Login

कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे.. भाग ६

कथा त्या तिघांची


कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे.. भाग ६


मागील भागात आपण पाहिले की स्वानंदी रणजीतला भेटायला जाते.. आता बघू पुढे काय होते ते.

" मिहीर.. मिहीर.. मुलगी पटली रे पटली." रणजीत खुश होता.

" झाले ना समाधान? आता पुढे?" मिहीरचे दुःख त्याच्या आवाजात जाणवत होते. पण ते रणजीतपर्यंत पोहोचत नव्हते.

" तिने उद्या तिच्या वडिलांना भेटायला बोलावले आहे. मला ना हे जरा कटकटीचे वाटते आहे. मस्त फिरायचे, मजा करायची.. तर हे नवीनच त्रांगडं."

" रणजीत, याचा अर्थ ती हे सगळं खूप गंभीरपणे घेते आहे. तुला समजतंय ना?" मिहीर त्याला सावध करत होता.

" हो रे.. तू ना संधी मिळाली की जास्त शिकवू लागतोस.. आधी आबा आणि आता तू.."

"आबासाहेब कुठून आले इथे?"

" अरे त्या स्वानंदीने सगळी माहिती काढलेली दिसते आहे माझी. तिच्या बाबांनी आबांना फोन केला होता. आबा तर जाम खुश आहेत. म्हणे समोरून संधी आली आहे तर सोडू नकोस. मनात म्हटलं वाचलो, एवढी लफडी केली पण कुठेही नाव येऊ दिले नाही."

" रणजीत मला हे थोडे चुकीचे वाटते आहे. तू जर तिच्याशी थेट लग्नाचा विचार करत असशील तर तिला खरं सांग. ती मुलगी मला हळवी वाटते."

" तू वेडा झालास का? मी असं काही केलेलं आबांना समजलं ना तर घराबाहेर काढतील मला. तिच्या वडिलांची मदत घेऊन मुख्यमंत्री बनायची स्वप्ने पडायला लागली त्यांना."

" लग्नच करायचे तर मग तुझे बाहेरचे छंद तर कमी कर.."

" हे बघ मिहीर, मी तुला त्या दिवशी पण बोललो. मर्यादेत रहा. मी काय करायचे आणि काय नाही तू मला शिकवू नकोस. समजलं?" रणजीत तिथून रागाने निघून गेला.

स्वानंदीला मुलगा पसंत आहे आणि घरदार चांगले आहे हे बघून तिच्या वडिलांनी, श्रीधररावांनी आबासाहेबांशी बोलून तिचे रणजीतशी लग्न ठरवले. आधीच उशीर झाला होता म्हणून जवळचाच मुहुर्त धरला. स्वानंदीचे लग्न म्हणून अख्ख गावच मदतीला आले आणि बघता बघता सगळी तयारी झाली सुद्धा. आबासाहेब आणि वत्सलाबाईंच्या मदतीला मिहीर होताच. अगदी पडेल ते काम तो करत होता. हिरा आणि बबल्या इथे नसल्यामुळे स्वानंदीला लगेच काही समजणार नव्हते पण जेव्हा समजेल तेव्हा ती काय करेल या गोष्टीचे मिहीरला टेन्शन आले होते.

लग्नाचा दिवस उगवला. मंत्र्यांपासून उद्योगपतींपर्यंत सगळे स्वानंदीला शुभेच्छा द्यायला आले होते. वधूरूपातली स्वानंदी गोडच दिसत होती. अगदी मिहीरच्या स्वप्नातली राजकन्या. रणजीतही तिला शोभत होता. ही जोडी अशीच राहो असे म्हणत मिहीर डोळ्यातले पाणी लपवत वळला. स्टेजवर नवदांप्त्याला शुभेच्छा द्यायला रांग लागली होती. तेवढ्यात मुख्यमंत्री स्वतः आले म्हणून सगळ्यांची धांदल उडाली. मुख्यमंत्र्यांसह त्यांचा मुलगा सतेजही होता. ते फोटो काढून गेले तरी सतेज मात्र स्टेजवर थांबला होता.

" हा सतेज.. माझा खूप चांगला मित्र." स्वानंदी रणजीतशी ओळख करून देत म्हणाली.

" स्वानंदी तुला शुभेच्छा द्यायची इच्छाच होत नाही.." सतेज हसत म्हणाला. रणजीत दोघांकडे बघत होता.

" का रे?"

" मग काय? मुख्यमंत्र्यांचा मुलगा सोडून तू निवडलंस आमदाराच्या मुलाला.."

" सतेज.. माझं लग्न आहे आज.."

" तेच तर दुर्दैव आहे."

" आता मारीन हं मी तुला.." स्वानंदी हसत म्हणाली.

" रणजीत, बघ हा मारते पण ही. जरा जपून. मस्करी खूप झाली. बाकीची लोकं पण थांबली आहेत. तुम्ही एन्जॉय करा. स्वानंदी बी इन टच.." सतेज स्टेजवरून निघाला.

" हा पण तुझ्यामागे होता?" रणजीतने असुयेने विचारले.

" त्याने मागणी घातली होती. पण.." रणजीतच्या चेहर्‍यावरचे बदलत असलेले भाव मिहीरने ओळखले.

" आईस्क्रीम खाणार का थोडं? दमला असाल ना?" त्याला बघून रणजीत भानावर आला. समोर असलेली माणसे त्याला दिसली. तो शांत झाला.


आता जसे मिहीरने रणजीतला नामुष्कीतून वाचवले तसे प्रत्येक वेळेस वाचवू शकेल का तो? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all