इतक्यात,
लोखंडे स्वतः CCTV रूमच्या दारात उभा होता.
त्याच्या डोळ्यांत वेड्यासारखी चमक.
कोपऱ्यात अडकलेल्या अवनीकडे तो हळूहळू येत होता.
“अवनी… तुला एवढं कळायला नको होतं.”
“तू आर्याला मारलं… माझ्यापर्यंत का आलास?” अवनी ओरडली.

लोखंडे हसला. “तू आर्यासारखीच हुशार आहेस आणि त्याच खोलित राहतेस. मी तुला पाहत होतो. तुझी हालचाल… तुझे प्रश्न…”
तो जवळ येत होता. “आज हे सगळं संपेल.”

अवनी मागे सरकत होती. नोटबुक तिच्या हातात थरथरत होतं.

तेवढ्यात, पानावर स्वतःहून मोठी ओळ उमटली,
“अवनी, खिडकीच्या बाहेर उडी मार!”
अवनीने भान हरवून खिडकी उघडली आणि बाहेर उडी मारली. ती पहिल्या मजल्यावर होती, जखमी झाली, पण वाचली. लोखंडे खिडकीतून ओरडत राहिला.अवनी पळत पळत हॉस्टेलच्या बाहेर आली.

अवनी थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली.
तिने, CCTV फुटेज, लोखंडेचा आवाज, नोटबुकमधील संदेश सगळं दाखवलं.

पोलीस लगेच हॉस्टेलमध्ये गेले आणि लोखंडे पळून जाण्यापूर्वी त्याला पकडलं.
त्याच्या खोलीतून, मुलींचे फोटो, चोरुन घेतलेले फोन,
आर्याचं खरं नोटबुक सापडलं.

आर्याच्या मृत्यूचं प्रकरण पुन्हा उघडलं गेलं.
लोखंडेने अनेक गुन्हे कबुल केले.
आर्याच्या मृत्यूमागचं सत्य प्रकाशात आलं.

सगळं शांत झाल्यावर अवनी हॉस्टेलमधून बाहेर येत होती. तिच्या हातात ते नोटबुक होतं. ती शेवटची ते उघडत होती. पानावर फक्त एकच ओळ लिहिली होती,
“धन्यवाद अवनी… आता मी मुक्त आहे.”
पुढचं पान आपोआप रिकामं झालं. त्यावरचं जुनं लिहिलेलं नाहिसं झालं.
जणू आर्याची आत्मा शेवटी मुक्त झाली होती.
अवनी नोटबुक बंद करून आकाशाकडे पाहत हसली.
शांत वारा तिच्या गालावरून फिरला.
एक हलकीशी फुसफुसणारा आवाज…
जणू आर्या म्हणतेय, “आता सगळं संपलं.”