पुनर्विवाह (कृष्ण सखी)-१५५

कृष्ण सखी
कृष्ण सखी -१५५


रात्र झालेली. दिव्यांचा प्रकाश सोडला तर सगळीकडे काळोख होता. रात किड्यांची किरकिर पावसाळ्याची ग्वाही देत होती. रस्त्यावर असणाऱ्या खांबावरच्या बलाच्या उजेडात छोटी छोटी चिलटं भिरभिरत होती. वातावरण उदासीन होतं अगदी त्याच्या मनासारखं!


सखीमुळे आरतीची आठवण झाली आणि त्याच्या मनाचा हळवा कप्पा उघडला. तो तिच्याशी जास्त काही न बोलता रंगीची धार काढायला गेला आणि धार काढताना रंगीच्या कासेसोबत तोही आतून मोकळा झाला. घरात येण्याआधी त्याने आपले डोळे पुसले मगच घरात आला.


सखी ओटीवर नव्हती म्हणजे ते खोलीत आडवी पडले असेल हा अंदाज लावून त्याने बाहेरचा दरवाजा, दिंडीचा दरवाजा, स्वयंपाकघराच्या मागचा दरवाजा.. खिडक्या सगळं बंद केलं. दिवे घालवले आणि आपल्या खोलीत आला. दरवाजा ढकलून तो मागे फिरला आणि आपोआप त्याची नजर खिडकीत गेली आणि काही क्षण ती तिथेच कैद झाली. खिडकीत नक्की सखी होती का आरती? काही क्षणांसाठी त्याचा गोंधळ उडाला. सखी अगदी आरती सारखीच गुडघे उराशी घेऊन खिडकीच्या बाहेर बघत खिडकीमध्ये बसलेली. तिच्याकडे पाहताना त्याच्या हृदयाची धडधड वाढली आणि तो तिच्याकडे पाहतच यंत्रवत खिडकीजवळ आला.


तिथे आल्यावर काही क्षण तो तिच्याकडेच भारावल्यासारखा पाहत होता. काही क्षणांच्या आहुतीनंतर त्याच्या नजरेला वास्तवाचं दर्शन झालं आणि खिडकीत सखी आहे हे त्याच्या नजरेने ओळखलं.


इकडे तिकडे बघत मान हलवतच मोठा श्वास सोडत त्याने स्वतःला स्थिर केलं. काही क्षणांसाठी आत मध्ये उगाचच त्याच्या भावनांची सरमिसळ झालेली. डोळे बंद करून नजर आणि चित्त शांत झाल्यावर त्याने पुन्हा सखीकडे पाहिलं तर ती आपला हात पाहण्यात गुंग होती.‌


त्याने तिच्याकडे बारकाईने पाहिलं. तिचा चेहरा दुःखी वाटला. डोळ्यांची कडा ओली दिसली.
‘सखी रडतायेत?’ त्याने पुढच्या क्षणी अस्वस्थपणे आवाज दिला,
“सखी ऽ …”


तरीही सखी एक नाही दोन नाही. आपला हात पाहत आपल्या नशिबाचं गुपित तिच्या सख्याला विचारण्यात ती गुंग होती.


तिच्या खांद्याला हलकासा स्पर्श करत त्याने पुन्हा अस्वस्थपणे आवाज दिला,
“सखी, कुठे हरवला?”

आपल्याच कोशात असणारी सखी त्याच्या आवाजाने अचानक दचकली आणि त्याच्याकडे पाहून घाबऱ्या आवाजत बोलली,
“काय झालं?”


कृष्णाने तिचाच प्रश्न तिला पुन्हा काळजीने विचारला,
“मी तेच विचारतोय तुम्हाला काय झालंय?”


आपल्या हाताची मूठ आवळून मान बाहेरच्या दिशेला फिरवत सखी डोळ्यांची कडा पुसून उगाच हसत बोलली,
“काही नाही.”


ती काहीतरी लपवतीये असं वाटून कृष्णाने पुन्हा काळजीने विचारलं,
“काय झालंय सखी? मला सांगणार नाहीत काय?”


सखी बाहेर बघत उदास स्वरात बोलली,
“सांगण्यासारखं काही नाही. मी कृष्णाला विचारत होते.. माझ्या नशिबात काय लिहिलंयस?”


कृष्णा थोडासा हसून बोलला,
“मग ते त्या कृष्णाला कशाला? मला विचार ना.. मलाही हातावरच्या रेषा कळतात.”


सखी त्याच्याकडे पाहून उगाच हसली. तिचं ते वरवरचं हसू पाहून कृष्णा आपला हात पुढे करत तिला हसवण्यासाठी बोलला,
“द्या बघू हात.”


सखीने आपला हात पुढे केला. कृष्णाने एका हाताने तिची नाजूक बोटे पकडली आणि दुसऱ्या हाताचं बोट तिच्या तळव्यावर फिरवत हसून बोलला,
“ही लांब रेषा तुमच्या सुखाची आहे. ही गडद रेषा ही तुमच्या आयुष्यातील आनंदाची आहे. हे बघा, ही रेषा सुद्धा सुखच दाखवते आणि ही अर्धवट रेषा म्हणजे तुमच्या आयुष्यातील संपलेलं दुःख.. समजलं काय..”


तिच्या तळव्यावर अलवार फिरणाऱ्या त्याच्या बोटाने तिच्या मनात सुद्धा मोहक अलवार भावना निर्माण होत होत्या. हाताला गोड गुदगुल्या होत होत्या.. मनाला कसं सावरायचं! ते तर त्याच्या जवळच घुटमळत होतं. तो खाली पाहत बोलत होता पण ती त्याला पाहण्यात हरवलेली.


तिच्या तळहाताकडे पाहताना त्याचं लक्ष सखीच्या मनगटाने खेचून घेतलं आणि अगदी सावकाश त्याने बोटांनी तिच्या बांगड्या मागे सारल्या. तिच्या मनगटावर सुद्धा भाजलेल्याच्या तशाच खुणा होत्या जशा तिच्या पायावर! ते पाहताना कृष्णाला इतकं वाईट वाटलं आणि तितकाच नितीनचा राग सुद्धा आला.


त्याची नजर आपोआप तिच्याकडे गेली. ती त्याच्याकडे पाहत नेहमीसारखी गालात हसत होती. तिच्याकडे पाहताना कृष्णाला खूप भरून आलं-

इतका नाजूक देह, इतकं नाजूक हळवं मन पण या देहाने.. या मनाने किती काही सोसलं आहे. किती काही आतमध्ये साठवलं आहे. सगळं स्वतःमध्ये सामावून सखींना असं हसता कसं येतं?

किती कणखर आहेत माझ्या सखी!’
तिच्याकडे पाहताना तोच भाऊक झाला.


‘आता सखी आपला हात पाहत हाच तर विचार करत नसतील? त्याच दुःखात तर स्वतःला बांधून ठेवत नसतील?’ या विचाराने तो अस्वस्थ झाला आणि तिचा तोच हात आपल्या हातात घेत तो उगाचच हसून बोलला,
“सखी ऽ ….”


त्याच्या उबदार हातात हात गेल्यावर तो आश्वासक स्पर्श तिच्या बावरलेल्या मनाला स्थिर करण्यासाठी पुरेसा होता.
“काय?”


कृष्णा तिच्या डोळ्यांत बघत आपलेपणाने बोलला,
“आपण मित्र आहोत ना?”


ती त्याच्या डोळ्यांत खोलवर पाहत बोलली,
“हा काय प्रश्न झाला क्रिष्ण्…‌ माझ्यासाठी आपलं नातं मैत्रीच्या ही खूप पुढे आहे.”


त्याच्याही त्यांच्या मैत्री प्रती काही अशाच भावना होत्या!

कृष्णा पुन्हा तसाच आपलेपणाने बोलला,
“मग मला तुमच्याविषयी सांगता काय.. ऐकायला आवडेल मला तसंही मला तुमच्याबद्दल काहीच माहिती नाही.”


सखी खिडकीच्या भिंतीला टेकून त्याच्याकडे पाहून हसून बोलली,
“माझ्याबद्दल सांगण्यासारखं काय आहे.. तुम्ही तुमच्या आठवणी सांगा. मला ऐकायला आवडतील.”


कृष्णा तिला आग्रह करत थोडासा हसून बोलला,
“मी तर सारखाच बोलत असतो. आज तुम्ही बोलायचं. तुमची शाळा, कॉलेज, लग्न सगळ्याबद्दलच बोलायचं. माझ्या सखी कशा होत्या मला थोडफार कळू तरं द्या.”


सखी भूतकाळात डोकवण्याचा कंटाळा करत बाहेर बघत बोलली,
“नाही नको. राहू द्या.”


‘सावली विद्रूप असेल तर पाठीमागे वळून पाहण्याची सुद्धा भीती वाटते!’


सखी खिडकीच्या बाहेर बघतच उदासपणे बोलली,
“चांगल्या आठवणी असल्या तर बोलाव्या नाहीतर सोडून द्यावा.”


कृष्णा तिच्या उदास चेहऱ्याची हनुवटी अलवार पकडून स्वतःकडे फिरवत तिच्या डोळ्यांत पाहत प्रेमाने बोलला,
“सोडून देण्यासाठी सुद्धा बाहेर काढावं लागतं सखी.. खरंच सखा मानता ना मला? मग मला तर सांगू शकता ना? माझ्याशी मोकळेपणाने बोलू शकता ना? मनातली खदखद माझ्याजवळ ओकू शकता ना?”


त्याच्याकडे पाहत सखीच्या नजरेसमोर तिचा भूतकाळ उभा राहिला आणि तिचे डोळे भरून आले. सखी ओल्या डोळ्यांनी बोलली,
“क्रिष्ण् ऽ.. नका विचारू. त्या आठवणी सुद्धा मला नको वाटतात.”


त्याच्याकडे पाहताना तिच्या डोळ्यांतील अश्रू गालावर ओघळले तसा त्याने तिचा हात घट्ट पकडला. काही क्षण निघून गेले. तो सुद्धा भाऊक झालेला. कृष्णाने तिच्या डोळ्यांत पाहत विचारलं,
“जरं तुम्हाला एक खून माफ असेल तर कोणाचा खून कराल?”


सखी क्षणाचाही विलंब न करता ओल्या आवाजात बोलली,
“त्याचा.”


त्याला अगदी अपेक्षित उत्तर आलेलं पण या उत्तरात पहिल्या सखीची अजिबात छबी नव्हती.


तिच्या भूतकाळात डोकवताना तिला धीर देत स्वतःही तिच्यातच आधार शोधत कृष्णाने तिचा हात घट्ट पकडून विचारलं,
“एक विचारू काय? पण नवरा म्हणून नाही हा विचारत, एक मित्र म्हणून विचारतोय.”


सखी धीरगंभीर हसत बोलली,
“कसंही विचारा.”


कृष्णा तिच्या डोळ्यांत पाहत धीर एकवटून बोलला,
“तुम्ही इतक्या देखण्या दिसता म्हणजे तुमच्यावर प्रेम करणारे लय असतील ना? म्हणजे त्यातलंच तुम्हालाही कोणी आवडत होतं काय?”


ते कॉलेजचे दिवस आठवून सखी त्याच्याकडे पाहून पुन्हा धीरग हसली. तिचं असं हसणं त्याला त्या दिवशी सारखंच भीषण वाटलं. सखी रडवेली होत बोलली,
“खरं सांगायचं तरं माझ्या कोणी प्रेमात पडलं का नाही मला माहिती नाही पण या सौंदर्याच्या प्रेमात बरेच जण पडलेले.. पण माझ्याकडे आदराने पाहिलं अशी नजर मला कधी दिसलीच नाही हो, त्यामुळे माझा कोणाच्या प्रेमात पडण्याचा कधी प्रश्नच आला नाही. माझ्या आयुष्यातील तुम्हीच पहिले पुरुष आहात ज्याला मी मनापासून माझा सखा मानलं.”


तिच्या दुःखात सुद्धा शेवटच्या वाक्याने कृष्णा मनोमन सुखावला. का? हे त्यालाही कळलं नाही पण ती फक्त ‘त्याची’ सखी आहे ही भावना त्याच्या आतमध्ये कुठेतरी दृढ झाली.


तिला विचारलं नाही तर ती उभ्या आयुष्यात कधी त्याच्याबद्दल बोलणार नाही हे माहीत असल्यामुळे कृष्णाने पुन्हा तिला प्रेमाने विचारलं,
“तुम्हाला आणि तुमच्या माहेरच्यांना नितीनचं स्थळ कसं पसंत पडलं?”


त्याने खूप शांतपणे आणि प्रेमाने विचारलेलं पण त्याच्या प्रश्नाने तिला नको असलेल्या गोष्टीच समोर आल्या. तिच्या मनात पहिल्यासारखी भीती नव्हती पण वेदना मात्र तशाच होत्या. सखी एका हाताने आपले डोळे पुसत खिडकीतून खाली उतरण्यासाठी पाय खाली सोडत बोलली,
“मला नाही बोलायचं काही.. खूप रात्र झालीये.”


ती खाली उतरतीये हे पाहून लगेचच समोरच्या भिंतीला हात लावत कृष्णाने तिला तिथेच अडवलं तशी सखी त्याच्याकडे पाहून किंचित राग आणि दुःख मिश्रित बोलली,
“का करताय असं तुम्ही? मला त्रास होतोय दिसत नाही का?”


कृष्णा तिचे खाली आलेले पाय दोन्ही हातांनी पकडून पुन्हा खिडकीमध्ये ठेवत प्रेमाने बोलला,
“तुम्हाला त्रास होतोय म्हणूनच बोलतोय, बोला माझ्याशी.”


तिला नव्हतं बोलायचं. तिचा घाणेरडा आणि अतिशय दुःखद भूतकाळ तिला नव्हता आठवायचा म्हणून तर ती आजवर स्वतःच्या आईशी सुद्धा बोलली नव्हती. सखीचे डोळे अश्रूंनी गच्च भरलेले. आठवायचं नाही म्हणून सुद्धा तिच्या स्मृतीपटलावर नितीनसोबतचे प्रसंग फोटोकॉपी सारखे भराभर जाऊ लागले तसे कृष्णाकडे पाहताना तिचे डोळे सुद्धा तितक्याच वेगाने खाली होऊ लागले.‌


नितीनसोबतच्या त्या दुर्गंधीयुक्त क्षणांमधील वेदना आठवून आत्ताही तिचे श्वास बिघडले आणि ते आठवायला भाग पाडलेल्या कृष्णावर सखी रडतच रागावली,
“का ऐकायचं आहे तुम्हाला? आणि काय ऐकायचं आहे? तुमच्यासारखा गोड आणि प्रेमाने भरलेला माझा भूतकाळ नाहीये. तो कधीच नव्हता. लहानपणापासून माझी आई आणि माझा भाऊ सोडले तर जगाने फक्त त्रासच दिला मला.”


सखी नकळत व्यक्त होत होती. हायस्कूलमधून, कॉलेजमधून, घरी आल्यावर ‘ती गप्प का?’ हे विचारून सुद्धा तिने कधी आईला सांगितलं नव्हतं, तेच तिचं बालपणीचं, किशोरवयीन दुःख आता ओघाने तिच्या मुखातून बाहेर पडत होतं.


ती कृष्णाकडे बघत ओल्या डोळ्यांनी रागात बोलली,
“लहानपणापासून ते अगदी कॉलेजपर्यंत माझ्याशी कोणत्याच मुलीने साधी मैत्री केली नाही.. का? तरं हे माझं सौंदर्य. मी कोणाशी हसून बोलले तरी मुली म्हणायच्या, मी खूप ओव्हर करते.
कुठल्या मुलाशी चुकून कधी कामापुरतं जरी बोलले तरी लगेच मुलींचे टोमणे मिळायचे, मी मुलांना अट्रॅक्ट करते.”


सखी स्वतःच्या देहाकडे बघत स्वतःचाच राग करत बोलली,
“हे सौंदर्य बदलता आलं असतं तर मी हजार वेळा बदललं असतं क्रिष्ण्… याच्यामुळेच मला लहानपणापासून मन मारून जगावं लागलं.”


तिचं दिसणं तिच्यासाठी इतकं त्रासदायक ठरलं असेल याची कृष्णाला कल्पनाच नव्हती. तिचं सौंदर्यच जणू तिच्या स्त्रीत्वासाठी शत्रुत्व घेऊन आलेलं. तिला झालेला मनस्ताप ऐकून कृष्णाचेही डोळे पाण्याने भरले.


त्याने घोगऱ्या आवाजत विचारलं,
“आणि तुमच्या सौंदर्यामुळेच नितीनने तुमच्याशी लग्न केलं.. हो ना?”


त्याचं बोलणं ऐकून सखीचं डोळे नव्याने भरले
जणू तिच्या खुल्या जखमेवर त्याने विस्तव ठेवलेला अशा तिला वेदना झाल्या.

हा कृष्णा काय आणि तो कृष्णा काय तिला दोघेही सारखेच!

तिने आधाराला त्याच्या हातात असलेल्या हातावर आपला दुसरा हात ठेवला आणि रडायला लागली.


तिला अशी रडताना पाहून तो भावुक होत बोलला,
“सखी…. रडू नका.”


सखी त्याच्याकडे बघत रडत बोलली,
“कशी रडू नको क्रिष्ण्? माझ्या सौंदर्याची मी खूप मोठी किंमत चुकवली हो… मला हे सौंदर्य खरंच नको.”


“सखी…..” बोलतानाही त्याचा गळा दाटला.


सखीने एका हाताने आपल्या मनगटावरच्या बांगड्या मागे घेतल्या आणि त्याला दाखवत बोलली,
“पहा …. पहा…..”


तो म्हणेल तसं आणि म्हणेल तिथं हात न लावल्यावर तिच्या हातांना मिळालेली चटक्यांची सलामी आठवून आताही तिच्या त्वचेवर काटा आला आणि सखी रडू लागली. ती पुन्हा पाच वर्षांपूर्वीच्या त्याच अतिशय घाणेरड्या वेदनादायी क्षणांमध्ये तिथेच घुटमळत होती. कृष्णाचे डोळे तिचा त्रास पाहून भरून वाहत होते पण तिला मोकळं होण्यासाठी तो फक्त मूकपणे पाहात राहिला.


सखीने त्याच्या हातातून हात काढून घेतला आणि रडतच दोन्ही हातांनी आपली साडी पोटऱ्यांपर्यत वर करून त्याला दाखवली. तिच्या गोऱ्या पायांवर ते चटके दाखवताना तिचे ओठ थरथरत होते. तिच्या ओठांतून तिच्या वेदना बाहेर पडण्यासाठी तडफडत होत्या पण हुंदक्याने तिला बोलता येत नव्हतं फक्त तिचे अश्रू बोलत होते.‌


त्यादिवशी त्याने पाहिलेली एक झलक होती. तिच्या दोन्ही पायांवर अगदी सरभरीत भाजलेल्या चे डाग होते. सखी त्याच्याकडे पाहून हुंडके देत रडत पाठमोरी झाली आणि आपली वेणी पुढे घेत कशीतरी बोलली,
“बघा…”


कृष्णाने जणू जड डोळ्यांनीच पाहिलं. तिच्या पाठीवर सुद्धा तसेच चटक्यांचे डाग होते. ते डाग पाहताना कृष्णा इतका तापलेला. रागामध्ये त्याच्या नसा ताठ झालेल्या. आत्ता नितीन समोर असता तर त्याने खरोखर त्याचे कुऱ्हाडीने दोन घाव केले असते इतका तो पिसाळलेला पण…. पण सखीसाठी सुद्धा तितक्याच टोकाचा तो हळवा झालेला फरक एवढाच होता की सखी हुंदके देऊन रडत होती आणि तो मूकपणे अश्रू गळत होता.


सखी त्याचा हात आपल्या दंडावरून फिरवत कशीबशी बोलली,
“तो जनावरासारखं इंजेक्शन खूपसायचा हो….”


दाटलेला आवंढा गिळत तो अश्रूपूर्ण नजरेने कसाबसा हुंकारला,
“हम्म…..”


सखी मोठमोठे श्वास घेत आपला हुंदका आवरून कशी तरी आपलं दुःख त्याच्यासमोर मांडत बोलली,
“तो माणूस नव्हता…दोन पायाचं जनावर होतं ते… जे.. जे माझ्या नशिबी आलं.. या शापित सौंदर्यामुळे…!”


तिच्या मनाची घालमेल आणि त्या आठवणींचे व्रण सहन न होऊन सखी कृष्णाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली. कृष्णाने ही लगेचच तिला आपल्या घट्ट मिठीत कवटाळलं जसं की तिच्या दुःखाला तो तिच्यापासून हाकलून लावत होता.


त्याने मिठीत घेतल्यावर सखीने रडतच त्याच्या मानेला हातांचा वेढा दिला आणि गुडघे त्याच्या छातीला लावून त्याला अगदी घट्ट बिलगली आणि तिच्या हक्काच्या मिठीत हुंदके देऊन रडू लागली.


एका हाताने तिला घट्ट मिठीत घेऊन कृष्णा मूक अश्रू गाळत तिच्या डोक्यावरून पाठीपर्यंत प्रेमाने थोपटत तिच्या त्या वेदनादायी क्षणांमध्ये तिचा सोबती झाला होता.


सखी हुंदके देऊन रडत मध्ये मध्ये बडबडत होती,
“मी त्याला कधीच माफ करणार नाही… कधीच नाही…. त्याने माझ्या… माझ्या स्त्रीत्वाचा अपमान केलाय… तो माणूस नाहीये … क्रूर जनावर आहे ते…. आमच्या व्हिडिओ काढून …. श्शी… श्शी… का मिळाला हे सौंदर्य …. शापित सौंदर्य…ज्याला प्रेमाचा स्पर्श नाही… प्रेमाने कोणी पाहिलं नाही… नकोय मला हे…..”


सखी तुटक तुटक बोलून आजच सगळी मनातील भडास काढून व्यक्त होत होती. ती कृष्णाच्या मिठीत खूप रडली. खूप खूप रडली आणि शेवटी रडून रडून त्याच्याच मिठीत झोपी गेली. झोपल्यावर सुद्धा तिचे उसासे येतच होते. कृष्णा तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिच्या दुःखाने स्वतःच घाबरून तिलाच आपला आधार करत तिला घट्ट मिठी मारून तसाच खिडकीजवळ उभा होता.


कृष्णाने तिच्याकडे पाहिलं तसं त्याच्या डोळ्यातील अश्रू तिच्या गालावरील अश्रूत मिसळला आणि ओझं होऊन वेगाने खाली घरंगळून गेला. कृष्णाने अलगद तिचा गाल पुसला तेव्हाच सखी उसासा देत झोपेत बडबडली,
“नको मला हे शापित सौंदर्य… कधीच नको!”


तिचं बोलणं ऐकून पुन्हा त्याच्या डोळ्यांतील अश्रू तिच्या गालावर ओघळले. स्त्रिया आणि सौंदर्य जणू समानार्थी शब्द पण यांना तेच नकोय!

कृष्णाने पुन्हा तिला आपल्या छातीशी घट्ट कवटाळलं आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बोलला,
“तुम्ही खूप सुंदर आहात सखी… तुमच्या इतकं सुंदर मी तर दुसरं कोणीच पाहिलं नाही आणि फक्त शरीरानेच नाही तुम्ही मनानेही तितक्याच सुंदर आहात.”


मी तुमचा सखा आहे ना… मग मीच तुम्हाला तुमच्यावर प्रेम करायला शिकवेन आणि त्या नित्याला तरं—-


त्याच्या आठवणीने ही कृष्णाच्या कपाळावरची शीर संतापाने फुगली. कृष्णा तिच्या डोक्यावरून हात फिरवत मैत्रीच्या आड सुरक्षित असलेल्या त्याच्या अव्यक्त भावनेने प्रेरित होऊन बोलला,
“तुमची शपथ सखी, तो जिथे पोहोचायला पाहिजे त्याला मी तिथेच पोहोचवणार! यानंतर तो कोणत्याच स्त्रीच्या सौंदर्याकडे ढुंकून सुद्धा पाहणार नाही. स्वतःच्या बायकोला हात लावतानाही तो घाबरेल.”


उर्वरित भाग पुढे..

© प्रियांका सुभा कस्तुरी
०९/०५/२०२४


🎭 Series Post

View all