मागील भागात आपण पाहिले की रणजीतला लोकसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता असते. आबासाहेबांनी प्रचाराची सुरुवातही केलेली असते. आता बघू पुढे काय होते ते.
" मिहीर, आजकाल मागे मागे काय राहतोस? तुझ्यावर तर फार मोठी जबाबदारी असणार आहे." आबासाहेब बोलत होते. "खरंतर आम्हाला कार्यालयात जाऊन सगळ्यांसमोर ही बातमी ऐकायला आवडली असती. पण साहेब नको म्हणाले. एकदा रणजीत खासदार झाला की आमचे टेन्शन गेले." मिहीर गप्पपणे उभा होता. रणजीत अधीरतेने फेऱ्या मारत होता. फोन वाजला. कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली. आबासाहेबांनी हात करून त्यांना शांत राहण्याची खूण केली. फोनवर बोलताना त्यांचे हावभाव बदलू लागले. अत्यंत निराशेने त्यांनी फोन ठेवला.
" साहेब, मिळाले ना तिकीट?" त्यातल्या एकाने धीर करून विचारले. काहीच न बोलता आबासाहेबांनी सगळ्यांना जाण्याची खूण केली. सगळेजण आश्चर्यचकित होऊन जायला निघाले. मिहीरला सुद्धा जाताना पाहून आबासाहेबांनी त्याला थांबायला सांगितले. हॉल रिकामा झाल्यावर त्यांनी स्वानंदीला आवाज दिला.
" सूनबाई.." तो आवाज ऐकून रणजीतही घाबरला. मिहीरच्या ह्र्दयाचा ठोका चुकला. स्वानंदी मात्र शांतपणे खाली आली.
" बोला.." तिचा स्वर ऐकून चिडलेल्या आबासाहेबांनाही काय बोलावे ते क्षणभर सुचले नाही. पण लगेचच त्यांनी स्वतःवर ताबा मिळवला.
"तू का केलेस हे?" आबासाहेबांच्या मुठी वळल्या होत्या.
" काय झाले आबा? मला समजेल का?" काय चालू आहे समजत नसलेल्या रणजीतने विचारले.
" या तुझ्या बायकोने तुझ्या मित्राला तिकीट मिळवून दिले.."
" काय??" रणजीत रागाने स्वानंदीच्या अंगावर धावून गेला. तोच मिहीर मध्ये आला. रणजीतचा पारा अजून चढला.
" तुझी ही हिंमत? एवढ्यात उपकार विसरलास तू?"
" मागे तूच म्हणाला होतास ना, स्वानंदीसाठी जर मी प्रयत्न केले तर ती परतफेड असेल? मग अजून कोणते उपकार लक्षात ठेवू मी? घरात जेवायला घालायचे की घालायला कपडे देण्याचे? त्या बदल्यात ढिगभर कामे करायचो. मग उपकार कसले रे?"
" अरे व्वा.. फक्त तिकीट मिळाले आहे तर एवढा आवाज फुटला.. काय एवढी जादू झाली? फक्त तिकीट मिळाले आहे, जिंकला नाहीस अजून." आबासाहेब गुर्मीत बोलत होते.
" तो जिंकेल की नाही याची तुम्ही काळजी करू नका.." स्वानंदी आबासाहेबांना बोलली.
" आमच्या घराण्याच्या सूनबाई आहात हे विसरू नका. मर्यादेत रहा." आबासाहेबांचा आवाज चढला होता. ते बघून वत्सलाताई मध्ये पडल्या.
" स्वानंदी, बाळा, सोडून दे ना हे सगळे. नको घरात वाद होऊन देऊस. मिहीर तू परत कर तिकीट. "
" आई, हे शक्य नाही.." स्वानंदी ठामपणे बोलली.
" कसं शक्य नाही, मी बघतोच." रणजीत मिहीरला ढकलून पुढे झाला.
" रहायचे आहे ना इथे?"
" रहायचे आहे ना इथे?"
" तिला जरी रहायचे असले तरी अशा असंस्कृत लोकांमध्ये मलाच तिला ठेवायचे नाही.." श्रीधरराव दरवाजात उभे होते. बाजूला बबल्या आणि हिराही होते. त्यांना बघून स्वानंदी पळत त्यांच्याकडे गेली.
" एवढी मोठी गोष्ट लपवलीस तू आमच्यापासून?" श्रीधररावांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारले.
" मला तुम्हाला त्रास होऊ द्यायचा नव्हता."
" आता नाही झाला?" स्वानंदी मूकपणे अश्रू ढाळत होती.
" तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. बसा. मग आपण बोलू." आबासाहेब बोलू लागले.
" गैरसमज झाला नाही.. होता तो दूर झाला. आता स्वतःच्या डोळ्याने बघून खात्री पटली. माझ्या एकुलत्या एका लेकीची पसंती म्हणून सगळ्याला हो म्हणत गेलो. पण तुम्ही आम्हाला एवढं फसवाल असं वाटलं नव्हते."
" आम्ही? आम्ही काय फसवलं?" आबासाहेबांची गुर्मी अजूनही उतरली नव्हती.
" विचारा तुमच्या लेकाला.. माझ्या लेकीच्या अटी या मिहीरने पूर्ण केल्या. आणि लग्न करायला मात्र हा पुढे आला." श्रीधरराव त्वेषाने बोलत होते. हे ऐकताच रणजीतने मान खाली घातली.
" मला हे माहित नव्हते.." आबासाहेबांचा आवाज पडला होता.
" ते माहित नसेल.. पण माझ्या मुलीचा तुम्ही राजकारणात शिडीसारखा वापर करू बघत होता हे सत्य बदलत नव्हते." स्वानंदीने वडिलांकडे बघितले.
" तू कुठे कुठे कोणापाशी काय शब्द टाकलास ते माझ्यापर्यंत आले नाही असे वाटते का तुला? आज सकाळी जेव्हा मिहीरचे नाव मध्ये आले तेव्हा आधी या बबल्या आणि हिराशी बोललो. मगच इथे आलो. बरं झालं आलो ते. यांचं सत्य तरी समजले."
" माझं थोडं ऐकाल का? हे नवराबायकोचं नातं असं पटकन तुटत नाही. आपण विचार करूया का?" वत्सलाताई मध्ये बोलल्या.
" नाही आई.. मी रणजीतला संधी दिली होती. पण त्याने माझ्यावर गलिच्छ आरोप करायलाही मागेपुढे बघितले नाही. आबासाहेबांनाही मी फक्त राजकारणात पुढे जाण्यासाठीच हवी होते. कोणालाच मी एक व्यक्ती म्हणून नको होते. मी खरंतर विचारच करत होते, हे बाबांना कसे सांगू म्हणून. पण माझा प्रश्न त्यांनीच सोडवला. मी चालले आहे इथून हे सगळं सोडून.. जे माझं कधी नव्हतंच."
" आणि मग आम्ही लोकांना काय सांगायचे? " हादरलेल्या आबासाहेबांनी विचारले.
" हा विचार तुम्ही आणि तुमच्या मुलाने मला फसवायच्या आधी करायला पाहिजे होता."
" मग इतके दिवस का थांबली होतीस इथे?" रागाने रणजीतने विचारले.
" मी तुला उत्तर द्यायला बांधिल नाही.. तरिही सांगते. मी म्हटलं तसं मला बघायचे होते की तुला माझ्याबद्दल काही वाटते का? पण नाही.. जी स्त्री तुला सर्वस्व द्यायला तयार होती तिच्याकडून तुला सगळंच फक्त ओरबाडून घ्यायचे होते. मी ते ही सहन केले असते. पण तुझा स्वभाव.. नाही. नको तो संशय मनी बाळगून तू किती त्रास देऊ शकतोस याची चुणूक दाखवलीस तू मला. मी इथे राहिले ते तुला जाणिव करून द्यायला की आपल्याला कोणी फसवले तर कसे वाटते.. मी फक्त तुझे तिकीट मिहीरला मिळवून दिले तर तुला एवढा राग आला.. तू तर माझ्या आयुष्याशी खेळलास. जो हक्क तुला कधीच नव्हता. तुला माहित होते मी माझ्या योग्य जोडीदार शोधण्यासाठी इतके वर्ष थांबले होते पण तिथेही तू तुझ्या क्षणिक मोहापायी माझ्या आयुष्याची वाट लावलीस. मी इथून जाणार तर आहेच पण सोबत जाताना तू जी माझ्यावर जबरदस्ती केलीस त्याचा अंश घेऊन चालले आहे. आणि त्याच्यापासून आयुष्यभर दूर राहणे हीच तुझी शिक्षा असणार आहे."
" स्वानंदी, नको ग अशी क्रूर होऊस.." वत्सलाताई म्हणाल्या.
" आई, क्रूरपणे तर तुमचा मुलगा वागला माझ्याशी. माझ्या सगळ्या भावनांचा चोळामोळा करून टाकला त्याने. त्याला वाटले होते त्याच्या बाकीच्या प्रकरणांसारखे हे ही प्रकरण दाबले जाईल. पण तो हे विसरला की सगळ्याच मुली अन्याय सहन करत नाहीत, काही प्रतिकारही करतात."
" अग पण पुढचं आयुष्य एकटीने कसे काढशील?"
" एकटीने नाही काकू.. मी माझ्या पापाचे परिमार्जन करणार आहे. जी चूक मी केली ती सुधारणार आहे. मी असणार आहे तिच्यासोबत पुढचे सर्व आयुष्य.. अर्थात तिला चालणार असेल तरच." मिहीर बोलला.
स्वानंदीने होकार दिला आणि ते दोघे तिथून बाहेर पडले स्वतःचे हवेहवेसे नवीन विश्व उभारायला..
स्वानंदीने होकार दिला आणि ते दोघे तिथून बाहेर पडले स्वतःचे हवेहवेसे नवीन विश्व उभारायला..
कथा कशी वाटली ते नक्की सांगा. अभिप्रायाच्या प्रतिक्षेत.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा