पुनर्विवाह (कृष्ण सखी)-१५२

कृष्ण सखी

कृष्ण सखी -१५२

त्या कपाळाला झालेल्या उबदार स्पर्शाने सखीला गोड अनुभूती झाली-
‘त्याचा हलकासा स्पर्श देखील किती हवाहवासा वाटतो!’

लगेचच तीच चार बोटे तिच्या मानेला स्पर्शली आणि एक गोड लहर तिच्या अंगभर गेली. ती बोटे जरा मागे पुढे सरकल्यावर तरं एक हवीहवीशी लहर नव्याने जन्मली आणि सखी खाली बघतच गालात हसली.


“आलोच.” बोलून कृष्णा बाईकवर बसून निघून गेला पण सखी त्याने स्पर्शलेल्या मानेवर आपली बोटे फिरवत गालात हसत राहिली.


तिच्या देहाला पहिल्यांदाच कोण्या पुरुषाचा स्पर्श होत होता असंही नव्हतं. शंभर वेळा चिंधड्या विस्कटून पाहिलेल्या या देहाला आज मात्र कृष्णाचा हलकासा स्पर्श ही मोहित करत होता.


‘असं का होत होतं?’
तिला कळत नव्हतं पण तो गेल्यावरही आपल्या कपाळावर, आपल्या मानेवर ती बोटे फिरवत राहिली पण स्वतःच्या स्पर्शात त्याच्या अलवार स्पर्शाची सर कुठे!


घरात एकटी होती म्हणून तिने गालात हसतच टीव्ही लावला. गाणी लावली आणि पुन्हा त्याच्याच विचारांत नेहमीसारखी चौकटीत उभी राहिली. त्याचं हक्काने रागावणं, तिला प्रेमाने समजावणं, तिचे अलगद अश्रू पुसणं, ते डोळ्यांत डोळे घालून बोलणं ते सगळं आठवताना देखील सखीच्या गालावर फक्त त्याच्यासाठीच गालात लपलेलं गोड हसू होतं.


ही वेगळीच गोड भावना होती जी आजकाल वरच्यावर तिला जाणवत होती आणि गालात हसण्यासाठी मजबूर करत होती.


अधीर मन झाले, मधूर घन आले…..


टिव्हीतील गाण्याचे बोल कानांवर पडले तशी सखी ही टीव्हीतील नायिकेप्रमाणे आनंदली. बाहेर होणारी हलक्या उन्हातील हलकीशी रिमझिम जणू तिला बोलवत होती. सखी हसतच प्रसन्न मनाने अंगणात गेली आणि दोन्ही हात पसरवून पदराला वारा दाखवत ती बारीकशी रिमझिम आपल्या अंगावर झेलत हसतच गोल फिरू लागली.


अधीर मन झाले..
धूक्यातूनी नभातले सख्या प्रिया
सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले….
मधूर घन आले ..


सखी अगदी स्वतःलाही विसरून हसतच गोल गोल फिरत होती. ती पावसाची रिमझिम जणू तिच्या देहाला गोंजारच होती, की बघ.. तुझ्या त्याच्यापेक्षा माझ्या स्पर्श किती अलवार आहे... आणि सखी ही हसतच मानेनेच ‘नाही’ म्हणत आपसूकच त्या गाण्याच्या बोलांवर थिरकत होती.


तिच्या नजरेत ती पावसाची हलकिशी रिमझिम सुद्धा त्याच्या स्पर्शा पुढे फिकी होती. डोळे बंद करून ती रिमझिम अनुभवताना… चेहऱ्यावर, मानेवर येणारे ते हलके थेंब तिला गुदगुल्या करत होते पण…

पण त्या हलक्या थेंबांमध्ये सुद्धा त्याच्या अलवार स्पर्शाची जादू नव्हती. तिला शहारा आणण्याची ताकत नव्हती.

फक्त त्याच्या आणि त्याच्या विचारांत स्वतःला विसरलेली सखी त्या हलक्या थेंबांची तुलना त्याच्या स्पर्शाशी करत आपल्याच तालात मानेवरून बोटे फिरवत हलके हलके थिरकू लागलेली.


मी अश्या रंगाची, मोतीया अंगाची
केवड्या गंधाची बहरले ना..


“ए ऽ दिपे ऽ ऽ, हिकडं यं बिगीन…..”
या आरोळीने सखीने हसतच मागे पाहिले आणि समोर सुरेखाला तिच्याकडे पाहून हसताना बघून सखी भानावर आली. गोल फिरल्यामुळे, थोडीशी थिरकल्यामुळे तिचे श्वास वाढलेले. प्रसन्न वातावरण, प्रसन्न मन.. भिजावं, नाचावं, हसावं असं वाटत असताना अचानकच एखादा विद्रूप चेहरा दिसावा असा सुरेखाचा चेहरा दिसला आणि सखी तिच्यावर रागावली,
“का हसतेस गं?”


सुरेखा दिपाबायच्या कानात हसून बोलली,
“ही सखी, आता आंगनात नाचत व्हती म्हायती हाये का?”

दिपाबायने ही एकदा सखीकडे पाहिलं आणि तोंडावर हात ठेवून हळूच बोलली,
“खरंच व्हयं?”

सुरेखा हसून बोलली,
“आग हो तरं.. म्हनून तं तुला आवाज दिला.”


आपल्याकडे बघून त्यांची चाललेली खुसुरफुसुर सखीला अजिबात आवडली नाही. तिचा मध्येच मूड ऑफ केल्यामुळे तर सखी त्यांच्यावर रागावली,
“काय चालू आहे तुमच्या दोघींचं? कसली खलबतं चालू आहेत? हिम्मत असेल तरं जोराने बोला की..”


दिपाबाय लगेचच मागच्या हातावर येत बोलली,
“कुठं काय.. आम्ही तं टिव्हतलं बोलत होतो. काल त्या वनीची साडी लै भारी व्हती.. ताय ह्यचं सांगत व्हत्या मला..”


“तुमची तेवढीच बुद्धी!
टीव्हीतलं राजकारण बघायचं आणि घरात तसंच करायचं.. मंदबुद्धी कुठल्या… हूं ऽ…” सखी दोघींना ऐकायला जाईल अशी बोलली आणि घरात गेली.


सुरेखा लगेच हळू आवाजात कुरकुरली,
“ही सखी लैच बिघाडले ना गं… पैलीच जरा बरी व्हती.”


दिपाबाय बदललेल्या सखीला बघून आधीच सावध होऊन बोलली,
“जाव द्या.. नगा नादी लागू त्यांच्या.. ती मुंबैची पुरगी लै हुशार निघाली. पैली यडी बनून आपला अंदाज घेतला आनि आता बगा कशी त्वांड टाकत आसती त्यं.”


सुरेखा ही तोंड वाकडं करत बोलली,
“मुंबैचं यडं.. ती शिंबडी पोरं बाई बाई करत्यात म्हनून सवताला लैच शहानी समजायला लागले ती… यक दिस तिला दावीनच माजा इंगा.”


दिपाबाय पुन्हा सुरेखाला समजावत बोलली,
“ऱ्हाव द्या ताय… आपून लै साध्या बगा. ह्या मुंबैच्या पुरी इंग्रजीत चार शिव्या हासाडतील तरी बी आपल्याला कळायचं न्हाय बगा..”


सुरेखा सखीवरच्या स्त्री असुयेपोटी धूसफूसत बोलली,
“तू बगच दिपे… मी आता काय करते त्यंं..”


दिपाबायने लगेच कुतूहलाने विचारलं,
“मला तरी सांगा की.. मी मैतरीन हाये ना तुमची.”


सुरेखा लगेच दिपाबायच्या कानात कुजबुजली आणि दिपाबय ही उत्साहात बोलली,
“लै भारी आयडिया बगा.. फकस्त सोनायआत्या घरात नसल्या म्हंजी झालं .. ह्यं यड तं मुळूमुळू रडत बसंल.. मला तं आताचं हासायला यतंय.” मग दोघीही सखीवर तोंडसुख घेत फिदीफिदी हसायला लागल्या.


सुरेखावर रागावून सखी बडबडत घरात आली, अगदी काही क्षणांपूर्वी तिचं मन किती प्रफुल्लित होतं पण सुरेखाने तिच्या आनंदावर जसं की विरजण टाकलेलं. सुरेखाचा चेहरा आठवूनच सखी दिंडीच्या दरवाजाच्या पायरीवर बसत तिच्या सख्याला बोलली,
‘कृष्णा, या सुरेखाला दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू पाहिलं की काय होतं रे? लगेच तिचा चेहरा काळा ठिक्कर पडतो. तू पण ना… असले जीव कशाला जन्माला घालतोस? जे फक्त दुसऱ्यांना त्रास देतात.’


तिच्याकडे पाहून कुजबूज करणाऱ्या, हसणाऱ्या त्या दोघी अजूनही सखीच्या नजरेसमोर येत होत्या. त्यांना आठवूनच सखी स्वतःशीच रागात बडबडली,
‘खूप शहाण्या समजतात दोघीही स्वतःला.. एक दिवस मुंबईचं पाणी म्हणजे काय ते दाखवेनच त्यांना.. जळाऊ लाकूड कुठल्या.’


“हंबा ऽ ऽ ऽ ऽ ऽ..”
रंगीचा आवाज आला तशी सखी गोठ्यात जात बडबडली,
“रंगी गोठ्यात आहे मग आई कुठे गेल्या?”


सखीने रंगीला ओली वैरण टाकली आणि प्रेमाने गोंजारत होती की बाहेरून आरोळी आली,
“आई ऽ ऽ ऽ ऽ ऽ.”


कृष्णाचा आवाज ऐकताच सखी हसतच दिंडीच्या दरवाजाकडे निघाली पण ओटीवरच थांबली. उगाचच तिच्या मनाला आशा-

तिच्या कानांना अजून काहीतरी ऐकायचं होतं की पुन्हा त्याची हाक आली,
“सखी ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ.”


पहिल्यांदाच त्याने अशी बाईकवर बसून आरोळी दिलेली. सखी हसतच बाहेरच्या उंबऱ्यात आली आणि तिला पाहून कृष्णाने हसतच आपलं हेल्मेट उतरून ठेवलं. तिचा प्रसन्न चेहरा त्याला सांगत होता, ‘तिला अजून तरी कणकणी आलेली नाहीये.’


तिच्या काळजीने किती घाई घाईत जाऊन आलेला तो! गोखलेबाई ओळखीच्या होत्या म्हणून सगळे पेशंट बाजूला ठेवून कृष्णाच्या नव्या लाडक्या बायकोला त्यांनी अर्जंट मध्ये डिस्क्रिप्शन लिहून दिलं. शिंका येऊन तिचं अंग भरून आलं असेल, तिला कणकणी आली असेल.. या विचारांनी तो वाऱ्यासारखा जाऊन आलेला.


तिच्याकडे बघतच हातातील पिशवी घेऊन अंगणाच्या पायऱ्या चढतच त्याने काळजीने विचारलं,
“आता बरं वाटतंय का?”

“हो.” सखी बोलली आणि-

“आं ऽ च्छी ऽ ऽ…”

कृष्णाने तिच्याकडे काळजीने पाहिलं आणि सखी मनातच कपाळावर हात मारत बोलली,
‘कृष्णा काय चालू आहे तुझं.. नको ना शिंका देऊस.’


सखी आपलं नाक चोळत हसून बोलली,
“काही नाही हो.... तुम्हाला पाहून पुन्हा चालू झाल्या.”


कृष्णाच्या पारखी नजरेला सखीची ओली साडी आणि हलके ओले केस क्षणात दिसले आणि त्याच्या कपाळावर आठी आली. तो तिच्या काळजीने तिला रागावला,
“सखी तुम्ही भिजला?”


सखी चोरी पकडल्यासारखी त्याच्याकडे पाहत मनातच,
‘कृष्णा त्या सुरखी फुरकीमुळे साडी बदलायची विसरले की रे….’


सखी त्याच्याकडे पाहून जबरदस्तीने हसली खरी पण त्याच्या कपाळावरची रेषा पाहून ते हसू आलं तसं लगेच गेलं आणि ती खाली बघून बारीक चेहरा करून पायाच्या अंगठ्याने खालची भुई उकरत बोलली,
“हलकिशीच गेले होते.. भिजायला नव्हते गेले.”


तिच्या खांद्यावर पडलेले पावसाचे बारीक बारीक थेंब.. दुधावरची साय बोटाने बाजूला घ्यावी अगदी तसेच त्याने सर्रकन उचलले आणि तिला दाखवत किंचित रागावला,
“इतकं भिजलाय तरी हलकं हलकं सांगताय काय?”


त्याचं काळजीने रागावणं पाहून सखी खाली बघूनच गालत हसली. त्याच्या ओरडण्याचा तिच्यावर फरकच पडत नाहीये हे बघून तो वैतागून पुन्हा तिला काळजीने ओरडला,
“ती साडी बदलणार आहात काय? का पायाच्या अंगठ्याने खोदकाम करत रात्रभर इथेच उभ्या राहणार आहात?”


तो ओरडल्यावर ती गालात हसत ओठांत पुटपुटली,
“बदलते.” आणि आपल्या खोलीत येऊन तिने दरवाजाला कडी घातली. आत मध्ये आल्यावर एवढा वेळ गालात अडकलेलं तिचं हसू आता मोकळं झालेलं. हसतच तिने कपाटातून आपली साडी काढली आणि आपोआप तिची नजर आपल्या खांद्यावर आली. खांद्यावर आजूबाजूला पावसाचे बारीक बारीक थेंब तसेच होते फक्त मध्येच बोटभर अंतरावर ते पाणी खांदा पुसल्यासारखं फिस्कटलेलं.


बाहेर कृष्णाची बडबड चालूच होती,
“तब्येत बरी नसताना स्वतःची काळजी स्वतःच घ्यायला नको काय? का आता यांच्यावर सुद्धा राखण बसायचं. आईच पावसात भिजतीये म्हटल्यावर मुलांना ओरडणार कोण? घरात तीन नाही… चार मुलं आहेत……” त्याची बडबड चालूच होती.


कानांवर त्याचा आवाज पडत असतानाच सखीने साडीची पिन काढली आणि पदर हातावर आल्याबरोबर नजर आरशावर गेली. तिचं ते पावसात चिंब भिजलेलंं मोहक स्त्री सौंदर्य पाहून ती स्वतःशीच लाजली आणि पदर खांद्यावर टाकत ती पलंगाकडे आली. पलंगावर नेसायची साडी ठेवून पुन्हा पदर हातावर आला आणि हुकांजवळ बोटे जाताच समोरच असणाऱ्या कृष्णाच्या फोटोवर नजर गेली-

त्या फोटोतील त्याचं हसू इतकं जिवंत होतं, त्याचा चेहरा इतका बोलका होता की… ‘असा ढळलेला पदर असताना.. हा चिंब देह घेऊन आपण त्याच्यासमोर….’ पुढची तिला कल्पनाच करवली नाही आणि लाजेने तिचे गाल लाल झाले. तिने पदर लगेचच खांद्यावर टेकवला आणि बावरलेलं मन लाजलं. आपली साडी घेऊन ती बाहेर आली आणि सरळ देवघरात जाऊन आतून दरवाजा बंद केला.


आपल्या खोलीत साडी न बदलता ती देवघरात साडी बदलायला का गेली? हे कृष्णाला कळलं नाही आणि त्याला ते कळणारं ही नव्हतं.


सखी आत मध्ये साडी बदलत होती तेव्हा बाहेरचा त्याचा आवाज शांत झालेला.
कृष्णा शाळेत निघून गेला की काय?
तिला अंदाज येत नव्हता. तिने पटकन आपली साडी नेसली आणि गडबडीत बाहेर आली तर कृष्णा बाहेरच्या दरवाजात उभा होता.


त्याला पाहून तो थोड्यावेळापूर्वी तिला ओरडलेला हे विसरून सखी नेहमीसारखी हसत बोलली,
“तुम्ही सुद्धा आज घरीच?”


कृष्णा मागे बघत अगदी सहज बोलला,
“व्हयं का? आणि घरी थांबून काय करू?”

“आपण गप्पा मारूया ना..”
सखी तशीच उत्साहात बोलली आणि कृष्ण थोडासा हसला.

औषधांची पिशवी तिच्या हातावर ठेवत तो काळजीने बोलला,
“वेळेवर औषधं घ्या आणि दुपारी आराम करा.”

सखीने फक्त मान हलवली,
“बर.”

सखी अचानक आठवल्यासारखी बोलली,
“आई कुठे गेलेत? सुरु सुद्धा दिसत नाही.”

कृष्णा बाहेर निघत बोलला,
“ती मावशीकडे गेले. मावशीची तब्येत जरा बरी नाहीये.”


पुन्हा मोबाईल वाजल्यावर तो गडबडीत निघणार एवढ्यात आपल्या खिशातून सिम कार्ड काढत घाईघाईत बोलला,
“तुमच्यासाठी सिमकार्ड आणलंय. तेवढं मोबाईल मध्ये घालून घ्या.”

मोबाईलची सवय मोडलेली सखी ते सिमकार्ड उलट पालट करत सहज बोलली,
“कशाला उगाच? आता मोबाईलची सवय मोडलीये आणि मला कोण करेल फोन?”


कृष्णा तिच्या इतकंच सहज बोलला,
“कोण म्हणजे? हर घटकेला तुमची आठवण येते. कुठे कॉल करायचा माणसाने? मोबाईल जिवंत असला तरच आम्ही फोन करणार ना?”

त्याचं बोलणं ऐकून सखी गालत हसली.

तिची तब्येत नरम गरम असताना तिला असं सोडून जायला त्याचही पाऊल निघत नव्हतं पण हेडसरांचा सारखा येणारा फोन त्याला जाण्यासाठी मजबूर करत होता. तिचे ओले केस पाहून त्याने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. सखीला किती बरं वाटलं.

तिच्या केसांमुळे आलेली आपल्या हाताची ओलाई पाहून कृष्णा काळजीने बोलला,
“जरा केस सुद्धा पुसून घ्या, नाही तर डोकं धरेल.”


त्याचं किती बारीक लक्ष! सखी आपल्या केसांवरून हात फिरवत हुंकारली,
“हम्म….”


पुन्हा त्याचा मोबाईल वाजला. कृष्णा गडबडीत बोलला,
“आता निघतोच पण गोळ्या खाऊन आराम करा. दुपारी फोन करेल.”


त्याने गेलं पाहिजे हे तिलाही कळत होतं पण..
‘त्याने तिच्या आसपासच असावं’ अशी दाट भावना आतून का येत होती हे मात्र तिला उमगत नव्हतं.


त्याच्या स्पर्शाच्या मोहात पडलेल्या सखीला त्याचा स्पर्श हवा होता आणि तो कर्तव्यदक्ष ऑफिसर सारखा घाईघाईत निघालेला. पुढच्या काही क्षणांत तो तसाच निघून जाईल या विचारानेच सखी अगदीच तिच्या स्वभावाविरुद्ध वागली आणि आपल्याच कपाळावर बोटं टेकवत बोलली,
“क्रिष्ण् ऽ, थोडासा ताप आल्यासारखा वाटतोय ना?”


कृष्णा पुढच्याच क्षणी काळजीने..
“व्हयं काय.. बघू…”


आपलं गालातलं चोरटं हसू गालातच ठेवत सखी आपला उत्साह लपवत स्वतःच थोडी पुढे आली आणि कृष्णाची काळजीची बोटे तिच्या कपाळावर टेकली आणि नंतर मानेवर बोटे टेकवत तो अस्वस्थपणे बोलला,
“अजूनतरी तसं वाटत नाही.. पण तुम्हाला आतून कणकण जाणवत असेल. लगेच जेवून पडा काय.”


सारख्या वाजणाऱ्या फोनमुळे कृष्णा मनात नसतानाही शाळेत जायला निघाला. आपला मोबाईल खिशातून काढत त्यावर पडलेले हेडमास्तरांचे चार मिस् कॉल पाहून कृष्णा स्वतःशीच कुरकुरला,
“बायको आजारीये.. सांगून सुद्धा हेडमास्तरांना जरा कळ निघत नाहीये.”


कृष्णाने बाईकवर बसल्यावर सुद्धा तिला सूचना केल्या आणि नंतर तिची काळजी उराशी घेऊनच शाळेत निघून गेला. तो गेल्यावर सखी आपला आवडता ऐवज मिळाल्यासारखा स्वतःशीच हसली.

तिच्या मानेवर इकडून तिकडे आणि तिकडून इकडे त्याच्या झालेल्या त्या अलवार स्पर्शांनी जणू त्याच्या बोटातील अत्तर तिच्या त्वचेवर सांडलेलं. जे तो जाऊन सुद्धा तिच्या देहावर दरवळत होतं.

सखी अल्लड मुलीसारखी धावतच आरशासमोर गेली आणि आपली मान भिरभिरणाऱ्या नजरेने पाहू लागली. तिच्या नजरेला काही दिसत नव्हतं पण तिच्या देहाला अजूनही त्याचा तो स्पर्श जाणवत होता.

दूर कुठेतरी वीज हलकीशी कडाडली आणि तिचं लक्ष खिडकीतून बाहेर गेलं. अगदी मघासच्या सारखीच पावसाची रिमझिम पुन्हा चालू झालेली, जणू पाऊस तिच्या सख्याच्या स्पर्शासोबत पुन्हा स्वतःची तुलना करायला तिला भुरळ घालत होता.


आनंदलेली सखी अल्लड तरुणीसारखी दिंडीच्या दरवाजातून बाहेर धावली. ती दोन्ही हात घालून ते पावसाचे अलवार थेंब अंगावर झेलताना पुन्हा त्या हलक्या वाऱ्यासोबत स्वतःला विसरून थिरकू लागलेली.

त्याच्या स्पर्शाची कस्तुरी तिच्या शरीरावर दरवळत असताना त्या अलवार थेंबांची काय बिशाद… तिला भुरळ घालण्याची! हलकी हलकी थिरकताना तिच्या कानांत, तिच्या मनात मघासच्या ओळी तशाच घुमत होत्या-

मी अश्या रंगाची, मोतीया अंगाची
केवड्या गंधाची….. बहरले ना..

उर्वरित भाग पुढे..

© प्रियांका सुभा कस्तुरी
०६/०५/२०२४

………



🎭 Series Post

View all