पुनर्विवाह (कृष्ण सखी)-१५३

कृष्ण सखी
कृष्ण सखी -१५३


इथे तिथे सर्वत्र मोहक पावसाळी वातावरण-
कुठेतरी ऊन, कुठेतरी पाऊस, डोंगरावरून कोसळणारे ते पांढरे शुभ्र धबधबे, सगळीकडे
हिरवे हिरवे गालिचे, कुठेतरी पावसाची हलकी हलकी रिमझिम तरं मधूनच अंगावर शहारा आणणारी थंड हवा, ती हलकीशी बोचरी झुळूक सगळीकडे कसं प्रसन्न वातावरण अशा वातावरणात जिथे दगडाला अंकुर फुटतो तिथे प्रेमाला फुटणार नाही तर नवलच!

आपल्या उमलणाऱ्या अव्यक्त भावनांना त्या हलक्या हलक्या पावसाच्या थेंबासोबत अनुभवण्याचा सुखद अनुभव घेत सखी मनसोक्त पावसात भिजली.

‘आं ऽ च्छी ऽ ऽ ऽ..’ जेव्हा तिच्या कृष्णाने तिला आठवण करून दिली तेव्हा शिंका आल्यावर सखी आपलं नाक चोळत या कृष्णाच्या आठवणीने हसतच घरात आली आणि मघाशी केलेली चूक सुधारत यावेळी कृष्णा यायच्या आधीच तिने पुन्हा साडी बदलली आणि हसतच बाहेरच्या उंबऱ्यात आली. पाहते तर काय, अंगणात नाना हसतच पण हळू आवाजात अगदी चोरून बोलल्यासारखा फोनवर बोलत होता आणि खाली डाव्या बाजूला कलाईच्या अंगणात नैना एका कोपऱ्यात उभी राहून नानाकडे बघत लाजत मुरडत फोनवर बोलत होती.


प्रेमाचा गंध अनुभवत असलेली सखी त्या दोघांकडे पाहून हसली आणि ती स्वतःशीच बोलली,
‘कृष्णा नाना बद्दल क्रिष्णना सांगायचं राहूनच गेलं की रे.. किती काही बोलायचं असतं त्यांच्यासोबत पण हल्ली माझ्या वाटणीला येतच नाही ते.’


नानाकडे बघत आपल्या ओढणीशी चाळा करत बोलणाऱ्या नैनाने सखीला दरवाजात पाहिलं आणि “वैनी आल्या.” एवढंच बोलून तिने पटकन काॅल कट केला.


‘वहिनी?’
नानाने मोबाईल कानाला लावूनच आश्चर्याने मागं पाहिलं आणि सखीला यावेळी घरी पाहून तो हसतच बोलला,
‘“सखी, आज तू घरी?”

सखी हसत बोलली,
“सहजच तू ये ना.”

नाना आपले ओले सँडल आणि रेनकोट बाहेर उतरवत हसत बोलला,
“मी मघाशी काकूला आवाज दिला तेव्हा का नाही आलीस बाहेर?”

स्वतःच्याच धुंदीत असलेली सखी हसून बोलली,
“कधी हाक मारलीस मी तर ऐकलेच नाही.”


“काय बोलतेस? मी नेहमी सारखीच मोठ्याने हाक मारलेली की…” नाना खाटेवर बसत हसून बोलला.


“सुरेखाच्या घराकडे बघून आवाज दिला असशील ना, त्यामुळे मला ऐकायला आलं नसेल.” सखीने उगाचच तीर चालवला.


नाना थोडासा लाजूनच हसत बोलला,
“ते हाक मारता मारता मान इकडे तिकडे फिरतेच की… तसंच होतं माझं कधीकधी.. बाकी काही नाही बघ.”

सखी हसली आणि नेहमीसारखी हक्काने बोलली,
“तुला खायला काय करू का? का जेवतोसच?”


नाना खाटेवर ऐसपैस बसत बोलला,
“काही नको.. जेवून आलोय.


सखी दिंडीच्या दरवाजातून बाहेर पुन्हा चालू झालेली ती रिमझिम बघत बोलली,
“गावचा पाऊस किती सुंदर असतो ना..”

यावर नाना हसला,
“गावचा वेगळा आणि मुंबईचा वेगळा असं असतं का?”

सखीने जन्माला येऊन पहिल्यांदा पाऊस मनसोक्त अनुभवलेला. आजही आणि कृष्णा सोबत असताना त्या दिवशीही! त्या दिवशीची कृष्णाची पावसातील ती घट्ट मिठी आठवून सखी आताही आलेल्या थंड हवेने शहारली.


सखीला शांत झालेलं पाहून नानाने हसत विचारलं,
“काय विचार करतेस, मला तरी सांग.”


सखीने बाहेरची नजर नानावर टाकली आणि तिने हलकेच गालाच्या कोपऱ्यात हसत विचारलं,
“नाना हसणार नसलास तर एक विचारू?”

नाना हसतच बोलला,
“मी कुठे हसतो होय… विचार की.”


सखी आपल्या पायाच्या अंगठ्याकडे बघत आणि त्याच अंगठ्याने खालची भुई उकरत काहीशी लाजून बोलली,
“प्रेम म्हणजे काय रे?”


सखी आज चक्क प्रेमाबद्दल विचारते!
नानाला नवल वाटलं पण तिची अवस्था पाहून ते नवल फार काळ टिकलं नाही कारण ती सध्या ‘प्रेम’ या दोन शब्दांभोवतीच गुरफटलीये, हे त्याला जाणवत होतं.

सरळ उत्तर देईल तो नाना कसला तो मुद्दामून बोलला,
“आता बघ, प्रेम म्हणजे प्रेम असतं.. तुमचं आणि आमचा सेमच असतं.”

नाना प्रेमाबद्दल काहीतरी वेगळे सांगतोय म्हणून सखी त्याच्याकडे बघून कान देऊन ऐकू लागली. नाना हसत बोलला,
“प्रेम सगळ्यांचं सगळ्यांवर असतं.. आईचं मुलांवर.. मुलांचं आईवर, विद्यार्थ्यांचं बाईंवर.. शिक्षकांचं मुलांवर, पुढार्‍यांच त्यांच्या जनतेवर आणि जनतेचं स्वतःवर…..”

त्याला भलतंच बडबडताना पाहून सखी हिरमोड होऊन बोलली
“ए ऽ वेडा… मी तुला ते नाही विचारलं. मी तुला दुसऱ्या प्रेमाबद्दल विचारतीये.”


नाना हसत बोलला,
“‘वेडा’ चांगली उपाधी दिलीस.. अगदी सासू सारखीच!”

त्याला मुद्दा सोडून भलतंच बडबडताना पाहून सखी किंचित वैतागून बोलली,
किती भाव खाशील रे.. सांग ना लवकर.”


नाना खाटेवर जरा पुढे सरकून बसला आणि नैनाच्या घराकडे बघत रोमँटिक मूडमध्ये बोलला,
“प्रेम म्हणजे गारवा! तो फक्त थंडावा देतो आपल्या तानाला मनाला.. सगळी दुनिया एकीकडे आणि आपल्या गारवा एकीकडे. प्रेमात पडल्यावर ती व्यक्ती कशी दिसते, कशी वागते, कशी राहते, कशी बोलते या कशालाच अर्थ उरत नाही. ती व्यक्ती कितीही वेडी असली तरी आपल्यासाठी लय भारी असते. त्या व्यक्तीला पाहण्यासाठी, त्या व्यक्तीशी बोलण्यासाठी मन उगाचच झुरत राहतं.”


नाना आत्ताचाच स्वतःचा अनुभव सांगत बोलला,
“तिच्याशी कितीही बोललं तरी मनच भरत नाही बघ.. फक्त बोलतच रहावसं वाटतं. त्या व्यक्तीकडे पाहून आपोआप हसू येतं.. ती वेगळीच फिलिंग असते यार.”


नैनाची मिठी आठवत नाना त्याच क्षणांमध्ये हरवत बोलला,
“त्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी खास असते. त्या व्यक्तीच्या स्पर्शात तर जादू असते. त्या व्यक्तीचा स्पर्श आठवून सुद्धा शहारा येतो.”


नानाचा अनुभव संपला आणि त्याने सखीकडे पाहिलं. सखी नानाच्या प्रत्येक वाक्यासोबत स्वतःची तुलना करत पुन्हा तो पाऊस बघण्यात हरवली.


नानाच्या मोबाईलवर लगेचच मेसेज आला-
'पटकन बाहेर या.’


नैनाचं आमंत्रणच होतं. नानाने हसत रिप्लाय दिला,
‘आलोच.’

..आणि तो लगेचच बाहेर गेला. सुरेखा बाहेर गेल्यामुळे नैनाला बोलण्यासाठी जरा ढील मिळालेली त्याचा उपयोग करत नैनाने नानाला पुन्हा फोन केला आणि एकमेकांकडे बघत लाजत मुरडत फोनवर बोलत त्यांचं गुटुर गुटुर पुन्हा चालू झालं.


नानाच्या बोलण्यातून नवीन आणि नाजूक अर्थ उमगलेली सखी स्वतःशीच गालात हसत अंगठ्याने भुई उकरू लागलेली.


‘एखादं नवीन सत्य स्वीकारणं सोपं असतंच कुठे!


‘प्रेम’ हा शब्द देखील दूरदूर पर्यंत जिच्या आयुष्यात नव्हता, तिच आता त्या शब्दाभोवती घुटमळत होती. सगळीकडे आनंदी आनंद, प्रसन्न मन.. सगळं जग जसं हलक हलक वाटत होतं तिला.. अगदी तिच्या मनातल्या भावनांसारखं!


आपल्या वाऱ्यावर उडणाऱ्या पदराकडे पाहताना एक गोड विचार तिच्या मनात येऊन गेला-
‘या पदरासारख आपण ही वाऱ्यावर उडावं. वाऱ्यासोबतच तरंगत तरंगत त्याच्याकडे जावं आणि झुळूक बनवून त्याला स्पर्शून पुन्हा मागे फिरावं..’ किती तिचा वेडा विचार! या विचारासोबतच ती स्वतःशीच लाजली.


स्वतःलाच विचित्र वाटेल.. इतकी विचित्र वागत होती ती. जशी ही नेहमीची सखी नव्हतीच. कात टाकणे म्हणजे किती!


प्रेमाचा गोड दंश झालेली ही सखी वेगळीच होती! जी तनाने आणि मनाने कृष्णाची झालेली.
कृष्णमय झालेली. जिला जगाची फिकीर नव्हती. जिला त्याच्याशिवाय काही दिसत नव्हतं. काही कळत नव्हतं, अशी कृष्णाची सखी झालेली…
अशी कृष्णसखी झालेली!


नानाच्या बोलण्यातून तिला गोड अर्थ उमगलेला. तिच्या या खुळ्या भावनेला तिला नाव सापडलेलं. ते नाव इतकं गोडं होतं की तिलाच विश्वास बसत नव्हता.. की असं ही होऊ शकतं!


तिच्या अंतर्मनाने आत्ताच कौल दिलेला. जे स्वीकारताना तिच्या शरीरातील कण न कण आनंदाने जसा की भरून आलेला. सखीने आपला हात काळजावर ठेवला. तिच्या हृदयाची धडधड वाढलेली. गालावर लाजेचं हसू उमटत होतं. डोळ्यांत आनंदाने पाणी येऊन पाहत होतं.

तिच्या अंतर्मनात आवाज उठलेला. गोड ठिणगी पडल्याची जाणीव झालेली. ती सुखद भावना तिच्या डोळ्यांनाही सुखावून गेलेली.


‘आपल्या नशिबात प्रेमच नाही’ हा उंच नेहमी दुखावणारा मनोरा ही आता कायमचा जमीनदोस्त झालेला. ती आपला हात हृदयावर ठेवून इकडे तिकडे अस्थिर नजरेने बघत किंचित गालात हसत तिच्या सख्याला बोलली,
“कृष्णा ऽ, म्हणजे मी………मी….

तुला कळलं ना रे…….”


तिचा सखा तिच्या समोरच आहे या विश्वासाने तिने लाजून आपला चेहरा ओंजळीत घेतला. आनंदाने हलकीशी थरथरत ती ओठांत बोलली,
“मी… तुझी सखी.. क्रिष्ण् च्या प्रेमात पडलीये अरे…”


बोलताना तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू आलेले. स्वतःच्या ओंजळीत चेहरा असताना सुद्धा तिच्या गालावरच हसू मात्र कायम होतं. अंतर्मनात गोड खळबळ माजलेली ती वेगळीच. तिचे श्वास बिघडलेले. इतकी मोठी गोष्ट घडलेली असताना आत मध्ये उलथापालत होणार नाही तरं नवलच!

उर्वरित भाग पुढे..

© प्रियांका सुभा कस्तुरी
०८/०५/२०२४

…..

जमलं तर संध्याकाळपर्यंत पुन्हा भेटू..


शुभ सकाळ!

🎭 Series Post

View all