Login

कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे

कथा त्या तिघांची


कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे..


" मीत ना मिला रे मन का.. मीत ना मिला रे मन का.. कोई तो मिलन का करो रे उपाय.." मिहीर एकटाच गाणे म्हणत समुद्रकिनारी बसला होता.. समोर पसरलेला अथांग सागर, वर लुकलुकणारे तारे, आजूबाजूला सुपारीपोफळीच्या झाडांवर पसरलेली रात्र.. आपला एकटेपणा त्याला परत जाणवला. कितीतरी वेळ उदास असा बसून तो तेच गाणं परतपरत गुणगुणत होता.


" मिहीर, अरे कधीचा शोधतो आहे तुला." रूद्र धापा टाकत आलेला दिसून येत होते.

" का रे? काय झाले?"

" अरे तो रणजीत वेडा झाला आहे. बाटलीमागून बाटली रिचवतो आहे. तूच फक्त त्याला यापासून थांबवू शकतोस."

" पण असं काय झालं?" मिहीरने उठून वाळू झाडत विचारले.

" ते मलाही माहित नाही. तू सकाळी लवकर गेलास. त्यानंतर आम्ही आवरून जवळच्या किल्ल्यावर गेलो होतो. तिथून आल्यापासून जो बसला आहे तो उठलाच नाही."

" एक दिवस मी काय बाहेर गेलो, एवढा प्रॉब्लेम? चल बघू. आबासाहेबांना समजलं तर मला बोलणी बसतील." मिहीर आणि रूद्र हॉटेलच्या दिशेने निघाले.

"तू फोन का बंद ठेवलास?" रस्त्याने चालताना रूद्रने विचारले.

" सहजच रे.. खूप वर्षांनी गावी आलो ना.. काही जुन्या आठवणी ताज्या होतात का बघत होतो."

" मग झाल्या का?"

" नाही रे.. गाव सोडलं तेव्हा तीनचार वर्षांचा होतो.. काय आठवणार?" मिहीर खिन्नपणे बोलला. "तुला काय माहित मी समुद्र किनाऱ्यावर होतो ते?"

" कवी कुठे असणार? निसर्गाच्या सान्निध्यात. अंदाज लावला." दोघे बोलत बोलत हॉटेलमध्ये आले. खोलीत रणजीत दारू पित होता. बाकीचे मित्र त्याला समजावत होते. तो कोणाचेच ऐकत नव्हता.

" अरे काय, एका दिवसात आमच्या गावातली सगळी दारू संपवणार की काय?" मिहीरने वातावरण हलके करण्याचा प्रयत्न केला. रणजीतने रागाने मिहीरकडे बघितले.

" नोकर आहेस.. नोकरच रहा.. सांगितलेली कामे करायची आणि बाजूला व्हायचे. जास्त बोलायचे नाही." रणजीतचे शब्द ऐकून मिहीरचा चेहरा उतरला. रणजीतने बाकींच्याकडे बघताच खोली रिकामी झाली. रणजीत आणि मिहीर दोघेच उरले होते. रणजीतने मोबाईल काढला. त्यातला एक फोटो त्याने मिहीरला दाखवला.

" कोणत्याही परिस्थितीत ही मला मिळालीच पाहिजे.." दारू जास्त झाल्याने रणजीतचा झोक जात होता.

" हो.. मी बघतो."

" बघू नकोस.. तुझे गाव आहे म्हणून तिला उचलून इथे राडा केला नाही. पण मला ती आवडली हे नक्की.. समजलं?" मिहीरने रणजीतला पलंगावर झोपवले. दुसर्‍या मिनिटातच तो गाढ झोपी गेला. मिहीरने तो फोटो परत बघितला.. गोरापान चेहरा, चाफेकळी नाक, लांबसडक मोकळे सोडलेले केस, काळेभोर डोळे. रणजीतने तिच्या नकळत खूप फोटो काढलेले दिसत होते. मग स्वतः तिच्याशी न बोलता आपल्या गळ्यात हे का टाकले असावे? मिहीर स्वतःशीच विचार करत होता. त्याने परत फोटो बघितला. तो फोटो नजरेआड करायची इच्छा होत नव्हती. त्याने पटकन ते फोटो स्वतःला पाठवून घेतले. तो स्वतःच्या खोलीत आला. त्याने डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न केला पण डोळ्यासमोर तोच फोटोतला चेहरा येत होता..



कोण असेल ती फोटोतली तरूणी? का नाही रणजीत स्वतः बोलला तिच्याशी? मिहीर काही मदत करू शकेल का? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all