मागील भागात आपण पाहिले की आबासाहेब स्वानंदीला त्यांना मंत्रीपद मिळावे म्हणून हालचाल करायला सांगतात. आता बघू पुढे काय होते ते.
" काय सूनबाई, आलात का बाहेर जाऊन?" आबासाहेबांनी स्वानंदीला विचारले.
" अहो, आत्ताच तर आली ती. जरा बसू तर दे." वत्सलाताई बोलल्या. रणजीत, आबासाहेब आणि आता या.. खोटी काळजी दाखवतात की काम होईपर्यंत खरी.. स्वानंदीने मनात विचार केला.
"इट्स ओके आई.. आबासाहेब मी सतेजला भेटून आले. तो काकांशी बोलून बघणार आहे. पण सध्या तरी ते लोकसभेच्या निवडणुकीकडे जास्त लक्ष देत आहेत." ते ऐकताच आबासाहेबांचे डोळे चमकले.
" सूनबाई, मग या निवडणुकीचे तिकीट मिळते का बघा की आपल्या रणजीतला. आमचा प्रयत्न चालूच आहे. पण तुम्ही जरा नेट लावलात तर."
" आबासाहेब, मी फक्त सतेजची मैत्रिण आहे." स्वानंदी म्हणाली.
" हो.. पण तुमचे वडिल तर सगळ्यांचेच मित्र आहेत ना. मी बोलू का त्यांच्याशी?"
" नको.." स्वानंदी पटकन बोलली. " मी बोलते काकांशी." ती तिथून निघाली. वत्सलाताई बोलत होत्या.
" दमूनभागून आलेली पोर ती.. लगेच काय चौकशा? पाणी तरी पिऊ द्यायचे."
" तुम्ही आम्हाला शिकवू नका. आता जर धरून ठेवले तर आणि तरच रणजीतला तिकिट मिळेल. हे राजकारण आहे. जोपर्यंत चलती आहे तोपर्यंतच काम करून घेतले पाहिजे." स्वानंदीने खोलीचा दरवाजा लावून घेतला. आणि इतका वेळ धरून ठेवलेला अश्रूंचा बांध फुटला. काय होते आयुष्य आणि काय झाले आहे.
त्यादिवशी पहिल्यांदाच रणजीत दारू न पिता घरी आला होता. तो थोडा बेचैन दिसत होता. अजूनही त्याला सतेजसोबत हसून बोलणारी स्वानंदी आठवत होती. तो खोलीत आला. स्वानंदी पुस्तक वाचत बसली होती. रणजीत जाऊन तिच्यासमोर उभा राहिला.
" तू का वागतेस माझ्याशी असं?"
" मी? मी काय वागले तुझ्याशी?" स्वानंदीने आश्चर्याने विचारले.
" त्या सतेजसोबत कशी असतेस, आणि माझ्यासोबत? सतत तोंडावर बारा वाजलेले असतात."
" कोण जबाबदार आहे त्याला?" स्वानंदीने आवाज न चढवता विचारले.
" मी जबाबदार आहे म्हणायचे आहे का तुला? व्वा.. हे म्हणजे स्वतः बाहेर मजा मारायची आणि दुसऱ्यांसमोर सज्जनपणाचा आव आणायचा."
" मी काय मजा केली?"
" तो सतेज बोलला होता ना आपल्या लग्नाच्या दिवशीच.. आणि आजही."
" माझ्यावर घाणेरडे आरोप करण्याआधी एक गोष्ट आठव की तुझ्याच वडिलांनी मला त्याला भेटायला सांगितले होते. मी माझ्यासाठी भेटायला गेले नव्हते."
" नाव आबांचं.. आणि.." स्वानंदीला ते शब्द ऐकवेनात. तिने पुस्तक बंद केले आणि ती बाहेर जायला निघाली.
" एक गोष्ट याद राख. माझी वस्तू मी सहजासहजी कोणाला देत नाही." रणजीतने स्वानंदीचा दंड घट्ट पकडला होता. स्वानंदीने त्याचा हात झटकला आणि ती बाहेर निघून गेली. खाली वत्सलाताई आणि आबासाहेबांसमोर तिला जायचे नव्हते. डोकं शांत करायला ती गच्चीवर गेली. गार वारा सुटला होता. समोर बाग दिसत होती. रातराणीचा मंद सुवास दरवळत होता. टिपूर चांदणं पडलं होतं. तिचा गेलेला मूड परत येत होता. दूर कोणीतरी गिटार वाजवत होतं. ती झोपाळ्यावर बसून ते ऐकू लागली. तिने डोळे मिटून घेतले. तिच्या हातावर कोणीतरी हात ठेवला. तिने डोळे न उघडता तो स्पर्श स्वतःमध्ये सामावून घेतला.
" मला माफ कर. माझ्यामुळे ही वेळ तुझ्यावर आली आहे." मिहीर बोलला.
" काही गोष्टी माफी मागून दुरूस्त होत नाहीत."
" मग काय करू मी?"
" वेळ आली की नक्की सांगेन."
त्यानंतरचे स्वानंदीचे काही दिवस खूपच बिझी गेले. सतत कोणाला ना कोणाला भेटणं. इथे जा तिथे जा. जे चालू होते ते रणजीतसाठीच होते त्यामुळे तो काहीच बोलू शकत नव्हता. मग एक दिवस आबासाहेबांना हवी असलेली बातमी मिळाली. रणजीतला तिकिट मिळेल असे आश्वासन त्यांना मिळाले होते. औपचारिक घोषणा होणे तसे बाकी होते. पण आबासाहेबांनी मात्र तिकिट मिळाल्यासारखीच प्रचाराची तयारी करायला सुरुवात केली.
रणजीत जिंकेल का ही निवडणूक? तो मानेल का त्यासाठी स्वानंदीचे आभार? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा