पुनर्विवाह (कृष्ण सखी)-१५४

कृष्ण सखी
कृष्ण सखी -१५४


तिचा सखा तिच्या समोरच आहे या विश्वासाने तिने लाजून आपला चेहरा ओंजळीत घेतला. आनंदाने हलकीशी थरथरत ती ओठांत बोलली,
“मी… तुझी सखी.. क्रिष्ण् च्या प्रेमात पडलीये अरे…”


बोलताना तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू आलेले. स्वतःच्या ओंजळीत चेहरा असताना सुद्धा तिच्या गालावरचं हसू मात्र कायम होतं. अंतर्मनात गोड खळबळ माजलेली ती वेगळीच. तिचे श्वास बिघडलेले. इतकी मोठी गोष्ट घडलेली असताना आत मध्ये उलथापालत होणार नाही तरं नवलच!


सुरेखा अचानक आल्यामुळे नैनाशी बोलणं आटोपत घेऊन नाना हसतच घरात आला तेव्हा सखी स्वतःशीच गालात हसत होती. आज जरं सोनाई घरी असती तरं तिनेही सखीच्या चेहऱ्यावरची नवलाईची लाली ओळखून तिच्या मनातलं ओळखलं असतं. आज तिचा चेहराच बोलत होता. तिला तशी पाहून नानाला तिच्यासाठी खूप खूप आनंद झाला.


तिच्या चेहऱ्यावरचं ते हसू पाहून आणि तिला स्वतःशीच हसताना पाहून नानाने हसतच विचारलं,
"सखी, तू प्रेमात पडलीयेस का?"


त्याच्या डायरेक्ट विचारण्याने सखी गडबडून लगेच स्वयंपाकघरात गेली आणि उगाचच कडापाच्या फळीवरचा डबा चाचपडत त्याला टाळत बोलली,
"नाना, उगाच काही पण बोलू नको हं."


नाना हसतच स्वयंपाकघरात जात तेच बोलला,
"मला तर वाटतं.. तू कोणाच्या तरी प्रेमात पडलीयेस."


सखी बावरून काहीशी लाजून बोलली,
"पुन्हा तुझं तेच! तू गप्प बस हं..."


नाना हसत बोलला,
"मी कुठे उड्या मारतोय." आणि तिच्या हातात असणाऱ्या डब्यातल्या शेंगदाण्याची मूठ भरत बोलला,
"आपला कृष्णा आहेच तसा की कोणीही प्रेमात पडेल, बरोबर ना?"


सखीला त्याच्यावर रागवायचं होतं पण तिच्या गालातलं हसू आज जातच नव्हतं. ती गालात हसतच त्याच्यावर रागावली,
"तू गप्प बस हं ऽ.. आणि काय सारखं तेच तेच लावलंयस तू... तू जा बघू."


नाना मुद्दामून ओटीवर बघत बोलला,
"बर ठीक आहे.. तो बघ कृष्ण आला..आता तोच सांगेल."


सखी भलतीच बावरली. ती नानाला हळू आवाजात रागावली,
"ए ऽ, नाना.‌ गप्प बस ना."


नाना ओटीवर बघत तसाच सखीकडे हात करत बोलला,
"कृष्णा, तुच सांग.. तुला पण वाटतंय ना सखी तुझ्या प्रेमात पडलीये?"


त्याच्या बोलण्याने सखी अशी लाजली! तिने भांबावलेल्या मनःस्थितीत आपला चेहरा लाजून ओंजळीत पकडला आणि स्वतःशीच बोलली,
'कृष्णा, हा नाना किती लाजवतो!'


सखीला लाजताना पाहून नाना तिच्याकडे पाहून हसायला लागला.
"सखुबाई, तुमचे मास्तर अजून आले नाहीत.. आधीच लाजू नका."


नाना बोलल्यावर सखीने मागे वळून पाहिलं आणि हसतच त्याला चापट मारत बोलली,
"तू जा बघू.. खूप दुष्ट झालायस."


नाना हसायला लागला,
"डायरेक्ट जा! चहा पाणी तरी कर."


त्याच्या गोड चिडवण्याला त्रासून सखी हसतच त्याला पुन्हा रागावली,
"तुला काही नाही मिळत.. तू जा बघू."


नाना हसतच बाहेर जात पुन्हा बोलला,
"मी जातोय पण तू एकदा विचार कर.
खरंच प्रेमात पडलीयेस ना?"


सखी काहीशी लाजून बोलली ,
"नाना तू गप्प बस हं...."


नाना सुद्धा हसतच निघाला. तो अंगणात गेला असेल की कृष्णाच्या बाईकचा आवाज आला तशी सखी दरवाजात आली.


कृष्णाने बाईक थांबवली आणि नानाशी बोलू लागला. त्याने नानासोबत बोलता बोलता सखीकडे पाहिलं आणि खुणेनेच विचारलं,
‘ताप नाहीये ना?’

सखीने हसून नकारार्थी मान हलवली. तिचा प्रसन्न चेहरा तिची तब्येत बरी असल्याची खुण होती. तो तिच्याकडे पाहून हसला. सखी सुद्धा त्याच्याकडे पाहून गोड हसली.


तो बाईकवर बसलेलाच होता. एका हाताने बाईकचं हँडल पकडून त्याचा दुसरा हात बोलताना हवेत हलत होता. चेहऱ्यावर नेहमीसारखं प्रसन्न हसू होतं ते वेगळच! हेल्मेटमुळे विस्कटलेले केस कपाळावर आलेले. सावळा असला तरी देखणा कृष्णा सखीच्या नजरेला फारच भावला. आजवर कधी त्याचं निरीक्षण न करणारी सखी आज मात्र त्याला एकटक डोळे भरून पाहत होती.


'हसता हसता बोलताना क्रिष्ण् कसले भारी दिसतात रे कृष्णा!' तिचं अल्लड प्रेमात पडलेलं मन त्याचं पुरुषी सौंदर्य पाहण्यात गुंतल होतं की कृष्णाने तिची वाट पाहून शेवटी तिला हाक मारली,
"सखी ऽ ... पाणी आणता काय.."


तशी सखी स्वतःच डोक्यावर टपली मारत स्वतःशी बडबडली,
"काय सखू, पाणी द्यायचं सोडून अशी कधी न बघितल्यासारखी काय बघत बसलीयेस."


सखी लगेचच दोन तांब्यात पाणी घेऊन आली. एक कृष्णाला दिला आणि दुसरा नानाला!


एरवी वरून पाणी पिणाऱ्या कृष्णाने आज नानाशी बोलता बोलता तोंडाला तांब्या लावला आणि अर्धा तांब्या संपल्यावर तांब्या पाण्यासकट त्याने सखीकडे दिला.

कृष्णाशी बोलण्यात गुंतलेल्या.. तांब्या हातात पकडून बसलेल्या नानाच्या तांब्याची वाट न पाहताच सखी तो कृष्णाचा तांब्या घेऊन ... त्याचं राहिलेलं उष्ट पाणी पाहत पुन्हा घरात यायला निघाली.


'क्रिष्ण् चे ओठ लागलेत इथे!'
तांब्याकडे पाहताना तिच्या हृदयात चुळबूळ झाली. लगेचच मन लोभी झालं आणि ती जागीच थांबून हळूच तांब्याला ओठ लावणार इतक्यात...

कृष्णाशी बोलताना सखी वर बारीक लक्ष असलेला नाना जोरात आनंदाने ओरडला,
"च्या ऽ मारी ... सखी!"


तो तांब्या ओठाला लागण्याआधीच सखीला पाणी न पिताच जोराचा कोरडा ठसका लागला. तिने बावचळून तोंडावरून पदर फिरवला आणि ठसका कसाबसा आतल्या आत गिळत मागे वळून पाहिलं. कृष्णाने ही न कळून सखीकडे बघत नानाला विचारलं,
"काय झालयं? ओरडलास कशाला?"


खूप मुश्किलीने आपला ठसका कसातरी परतून लावत.. तरीही हलकेच ठसकट सखी नानावर रागावली,
"तू.... तू जा बघू!"


तिला गोंधळलेली पाहून नाना तिच्याकडे बघून हसायला लागला,
"काय मग... चोरी पकडली ना?"


"कसली चोरी?"
कृष्णाने विचारल्यावर तर सखी पुरती गोंधळली.


नाना मुद्दामून भुवया उडवत हसत बोलला,
"सखी, सांगू का.. सांगू?"

सखीला नानाचा खूपच राग आला पण विशेष म्हणजे पहिल्यांदाच असं झालेलं राग येऊन सुद्धा, ती रागवून सुद्धा तिच्या गालातलं हसू काही जात नव्हतं. ती पुन्हा हसतच रागवली,
"ए ऽ नाना...तू गप्प बस हं.. आणि जा इथून!"


त्या दोघांच्या हसण्याने काहीच न कळून सुद्धा कृष्णाच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू आलं आणि तो हसतच बोलला,
"सखी... हकालपट्टी करताय काय त्याची?"


सखी कृष्णालाच नानाची तक्रार करत बोलली,
"पाहिलं ना कसा त्रास देतोय.. जाऊ दे त्याला"


नाना लगेच नाटकीपणाने कृष्णाच्या खांद्यावर हात ठेवून दुःख झाल्यासारखं बोलला,
"बघितलं का तुझी बायको! कशी हाकलवून लावते मला.. बिचारा मी."


कृष्णाने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि खांद्यावरच हात काढून तोच हसत रागावला,
"बेन्या, सखी बरोबर रागवतात तुझ्यावर .. चल घरात."


नाना घरात आल्यावर तर कृष्णा समोर तिला अजून छेडणार... त्याआधीच बावरलेली सखी नानाकडे बोट करून पण गालात हसतच बोलली,
"नाना, आज तू घरात यायचं नाहीयेस.. तू जा बर आधी."


कृष्णा हसतच अंगणातून वर येत बोलला,
"सखी, येऊ द्या त्याला.. खरोखर हकालपट्टी करताय का त्याची."


नाना सखीकडे पाहून पहिला हळूहळू हसत होता. तिची उडालेली तारांबळ आणि त्याला घालवायची घालमेल पाहून तर नाना नंतर मोकळेपणाने हसायला लागला.


त्या दोघांचं काय चाललंय, हे कृष्णाला कळत नव्हतं पण हे सखीचं 'रागावणं' रागाचं नव्हतं तर प्रेमाचं होतं हे त्याला दिसत होतं.


कृष्णा उंबऱ्याजवळ गेल्यावर मागे बघत नानाला हसून बोलला,
"तुमचं तुम्ही बघून घ्या. सखींनी सोडलं तर ये घरात." आणि हसतच घरात गेला.


तो गेल्यावर नाना भुवया उडवत बोलला,
"काय मग सखी.....? हम्म... हम्म...."


सखी त्याच्यावर पुन्हा हसतच रागावली,
"तू गप्प बस हं ऽ.. आणि जा बघू.. पुन्हा येऊ नकोस.”


नाना तरीही तिला त्रास देत चिडवतच होता,
"चोरी पकडली ना? काय... काय... बरोबर ना?"


सखीला इतकं लाजल्यासारखं होत होतं. तिने दारातील चिपाटी उचलली आणि पदर कमरेला खोचतच पुन्हा अंगणातून खाली येत बोलली,
“थांब तुला बघतेच आता.”


"ए बाई, लग्न व्हायचंय अजून माझं."
नाना हसतच बाईकवर बसत बोलला आणि बाईक चालू केल्यावर जातानाही तिला त्रास देत भुवया उडवत बोललाच,
"मग सखी......"


सखी लाजून हसतच काहीशी वैतागून बोलली,
"ए ऽ तू जा रे....."

नाना हसतच प्रसन्न मनाने निघून गेला.


आरव आणि गौरी सुद्धा धावतच शाळेतून घरी आले. थोडसं खाऊन लगेचच ते खेळायला देखील गेले. सखीने स्वयंपाकाला लागत कृष्णाला विचारलं,
“आई येणार आहेत की राहणार आहेत?”


कृष्णा आपल्याच खोलीत काहीतरी करत होता. तो तिथूनच बोलला,
“आई सकाळीच येईल. मावशीची तब्येत जरा ठीक नाही.”


घरात सोनाई नव्हती तर घर शांत वाटत होतं. कृष्णा स्वयंपाकघरात येत सोनाईच्या आठवणीने बोलला, “आई घरात नाहीये तर तिची आठवण येतीये.”


सखी ही हसून बोलली,
“मला ही.”


सखी कालवणाची तयारी करत अगदी सहज बोलली,
“तुम्हाला थोडावेळ असेल तर इथे बसता का.. आई नाहीयेत तरं करमत नाहीये.”


कृष्णा लगेचच खाली बसला आणि पुढे होऊन तिच्या पुढ्यातील लसणाची कुडी घेत लहान होत बोलला,
“बसतो की.. आई नाहीये तर मलाही करमत नाहीये.
म्हणून मी तिला कुठे पाठवत नाही. सकाळी आपल्याला काही बोलली नव्हती आणि आपण निघून गेल्यावर पाठून गुपचूप निघून गेली. उद्या येऊ द्या एकदाशी... भांडतोच तिच्याशी.”


सखी त्याच्याकडे पाहून हसली. ती लसणाची पाकळी सोलतच त्याने तिला काळजीने विचारलं,
“आता बऱ्या आहात ना? दुपारी औषधं घेतली ना वेळेवर? पुन्हा अंग भरून नाही ना आलं?”

त्याच्या डोळ्यांत काळजी पाहून सखी हसून बोलली,
“औषधही खाल्ली आणि आता मला बरंही वाटतंय


दोघांच्या गप्पांमध्ये जेवण झाल्यावर चौघांनी गरमागरम जेवून घेतलं. नेहमीसारखे खेळून खेळून दमलेले आरव आणि गौरी लगेच झोपी गेले. त्यांच्या अंगावर पांघरून घालून सखी आपल्या खोलीतून बाहेर आली तेव्हा कृष्णा सोनाईसोबत बोलून बाहेरच्या उंबऱ्यात उभा होता.


मुले झोपलेली. शांत वातावरणात रात किड्यांची किरकिर ऐकू येत होती. बाहेरची थंड हवा घरात सुद्धा जाणवत होती. सखीला त्याच्याशी खूप खूप बोलायचं होतं. पाठमोऱ्या त्याच्याकडे पाहताना सखी भिंतीला टेकून उभी राहिली.


त्याच्यासोबत शैक्षणिक विषयावर बिनधास्त बोलणारी सखी प्रेमाबद्दल बोलताना थोडीशी संकोचली. तिने अस्थिर आवाजात विचारलं,
"क्रिष्ण् ऽ, एक विचारू?"


कृष्णा पुन्हा ओटीवर येत हसत बोलला,
"विचारा की.."


सखी स्वयंपाकघराच्या दरवाजाला नखाने उगाचच रेघा मारत हळू आवाजात बोलली,
"प्रेम म्हणजे काय क्रिष्ण्?"


सखी अचानक असं काही विचारेल अशी त्याला कल्पनाच नव्हती. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू हवेसोबत उडून गेलं. तिचा प्रश्न ऐकून पहिली त्याची नजर आतल्या खोलीत समोरच्याच भिंतीवर असणाऱ्या आरतीच्या फोटोकडे गेली आणि त्याचा वेदनेची भावना लपवणारा आवाज आला,
"प्रेम म्हणजे आरु.... प्रेम म्हणजे खोल खोल समुद्र जिथे सुखावणाऱ्या, धुंद करणाऱ्या लहरींसोबत चटके देणाऱ्या लहरी सुद्धा सापडतात.. त्यातून आपली सुटका नसते."


एका वाक्यात त्याने त्याचा अनुभव सांगितला. तिच्या आठवणीने गलबलून आल्यावर थकल्यासारखा मोकळा श्वास सोडत कृष्णा स्वयंपाकघरात जात बोलवलं,
"मी धार काढून येतो.‌"


कृष्णा तिच्यासमोर धार काढायला गेला. सखी सुन्नपणे तिथेच उभी होती. डोळ्यांतील अश्रू खाली धावायच्या आधीच घाईत ती आपल्या खोलीत आली. कृष्णाच्या बोलण्याने तिला वास्तवाची जाणीव झाली. दुपारपासून तिच्या नाजूक अलवार भावनांचा पतंग अगदी आकाशाला भेदून वर वर जात होता पण त्याच्या बोलण्याने तो पतंग एका क्षणात जमिनीवर आदळला, त्यासोबत तिच्या नाजूक भावनाही आदळल्या आणि त्या जखमी झाल्या.


प्रेम म्हणजे..... 'आरु'
त्याच्या एका शब्दातच त्याचं मन खुलं झालं. सखीचे प्रेमात नुकतेच गुलाबी झालेले डोळे भरून आले. जितका आनंद तिला दुपारपासून झालेला जणू सगळा आनंद अचानकच काळोखात गायब झाला.


ती खिडकीतून बाहेर बघत जड आवाजात बोलली,
‘मला आधीच माहिती होतं ना क्रिष्ण् चं आरतीताईंवर प्रेम आहे मग तरीही मी कशी त्यांच्या प्रेमात पडले? मी नव्हतं असं करायला पाहिजे कृष्णा..... ते मित्र होते तर मी ही मैत्रीपर्यंतच स्वतःला बांधून ठेवायला हवं होतं.’


पुन्हा ती दूर दूर पहात रडवेली होत बोलली,
‘पण मी तर मैत्रीच्या कोशातचं होते की रे.. मग कधी मी माझी रेषा ओलांडली मलाही कळलं नाही. मी मुद्दामून नाही रे प्रेमात पडले.... मी मुद्दामून नाही....’


पुन्हा आपले डोळे पुसत सखी धीर गंभीर हसली,
‘तरी म्हटलं हे ओंजळभर सुख माझ्या नशिबात कसं? पण काही हरकत नाही कृष्णा.... तू जे करतोस ते योग्यच असतं.’


तो तिचा नाही. त्याचं तिच्यावर प्रेम नाही. ती मैत्रीणी पलिकडे त्याच्यासाठी काही नाही, हे सत्य स्वीकारून सुद्धा सखीचं मन त्याच्यासाठीच तळमळत होतं. अजूनही तिच्या मनातील त्याच्या प्रतीची उदात्त भावना कणभर सुद्धा कमी झाली नव्हती. सखी पुन्हा खिडकीतून पाहत भिंतीला टेकत मोकळा श्वास सोडत उभी राहिली. सत्य स्वीकारल्यामुळे आता जरा तिला मोकळं वाटत होतं.


कृष्णाला... आपल्या प्रेमाला मनापासून समर्पित होत सखी स्वतःशीच पुटपुटली,
‘कृष्णा, क्रिष्ण् आरतीताईंचे असतील पण मी.. मी फक्त त्यांचीच असेन.

क्रिष्ण् च्या प्रेमाने भरलेल्या ओंजळीतून जे थेंब माझ्या पदरात पडतील तेवढेच माझे!’


प्रेमाचा गंध नुकतीच हुंगणारी सखी त्याला त्याच्या ‘तिच्यासह’ स्वीकारून प्रेमाची नवीन परिभाषा स्वतःच आखत होती

उर्वरित भाग पुढे..

© प्रियांका सुभा कस्तुरी
०८/०५/२०२४

………

काय वाटलं हा भाग वाचून..

भेटू लवकरच..

🎭 Series Post

View all