मागील भागात आपण पाहिले की रणजीतला काहिही करून स्वानंदीचा होकार मिळवायचा असतो. बघू आता पुढे काय होते ते.
" तू प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है.." समोर आमिरखान जीव तोडून गाणं म्हणत होता आणि मिहीर स्वानंदीच्या विचारात गुंतला होता.
" साहेब, काही हवं आहे का? साहेब.." हॉटेलमधल्या माणसाने, बबल्याने परत येऊन विचारले.
" नाही रे काही नको."
" असं कसं साहेब? सकाळपासून काही खाल्लं नाहीत तुम्ही. काय हवं ते सांगा पटकन. नंतर तीन तास किचन बंद होईल. काही अडचण आहे का? मी मदत करू का?"
" तू काय मदत करणार मला?"
" सांगून तर बघा.." तो पाठीच लागला.
मिहीरने प्रयत्न करून बघायचे ठरवले. त्याने स्वानंदीचा फोटो त्याला दाखवला.
मिहीरने प्रयत्न करून बघायचे ठरवले. त्याने स्वानंदीचा फोटो त्याला दाखवला.
" या तर स्वानंदी ताई.."
" तू ओळखतोस?"
" यांना कोण नाय ओळखत? खूप प्रेमळ कुटुंब आहे. माझी बायको जाते यांच्या बंगल्यावर कधीतरी बदली काम करायला." मिहीरला आशेचा किरण दिसू लागला.
"यांच्यात काही दोष आहे का?"
" दोष? कसला दोष? अहो यांच्यासारखं माणूस शोधून सापडणार नाही.."
" मग त्यांनी अजून लग्न का केले नाही? एवढ्या सुंदर, श्रीमंत. मग कधीच कोणत्याच मुलासोबत त्यांचा फोटो दिसत नाही असं का?" मिहीरने शक्य तेवढा निरागस चेहरा ठेवत विचारले.
" साहेब, नक्की काय भानगड आहे? एवढी का चौकशी करताय?" बबल्याने डोळे बारीक करत विचारले.
" भानगड अशी नाही रे. काल त्यांना बघितले.. वाटलं विचारावसं. तुला राग आला असेल तर नको सांगू.."
" राग असा नाही.. तसेही तुम्ही दिसायला, वागायला चांगले आहात.. त्या दुसर्या साहेंबासारखे नाही. तुम्हाला जर ताई आवडल्या असतील तर सांगतो. तसेही साहेबांना पण आता त्यांच्या लग्नाचे टेन्शन आलं आहे." बबल्याचे पुराण संपतच नव्हते.
" अरे ताईसाहेबांचे सांगतो आहेस ना?"
" हो.. सांगतो ना. त्यांना लग्न करायचे आहे पण त्यांना कोणी पसंत पडतच नाही. आजपर्यंत भरपूर मुले येऊन गेली , त्या बोलून बघतात पण परत नन्नाचा पाढा." मिहीर विचार करत होता.
" मला लावू शकशील त्यांच्या बंगल्यात कामाला?" मिहीरने पटकन विचारले.
" साहेब तुम्ही??" बबल्याने आश्चर्याने विचारले.
" हो.. मला कसंही करून काही दिवस तरी तिथे काम करून त्या स्वानंदीचे मन जाणून घ्यायचे आहे. पैशाची काळजी करू नकोस.."
" सगळ्याच गोष्टी पैशात नाही मोजता येत साहेब. मी करेन तुम्हाला मदत.." बबल्याच्या मदतीने मिहीरने स्वानंदीच्या बंगल्यात प्रवेश मिळवला. पण ती आणि तिच्या वडिलांसमोर येणे मात्र त्याने टाळले. ना त्याने स्वानंदीला प्रत्यक्ष पाहिले ना तो तिच्या नजरेस पडला. बबल्याच्या ओळखीचा त्याला असा फायदा झाला होता. स्वानंदी घरात नसताना त्याने अख्खा बंगला पालथा घातला. तिथे आश्चर्याची एकच गोष्ट होती. पूर्ण बंगला विजेच्या दिव्याने लखलखत असताना स्वानंदीच्या खोलीतल्या खिडकीत एक तेलाचा दिवा सतत तेवत असायचा. सकाळ असो वा संध्याकाळ, उन असो वा पाऊस, तो दिवा सतत तेवत असायचा. मिहीरने बबल्याच्या बायकोला हिराला याचे कारण विचारले.
" मलापण माहित नाही. मी जशी बघते आहे तसा हा दिवा चालूच आहे.."
या दिव्याचेच काही रहस्य आहे असे राहून राहून मिहीरला वाटायला लागले. त्याने निघताना हिराचे लक्ष नाही हे बघून तो दिवा विझवून टाकला.
काय असेल कारण तो दिवा सतत तेवत ठेवण्यामागचे? स्वानंदी खुश होईल की नाराज बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा