Login

पुनर्विवाह (कृष्ण सखी)-२०४

कृष्ण सखी
कृष्ण सखी -२०४

तिचे हात त्या देहावरून फिरू पाहत होते की ओटीवरून ‘आय शाॅटच!’ ऐकू आलं आणि त्या एका शब्दाने सखी भानावर आली.

‘ही ती वेळ नाही, हा तो एकांत नाही.’
याचं भान येताच सखीचे हात त्याच्या खांद्यावरून घरंगळल्यासारखे खाली आले. तिचा ओझरता स्पर्शही जसा की त्याला वेडं करत होता. जणू उद्याची चुणूक दिसूनच कृष्णा बिघडलेल्या श्वासांनी तिच्या कानात कुजबुजला,
“इतक्या लाजला तरं तुमचं काही खरं नाही!”


त्याच्या बोलण्याचा अर्थ उमजून सखी खाली बघूनच बावरल्यासारखी हसली. तिचं लाजरं हसू पाहून आधीच मन खुळं झालेल्या कृष्णाच्या हातांचा पाश तिच्या कमरेभोवती आपोआप आवळला गेला.  त्याच्या मिठीत नसूनही सखी त्याच्या अर्धवट मिठीत होती. श्वासांच्या अंतरावर असलेला त्याचा तांबूस रुंद देह तिला लाजवत होता आणि पुन्हा त्याच्या कवेत असलेला तिचा नाजूक देह त्याला वेड लावत होता. दोघांच्या भावनांसारखंच क्षणात बदलेलं ते वातावरण दोघांनाही भुरळ घालत होतं.


कृष्ण सखी एकमेकांत मश्गूल असताना सोनाई बाहेरून आली आणि स्वयंपाकघरात जाताना तिने सहज कृष्ण सखीच्या खोलीत नजर टाकली. दरवाजातच शर्टलेस पाठमोरा कृष्णा दिसताच सोनाई नेहमीसारखी सहजतेने बोलली,
"कदी रं आलास?"

सोनाईचा आवाज ऐकून कृष्णाजवळ असलेली सखी चमकली आणि कृष्णा हलकासा मागे बघत तितक्याच सहजतेने बोलला,
"मघाशीच आलोय. कुठं फिरतेस?"

स्वयंपाकघरात जाताना लगेचच तयार असलेलं सोनाईचं उत्तर आलं,
"धुरपीकडं गेल्याले." सोनाई विझलेल्या चूलीपुढं बसली. ना ओटीवर, ना स्वयंपाकघरात, ना त्यांच्या खोलीत सखी कुठेच न दिसल्याने पुढच्याच क्षणी चूलीला शेणकूट लावत सोनाईने आश्चर्याने विचारलं,
"पोरांनू, म्हाळसा ऽ कुटं रं गेल्या?"


कृष्णा कवेत असलेल्या सखीकडे बघून गालात हसला आणि सखी बोलायच्या आधीच आरव उत्साहात बोलला,
"खुलीत हाये की, बाबांच्या पाठीला बाम लावत्या."

आत्तापर्यंत चूल विझली असेल हे लक्षात येताच सखी कृष्णापासून बाजूला होण्याचा प्रयत्न करत हळूच पण गडबडीत बोलली,
"चूल विझली असेल. मला जायला हवं."

तिच्या स्पर्शाच्या मोहात असलेला कृष्णा हसत बोलला,
"आई आलीये ना आता?"

सखी पुन्हा त्याचा कमरेवरचा हात काढण्याचा प्रयत्न करत ओठांत बोलली,
"आई आलेत म्हणूनच जाऊ द्या."


कृष्णा तिची जाण्याची घाई पाहून हसत बोलला,
"आई करेल स्वयंपाक. तुम्ही थांबा."


दरवाजातच उभा असलेल्या त्याचा सूर ऐकून सखी मान हलवत बोलली,
"तुम्ही हळू बोला ना, आई ऐकतील."


कृष्णा हसला,
"ऐकू द्या की मग."

त्याचा आवाज सहज स्वयंपाकघरात जात असेल हे माहित असलेली सखी त्याच्याकडे बघत विचित्र हसली. कृष्णा तिच्या चेहऱ्यावरचं ते मोहक हसू पाहून गालात हसत बोलला,
"तुम्ही अशा हसला की......."

"श्श ऽ ऽ ऽ."
सखी त्याच्या ओठांवर बोट ठेवत चोरी केल्यासारखी बोलली,
"तुम्ही काहीच बोलू नका."


सोनाई त्या दोघांची कुजबुज स्वयंपाकघरात गालात हसत ऐकत होती. कृष्णाच्या बिनधास्त वागण्यामुळे सखी अजून अवघडू नये म्हणून सोनाई चूलीला लाकूड शेणकूटांच भरणं घालत मोकळ्या आवाजात बोलली,
"म्हाळसा ऽ, मी हाये गं चुलीफुडं. तू कर काय करत्येस त्यं."


शर्टलेस कृष्णाच्या अर्धवट मिठीत असलेल्या
सखीला सोनाईच्या बोलण्याने एकदम लाजल्यासारखं झालं. त्याची मिठी हवीहवीशी असूनही त्याक्षणी ती क्यूट चेहरा करून बोलली,
"क्रिष्ण् ऽ, प्लीज सोडा ना!"

तिच्या चेहऱ्यावरचे ते भाव पाहूनच कृष्णा गालात हसत तिला मोकळं करत बोलला,
"खूष?"

नेहमी त्याच्यापासून दूर झाल्यानंतर क्षणासाठी उदास होणारं तिचं मन याक्षणी गालात हसत हुंकारलं,
"हम्म ऽ."

'मी जातीये.' हे खुणावून सखी दबक्या पावलांनी स्वयंपाकघरात आली आणि चोरी केल्यासारखी सोनाईच्या शेजारी बसत चुकल्यासारखी बोलली,
"ते.... क्रिष्णची पाठ दुखत होती म्हणून थोडी चोळून दिली."

विझलेल्या चूलीकडे दुर्लक्ष करत सोनाईने थंडपणे विचारलं,
"आसू दे. त्याजं कंबारठ ऱ्हायलं का?"

सखी तशीच हळू आवाजात बोलली,
"थोडा आराम मिळाला असेल."

.. लगेचच शर्ट अंगावर चढवत स्वयंपाकघरात आलेला कृष्णा हसत बोलला,
"तुझ्या सुनेच्या हातात जादू आहे आई, पाठीला हात लागला आणि पाठदुखी गायब!"

सखी त्याच्याकडे बघून हसली,
"खरंच राहिलीये ना? की उगाच वरवर कौतुक करताय?"

कृष्णा उलट तिलाच उलटा प्रश्न विचारत आपल्या गालावरून सुचपकणे बोटं फिरवत गालात हसत बोलला,
"आपलं काय वरवर असतंय काय? तुम्हाला माहित नाही काय?"

त्याचा इशारा ओळखून त्याचा स्पर्श अनुभवलेला तिचा देह लाजला आणि ती गालात हसली. सोनाईचं दोघांकडेही लक्ष होतं. पहिल्यांदाच त्यांना असं नवरा-बायकोसारखं गोड-गोड बोलताना पाहून सोनाईला फार फार आनंद झाला. त्यांना त्यांचा त्यांचा वेळ मिळावा या हिशोबाने सोनाई हसतच बोलली,
"किशना, आरं मावशी तुमचं लगीन झाल्यापास्नं तुम्हाला जोड्यानं बोलावत्या. जा की घटकाभर जाऊन या."

सोनाईचं बोलून होताच सांसारिक सखी लगेच बोललीच,
"पण आई, तीन्ही मुलांना घेऊन गाडीवर कसं जमेल?"

"त्यांना कशाला न्ह्याचं? सकाळी सकाळी दोघांनीच बिगीनी जाऊन याचं त्यं." सोनाईचं बोलून होत नाही तोवर बाहेरून आरोळी आली-

"मास्तर ऽ, जरा हिकडं यताव का?"
राकेशची हाक आली आणि सोनाई विषय संपायच्या आत तिथेच फैसला करत बोलली,
"ए ऽ कामदारा, उद्याच काय करणार हायेस त्यं आत्ताच सांग मं जा भायेर."

'सखीसोबत एकांत!'
या विचाराने सुखावलेला कृष्णा चेहऱ्यावरचा आनंद लपवत सोनाईकडे बघून बोलला,
"तू म्हणतेस म्हणून उद्याच जाऊन येतो दोघं."

.. आणि तसाच सखीकडे बघून गालात हसत बोलला,
"उद्या जाऊया, दोघंच."

फक्त 'दोघंच' जाण्याचा आनंद त्याच्याही नजरेत पाहून सखी गालात हसत हुंकारली,
"हम्म ऽ."

बाहेर निघालेला कृष्णा क्षणासाठी थांबला आणि सुरात गालात हसत बोलला,
"उद्या जरा वाढीव तयार व्हा."

त्याची मागणी ऐकून सखीला गुदगुल्या झाल्या आणि सोनाई हसतच बोलली,
"वाढीव म्हंजी कशी?"

कृष्णा हसतच सोनाईच्या खांद्यावर हात ठेवून तिचा खांदा दाबत बोलला,
"म्हातारे ऽ, तू कशाला ऐकतेस?"

खांदा दुखल्यामुळे सोनाई कसंनुसं हसत बोलली,
"मं कानात बोल की तिकडं, मला कशाला ऐकावान करतोयस?"

"मास्तर ऽ ऽ ऽ ऽ."

बाहेरून हाक आल्यावर कृष्णा खोलीबाहेर जात हसत बोलला,
"आता सवय लावून घे म्हातारे."

सोनाई हसतच बाहेर गेलेल्या कृष्णाला ऐकू जाईल अशा आवाजात बोलली,
"तुझी आय म्हातारी, मला म्हातारी म्हनतोयंस व्हय रं."

कृष्णाचाही बाहेरूनच सूर आला,
"ए ऽ म्हातारे, गप बसती काय? घरात आलो तर खाऊन टाकीन बघ."

त्या दोघांची जुगलबंदी बघून प्रसन्न मन असलेली सखी तोंडावर हात ठेवून  खुदुखुदु हसू लागली.


कृष्णा सहज मुलांमध्ये गेला तो बाहेरचाच झाला. रोजच्या सारखाच दिवस उजाडून मावळला आणि रात्रीच्या अंधारानंतर हळूहळू सुर्याचं अस्तित्व जाणवलं. सकाळ झाल्याची लक्षणं दिसली आणि कृष्णसखीसोबत सोनाईही गालात हसू लागली.


अंघोळ झाल्यावर कृष्णा नेहमीसारखा सकाळीच तयार झाला आणि दूधाचा ग्लास संपवून बाहेर सखीची वाट बघू लागला. सखी एरवीसारखी आजही झटपट तयार होईल असं कृष्णाला वाटलेलं पण दहा मिनिटांनंतर त्याने अंगणातून आवाज दिला,
"सखी ऽ, झालं काय?"

लगेचच सोनाई स्वयंपाकघरातून,
"म्हाळसा ऽ, आवारल का गं?"

सखी लगेच खोलीतून,
"झालं हां आई ऽ."

"झालंय. थाम जरा."
सोनाई पुन्हा स्वयंपाकघरातून.


पाच मिनिटांनी कृष्णा पुन्हा स्वतःशीच,
'झालंय मग कुठं थांबल्या?'


.. आणि पुन्हा वेळेची किंमत करत त्याने अंगणातून आरोळी दिली,
"आई ऽ, गप्पा नंतर मार. पाठव त्यांना."


त्याचं सारखं हाका मारणं पाहून सोनाई बाहेरच्या दरवाजात येत तिच्या तऱ्हेने प्रेमाने बोलली,
"थाम की जरा, कशाला यवढा घाईला आलाईस?"

मघापासून वाट पाहून वैतागलेला कृष्णा घड्याळ बघत बोलला,
"अर्धा तास झाला थांबलोय की, एवढा वेळ लागतो व्हय?"

सोनाई हात हलवत तोऱ्यात बोलली,
"बायकांना लागतो यळ. तुझी आय यनीफनी करून लगीच निघती म्हनून बायकूनं बी निघावं व्हय? थाम जरा."

कृष्णा सोनाईवर वैतागला,
"तू भाषण देऊ नकोस. सखी मघापासून आवरतायेत तरी अजून झालं नाही त्याचं. काय करतायेत ते बघ जरा. आवरायचं सोडून कपाट आवरत बसल्या वाटतं."

"लयीच भुनभुन आसती बग तुजी."
सोनाई बडबडली आणि पुन्हा कृष्ण सखीच्या खोली बाहेर येऊन ओरडली,
"म्हाळसा ऽ, आगं आवर की लवकर. कामदार वैतागला तं जानं ऱ्हाईल कुठंच्या बुटं."

"हो, झालं आई ऽ."
बोलतंच सखीने दरवाजा उघडला आणि सखीला पाहून सोनाईने आनंदाने कनपटावर कडाकडा बोटं मोडली. सखी गालात हसत बोलली,
"आई ऽ, बरी दिसतीये ना?"

सोनाई पुन्हा तिची नजर उतरत कौतुकाने बोलली,
"आक्शी गौरायवानी दिखनी दिसत्यास बग."

सखी हसली. ती ज्याच्यासाठी तयार झालेली आता त्याने पहावं, मनापासून कौतुक करावं असं तिला वाटतं असतानाच बाहेरून कृष्णासोबत त्याचा वैतागलेला सूरही जवळ जवळ आला,
"आई ऽ, सखींना सांग, असाल तशा बाहेर या नाहीतरं जायचं-"

पुढचं काही बोलेपर्यंत कृष्णा अर्ध्या अंगणात पोहचला आणि सखी उंबऱ्यात दिसली-
नाजूक देहावर हिरवी काठपदराची चापून-चुपून नेसलेली साडी, तरीही हातावर मोकळा असलेला पदर तिच्या सौंदर्याला चार चाॅंद लावत होता. कधी नव्हे ते चेहऱ्यावर मोकळे सोडलेले केस, आधीच गोऱ्या रंगावर फाऊंडेशनचा हलकासा थर, डोळ्यांत काजळाची रेघ, कपाळावर शोभेल अशी चंद्रकोर, खाली छोटंसं लालभडक कुंकू, ते लालचुटुक ओठ, ते हिरवेकाकण भरले हात आणि या सगळ्यांवर भारी असं तिचं गालातल्या गालात लाजरं हसू.

कृष्णा नजरबंदी झाल्यासारखा तिच्याकडे बघत पायरीपर्यंत चालत गेला. कृष्णाला पुतूळ्यासारखा सखीकडे बघताना पाहून सोनाई ठसक्यात बोलली,
"आता न्हाय व्हय रं उशीर व्हतं?"


कृष्णा सखीकडे बघून गालात हसत बोलला,
"आता इतकं वाढीव तयार व्हायला थोडासा वेळ तरं लागतोयंंच की."

सखी गालावर रेंगाळणारे केस कानामागे घेत गालात हसत बोलली,
"ठीक आहे ना?"

कृष्णा हात पुढे करत तिच्या धुंदीत धुंद होत गालात हसत बोलला,
"लयीच बेकार वाढीव दिसताय तुम्ही. अगदी नव्या नवरीसारख्या."


उर्वरित भाग पुढे..

© प्रियांका सुभा कस्तुरी
२४/०९/२०२४

..............

प्रकृती अस्वास्थ्यामुळे कथेच्या उत्तरार्धात
ब्रेक घ्यावा लागला. तुम्ही सर्वांनी समजून घेतलं त्यासाठी सर्वांचे मनापासून आभार! सध्या तब्येत ठीक आहे त्यामुळे पुन्हा लेखणी हातात घेतली आहे.

पुढील भाग आजच टाकण्याचा प्रयत्न करेन! लोभ असावा!

🎭 Series Post

View all